॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सहावा ॥


शिवराम गुरवे नमः ॥
जयजय सद्गुरु शिवसनातनु । अभेदें सदां दुभती कामधेनु ।
वत्स तुझें रघुनंदनु । प्राणाहूनि   आवडतें  ॥ १ ॥
केवळ निरंजनी अभिन्नपणीं । चरत होती ज्ञप्तिरूपिणी ।
त्या तृप्तीने कृपा कांस आली भरूनी । तेव्हां धैर्यवनी निघेना ॥ २ ॥
तेधवां वत्साचें झालें स्मरण । जनस्थाना आली परतोन ।
कृपेनें द्रवली हुंबरून । रामवत्सा चाटीत ॥ ३ ॥
माते पाजी वो क्षुधा लागली । ऐशी वत्से नसतां प्रार्थना केली ।
आपण पाजी अति पान्हा घाली । हुमणीही न देतां ॥ ४ ॥
चारी वाचा हे परी स्तन । अद्वैते प्रबोधाचें दुग्ध गहन ।
अखण्ड चालिलें असे तेथून । काळवेळ नाहीं ॥ ५ ॥
ऐशिया निरंतर धारा पाहतां । श्रोत हे मुख झाला पसरिता ।
तो ओघ दाटला हृदया अतौता । मग परतला मुखावाटे ॥ ६ ॥
श्रीरामाची तृप्ति पूर्ण पुरातन । यावरी उपराळा झाला शिववचन ।
ओघ परतला जो मुखांतून । तो अत्यंत दाटला ॥ ७ ॥
मग सर्वांगांतून प्रवाह चालिला । एकत्र होऊन त्रिभुवनीं दाटला ।
तो विज्ञानसरोवर स्कंदें देखिला । तेव्हां तो पान करूं लागे ॥ ८ ॥
पुढे सनकादि करून । अद्वैत दुग्धाचें करिती पान ।
व्यास तो प्रत्यक्ष नारायण । आतृप्त प्याला ॥ ९ ॥
आणिक थोर थोर मुनि उठिले । दुग्धपान करून ढेकरु दिधले ।
परी ते दुग्ध नाहीं हालवलें । किंचिन्मात्र ॥ १० ॥
सूत म्हणे शौनकादिकांसी । मीही प्रवर्तलों दुग्धपानासी ।
तेचि देत असे तुम्हांसी । आवडी पान करा ॥ ११ ॥
हें दुग्ध कदापि सरेना । वीट न ये परी पीववेना ।
भूतभविष्य ज्ञातिया वर्तमाना । येणें तृप्त केलें ॥ १२ ॥
नरतनूसी जितुके आले । पुढें होती की मागे होऊन गेले ।
वर्तमानी यासहित असती झाले । विभागी या दुग्धाचे ॥ १३ ॥
परी जयासी कामज्वर वाढे । तयासी हे विषरूप पान न घडे ।
पाखण्डियासी जो थेंबुंटा न जोडे । त्या दुग्धामाजी पोहतां ॥ १४ ॥
असो ऐसे हैं दुग्ध अपार । जे मागे वर्णिलें पाशुपतास्त्र ।
रामासी प्राप्त झाले जगदोद्धार । करावा हा हेतू होतां ॥ १५ ॥
तो हेतू रामाचें अंतरींचा । पुरविला गुरुमायें साचा ।
तेणें मानवी अधिकारियाचा । मनोरथ पुरे ॥ १६ ॥
एकदां अद्वैतदुग्धाचें होतां पान । होतसे कामनाक्षुधेचे निसंतान ।
जेहीं देखिलें ने पान करून । अन्य घेणारा पाजिती ॥ १७ ॥
असो जें  रामें होतें मनीं धरिलें । की हे जीव सोडवीन अंश आषुले ।
ते सदाशिवे सर्व पुरविलें । जगदोद्धार झाला ॥ १८ ॥
मागें पंचाध्यायापर्यंत । रूपकेंशी बोलिलें ज्ञान अद्वैत ।
आधिकारियापासून पूर्ण सिद्धान्त । संकेते केला ॥ १९ ॥
आतां येथून पुढे शिवराघव संवाद । विस्तारेशी होईल विशद ।
स्पष्टार्थेचि प्रकटेल जितुका अनुवाद । रूपकेंशी मागे झाला ॥ २० ॥
विज्ञान कैसें कैसें ज्ञान । कैसे वैराग्याचे लक्षण ।
कैसा मोक्ष तुटे बंधन । कवणिये परी ॥ २१ ॥
जग कैसे याचा कोण कर्ता । अद्वैती उद्भव केवी झाला दैता ।
माया अविद्या जीवशिव समस्तां । ॥ वेगळाले वर्णिजे ॥ २२ ॥
अन्वयाचें कैसें स्वरूप । कासया म्हणावें व्यतिरेकरूप ।
अपरोक्षज्ञान केंवी आपेंआप । परोक्षही कैसें ॥ २३ ॥
काय ते संप्रज्ञ असंप्रज्ञ । कोणते सविशेष निर्विशेष लक्षण ।
विशेष सामान्यादिकांचे कथन । भिन्नभिन्न कीजे ॥ २४ ॥
ग्रंथ संपेतों अवघे बोलिजे । तें आरंभीच केवीं वर्णू लाहिजे ।
प्रसंगा ऐसे अवधान दिजे । वचनरहस्याशीं ॥ २५ ॥
पांचवा अध्याय संपतां । शिव बोलिला की मी सर्वकर्ता ।
कालाचा काल आणि नियंता । उत्पत्ति स्थितीचा ॥ २६ ॥
येथे कोणी जीव मंदमति  । एकाचे एकचि अंतरीं भाविती ।
यथार्थ शिवरूपातें नेणेती । तेव्हां कल्पिती देहधारी ॥ २७ ॥
तो देहधारी उत्पन्न केवीं करी । एक म्हणती लीलाविग्रही पुरारी ।
ऐशी वल्गना मात्र करिती सारी । परी निर्द्धार नव्हे ॥ २८ ॥
याचा निर्धार यथार्थ व्हावा । संशय जीवांचा मावळावा ।
यास्तव प्रश्न करीतसे शिवा । रघुनंदन सप्रेमें ॥ २९ ॥


श्रीराम उवाच -
भगवन्नत्र मे चित्रं महदेतत्प्रजायते ।
शुद्धस्फटिकसंकाशस्त्रिनेत्रश्चन्द्रशेखरः ॥ १ ॥


