॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सार - अध्याय तिसरा ॥

ज्याचे चित्त कामक्रोध पीडित असते त्यास हितकर वचन सत्य असले तरी रुचत नाही. जसे विरक्ति उपजतांच संचारास जावे हे गोड वाटत नाही. प्रजार्थ ऋतुकाळी स्त्रीगमन करून पुत्र झाल्यावर स्त्रीस मातेसमान मानावे हे वचन कोण ग्रहण करील ? मरणाराने औषध घेतले नाही तर वैद्य तरी काय करणार ? रावण वधाचा उपाय श्रीरामाने अगस्तिंना विचारला, तेव्हां अगस्तिंनी पार्वतीपती शंकरास शरण जाण्यास सांगितले. येथे परत अध्यात्म रामायणाचे रूपक आले आहे. अज्ञान हा भवसागर, देह ही लंकापुरी, देहत्रय हाच त्रिकुटाचल, सीता म्हणजे आत्मनिष्ठ अपरोक्षानुभूति. ती रावण = अहंकार याच्या हाती पडली. अशोकवनात अतिशय शोकांत कामक्रोधादि असुरींनी तिला वेष्टिली पण शांतवृत्ति त्रिजटेमुळे वाचली. इन्द्रजित = काम, हे असुर फार मायावी. इंद्रादि देव म्हणजे इंद्रियदेवता, अहंकार रावणाच्या आधीन झाल्या. इंद्रियांच्या क्रियाशक्ती ह्या अप्सरा. अहंकार रावणाचा पुत्र इंद्रजित जो काम, त्याने सर्व देवांना परास्त केले. कुंभकर्ण हा तम अहंकार, बिभीषण सत्त्व अहंकार. हा शमदमादि श्रवणमननादि अस्त्रांनी मुक्त आहे. हा परमार्थास साह्यभूत होतो. हा साह्य झाल्याशिवाय रजतमाचा घात होऊ शकत नाही. राम प्रत्यगात्मा ब्रह्म. तुरीयावृत्ति हे अरण्य. हे त्याचे धाम. म्हणून अगस्ति रामास म्हणतात की तू स्वसुखेंच राहा. तूं रावणास कसा जिंकशील ?

ऐकताच राम कोपून म्हणाले की मी क्षत्रिय आहे, माझी भार्या रावणाने हरण केली आणि मी स्वस्थ राहिलो तर जगून काय उपयोग ? शिवाय देवांची सुटका कशी होईल ? माझ्या ब्रीदाचे काय ? अभावरूपी वालीला मारून भावसुग्रीवास मी राजा करीन. नळ हा अभ्यास, त्याच्या करवी सेतु बांधीन व विवेक मारुती व वैराग्य लक्ष्मण आणि सत्त्वगुण बिभीषण यांच्या साह्याने अहंकार रावणाचा वध करून स्वसुखरूपी विमानातून स्वानुभूति सीतेसह अयोध्येस जाऊन राज्य करीन. तरी शिवगुरू ज्यायोगे प्रसन्न होतील तो उपाय आपण सांगा.

