॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सार - अध्याय दहावा ॥

सदाशिव ब्रह्म आत्माराम यांचे ऐक्य व्हावे हाच उपनिषदांचा मतितार्थ असून जो साधन-चतुष्टय संपन्न, तोच येथील अधिकारी आहे. वेदान्त हेच शास्त्र असून स्वानुभव आणि प्रबोधशक्तिसंपन्न सद्‌गुरु असणे अत्यावश्यक आहे. द्वैत निरसन हीच अनिष्ट निवृत्ति आणि अभिन्न होणे हीच इष्ट प्राप्ति असून उभयरूपे मुक्ति हेच श्रवणाचे फळ होय असे सांगितले आहे. या अध्यायांत जीवाचे मुख्य लक्ष्यरूप कोणतें आणि वाच्यरूप कोणते ? कैसे कवणा बन्धन ? जन्म-मरण कोणत्या कारणाने प्राप्त होते वगैरे शंकांचे निरसन करून जीव-ब्रह्म ऐक्य लक्षण सप्रतीत यावर निरूपण करण्यांत आले आहे. या दृष्टीने हा अध्याय महत्त्वाचा आहे.

जीवाचे मुख्य रूप प्रत्यगात्मा आणि शिवाचे मुख्य रूप परमात्मा हे असून नामरूपाचा त्याग केला असतां विचारवंत यांशी एकरूप होतात, ऐक्य पावतात. (१९) ईश्वर ब्रह्म हे सर्वांस पटते पण जीव ब्रह्म कसा होईल ? रंक राजा कसा होईल ? रंकाने स्वतःस राजा म्हणणे म्हणजे शिक्षेस सामोरे जाणे होय. ईशाची सर्वज्ञता, सर्वव्यापकता कुठे आणि एकदेशी, किंचिदज्ञ जीव कोठे ? ईश्वराच्या कृपेने सलोकता वगैरे मुक्ति मिळवाव्या हे बरे असे लोक म्हणतात.

एखाद्यास अहंब्रह्म अशी प्रतीति आली तरी त्याचे ज्ञान दृढ नसेल तर तोही चळेल. अतिदृढ निःसंशय वृत्ति राहावी म्हणून निरूपलेचि निरूपावे, की ज्यायोगे अखंड एकरसी तृप्ति तिन्ही अवस्थेत राहावी. निरनिराळे संप्रदाय आपले उपास्य तेच ब्रह्म असे म्हणतात. मुख्य ब्रह्मरूप जाणत नाहीत, मायिक ईश्वरत्व जाणत नाहीत. अन्योन्याध्यास उगीचच करतात. आपले उपास्य ब्रह्म इतर सर्व अब्रह्म मानतात. इतरांचे राहो जेथे जे जे नियम व्रत वगैरेंचे वर्णन असेल, तेथे तेथे तेच उत्तमश्रेष्ठ इतर अधम असे वर्णन करावे हा श्रीव्यासांचा स्वरूपभावच आहे हे जाणून साधकाने विचारपूर्वक वागावे.

किंचितज्ञ जीव साधनेनेही कल्पांती ब्रह्मरूप होणार नाही, अहं ब्रह्म हे साधन जीवास योग्य नव्हे असे मूढमतींचे बोलणे मनावर घेऊं नये. गुरुशास्त्र विचारे अहंब्रह्म प्रतीति दृढ करावी. यानंतर देह मरण पावला की जीव कोठे जाऊन राहतो ? जीव आभासत्त्व कसे पावला ? देहामध्ये कोठे राहिला ? देह त्यागितां कोठे गेला की देहासवें निमाला ? एकदां मडके फुटले की आकारास येत नाही तसे जीवाचा अंत झाला की सर्व संपते असे मूर्ख मानतात. एक देह कर्मयोगे निमाला, दुसरा प्राप्त झाला नाही तोपर्यंत काय गती ? मी ब्रह्म आठवावे तर द्वैत होते न आठविता अज्ञान राहते तरी साधकाने काय करावे ? इत्यादि श्रीरामांचे प्रश्न ऐकून शिवगुरु अत्यंत प्रसन्न झाले आणि रामास कडिये घेऊन नाचू लागले. कांही वेळ द्वैतभावच निमाला असे सुरेख वर्णन श्रीहंसराजांनी केले आहे. ते वाचून एकनाथी भागवतातील श्रीकृष्ण-उद्धव प्रेमाची आठवण झाल्याखेरीज राहात नाही.