हे भगवन् भालचंद्र त्रिलोचना । महान हे आश्चर्य झाले माझें मना ।
शुद्ध स्फटिकासम दैदीप्यवर्णा । देह असे तुझा ॥ ३० ॥
जे मदंश जीव उद्भवले । केवळ अज्ञाने किंचिज्ञत्व पावलें ।
त्या मज जीवासी आश्चर्य थोर झालें । आपण मी कर्ता म्हणतां ॥ ३१ ॥
जीवासी तुझे रूप न कळे । ज्ञानदृष्टीचे गेले डोळे ।
संशयामाजी जाऊनि बळें । पडिले असती ॥ ३२ ॥
असंभवासी बळे संभविती । संभवे तेथें असंभव कल्पिती ।
मागुती आश्चर्यही करिती । हे होय कैसें म्हणूनी ॥ ३३ ॥
तं अनंत परिपूर्ण असतां । परिच्छेद मानिती साकारता ।
देहधारी कल्पून सत्यत्वे तत्त्वतां । होय नव्हे करिती ॥ ३४ ॥
पयफेन धवल स्फटिकापरी । कांति फांकत असे अंबरी ।
त्रिलोचन पंचवदन त्रिपुरारी । ऐसा देहधारी तूं ॥ ३५ ॥


मूर्तस्त्वं तु परिच्छिन्नाकृतिः पुरुषरूपधक ॥
अम्बया सहितोऽत्रैव रमसे प्रमथैः सह ॥ २ ॥


जैशी पुरुषाची आकृति । तेवींच तुझी परिछिन्न मूर्ति ।
रमत अससी सहितपार्वती । आणि ते प्रमथगण ॥ ३६ ॥
आपण जेवी साडेतीन हात । तेवींच तुझाही देह परिमित ।
दशभुजादि मात्र असतील विपरीत । मनुष्याहूनी ॥ ३७ ॥
जेवीं आम्ही स्त्रीसहित । सदनीं असों की रमत ।
तेवींच तूंही कांतेशी रत । अससी कैलाशी ॥ ३८ ॥
आम्हांपाशी असती सेवक । तेवीं तुझिया सेवेसी प्रमथादिक ।
ऐसेंचि पाहती सकळिक  । आपणांवरूनी ॥ ३९ ॥


त्वं कथं पंचभूतादि जगदेतच्चराचरम् ॥
तद्ब्रूहि  गिरिजाकान्त मयि तेऽनुग्रहो यदि ॥ ३ ॥


ऐसा तूं मूर्तिमान असतां । सर्वभूत चराचराचा केवी कर्ता ।
हे सांगे मजप्रति गिरिजाकांता । जरी मजवरी अनुग्रह ॥ ४० ॥
तूं मूर्तिमानचि सर्व जीव भाविती । निराकार जाणावया केवीं त्या मति ।
म्यां चराचर केले तुझी जे उक्ति । भाविती असंभूत ॥ ४१ ॥
पुरुषापासून आकाश कैसे होय । वायु अग्नि तो कदां न होय ।
पृथिवी पाणी जे निर्मिली द्वय । कवणियेपरी ॥ ४२ ॥
चराचर जंगम स्थावरें । वृक्ष मनुष्य अश्व आणि पांखरें ।
पुरुषापासूनि इतुकीं निद्धारे  । कैसेनि होती ॥ ४३ ॥
मीच सर्वांभूतीं व्यापक । येविशीही कितेक साशंक ।
म्हणविती अवयवी जगन्नायक । बैसलासे कैलासीं ॥ ४४ ॥
कैलाशींचे कोनासी जो बैसे । तो जगीं व्यापक कैसा असे ।
आणि आकाशादि भूती वसे । कैसा एकला ॥ ४५ ॥
गुप्त असे म्हणों चराचरीं । तरी अवयवांत अवयवें असती सारी ।
किंवा धाकुटी मूर्ति साजिरी । हृदयामाजीं असे ॥ ४६ ॥
पाणियामाजीं भूतें गुप्त राहतीं । तेवीं व्यापक असेल सर्वांभूतीं  ।
एक म्हणती सत्ता तिहीं जगतीं । व्यापली असे ॥ ४७ ॥
एक म्हणती जग हे पुरुषे  केलें । हे पुरुषसूक्ती नाहीं काय आलें ।
मुखापासून ब्राह्मण झाले । क्षत्रिय बाहूपासूनी ॥ ४८ ॥
मांडियांपासून वैश्य उद्भवले । शूद्र ते पादापासून जन्मले ।
तरी हे ऐसेच असतील झाले । सर्वांगापासूनि ॥ ४९ ॥
आतां भूतादि हे कैशी होणें । तरी शिवचि मममायादुरत्यय म्हणे ।
तस्मात् सत्यसंकल्पाच्या गुणें । ईश्वरें केलें असेल ॥ ५० ॥
ईश्वर हा सर्वभूतीं राहे । सर्व सूत्रे हलविताहे ।
तो जनासी पहावया केवी लाहे । स्थूलदृष्टी ॥ ५१ ॥
ऐसा गलबला मात्र करिती । मिथ्या कैशी सर्व शास्त्रे होतीं ।
उगीच कुतर्के युक्ति पेंचिती । एकमेकांची ॥ ५२ ॥
असो निश्चय नसतां कवणासी । मोक्ष कैचा पडतां सायासीं ।
जरी कृपा असेल श्रीप्रभूसी । तरी सांगावें मजला ॥ ५३ ॥
जीवाप्रीत्यर्थ कृपा मजवरी । जरी प्रभूची असेल खरी ।
तरी हे सांगावें एक निर्धारीं । निश्चय व्हावा जीवां ॥ ५४ ॥
तुझे रूप तें आहे कैसें । त्वां चराचरा कैसें केलें असे ।
सर्व जगीं केवीं तुझें रूप वसतसे । हे कळावे जीवा यथार्थ ॥ ५५ ॥
या रीतीं रामाचा प्रश्न ऐकूनी । सुप्रसन्न झाला शूलपाणि ।
म्हणे तुज जीवाचा कळवळा असें मनीं । तरी अवधारी सांगेन ॥ ५६ ॥


श्रीभगवानुवाच -
साधु पृष्टं महाभाग दुर्ज्ञेयममरैरपि ॥।
तत्प्रवक्ष्यामि ते भक्त्या ब्रह्मचर्येण सुव्रत ॥ ४ ॥


