॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सार - अध्याय पंधरावा ॥

आपणावर आणि देवावर अशी भक्ति विभागली गेली तर ती कर्मभक्ति व्यभिचाररूप होते. भिन्नपणा ही विभक्ती होय, तिला भक्ति कोण म्हणेल ? गुरुदेवांवरील प्रीति हिलाही भक्ती नांव आहे. पण आपल्यावरची प्रीति सुटून ती देवावर किंवा गुरूवर दंडायमान अखंड कशी जडेल ? बहिरंगद्वारा अंतरंग कसे साधेल असे प्रश्न येथे उपस्थित केले आहेत.

ज्याने त्याने आपल्या अधिकारानुरूप साधन करावे. थोराने थोर, अल्पाने अल्प, ज्ञानी पूर्ण समाधानी ऐक्यबुद्धीने सुखांत डोलतात. ते सुख इतरांना लाभले नाही तरी त्यांनी दुःखातच बुडावे काय ? त्यांनी अल्पस्वल्प सुख मिळवून भोगावे. निषेध कुठेच केलेला नाही.

साधकाला ध्यान करावेच लागते. निर्गुण ध्यान घडत नसेल तर श्रवण मनन करावे. विवेकवंतास चतुष्टय साधने संपादावी लागतात. अधिकारी नसेल त्याने गुरुसेवा करावी, देवाचे भजन करावे. अंतरंग आवडी उपजत नसेल तर बहिरंग आचरावे. अभेद भक्ती घडत नसेल तर आवडीने कर्मभक्ति करावी. प्रथम अंतरंग आवडी नसेल तरी बहिरंगाने ती चित्तात निर्माण होते. बहिरंग म्हणजे देहाची क्रिया, अंतरंग म्हणजे मनाला ज्याची आवड असते ते.

वाणीच्या भजनाला उभयात्मक म्हणावे. याप्रमाणे कायिक, मानसिक, वाचिक, तिन्ही प्रकारे भजन प्रीतीने करणे आवश्यक आहे. यालाच कर्मभक्ति म्हणतात. या प्रीतीरूप भक्तीतही दोन प्रकार आहेत. विवेकी गुरूला भजतात तर मूढ लोक अन्य देवांना भजतात. ज्यास त्वरीत तरावयाचे असेल त्याने गुरुभजन करावे. त्याचेही तीन प्रकार आहेत - कायिक, वाचिक आणि मानसिक कायेने गुरुसेवा करावी, वाणीने गुरुनाम घ्यावे आणि मनाने गुरुमूर्तीचे ध्यान करावे.

प्रश्न : अज्ञान्याला ईश्वरार्पण कसे घडते ? तर सत्त्वगुण उद्‌भवला की घडते. आळस प्रमादाचा त्याग करून अनुसंधानात तत्पर झाले पाहिजे म्हणजे तमोगुण जातो. देहसुख त्यागून बंधन सुटावे अशी इच्छा ठेऊन होणारे प्रारब्धावर सोडले की रजोगुण जातो. मग अंतरातील दुराचार नष्ट होतो व सदा सत्कर्माची आवड निर्माण होते व जे करतो ते शिवार्पण करू लागतो. मी कर्ता अशी भावना उठली की मनास फटकारतो की मी गुरुवंचक होऊ नये. मी काया वाचा मन गुरुचरणी अर्पण केली आहेत, तर हे मना, तू कर्तृत्व घेतलेस तर नरकात जाशील. याप्रमाणे मनास दंडून केलेले सर्व शिवार्पण करतो.

विवेकी सर्व शिवार्पण करतो ते गुरुकृपेसाठी. त्याचे विभूति धारण म्हणजे संत विभूतिंचा सत्संग. प्रांजळ गुरुकृपा केव्हां होईल हीच तळमळ त्यास लागते. सकळ भौतिक हे भस्मच आहे असा भाव असतो. सर्व कर्मास उबगून तो संतसंग करतो. संतमेळींच शिवास पाहतो. विवेकीही पंचाक्षरी जप करतो, पण भाव निराळा असतो. गुरुकृपेच्या इच्छेनेच तो सर्व करतो. रुद्र म्हणजे एकादश, म्हणजे आदिअंती एक निर्विशेषच (११). त्याचा अक्ष शब्दे वाणीस घोष लागणे हेच त्याचे रुद्राक्षधारण किंवा अक्ष म्हणजे सर्वेंद्रियी सद्‌गुरूच विषय होणे हे होय. विवेकीस विज्ञान सोहळे आवडतात. सर्वत्र अर्थ पाहतो म्हणजे ब्रह्मभावना करतो. मूढ जे शिवार्पण करतात ते अनंतपट फळासाठी असते. ते भ्रमाने स्वतःस व प्रतिमेस चर्चितात. सर्वदा कंठी, शिरी रुद्राक्ष धारण करतात, पंचाक्षरी जप करतात. ते सकाम असले तरी शिवास आवडतात. जे भस्मी शयन करतात तेही शिवास आवडतात. पण मूढाचे इंद्रियदमन म्हणजे बाहेर इंद्रिये कोंडतात पण मन सैरा विषयांकडे धावते असे असते. मूढ रुद्राचे पठण करतो पण फक्त प्रतिमा किंवा लिंगाच्या ठायीं शिवभावना असते. मूढही अनन्य असतो, पण सकाम असतो. अशा दोघांत जमीन अस्मानाचा फरक आहे. बहिरंग, अंतरंग दोन्ही असेल तर तोही निश्चितच अधिकारी होय. मात्र कामना नसावी. काम्यभक्ति करणारा परमार्थास अधिकारी नसतो.

यानंतर नवविधा गुरुभक्तीचे वर्णन केले आहे. कायिक सद्‌गुरुसेवा आणि अनुदिन दास्य या योगें पादसेवन, अर्चन आणि वंदन अशी तिन्ही प्रकारे भक्ती घडते. कायिक, वाचिक गुरु भजनाने श्रवण, कीर्तन-भक्ति घडते, व मानसिक ध्यानाने स्मरण-भक्ति घडते. अशी त्रिविध भक्ति घडते तेव्हां त्यांत सख्य आणि निवेदन-भक्ति घडतेच. सख्य भक्तिपर्यंतच्या भक्ती ह्या अवर आहेत. निवेदन भक्ति परभक्ति, मदर्पण भक्ति ही परतर भक्ति, तर ऐक्यभक्ति ही अनिर्वचनीय आहे. अधिकार प्राप्त झाला नाही तरी शैवदीक्षा सोडूं नये. फलत्यागाचे उपाय करावे आणि सद्‌गुरूचे पाय सेवावे म्हणजे क्रमशः अधिकार प्राप्त होतो. गुरूशी अनन्य असावे. शुद्धवेदान्त असलेले ग्रंथ श्रवण करावे. रुद्रामध्ये, नमक चमकादिमध्ये सर्व रुद्र असेच वर्णन आहे. विराट रूपाचे वर्णन सुक्तेंही करतात. सर्व उपनिषदें मननासहित पठण करावी. ॐ स्वयंभू एकाक्षर ब्रह्म वेदांचे मूळ, सर्वोपनिषदसार आहे. दह्यांतून घृत निवडावे तसे ॐकार ज्यास भावला तो जन्म मरणांतून सुटतो. नंतर ॐकारात चारी वेदांसह सर्व विश्व कसे सामावले आहे याचे सविस्तर वर्णन केले, ते विस्तार भयास्तव देतां येत नाहे. येथे हा अध्याय संपतो.

GO TOP