शिवगुरु सांगतात की एकच सूर्य विहीरीत आणि घटांत प्रतिबिंबित होतो. घट तशी अविद्या बोलिजे विहीर तशी माया ओळखावी. त्या दोन्हीतील प्रतिबिंबे ती जीवन व ईश असे जाण. सूर्य जसा दूर आकाशांत तसा आत्मा ब्रह्म अविनाशी सत्यत्वें अधिष्ठान दोन्हीस प्रतिबिंब जीवा शिवा (११५) म्हणून जीवाचे व शिवाचे निजरूप एकच आहे. विहीर मोठी कल्पिली म्हणून विद्या मोठी. घट लहान म्हणजे अविद्या धाकुली ! घागरीतले जल गढूळ तशी अविद्या मळयुक्त, विहीरीतील जल निवळ तशी विद्या निर्मळ. विहीरीतील प्रतिबिंब लखलखीत तसा ईश्वर सर्वज्ञ तर जीव किंचितज्ञ ! लोकरीति की शास्त्ररीति यास साधकाने महत्त्व देऊ नये. ज्ञानसंविति तरणे ज्यास असेल त्याने ऐक्य संपत्ति प्राप्त करावी. प्रतिबिंबि त्यागून मूळ् बिंब घ्यावे. ईश्वराचे साकार ब्रह्मांड, जीवाचे साकार नाना पिंड त्यागावे. माया अविद्येचें बंड मोडून टाकावे.

जीव ईश्वर दोन्ही प्रतिबिंबेच आहेत पण दृष्टान्त तितुका एकदेशीच असतो, म्हणून दुसरा दृष्टांत देतात. एकच आकाश परिपूर्ण असते. पण मेघाकाश आणि घटाकाश भिन्न भासते. घट फुटला तरी आकाशाचा नाश होत नाही, तसा पिंड मेला असता आत्मा अविनाशच असतो. मेघ गेला की आकाशी आकाश मिळून जाते. मेघामध्ये जे जल असते त्यांत आकाशाचे प्रतिबिंब. तसे मायेमध्ये सर्वज्ञत्व भासते पण तेच मायिक ईश्वरत्व होय. माया उपाधि लोपली की ईश्वरत्व लय पावते. एवं ईश्वराची रूपे दोन, एक मायिक आणि एक अविनाशी परिपूर्ण. मिथाला वाच्य म्हणतात आणि सत्यास लक्ष्य म्हणतात.

घटात जल घातले, की त्यात नक्षत्रासह आकाश बिंबते तसेच पिंडी वृत्तीचे स्फुरण झाले त्यांत चैतन्य उद्‌भवले की त्यासच जीव म्हणतात. बुद्धि असे तोपर्यंत सद्‌भाव उमटतो. घटांतील जल सांडले की प्रतिबिंब लोपते. तसेच बुद्धिचा अभाव होतांच जीवत्व हारपते. घटाकाश होते ते जल असतां आणि नसतांही तसेच राहिले. तसे व्यापक ब्रह्म राहतेच. ’वाच्य तेची जीव चैतन्य । लक्ष्य तेचि कूटस्थ सामान्य ॥’ कूटस्थ निर्विकारी असतो. ईश्वराची रूपें दोन तशीच जीवाचीही दोन, या मेघ-घट दृष्टांताच्या योगे जाणावी. ईश्वराचे लक्ष्यरूप पूर्णब्रह्म. जीवाचे लक्ष्यरूप कूटस्थ आत्माराम. ही फक्त नामे विषम आहेत. रूप एकच असते. प्रत्यगात्मा ब्रह्म व परमात्मा एकच हे जाणतो तोच ज्ञाता होय.