त्वां पुशिलें तें दुर्ज्ञेय अमरां । परी सांगेन हे मी निर्धारां ।
हे सुव्रत हे महाभाग ऐके त्वरां । ब्रह्मचर्यकडूनी ॥ ५७ ॥
त्वां पुशिले की मानवीजन । यासी माझिया स्वरूपाचें नाहीं ज्ञान ।
मी असे सगुण की निर्गुण । की उभयात्मक ऐसें ॥ ५८ ॥
आणि म्यां हें कैसे निर्मिलें । हे जीवासी यथार्थ पाहिजे कळलें ।
तें तुज सांगेन आक्षेपिलें । तुवां म्हणोनी ॥ ५९ ॥
यथार्थ न कळेचि मानवी जीवां । एतद् विषयींच कायसा प्रस्तावा ।
 दुर्ज्ञेय असे स्वर्गस्था देवां । सत्वगुणी असोनी ॥ ६० ॥
नाना विमानी बैसूनी । क्रीडत असती स्वर्गभुवनीं ।
स्त्रियासंगेंशी अमृतपानी । नानाविलास देहसुख ॥ ६१ ॥
नाना क्रीडा हे करावी । तनु गुप्त करून प्रगट दावावी ।
आपुली जनीं आढ्यता व्हावी । इतुकेंचि ज्ञान त्यांचें ॥ ६२ ॥
परी मजसी यथार्थ जाणावया । ज्ञान नसेचि देवां ऐशिया ।
दुःख कष्टले जरी दांत खावूनिया । परी मी तयां न कळे ॥ ६३ ॥
ऐसें दुर्ज्ञेय सकळांसी । देव दानव मानवांसी ।
परी मी सांगेन गा तुजसी । परमप्रिय म्हणोनि ॥ ६४ ॥
उत्तमव्रती यास्तव सुव्रत । नाम तुझें असे विख्यात ।
आणि तुझे भाग्य वर्णनारहित् । जे मी प्रसन्न तुजला ॥ ६५ ॥
यास्तव महाभाग तूं राम । ऐकें सावधानत्वं निःसीम ।
मी मांगेन गुह्य परम । ठेवा अंतरींचा ॥ ६६ ॥
परब्रह्मीं असावी चित्तवृत्ति । याशीच ब्रह्मचर्य बोलती ।
सर्वेद्रियांसहित मनासी उपशांति । तेणेंचि परी ॥ ६७ ॥
ऐशिया ब्रह्मचर्येकडूनी । सांगेन तें ऐकें गा चापपाणी ।
हे  दुर्ज्ञेय असे सर्वालागुनी । परी माझिये कृपें सुलभ ॥ ६८ ॥


