॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सार - अध्याय बारावा ॥

यांत प्रश्न विचारला आहे की उपासना विधि, देश, काळ वगैरे सर्व सांगा.

बहिरंग साधन - मंत्रतंत्रादि विधिविधान वगैरे निष्प्रयोजन असे श्रुतीच सांगते. ही खरी उपासनाच नव्हे. मनाचे अधिष्ठान ते उपास्य होय, त्यास जाणून त्याचे अनुसंधान राहणे ही मुख्य उपासना आहे. अशी मुख्य उपासना त्यागिली आणि बहिरंगास प्रतिष्ठिले. वर वर रुचिकर बोलून लोकांना सकाम करतात बहुतेक शास्त्रे ! क्रियारूप उपासनेला बरेच निर्बंध असतात ते त्यागार्थ बोलावे. बहिरंगरूप त्यागार्थ हे मूळ शिवगीतेत म्हटलेले नाही. हे श्रीहंसराजांचे मत आहे. ते म्हणतात, मुख्य म्हणजे बहिरंगाचा त्याग घडावा आणि अंतरंग सुदृढ जडावे म्हणजे असंग होऊन ज्ञान प्राप्त होते.

शिवगुरु सांगतात की अन्य देवांना भजतात ते मलाच भजतात. कारण मीच सर्व देवांच्या ठायी अधिष्ठान आहे. पण मला न जाणतां जे अन्य देवांना भजतात ते अन्यथा फळ लाभतात. अन्य देव भजकही माझ्याहून भिन्न नाहीत. अज्ञानाने जाणत नाहीत. देहबुद्धी घेऊन स्वतःस किंचितज्ञ मानतात. जे श्रद्धापूर्वक अन्य देवतांना भजतात ते माझेच यजन करतात पण अविधिपूर्वक. त्यांना कुठल्याही देवांना भजले तरी मीच त्यांना फळ देतो. सर्व क्रियांचा भोक्ता उपास्य मीच आहे. पूजकाची भावना सर्वात्मक देव अशी नसते. पण माझी भावना अशी आहे की पूज्यपूजक मीच अविनाशी एकला आहे. अज्ञ लोक देवास एकदेशी मानतात व एका देवतास सोडून दुसर्‍यास भजूं लागतात. हे फलाशेचेच भक्त असतात, केवळ फलास्तव भजतात. देवाचे प्रेम त्यांना नसते. मग त्यांना ठकवून मी त्यांना तसेच नाशवंत फळ देतो. त्यांनी प्रारब्धानुसार मागितले असेल तर ते देतो नाहीतर दुसरे मागा म्हणतो. प्रारब्धासारखे तर होतच असते, पण त्या मूर्खांना कळत नाही की आम्हांस ठकवित आहे. देवास एकदेशी मानतात ते उपास्य आणि उपासक व्यर्थ होत. मला यथार्थ ओळखून आपणांसकट जनीं वनीं मलाच जे पाहतात, त्यांनी पूजाविधीने मला पूजले नाही तरी मी पूजिला जातो. माझे निर्विशेषत्व न कळतांही जो मला सर्वांभूती पाहतो आणि परोक्ष ऐकून मला उपासतो तो सगुणोपासक ब्रह्मादि तृणापर्यंत मी शिव परब्रह्म अभंग आहे असे जाणून समुद्रावर तरंगाप्रमाणे होऊन जे विचरतात, त्यांच्यावर मी प्रसन्न होऊन त्यांना मुक्ती देतो.

विधि अविधि न पाहता जो सर्वांच्या ठायी मलाच पाहतो आणि आपण स्वतः मात्र दास्यत्वे वेगळा राहतो तो सगुणोपासक अहोरात्र अनुसंधानरूपाने मला उपासितो. त्यास बहिरंगाची आवश्यकता नाही. पण समजा लोकरीतीने करत असला तरी विधि अविधि न बघतां मी प्रसन्न होतो. त्याने दिलेले सर्व मी गोड मानून घेतो. मी गुरुरूपे त्यांना ऐक्यबोध करून मोक्ष प्रदान करतो. मुक्ति त्यांची दासी होते. असा जो कोणी अंतरंग भक्त असेल तो कर्मभ्रष्ट, आचारभ्रष्ट किंवा प्रारब्धयोगे कुमार्गी झाला तरी तो सर्वश्रेष्ठच होय. त्याची कुणी निंदा करू नये. तो प्रारब्धाच्या करणीने सुरापानी, ब्रह्महत्यारा जरी असला तरी तो देहकर्मी अलिप्त असतो. त्याने जेव्हां मीपणा मला वाहिला तेव्हांच तो असंग झाला. अशा रीतीने जो मदैक्य भावास प्राप्त झाला त्यास साधुत्व मानावे.

यानंतर प्रश्न केला आहे की अशी स्थिती प्राप्त होण्यास त्याने मनांत कसे ध्यान करावे ते सांगावे. त्याचे उत्तर देतात - सोहं आत्मा या ध्यासाने मी आत्माराम सत्, चित्‍घन, आनंदरूप अशी त्रिविध प्रचीति अंतरांत घेऊन मग ब्रह्माण्डीही जो पाहतो असा ’पहातसे आपणासी आपण’ या नांव अनन्यधी’ डोळ्याने दृश्य पहात असला तरी वृत्तीत द्वैतभाव उद्‌भवत नाही तोच पूर्ण ज्ञाता होय. नंतर मीपण त्यागून अहंब्रह्म स्फुरण होऊं लागले की ती कर्तृतंत्र उपासना होय.