तिन्ही काळी आत्मा असतो हा सर्वांचा स्वानुभव आहे. हा सदोदित आहेपणा हेच परमात्म्याचे रूप आहे. मी नव्हतो असे क्षणभरसुद्धा कोणाला वाटत नाही. एवं आदि मध्य अवसानी आत्मा पूर्णपणे असतो. हे सद्‌रूप जाणून घ्यावे. चिद्‌रूप म्हणजे ज्ञानरूप कसा ते ऐका. सर्व अवस्थांना आत्मा जाणतो हेच चिद्‍रूपत्व होय. आत्म्याच्या ठिकाणी स्वगत, सजातीय, विजातीय भेद नाहीत. तसेच कालादि परिच्छेदादिही नाहीत. त्रिविध भेदावीण आत्मा निर्मळ परिपूर्ण अनंत आहे, याचप्रमाणे विचार करावा.

आपणाकरिताच सर्व काही प्रिय वाटतात. ’तस्मात् सर्वाहूनी तत्त्वता । आपुली असे प्रियतरता ॥२१०॥’ देह प्रिय म्हणावा तर प्रसंगी अवयव, डोळे, प्राण देऊनही सुखी व्हावयास पाहतात. ’सुखदुःखावीण स्वानंद । आत्माच एक आनंदकंद । यास्तव ब्रह्म आत्मा अभेद । तिन्ही काळी ॥२१८॥’ मी नित्य, विशुद्ध, सर्वात्मा, निर्लेप, निरंजन, सर्वधर्मविहीन, मनाने अग्राह्य असा आहे. आरशाशिवाय आपले मुख आपणांस दिसत नाही. तसे स्वतः चिद्‌रूप स्वतः सिद्ध असून बुद्धिशिवाय स्वतःस पाहू शकत नाही. ’पहावे आपणासी आपण’ हाच राजयोग असून अहंब्रह्म हे विसरू नये. रात्रंदिवस हेच साधन करून त्रिविध प्रतीतीने आपली आपण अनुभूति घ्यावी.

शिवगुरु रामांस सांगतात की शिव व राम हे दोघेच गुरूवीण आत्मज्ञानी आहेत. गुरुपरंपरेने ज्ञान पावतात. त्यांच्यांत आणि आमच्यांत रतिभरही भेद नाही, जसा दिव्यादिव्यांत नसतो (२५३). जीव ब्रह्म समान आहेत. भिंतीवर काढलेल्या चित्रांत कुणी एक सुखासनीं बसला आहे तर एक त्याच्या पायाशीं बसला आहे असे दिसत असले तरी ’भिंतीमाजी उणीवता झाली आहे का ?’ (२६२) ईश्वर जीव हा भेद तोंवर असतो ’जंव पावला नाही ब्रह्मभावना । ऐक्य होता अपरोक्षज्ञाना । कोण ईश्वर कोण जीव ॥२६८॥’