श्लोकार्द्ध - पारं यास्यस्यनायासाद्येन संसारवारिधः ॥


जरी मी कृपा करीं शूलपाणि । तरी यथार्थ ज्ञान होय ज्ञात्यालागूनी ।
जया ज्ञाने संसारसागर लंधूनी । अनायासे पार' जाती ॥ ६९ ॥
सर्व शोकाचे करावें हनन । ऐसा शूल म्यां केला धारण ।
यास्तव शूलपाणि मज अभिधान । आणि मोक्षप्रद ॥ ७० ॥
ऐसा मी सद्गुरु अधिकारियासी । अखण्ड तत्पर जो मत्पदासी ।
मी कृपाघन ओळतां तयांसी । सर्वही असे सुलभ ॥ ७१ ॥
माझें यथार्थ ज्ञान होतां । कळेल हें कैसें झालें कोण कर्ता ।
मी कैसा असे जगांअतौता । आणि मजमाजीं जग । ७२ ॥
यारीतीं जो आपुल्या ठायीं पाहे । तोचि निजांगें ब्रह्मत्व लाहे ।
निजांगें ब्रह्म होतांचि राहे । स्थिति सविशेषीं ॥ ७३ ॥
ऐसें ज्ञान पावे जो माझिया कृपें । तयाचा सर्वही भेद लोपें ।
तेणें साधनही न करितां साक्षेपें । भवसागरा लंघी ॥ ७४ ॥
जन्ममृत्यरूप संसार । हाचि अनुलंघनीय सागर ।
अनायासे  तरती सारासार । विचार घेतां ॥ ७५ ॥
परी माझिये कृपेवांचून । स्वतः करितांही श्रवण मनन ।
कदापि नव्हेचि अपरोक्षज्ञान । देवदानव मानवां ॥ ७६ ॥
तूं म्हणशी देव सत्वगुणी । ते तत्पर असावेत अभेदज्ञानी ।
परी फुगले अभिमानेकडोनी । जाणिवेचिया ॥ ७७ ॥
आम्ही ज्ञातेपणे ब्रह्म जाणूं । अथवा जाणिलें ऐसा घेती आभिमानु ।
ते तत्क्षणींच पडती भिन्नु । जाणिव उफाळें ॥ ७८ ॥
हे मी ब्रह्म अपरोक्षपणीं । अनुभविलें जरी वाच्य त्यागूनी ।
तेही करी त्रिपुटीची उभवणी । तेव्हां भिन्न पडे ॥ ७९ ॥
उगेंचि सहजत्वे ज्ञान स्फुरतां । इकडे ज्ञेय होय तिकडे ज्ञाता ।
ऐसें किंचितही दैत उदभवतां । भीती हे न चुके ॥ ८० ॥
बहुत कासया बोलावें । स्वरूपी जाणणोंचे न संभवें ।
तें जाणिल्यावीण अंगचि व्हावें । सद्गुरुकृपें ॥ ८१ ॥
वृत्तियोगें ब्रह्मानुभवितां । तया अपरोक्ष बोलावें केउता ।
वृत्ति ब्रह्म जाणे ब्रह्म न होतां । हेचि भिन्नता द्वैतरूप ॥ ८२ ॥
यास्तव जंव जंव जाणों जायिजे । तंव तंव वेगळेचि पडिजे ।
जाणण्या नेणण्यावीण अंगें होइजे । या नांव ज्ञान अपरोक्ष ॥ ८३ ॥
वस्तु जरी आपणाहूनी । भिन्न असती वेगळेपणीं ।
तरी जाणों येती सुखेंकडूनी । तस्मात् जाणणे न संभवें ॥ ८४ ॥
तें अंगें आपण पहिलेच आहे । ऐसें हैं विचारें जाणोंन लाहे ।
उगेंचि तयासी साधू पाहे । तंव ते दुरावें अत्यंत ॥ ८५ ॥
अगा परब्रह्म जाणावया । कोणतें तत्त्व समर्थ रामराया ।
सूर्यापुढे सनकाडिया । तेवी मनादि वृत्ति ॥ ८६ ॥
तस्मात् ब्रह्म जाणणेचि न घडे । देव दानव की मनुष्य बापुडे ।
जाणती केवीं परप्रकाशें  जडे । आपणां भिन्न कल्पूनि ॥ ८७ ॥
हे असो बापुडे येर । सर्वात श्रेष्ठ विष्णु शंकर ।
तेही न जाणती ब्रह्म चिन्मात्र । भिन्नपणेंशीं ॥ ८८ ॥
हेही असो जीवाची वार्ता । मी सर्वेश्वर घे जरी जाणीव अहंता ।
तरी ब्रह्मरूपी सहज भिन्नता । पड़े अचूक ॥ ८९ ॥
मागे झाले पुढे होणार । प्रस्तुत  असती जे ज्ञाते नर ।
परी जाणिलेंचि नाही अणुमात्र । ब्रह्म कवणेही ॥ ९० ॥
येथेही रामा मानिशील स्वभावें । ब्रह्मज्ञानचि कदां न संभवे ।
तरी अज्ञान जाऊन सुटावे । जीव हे कैसे ॥ ९१ ॥
ज्ञानचि नव्हे कल्पांतीं । तरी गुरुशास्त्रविचार व्यर्थ जाती ।
म्यां केली जितुकी सायास कृति । व्यर्थ झाली म्हणशी रामा ॥ १२ ॥
तरी अवधारी गुरुमुखेंकडून । करावें महावाक्य विवरण ।
ब्रह्म केवढें कैसे लक्षण । सच्चिदानंदता जाणावी ॥ ९३ ॥
सत्यज्ञानानंदघन । हे विधिमुखें वेदाचें वचन ।
अनंणू अदीर्घ अस्पर्शादि खुण । निषेधेमुखाची ॥ ९४ ॥
या उभयरूपें वेदाची प्रवृत्ति । गुरुमुखें जाणावी निश्चितीं ।
अर्थ घेतां शब्द फोल होती । कण घेतां भूस जेवीं ॥ ९५ ॥
ऐसा जो वेदार्थ घेतला । तया अर्थे अनुभव आला ।
अनुभव घेतां क्षय अर्थाला । जेवीं परिपाकी धान्य ॥ ९६ ॥
हाचि अनुभव आणि अनुभविता । आटती निजांगें ब्रह्म होतां ।
परिपाकही न उरे पाहतां । तृप्ति झालिया ॥ ९७ ॥
अभिन्नज्ञानाची स्फूर्ति ओसरे । उगीच अभेदाची तृप्ति उरे ।
परी झालेपण तेही न उरें । या नांव समाधान ॥ ९८ ॥
ऐसें त्रिपुटीविण समाधान । याचि नांवें यथार्थज्ञान ।
यावीण तें अयथार्थ जाणणें । तेणे बंधन न निरसे ॥ ९९ ॥
असो यथार्थज्ञान वस्तुतंत्र । सद्गुरुकृपें जो पावे स्वतंत्र ।
तयासी जग सारे ब्रह्मचिन्मात्र । सहजस्थिति होतसे ॥ १०० ॥
जेवीं अलंकारामाजी सुवर्ण । आंत बाहेरी आकार असून ।
तेवीं सर्व जगी सच्चिद्घन । जग असतां पाहे ॥ १ ॥
नामरूपावीण या जगासी । रूप कोणतें सत्यत्वेशी ।
आकारास्तव नाम सुवर्णासी । अलंकार ऐसें ॥ २ ॥
ऐसें सुवर्ण दृढ ओळखिलें । मग ते अलंकार जरी नासले ।
तरी तें सुवर्ण असें संचलें । जैसे तैसें ॥ ३ ॥
तेवीं या विशेषामाजीं ब्रह्म आपण । प्रतीतीस येतां सच्चित्धन ।
मग जरी जग सारे पावले मरण । तरी ब्रह्म अखण्ड एकरूप ॥ ४ ॥
ऐसें जे यथार्थ ज्ञान जाणती । तेचि संसारसागरापासून सुटती ।
तयासी कांहींच करावें न लगती । अन्य सायास ॥ ५ ॥
तो जरी कदां न इच्छी मुक्ति । परी ते अचूक होईल तयाप्रति ।
असो ऐसें ज्ञान झालिया  वरुती । तो क्रीडे कैसा ॥ ६ ॥
आपणामाजी सर्व जग । की सर्वांमाजी आपण असंग ।
दोहों श्लोकी हा प्रसंग । ध्वनितार्थे बोलूं ॥ ७ ॥


दृश्यते पंच भूतानि ये च लोकाश्चतुर्दश ॥ ५ ॥
समुद्राः सरितो देवा राक्षसा ऋषयस्तथा ॥
दृश्यन्ते यानि चान्यानि स्थावराणि चराणि च ॥ ६ ॥
गंधर्वाः प्रमथा नागाः सर्वे ते मद्विभूतयः ॥