याप्रमाणे ध्यान, ज्ञानही निरूपिले. ते सगुण व निर्गुण हेही साधकांना सांगितले. यांत ज्ञाता किंवा ध्याता यांची निर्गुणी किंवा सगुणी अनन्यता असली की प्रारब्धवश घडलेली देहकर्मे त्यांस स्पर्शही करीत नाहीत. ज्ञानी किंवा निर्गुणोपासक यांना कर्मे स्पर्शत नाहीत. सगुणोपासकाचे मीपण जरी गेलेले नसले तरी मी शिव सर्वात्मा जाणून त्याने बुद्धीने ते मला अर्पण केलेले असते म्हणून तोही कर्माने लिप्त होत नाही व मी पुढे त्यास ऐक्यज्ञान देतो. तो सगुणाच्या प्रेमांत पडून गुरुरूपाशी अथवा ध्येयमूर्तीशी एकरूप होतो व जिकडे तिकडे तेच रूप पाहतो. दोन्ही साधनांत अंतरंगता मुख्य आहे.

बहिरंग उपासना चार प्रकारची आहे १) संपतविधि २) आरोपविधि ३) अध्यासविधि आणि ४) संवर्गविधि. संपतविधि म्हणजे कळल्याशिवाय कल्पणे उदा० वैराग्यसंपन्न व्यक्ति अथवा राजा यांची शिव जाणून उपासना. आरोपविधि म्हणजे पाषाण, मृत्तिकादि मूर्तींच्या ठिकाणी ईश्वरभावना. अध्यासविधि म्हणजे सारूप्यता नसतां बुद्धिपूर्वक आरोप करणे; उदा० शाळिग्रामी विष्णु, बाणाच्या ठिकाणी शिव इत्यादि. संवर्गविधि म्हणजे यज्ञाच्या अग्नीच्या ठिकाणी सर्व देव कल्पून आहुति देतात. किंवा योगाभ्यासांत ब्रह्माण्डी वायु चढवून सर्व देवता संपूर्ण शून्यांत आहेत असे मानतात.

सर्वात्मभावे देवाचे अनुसंधान हेच अंतरंग साधन. सर्वांची ज्ञानस्थिती एकरूप असते. सजातीय, विजातीय तसेच सर्वांचे ज्ञान सारखेच असते. शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श इत्यादि अंतरंग साधनेची ही अंगे आहेत, पण आधी बहिरंग साधनेचे प्रकार वर्णिले आहेत. याज्ञिक, शाळिग्रामादि पूजणारे यांचा भर बाह्य थाटमाट यावरच असतो. नानाव्रते, अनुष्ठाने करतात पण लोकांची निंदा करतात. पर्वस्नान, सिंहस्थ, कन्यागत इत्यादि करून देह मात्र शिणवितात. योगदेखील कुण्डलिनी आदि कर्मरूपच आहे. अष्टांग साधने, प्राणायामादि करतात. कुणी म्हणतो प्रकाश दिसतो, कुणी म्हणतो दशविध नाद ऐकू येतात. योगसामर्थ्याचे अनेक प्रकारे प्रदर्शन करणारे लोक, नौति, धौति इत्यादि करणारे लोक नाना प्रकारचे ढोंग करतात पण अवघाचि बहिरंग. सत्यमिथ्या निवडणे नाही आणि देहबुद्धि उलट बळकट करतात. श्लोक १७ वरील टीका (ओवी ३१० ते ४१७) इतकी विस्तृत असून सर्वांवर कठोर ताशेरे ओढले आहेत. पंढरीचे वारकरीही यांतून सुटलेले नाहीत. मूळांत नसतां श्रीहंसराजांनी लोकजागृतीच्या हेतूने हा विस्तार केला असावा. ब्रह्मा, विष्णु, शिवादि प्रसन्न झाले तरी आम्हांला गुरु भेटवा आणि ज्ञान देऊन मायेचा निरास करावा हेच मागावे असे म्हटले आहे. बहिरंगाने चित्तशुद्धि होत नाही. कर्माने फळ सिद्धि होत नाही. म्हणून ज्ञान व्हावे हीच इच्छा करणें हीच मुख्यतः हृदयशुद्धि होय असे शेवटी सांगतात.

श्रीहंसराज सांगतात की अंतरंग साधने आणि बहिरंग साधने यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. बहिरंग साधनांत उत्तम देश आवश्यक तर अंतरंग साधनांत सत्संग हाच उत्तम देश. बहिरंग साधनेंत प्रातःकाळ, स्नान, सोवळे, पूर्वोत्तर मुख करून बसणे, मौन, उदंडक्रिया यांची जरूरी तर अंतरंग साधनांत मनाचा संतोष व फक्त श्रवण-मनन यांची आवश्यकता असून स्नान सोवळे यांचे महत्त्व नाही. येथे असो भलतैसा - असे कुठल्याही स्थितीत चालता बोलता चित्त त्यांत रमणे आवश्यक आहे. निरहंकाराने गुरूंना आवडे ते पुसावे. बहिरंग साधनेने अहंकार मात्र जोपासला जातो.

GO TOP