शिवगुरु म्हणाले की मला कोणी जाणूं शकत नाही. मीच सर्व लोकांचा ज्ञाता आहे. तेव्हां राम म्हणतात की साधक प्रश्न विचारील की मन वाणी जाणू शकत नाहीत मग अनुसंधान कसे राखावे ? शिवगुरु सांगतात - मनवाणीस कळत नसले तरी मनवाणी त्यावाचून असत नाहीत. निरतिशयानंद जो आत्मा तोच मी असा निश्चय करावा. मनवाणीस कळत नाही हे खरे, पण मनास व वाणीस हाच अनुदिनीं छंद लावून घ्यावा. मनवाणीस मी अगोचर असलो तरी मी सर्वकाळ आहेच असे मनास ध्यान लागले की असंगत्व प्राप्त होते. मनवाणीचे पूर्वीचे व्यापार त्यागावे व मी असंग हे ध्यान निरंतर, जारस्त्रियेप्रमाणे उत्कटतेने करावे. त्याविषयींच बोलावे, त्याविषयींच ऐकावे व एकटे असतां मननही याचेच करावे. असे दृढ अनुसंधान म्हणजेच ध्यान, म्हणजेच निदिध्यासन. वाणी मनास कळले नाही म्हणून आपले अस्तित्व व ज्ञान थोडेच लोपते ? आहेपणा, जाणतेपणा आणि सुखरूपता सदैव असतेच. पण आठवण असली की पूर्ण समाधान असते. जागे झाल्यापासून झोपेपर्यंत, खातापिताना, काहीही करताना याचे स्मरण ठेवावे. या देहांत प्राण असेतो हे स्मरण सोडणार नाही असा निश्चयच करावा. हळूहळू देहबुद्धि जाईल हे निश्चित. देहबुद्धि जाईल, येईल असे वारंवार होईल म्हणूनच अहंआत्मा हे सारखे स्मरले पाहिजे. म्हणजे देहत्व नष्ट होऊन आत्मत्त्व दाटेल आणि सर्व ओहटून आनंदाचा ओघ लोटेल, असे श्रीहंसराज सांगतात. यांत त्यांचा स्वानुभवच प्रगट झाला आहे यांत कांही शंका नाही.

सारखे असंगत्त्वाचे भान ठेवले की कर्ता भोक्ता ही भावनाच लोप पावते. अहं ब्रह्मास्मि अनुसंधान धरले की विश्व, तैजस, प्राज्ञ यांच्या प्रमाणेच देहबुद्धीचे लक्षणही निपटून जाते. हळूहळू ब्रह्मबुद्धी वाढविणे, देहबुद्धी त्यागणे हे अति दृढ झाले की निजांग ब्रह्म अपरोक्ष होते. एकलाच एक असल्यावर भय राहात नाही. द्वैत आले की भय आले. सिंह जसा पाण्यांतील आपलेच प्रतिबिंब पाहून भ्यायला आणि ओरडून उडी घालून मेला, तसे. सर्व भूतांच्या ठायीं मीच आहे तर कोण कोणाची निंदा करणार ? स्थूल बुद्धीचे पाहणे उपयोगास येत नाही, सूक्ष्म बुद्धीने अभ्यासाने ब्रह्मात्मबोध होतो.

ईश्वर हे सविशेष ब्रह्म असून जीवाच्या ठायी स्वप्नदृष्टि व्हावी तशी ईश्वराच्या ठायी ईशसृष्टि आहे. साधकाने जीवसृष्टि व ईशसृष्टि समान हे जाणले पाहिजे. स्वरूपाचे न कळणे हीच जीवास आवरणशक्ति असून मी जीवरूपे देहाकारास येतो. असे वाटणे ही विक्षेपशक्ति आहे. ’तैसे लिंगशरीरी प्रतिबिंबले । ब्रह्मात्मरूप त्या जीवास आले । तरी तयासे काय सत्यत्वें झाले । विकार उपाधीचे ॥४३७॥’ मी अधिष्ठान आहे म्हणूनच जीवत्वाचा आरोप होतो. तसाच अविद्यावश मी लिंगदेही राहतो असे म्हटले जाते. परब्रह्मीं माया स्फुरली, तीच चंचलपणे सतरा प्रकारी विभागली गेली. पंचप्राण, पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये व मन आणि बुद्धि या सतरा तत्त्वांना मिळून लिंगशरीर म्हणतात. अहंकार बुद्धींत स्फुरतो म्हणून ते दोन्ही मिळून एक आणि मनच चिंतनात्मक व्यापार करते म्हणून मन, चित्त मिळून एक अशी गणना केली आहे. (म्हणून कोठे १९ तत्त्वे मानतात) ’ज्ञान अज्ञानाचा निर्धार हा कूटस्थाचा प्रकाश’ अशी किंचित स्फूर्ति स्फुरते व मावळते म्हणून जीवास अल्पज्ञ संज्ञा आली. स्वप्न, जागृतींत स्फूर्ति उठते आणि मावळते. सुषुप्तीत तिचा अभाव असतो. ज्ञान मात्र उरते. तोच आत्म्याचा प्रकाश होय. जग असेतो प्रतिबिंब असते, तसे बुद्धि असेतो जीवाचे राहणे. बुद्धि अभावी नाश होतो.