दृश्यत्वे पंचभूतें दिसतीं । आणि जया चतुर्दश लोक म्हणती ।
समुद्र पर्वत देवराक्षसादि व्यक्ति । ऋषींसहित ॥ ८ ॥
स्थावर जंगम चराचर । गंधर्व प्रमथ नाग किन्नर ।
अन्यही पशुपक्ष्यादि नर । तितुक्याही माझ्या विभूती ॥ ९ ॥
हे सर्व जग जितुकें उद्भवलें । जें जें नामरूपात्मक दिसलें ।
तेथें संकेतें असें बोलिलें । पुढें विस्तार याचा ॥ १० ॥
अतळादि सप्तपाताळ । तेवीं स्वर्गादि सप्तताळ ।
ऐसे हे चतुर्दश लोक सकळ । जडत्वें दृश्य ॥ ११ ॥
पंचभूतात्मक हे सारे । यांत वसती जंगम स्थावरें ।
नद्या पर्वत समुद्र वृक्षादि अपार । स्थावर बोलिजे ॥ १२ ॥
येर चालती ते जंगम । तिहीं लोकी राहती करून धाम ।
देव दानव मानवादि विषम । पशुपक्ष्यादिक ॥ १३ ॥
असो हे जितुकें उद्भवलें । दृश्यत्वे आकारासी आलें ।
जया पुरुषासी ज्ञान झालें । त्यासी ह्या विभूति माझ्या ॥ १४ ॥
विभूति म्हणजे मदंश । अस्तिभातित्वें सच्चिदंश ।
अलंकारी सारे सुवर्णलेश । दुसरा नाहीं ॥ १५ ॥
 तेवींच ब्रह्म सच्चिद्धन । तेंचि अस्तिभातित्वें जगपूर्ण ।
दुसरें किंचितही नसे आन । या सर्वांमाजी ॥ १६ ॥
सुवर्ण नेणून अलंकार घेती । ब्रह्म न जाणून जग पाहती ।
जग अलंकाराची होतां समाप्ति । मुक्ती ब्रह्मसुवर्णा ॥ १७ ॥
आकारचि अवधा सुवर्णमय । ब्रह्मगोळचि अवघा ब्रह्म होय ।
अलंकार जगासी असे रूप काय । ब्रह्मसुवर्णाविण ॥ १८ ॥
ऐसें जें उत्तम पहाणें । ह्याची मदविभूति अनुभवणे ।
कांहींच न दिसे अधिक उणें । कार्य की कारण ॥ १९ ॥
आकाशी जैसा मेघ । तेंवींच ब्रह्मस्वरूपी जग ।
मेघामाजी आकाश असंग । तेवीं जगी ब्रह्म ॥ २० ॥
ऐसा ब्रह्म होऊनि । सदां विचरत असे ज्ञानी ।
भवभयाची झाली धूळधाणी । देह असतां अक्षयपदीं ॥ २१ ॥
या रीतीं यथार्थज्ञान सद्गुरुमुखें । होणे त्या जीवन्मुक्त बोलिजें सुखें ।
स्वतांच अनुभवी जो असिकें । तो नित्यमुक्त ॥ २२ ॥
कोठेचि नसे कुंठीत मति । काहीही करितां नसे खंती ।
ते नित्यमुक्तपणे स्वसंविति । आम्ही दोघेचि असों ॥ २३ ॥
चतुर्भुज विष्णु मी सदाशिव । दोघेहि नित्यमुक्त सदैव ।
आम्हांसी ज्ञान लोप नसे स्वयमेव । कवणेही काळीं ॥ २४ ॥
तो तूं विष्णुचा अवतारु । मनीं करूं म्हणशी जगदोद्धारू ।
मी पूर्ण करावया जगद्गुरु । पातलों शिव ॥ २५ ॥
तरी आपणचि गुरुशिष्य दोघे । अवतरून या जगी निजांगें ।
संवादमिषे  लागवेगें । जगदोद्धार करूं ॥ २६ ॥
एवं नित्यमुक्त आम्ही दोन । तिसरा जो का चतुरानन ।
तो असून आम्हांसमान । जीवन्मुक्ताकडे आला ॥ २७ ॥
कारण की रजोगुणाची अधिकता । तेणें ज्ञाता परि संशय उठे चित्ता ।
तो फेडावयालागी मागुता । मज गुरूस जाणे लागें ॥ २८ ॥
एकदा अव्यक्तरूपें म्यां उपदेशिलें । तेणें अभेदज्ञान स्फुरूं लागलें ।
मागुती सनकप्रश्ने कुंठित झालें । मन ते बोधिलें म्यां हंसें ॥ २९ ॥
ययापूर्वीही कल्पान्तरीं । ब्रह्मादि मिळूनि देवतें सारी ।
प्रार्थितां म्यांच बोधिले निर्धारीं । संवादमिषे  ॥ १३० ॥
तो संवादचि रघुनंदना । सांगेन ऐकें एकाग्रमना ।
ज्या संवादी हेतु असती नाना । ते सर्व प्रगट करूं ॥ ३१ ॥
देवांसी दुर्ज्ञेय असें बोलिलें । भिन्नत्वे स्वरूप न जाय लक्षिलें ।
तें स्पष्ट कळेल तुज वहिलें । यया संवादें ॥ ३२ ॥
अन्यासी ब्रह्म जाणणेंचि न घडे । हेही तुजलागी उजेडे ।
आणि निर्विशेषाचें रूपडें । येईल प्रतीती ॥ ३३ ॥
तेवीं सविशेष म्हणिजे काय । हाही स्वतां बाणेल प्रत्यय ।
आणि भूतादि हे जगकार्य । कैसे झाले हे कळे ॥ ३४ ॥
या जगाचा कोण कर्ता । कळेल जगी कैसी व्यापकता ।
आणि तुवां जो प्रश्न केला होता । की तुज देहधारी कल्पिती ॥ ३५ ॥
ऐसा शिव असतां देहधारी । कैशी निर्मिली ही भूतें सारी ।
हे आशंका जीवाचें अंतरीं । अज्ञानास्तव झाली ॥ ३६ ॥
हे असो मानवाची वार्ता । अज्ञान पडे देवां समस्तां ।
तयातें मी झालों बोधिता । पूर्वील कल्पी ॥ ३७ ॥
ऐसे हेतू या संवादाचे । प्रगट कळतील तुज साचे ।
अध्याय संपेतों निरूपण याचें । असे ते ऐकावें ॥ ३८ ॥
हा संवाद अधिकारियासी । श्रवणें बाणतां निश्चयाशीं ।
मुक्ति होय त्या अनायासी । या संसारसागरापासूनी ॥ ३९ ॥
आतां बोलिला विभूतिप्रकार । जो ज्ञानियाचा क्रीडाविहार ।
तोचि मागुतां सविस्तर । निर्धार  बोलिजे ॥ ४० ॥


पुरा ब्रह्मादयो देवा द्रष्टुकामा ममाकृतिम् ॥ ७ ॥
मंदरं प्रययु: सर्वे मम प्रियतरं गिरिम् ॥