यावर अगस्तींनी रामास सांगितले की मी तुला विरजा दीक्षा देईन तिचा तूं स्वीकार कर. त्यायोगे मर्त्यत्व जाऊन तूं तेजोमय होशील आणि सर्व शत्रूंना मारून, वांछित कामना पूर्ण होऊन, सर्व भूमंडळाचे राज्य भोगून अंती शिवसायुज्य पावशील. हे ऐकून श्रीरामास फार आनंद झाला व अगस्तिची स्तुति करून, त्यांना प्रणाम करून विरजा दीक्षा देण्याची प्रार्थना केली. तेव्हां अगस्तिंनी सांगितले की तुला मी पाशुपतव्रत सांगतो, ते तू कर. शुक्लपक्ष चतुर्दशी, अथवा अष्टमीस अथवा एकादशीस (आर्द्रायुक्त असेल अशी) कुठल्याही मासांत दीक्षेस आरंभ करावा. नंतर परात्परतर ईश्वर जो शिव त्याचे यथाविधि ध्यान करावे. अनुक्रमे मात्रांसहित पंचमहाभूते ओळखावी व अमात्रात्मक ईशरूप जे, ते सर्व भूतांमध्ये आहे असे जाणावे. अशा ध्यानांत मन एकाग्र करून निजांगे मोक्षरूप होऊन पाशुपत व्रताचरण करावे. प्रातःकाळी उठल्याबरोबर संकल्प करावा की हे पाशुपत व्रत प्राणांत झाला तरी मी सोडणार नाही. त्या ध्यानरूप व्रतासाठी स्नान आदि करून शुद्ध व्हावे. उपोषित राहून स्वतः श्वेतवस्त्र, श्वेतपुष्प, गंधानुलेपन आणि शुद्ध यज्ञोपवीत धारण करावे. नंतर प्राणापानादि करून विरजा मंत्र आणि असमाप्तमन एकाग्र करून चरु, समिधा आणि घृतादि यांचे हवन करावे. नंतर वेदोक्त रीतीने समंत्रक भस्म घेऊन निजांगी लावावे. याप्रमाणे भस्मस्नान करणारास महापातकेही स्पर्श करू शकत नाहीत. अभस्मी असेल तो वीर्यभग्न व भस्मयुक्त असेल तो सामर्थ्यवान होय. भस्मशायी विप्र जितेंद्रिय होऊन सर्व पापांतून मुक्त होऊन शिवसायुज्य प्राप्त करतो. असे सांगून अगस्ति म्हणाले की, रामा ध्यानापासून जे जे परमार्थ साधन सांगितले ते शिवसहस्रनामासह कर. त्यायोगे तुला सर्वार्थ प्राप्त होतील. असे म्हणून वेदांचे सारच व शिवाचे प्रत्यक्ष रूपच असे शिवसहस्रनाम अगस्तिंनी श्रीरामास दिले व म्हणाले, या शिवसहस्रनामाचा जप अहोरात्र कर म्हणजे भगवान प्रसन्न होऊन तुला पाशुपतास्त्र देतील. त्यायोगे समुद्राचे शोषण होऊन तुझे सर्व शत्रू मरण पावतील व तुझी प्रिया तुला प्राप्त होईल. पाशुपतास्त्राचा लाभ झाला नाही तर राक्षसांवर जय मिळणे अतिदुर्लभ आहे. म्हणून शंकरांना शरण जाऊन तूं ते अस्त्र प्राप्त करून घे.