वृत्तिसहित जीवास क्षेत्रज्ञ म्हणतात. जडास जीववितो म्हणूनही जीव. देह क्षेत्रास जाणतो म्हणून क्षेत्रज्ञ तर देह पुरीमध्ये राहतो म्हणून पुरुष म्हणतात. अज्ञानाने निजस्वरूपापासून भिन्न पडला तेव्हांपासून मीपणा घेऊन कर्मे करतो या नांव अनादि. असंख्य वेळा लय होतो तरी देहाभिमान घेऊन कर्मे करीतच असतो म्हणून पापपुण्यही अनादिच. पुण्याचे फळ सुख, पापाचे फळ दुःख अशी ही दोन्ही फळे जीव अज्ञानामुळे भोगतच असतो. कोणत्याही देहात प्रतिबिंबित देहयुक्त असतो. अशी सतरा तत्त्वांची सामग्री व पापपुण्ये गाठीं बांधून अज्ञान असेतो पर्यंत हिंडतो. सुषुप्तीत मात्र लिंगासह देहघात होतो पण जागृतींत परत कर्ताभोक्ता होतो. पण हे जाणे-येणे यथार्थ नाही. वास्तविक जीवास सुद्धा हे काही स्पर्शत नाही. मग मुख्य प्रत्यगात्म्यास कसे स्पर्शेल ? वृत्तीचे धर्म वृत्तीच भोगते. अन्योन्याध्यास कल्पितो व अज्ञानामुळे आत्मा नाहीच मी देह आहे; आत्मा जड मीच सर्व जाणतां आत्मा दुःखरूप मी सुखरूप वगैरे भावून अस्ति भाति प्रियत्व देहास मानतो.

या नंतर योगमार्गाचे वर्णन करून निरनिराळ्या चक्रांचे वर्णन केले आहे. पण ’हे योगशास्त्राचे मत । यासी म्हणो नये शुद्ध वेदान्त । देहबुद्धि त्यागावया निश्चित । विवरूनी जाणावे ॥५४१॥’ असे सांगितले आहे. नंतर जीव केवढा आहे ? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. केशाग्राचा सतांश करावा. त्याचाही शतांश निवडावा. इतुका सूक्ष्म जीव जाणावा असे म्हटले आहे. अणु, परमाणु, त्रसरेणु पेक्षाही जीव सान आहे. पण तो एकदेशी मानूं नये, अनंतत्त्वे वर्णन करतात. अवयव नाही, अमुक असे मनानेंही कल्पिता येत नाही. म्हणून सूक्ष्म असे म्हटले आहे. पण लोकांत अग्नि तसे सर्व वृत्तींना व्यापून असतो. सूक्ष्म असून सर्वव्याप्ती आहे. बहात्तर सहस्र नाड्या शरीरांत आहेत असे योगशास्त्र सांगते. सुषुम्ना मुख्य असून हिच्यामार्गे जीव सुटतो असे म्हणतात. सुषुम्नाद्वारा ब्रह्मरंध्र भेदून क्रममुक्ति मिळते, ब्रह्मलोकी जाऊन राहतो. तरी साधकांनी याप्रकारे क्रममुक्तिवर विसंबून न राहतां याच देही मुक्त व्हावे असे पूज्य श्रीहंसराज सांगतात.

GO TOP