पूर्वी मज पहावयाची इच्छा चित्तीं । ऐसे ब्रह्मादि देव सारे मिळती ।
माझिया प्रियतर मंदरगिरी प्रति । ममाकृति पाहों आले ॥ ४१ ॥
पूर्वी कवणे एके कल्पी । ब्रह्मादि देव मिळती साक्षेपी ।
बोलती एकमेका की प्रतापी । कर्ता कोण या जगाचा ॥ ४२ ॥
आकारा आलों मी पंचवदन । हेंचि माझें रूप सत्यगहन ।
निर्विशेष नेणतीच निरंजन । तेव्हां एकाचें एक पाहती ॥ ४३ ॥
निर्विशेष तो नव्हेचि ठावें । परी सविशेषही न कळे आघवें ।
उगेंचि एकदेशी स्वभावें । मजला कल्पिती ॥ ४४ ॥
मी मायावशें निर्विशेष असून । सविशेषत्वे झालों संपूर्ण ।
कोणताही पदार्थ मजहून भिन्न । असेना सहसा ॥ ४५ ॥
अरे जे संशय कल्पना करिती । तें तरी मजवीण कोण दुजे असती ।
परी या अज्ञानाची काय हो कृति । अघटित असे ॥ ४६ ॥
मायेपासून तृणापर्यंत । मी एकला एक विकाररहित ।
तेथे मज म्हणती साडेतीन हात । कैलासी राहे ॥ ४७ ॥
ऐसें अघटितत्व या अज्ञानाचें । देव भुलविले सतगुणाचे ।
तेथें आश्चर्य काय मानवाचें । विपरीत भावावया ॥ ४८ ॥
ऐसिया अज्ञानाचे खंडण । करावया मी समर्थ असें पूर्ण ।
परी मी सर्वव्यापी सचित्घन । उपदेशा योग्य नव्हे ॥ ४९ ॥
यास्तव मी लीलाविग्रही । देह धरून राहिलों पाही ।
अधिकारी पडिले जे अज्ञानप्रवाहीं । ते उपदेशून काढितसें ॥ १५० ॥
मागे झाले आतां असती । आणि पुढे जे जे अधिकारी होती ।
ते ते उपदेशून स्वात्मगति । मेळवीं मी सद्गुरु ॥ ५१ ॥
एकदेशी मी देहधारी असतां । जीवासी देतसे आत्मसायुज्यता ।
त्याही मज सद्गुरुसी न भजतां । अन्य देव धुंडिती ॥ ५२ ॥
ज्या वेदें होय माझें ज्ञान । तया वेदासी अव्हेरिती मूर्खजन ।
नाना मतांचा करिती शीण । इच्छेसारिखा ॥ ५३ ॥
असो ते मंदभाग्य पशूचे परी । तुज सांगितले की त्याग करीं ।
जे भावार्थी प्रज्ञावंत अधिकारी । ते गुरुबोधे तृप्त होती ॥ ५४ ॥
ऐशिया अधिकारियाच्या उद्धारा । देहधारक झालों गा खरा ।
राहिलों मंदरपर्वत शिखरां । जो मज अतितर आवडे ॥ ५५ ॥
जेथें एकांत असे सहज । द्वैताची नसेचि गजबज ।
तोचि कैलास नामें समज । वसतें स्थान माझें ॥ ५६ ॥
असो तया कैलासगिरीप्रति । ब्रह्मादि देव मिळून येती ।
मी साकारचि मानून चित्तीं । करिती प्रश्न मज ॥ ५७ ॥


सार्द्ध श्लोक ॥ स्तुत्वा प्रांजलयो देवा मां तदा पुरतः स्थिताः ॥ ८ ॥
तान्दृष्ट्वाथ मया देवान लीलाकुलितचेतसः ॥
तेषामपहृतं ज्ञानं ब्रह्मादीनां दिवौकसाम् ॥ ९ ॥


माझिया सन्मुख सर्व देव भिवोनी । बद्धांजली हस्त जोडोनी ।
स्तविते झाले मजलागूनी । यथामति भिन्नभिन्न ॥ ५८ ॥
लीलेने मोहाकुलित चित्त । ऐसे देव म्यां देखिले स्वर्गस्थ ।
तया ब्रह्मादिकांचे ज्ञान मी हरीत । स्वकीय तेजें ॥ ५९ ॥
एकाएकी मी षड्गुणैश्वर्यसंपन्न । त्या मज जगद्गुरूतें पाहून ।
भयभीत होऊन अंतःकरण । अंजलीपुंट जोडिती ॥ १६० ॥
निजांगें ब्रह्म मी सदां निश्चळ । कवणेही काळी नव्हें चंचळ ।
ऐसें स्वरूपज्ञान में अढळ । मजपाशी असे ॥ ६१ ॥
नामरूप जरी हे उद्भवलें । ज्ञेयादि त्रिपुटीरूप भेदावलें ।
परी तें तिहीं काळी मज नाही स्पर्शलें । यारीतीं वैराग्य अखण्ड ॥ ६२ ॥
सहजीं स्वभावशक्ती ते ऋद्धि । उत्पन्न सामर्थ्य त्या नांव सिद्धि ।
हे उभयरूपें ऐश्वर्य अनादि । मज ईश्वराचें ॥ ६३ ॥
मोक्षाऐसे दुर्मिळ पवित्र । तयाचें तों म्यां घातले सत्र ।
ऐसें औदार्य माझें स्वतंत्र । जगदगुरूचें ॥ ६४ ॥
यश कैसें त्रिभुवनी व्यापलें । स्वच्छ पूर्ण नाही मळलें ।
सर्व देवमानवादिकी स्तविलें । आणि वेदही वर्णी ॥ ६५ ॥
मीच तारक सकळ जीवांसी । साम्यता कवणा नये अन्या मजऐसी ।
ऐशी कीर्ति प्रगट वसे मजपाशीं । कदां उणी नव्हे ॥ ६६ ॥
ऐसा मी षड्गुणेश्वर्ययुक्त । दैदीप्यमान घवघवीत ।
देवी पहातांच सर्वांचे चित्त । मोहें व्याप्त झाले ॥ ६७ ॥
घाबरून अंजलीपुट जोडिती । चरणीं मस्तक ठेवून नेत्र झांकिती ।
स्तवूही नेणती पडली भ्रांती । जयजय करिती स्वमुखें ॥ ६८ ॥
माझें तेज अत्यंत देखिलें । स्वर्गस्थ ब्रह्मादिकही भ्याले ।
पुसावें ऐसें इच्छुन जे आले । तेही विसरून उगें स्तविती ॥ ६९ ॥
एवं म्यां स्वकीय तेजेंकडून । त्यांचे स्मरणरूप हरिले ज्ञान ।
उगेंचि करूं लागले स्तवन । तुटक तुटक वाणीनें ॥ १७० ॥
ऐसें घाबरले सर्व देव । परि मी जाणतसे अंतर्भाव ।
तेव्हां पुसता झालों आभिप्राव । कायरे तुमचा ॥ ७१ ॥
परि तयांसी काही सुचेना । भ्रांतीच पडली सुरगणा ।
असो येरांचे परी चतुरानना । सुचेना कांहीं ॥ ७२ ॥
पदार्थ जाणावया बुद्धि चतुर । उत्पत्ति करण्यास ब्रह्मा थोर ।
परि मी परमात्मा अधिष्ठानमात्र । पाहूं जातां भांबावती ॥ ७३ ॥
मग इंद्रियदेव तो बहिर्मुख । ते तरी न जाणतीच सच्चित्सुख ।
निद्रालयीं होती मम सन्मुख । परी तत्क्षणी नासती ॥ ७४ ॥
असो माझें निर्विशेषज्ञान । नोहेचि ब्रह्मादिकालागून ।
परी सविषेशरूपें ब्रह्माण्डी व्यापून । असें तोही त्यां कळेना ॥ ७५ ॥
कारण की निर्विशेषरूप आहे कैसें । बुद्धिनिश्चया आलें जो नसे ।
तोंवरी सविशेषींही अनुभव नसे । मी व्याप्त कैसा तो ॥ ७६ ॥
सविशेष निर्विशेष उभय । कळावया एक असे उपाय ।
मी साकार सद्गुरु जरी प्रसन्न होय । तरी उपदेशमात्रे दावीं ॥ ७७ ॥
तस्मात् मुमुक्षुनें एक करावें । साधनसंपन्न आधी व्हावें ।
मज साकारसद्गुरूशी शरण यावें । तोषवावे सेवेनें ॥ ७८ ॥
हा काय निमित्त शरण आला । तो भाव मज ठाउका सद्गुरूला ।
ज्ञान देऊन सोडवीन तयाला । उपदेशमात्र ॥ ७९ ॥
माझें निर्विशेषाचें होतां ज्ञान । सविशेषही कळे त्यालागून ।
ते अभय कोण त्यांचे निरूपण । मागे झाले पुढे होणें ॥ १८० ॥
देव जैसे मजशी भ्यालें । तेवीं मुमुक्षु गुरूपुढें संकोचले ।
परी भावार्थे म्यां अंतर परीक्षिलें । असे गुरूरूपें ॥ ८१ ॥
त्यांसी जरी पुसों नेणवे । परी अनन्यभावें शरण यावें ।
मग मी गुरु कृपाळु स्वभावें । स्वतांचि बोधीन त्या ॥ ८२ ॥
जेवीं देव मज देखोन घाबरती । तयांसी मीच पुसे उमापति ।
तेवींच गुरुरूपें  शिष्याप्रति । हेतु काय तो पुसेन ॥ ८३ ॥
असो देव आधीच अज्ञान । काय म्यां पुसतांही प्रयोजन ।
परि त्यासीं नव्हेचि स्मरण । कोण कार्या आलों । ८४ ।
कांही काळ जो लोटला । तों ब्रह्मा अंतरी कांहीं स्मरला ।
परि तितुका प्रश्न न जाय केला । बरळपणें बोले । ८५ ॥