याप्रमाणे मूळ शिवगीतेत विरजा दीक्षा वा पाशुपत व्रताचे वर्णन आले आहे. श्रीहंसराज स्वामींनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने या सर्वांचा वेदान्तपर अर्थ लावला आहे. चतुर्दशी म्हणजे ज्ञानसूर्योदया पूर्वीची विचाररूप अरुणोदय वेळा. किंवा परोक्षाचे सर्व कळले तरी दृढ परोक्षा उणे राहिले असे जे उत्तमाधिकार्‍याचे लक्षण तीच चतुर्दशी होय. चतुर्दशी उत्तम व अष्टमी मध्यम - ही अष्टधा प्रकृति अधिकार्‍यास सम होणे होय. कनिष्ठ एकादशी म्हणजे ध्यानारंभी दशेंद्रियांचा निग्रह करून अकरावे जे मन त्यासही त्यात मिळविणे होय. शुद्ध अंतःकरण हाच शुक्लपक्ष असून सुखदुःखादि द्वंद्वाचा त्याग त्यात अभिप्रेत आहे. आर्द्रा आणि सोमवार म्हणजे सप्रेमत्व आणि निष्परिग्रह. या तिन्हीची परमार्थमार्गांत सारखीच आवश्यकता आहे. नंतर स्वामी म्हणतात की ज्याचे ध्यान करायचे ते ध्येय आधी जाणून घेतले पाहिजे. जो सर्वांचे जन्मस्थळ, सर्वांचे अधिष्ठान, ज्यास अविद्या मायेचा मळ स्पर्श करीत नाही, असा कल्याणरूप निर्मळ सदाशिव हाच ध्यानास योग्य आहे. विचाररूप ज्ञानाग्नीने सर्वांतील चिद्‌रूप ओळखून नामरूपाचा त्याग करून त्याचे सदासर्वदा स्मरण करणे हेच ध्यान होय. पंचमहाभूतांची मात्रांसहित ओळख करून घ्यावी आणि अमात्रात्मक ईशरूप जे, ते सर्वांत जाणावे. ’नामरूपाचा वृथा आरोप । अवघे ब्रह्म सत् चित् रूप ॥’ या ध्यानाच्या योगे साधक आपोआप सिद्ध होतात. ’पाशुपतास्त्र तेचि अभिन्नज्ञान । तयाचे पाशुपतव्रत हे साधन । चिरकाल अभ्यासितां ऐसे ध्यान । वस्तुतंत्र ज्ञान होते ॥’ (२३८) ’तिन्ही अवस्थेमध्ये एकले ब्रह्म । सच्चिदानंद मनें अखंड ध्यावे । ध्यानामाजी अखण्ड रत । हेंचि जाणिजे पाशुपतव्रत ॥ येणेंचि अभिन्नज्ञान होईल प्राप्त, अल्पचि काळे ॥’ प्राणांत झाला तरी हे व्रत सोडू नये. आग्रह न धरितां साधनास विघ्न न येईल अशा प्रकारचे हलके स्वल्प भोजन हाच उपवास. इंद्रियनिग्रह, शुद्धता म्हणजे दम. मनोमल त्याग हेच स्नान, त्यास शम म्हणतात. अंतर्बाह्य शुद्धता आणि उपरम हेच श्वेत वस्त्र परिधान. कर्माने चित्त शुद्ध होणे हेच उपनयन. दुर्भाषणेवीण वाणी हेच श्वेत गंध, पुष्प अनुलेपन. याप्रकारे श्रवण मनन होत असता अनुदिन सत्संग असावा. निदिध्यासरूपी हवनांत, ज्ञानाग्नित ’अहं ब्रह्मास्मि’ या भावनेने देहत्रयरूपे समिधा, संपूर्ण दृश्यरूप चरु, आणि चंचळ ते आज्य लावून भस्म करावे. अथवा सर्व रूपमात्र या समिधा, नाममात्र हा चरु, आणि क्रिया हे आज्य त्यांत मिळवून सर्व जाळून अस्तित्व तेवढे उरावे. ग्रन्थिभेद होणे हाच अंतःकाळ होय. तोपर्यंत एकतान निदिध्यासन चिरकाळ राखावे. ऐक्यरूप आत्मत्वात ’अग्निरिति’ मंत्रादिने विज्ञानांत ज्ञानाग्नि साठवून ते भस्म हुडकून निजांगी लावावे. मी ज्ञानाज्ञानविरहित, सघन परिपूर्ण असंग आहे हे वेदवचन सदा स्मरावे. ज्ञानही शेवटी मावळते म्हणून त्यास अग्नि म्हटले आहे. पुढे विज्ञानरूप भस्म तेवढे उरते. पण हा साक्षात्कार झाला तरी सूक्ष्म हेतुरूप द्वैत उरतेच. याप्रमाणे विज्ञानरूपी भस्म धारण करणारास महापातकेही स्पर्श करीत नाहीत. या प्रकारच्या भस्मस्नानांत जो रत असतो तो जितेंद्रियची भस्मशायी म्हणावा आणि तोच सर्व पापापासून मुक्त होऊन याचि देही याचि डोळां सहजासहजी शिवसमान होतो. विज्ञानभस्माचे सामर्थ्य एवढे आहे की, ’क्रियमाणावरे बिंदुले पडे ।’ स्वात्मानुभवात वृत्ति रत असणे हेच भस्मात सर्वदा स्नान होय. ’सर्व इंद्रिये विषय घेती । परी भिन्नत्वा नामरूपा नसे स्फूर्ति । ज्ञात्याची हातवटी अज्ञानू नेणती । व्यर्थ शिणती निग्रहें ॥’ (२८८) मंदमति असतात ते मरणानंतर शिवसायुज्य मिळेल या उधारावर विश्वास ठेवतात.

पाशुपतास्त्राचे रूप स्पष्ट करतांना श्रीहंसराज स्वामी सांगतात की, ’स्वात्मानुभवाचा परिणाम । अनिर्वाच्य अभिन्न ब्रह्म ॥’ की जेथे कधी द्वैताचा संभ्रम उद्‌भवतच नाही. असे अनिर्वाच्य समाधान हेच पाशुपतास्त्र असून ते परमगहन आहे. गुरुमुखाने वेदवचनांचे श्रवण मनन होऊन आवड उत्पन्न होते, आणि तू तेंच ब्रह्म आहेस (तत्त्वमसि) या वाक्याच्या अर्थाची प्रतीती येते. अर्थ कळला की त्रिपुटीरूप द्वैत उफाळते, आणि शेवटी अनुभव आणि अनुभविता विरून अनुभव्य फक्त उरते. आपण निजांगे तरी ब्रह्म होतो, पण झालो हा आठवही स्फुरत नाही. त्यालाच अनिर्वाच्य समाधान म्हणावे. हे समाधान सद्‌गुरू कृपेनेंच प्राप्त होते. ’द्वैताद्वैत अखण्डैकरसी, आहे नाही शब्दावीण जे समाधान, पुरते तेथे अज्ञान ज्ञान विज्ञान’ असे बोलताच येत नाही. अज्ञान नासावयास फक्त ज्ञानच समर्थ असते. तेच गहन असे पाशुपतास्त्र होय.

GO TOP