॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सार - अध्याय आठवा ॥

या अध्यायांत मुख्यतः देहाची उत्पत्ति, सर्व अवस्था यांचे चिळस उपजेल असे वर्णन केले आहे. वैराग्य प्राप्ति व्हावी हा उद्देश आहे. गर्भाची उत्पत्ति, त्याची प्रत्येक महिनांतील गर्भस्थिति, जन्माच्या वेळच्या यातना याचे सविस्तर वर्णन केले आहे.

वृक्षरूपाने शिवगीतेचे वर्णन केले असून अर्थरूप एकच खोड आहे, सोळा अध्याय या सोळा मोठ्या शाखा असून आठशे श्लोक ह्या सूक्ष्म शाखा आहेत. पदे देठ, अक्षरे पाने असून प्रत्यगात्मा ब्रह्म हा एकच रस व्यापून असून परम मोक्षरूप हे एकच फळ सुकल्पक साधकांना प्राप्त होते. कुकल्प अनधिकारी विषयफळे वेचतात. ज्ञान होण्यासाठी विरक्ती हवी ती दोषदृष्टीनेच उपजते म्हणून सर्व विषय दोषानेच व्यापलेले असतांना विषप्राय अन्नपण जीवांना ते गोड वाटतात. विष खाऊन मराल म्हटले तरी ऐकत नाहीत, म्हणून शिवगुरूंच्या मुखाने वर्णन केले आहे.

सर्व अवस्थांचे वर्णन करून शेवटी ’जो त्रिविधतापे चित्ती पोळला । अनुतापे अवघा त्यागचे केला । तोचि मुमुक्षु अधिकारी झाला । मोक्षश्रियेचा ॥२००॥’ असे म्हटले आहे. पक्षी झाडावर एकत्र येतात नंतर दाही दिशांस जातात, तसा हा प्रपंच आहे. तेथे माझे कोणास म्हणावे ? म्हणून मुमुक्षूने ’मी माझे’ याचा त्याग करावा किंवा सर्वच माझे म्हणावे. एकदेशीत्व घेतले की बंधन येते. ’अनंत ब्रह्मांडात्मक मी एकला । माझेच म्हणे सर्व नामरूपाला । असे तादात्म्य असे जयाला । तो निश्चयेशी मुक्त ॥’ म्हणून समष्टिमय अहंकार घ्यावा. जो मरतो तो परत जन्मतो, जन्मला की परत मरावेच लागते. अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय या चक्रापत्तितून सुटका नसते. अज्ञानाचा नाश केवळ ज्ञानानेच होतो. म्हणून गुरुकृपा वैद्याकडून ज्ञानमात्रा औषध घ्यावे पण वैराग्य पथ्य हवे. द्वैतत्याग हेच मुख्य वैराग्य लक्षण आहे असे शेवटी सांगितले आहे.

GO TOP