अथ तेऽसकृदज्ञाना मामाहुः को भवानिति ॥
अथाब्रुवमहं देवानहमेव पुरातनः ॥ १० ॥


अज्ञानेकडून व्याप्तचित्त । कोण तूं ऐसें एकदां उच्चारित ।
मग मी बोलतां झालों समस्तांतें । अरे मी पुरातन निश्चयें ॥ ८६ ॥
ब्रह्मा धैर्य धरून झाला बोलता । कीं तूं कोण इतुकेंचि एकदां म्हणतां ।
अनुमोदन देती सर्व देवता । हाचि प्रश्न म्हणोनि ॥ ८७ ॥
ब्रह्मा भ्रांत परी मज अनन्ये । आणि देवही असती तया आधीन ।
त्यांचा आशय मी सर्व जाणून । बोलता झालों ॥ ८८ ॥
अरे मी असे की पुरातन । अद्वैत एकला निरंजन ।
तुमचे काय झालें यथार्थज्ञान । विपरीत कां भावितां ॥ ८९ ॥
ज्या रीती ब्रह्मा मज शरण आला । तेवीं मुमुक्षूने यावें सद्गुरूला ।
ब्रह्मा भ्रांतीने जैसा भुलला । तेवीं बुद्धि भ्रांत जरी ॥ ९० ॥
तरी निश्चयेशी अनन्यभाव । असतां मी कृपाळु गुरु शिव ।
तो जरी पुसों नेणे अभिप्राव । तरी मी जाणून पुसेन ॥ ९१ ॥
काय तुझा गा असे हेतू । पुसतां जरी प्रश्नाची न करवे मातु ।
तरी तूं निर्विकार कैसा अनंतु । इतुकेंचि पुसावें ॥ ९२ ॥
इतुकेंचि अधिकारिये पुसतां । मी सांगेन आपुली अनंतता ।
जैसा देवांशी झालों बोलता । मी पुरातन म्हणूनी ॥ ९३ ॥
परी बुद्धि हे दृढ करावी । इंद्रिये बुद्धीने परतवावी ।
अनन्यभावें समर्पावीं । मज गुरुचरणीं ॥ ९४ ॥
मीच गुरुशिष्यातें देव । ऐसें बोलता मी शिव ।
येथे मानितील कोणी जीव । ते शंका ऐके रामा ॥ ९५ ॥
मी शिव पड्गुणैश्वर्यसंपन्न । तरी सद्गुरूही असावा येणे समान ।
ज्ञान वैराग्य तों पाहिजेत दोन । परी सिद्धीसामर्थ्यही असावें ॥ ९६ ॥
ऐशी शंका व्हावी निरसन । तरी सांगेन तें ऐक निरूपण ।
मुमुक्षू साधकेंही येथे अवधान । दिधले पाहिजे ॥ ९७ ॥
सदगुरूपाशी ही साही असती । ज्ञान तो परिपूर्ण सहजगति ।
नामरूपत्याग तेचि निश्चिती । वैराग्य थोर ॥ ९८ ॥
मोक्षलक्ष्मी जयाचें द्वारीं । तिष्ठताहे ऐश्वर्याची परी ।
ऐसा दाता कोण भूमीवरी । जे आपणासगट देता ॥ ९९ ॥
कृपा जयावरी असे करणे । दृष्टीमात्र तो ब्रह्मरूप होणे ।
या परतें यश तें कवणें । ठायीं असे ॥ २०० ॥
कीर्ति पाहतां अखण्डगती । तरी वेद स्वयें ब्रीद गाती ।
एवं षड्गुणैश्वर्य संपत्ति । सद्गुरूपाशी असे ॥ १ ॥
सहज ऋद्धि वसताती । पहा की अचेतने केवी चालती ।
खाती पहाती वास घेती । मुखादि गोलके ॥ २ ॥
आगंतुक सिध्दिचे लक्षण । न स्वीकारिती ज्ञाते सज्जन ।
नाना कंवटालें गुप्त प्रगट होणें । ती त्यागिती गारुडापरी ॥ ३ ॥
ऐसें असून जे मंदमती । गुरूपाशी सिद्धिसामर्थ्य पाहती ।
ते सर्वस्वेशी नागवती । निजात्मसुखा ॥ ४ ॥
कांहीं न होणे तें कदाचित् झालें । तेथें जयाचें मन विश्वासलें ।
परी त्यांत एकदा जरी उणे पडलें । तरी अनन्यत्व मरे ॥ ५ ॥
अविश्वासे कांस सोडिली । ऐशी कितेक नाहीत भवीं बुडालीं ।
तस्मात् साधकें जी स्वहिता प्रवर्तलीं । ती सामर्थ्य न पाहती ॥ ६ ॥
स्वानुभव आणि प्रबोधशक्ति । जयापाशी दोन निश्चिती ।
तेचि सद्गुरु ओळखून मती । अनन्य होती साधक ॥ ७ ॥
सामर्थ्यबळें जो गुरुत्व दावी । तो गुरु नव्हे तस्कर आडवीं ।
कौटालें उगीच लोके भोंदावीं । तेथे हित कैचें ॥ ८ ॥
कौटालीच जरी गुरु म्हणावे । तरी गारुडी का न बुद्धीने सेवावे ।
सामर्थ्य पाहती ते शिष्य अंगीकारावे । तरी कां न पाळावे पशु ॥ ९ ॥
ऐसेचि गुरुशिष्य भूमीवरी । असंख्य होतील वेषधारी ।
अंधासवें पडती गारीं । आंधळीं जातां ॥ २१० ॥
असो ऐसे जे दोधे अनधिकारी । ते उपयोगा न येती ब्रह्मसाक्षात्कारीं ।
तयासी त्यागावें पशूचे परी । जीवन्मृतजगीं ॥ ११ ॥
अज्ञानरूप सरे रजनी । ज्ञानसूर्य उंचावें गगनीं ।
उपदेशमात्र पूर्ण समाधानी । धन्य ते गुरुशिष्य दोघे ॥ १२ ॥
असो रामा मुख्य अधिकारियानें । देहलोभ सोडून शरण जाणें ।
ज्ञात्या गुरूपासून ज्ञान पावणें । अभेद अक्षयी ॥ १३ ॥
गुरूचें ऐश्वर्यतेज पाहूनी । भीति जरी उरे शिष्याचें मनीं ।
तरी उपदेशितां त्या ब्रह्मज्ञानीं । भीतीने रिघाव कैसा ॥ १४ ॥
ऐसे कोणी जरी कल्पितां । मी तयाचे भीतीसी निरसिता ।
जेवीं म्यां देवांशी अनुग्रह करितां । सर्व भीती काढिली ॥ १५ ॥
गुरुशिष्याचिये मिळणीं । भेदाची होतसे धूळधाणी ।
तेथें भय तरी उरे कोठोनी । द्वैतानुयायी ॥ १६ ॥
प्रथमतः कांही में जाय वाटलें । तें संघष्टणें जाय निरसलें ।
तेव्हां उभयताही एकचि झाले । दंपत्यापरी ॥ १७ ॥
असो देवांचा माझा संवाद । परोक्षरीतीं न पहावा भेद ।
हा गुरुशिष्यांचा अभेदबोध । अधिकारिये जाणावा ॥ १८ ॥
ब्रह्माबुद्धिदेवतेइंद्रिय । हा तरी माझाचि असे समुदाय ।
ऐसा मी अधिकारी निश्चय । श्रवण करीं गुरुमुखें ॥ १९ ॥
मी जो शिव तोचि श्रीसद्गुरु । मज अनाथाचे माहेरु ।
दीनाचा केलासे अंगिकारू । अभेद संवादी ॥ २२० ॥
या रीतीच जें जें बोलणें । अपरोक्षत्वें साधकें  घेणें ।
असो आतां संवादाचे खुणे । सादर व्हावें ॥ २१ ॥
अरे देवहो तुम्हां कैशी भ्रांति । मी पुरातन सच्चित्घन मूर्ति ।
या सृष्टीच्या आदि अंती । आणि मध्येही तैसाचि ॥ २२ ॥


आसं प्रथममेवाहं वार्तामि च सुरेश्वराः ॥
भविष्यामि च लोकेऽस्मिन्मत्तो नान्योऽस्ति कश्चन ॥ ११ ॥


देवहो सृष्टीपूर्वी मी एक । असतां मीच झालों सकळिक ।
भूत भावी वर्तमान तिन्ही लोक । दुजे काय येथे मजहूनि ॥ २३ ॥
हे सृष्टि नामरूपात्मक सारी । झालीच नव्हती चित्सागरीं ।
तरंगवीण समुद्रापरी । मी एकलाचि असें ॥ २४ ॥
वायूवीण जेवीं आकाश । तेवीं मायेवीण मी परेश ।
सच्चिनधन अविनाश । परब्रह्म ॥ २५ ॥
मनेवीण जेवीं प्रत्यगात्मा । तेवीं मायेवीण मी परमात्मा ।
अभेद परी दिधली उपमा । शिष्यबोधार्थ ॥ २६ ॥
आत्मा अस्ति भाति प्रिय जाणावा । परमात्मा सच्चिदानंद ओळखावा ।
येथे  वाउगाचि प्रीत्यर्थ नांवा । भेद झाला ॥ २७ ॥
मनादि नासतां आत्मा मी आहे । हेचि अस्तित्व सद्रप पाहे ।
जया आधिष्ठानावरी उमटों लाहे । भ्रम हा सारा ॥ २८ ॥
नेणिवेचा जो जाणता । भातित्वे तो लयसाक्षी निरीक्षिता ।
हेचि ज्ञानघन चिद्‌रूपता । लक्षण दुसरें ॥ २९ ॥
अनुभव नसतां सुखदुःखावीण । अनुभाव्यरूप आनंदघन ।
हेचि ब्रह्मीचे तिसरे लक्षण । अकृत्रिम असे ॥ २३० ॥
सच्चिदानंद हे ब्रह्मलक्षण । याचे पुढे विशद निरूपण ।
या चिन्हेंशीयुक्त मी पुरातन । सृष्टीपूर्वी ॥ ३१ ॥
त्या मज निश्चळ चित्सागरावरी । माया उठिली चंचळ लहरी ।
त्या मायेसरिशी नामरूपें सारी । जगकल्पना उमटे ॥ ३२ ॥
लहरीसवें तरंगमाळा । पाणी असून दिमती डोळां ।
तेवीं मज सच्चित्धन विशाळा । नामें ठेविली मायेस्तव ॥ ३३ ॥
उगाचि आकार बुद्बुदाचा । तेवींच आकार या जगाचा ।
उभयामाजीही पाहतां साचा । ब्रह्म पाणीच असे ॥ ३४ ॥
मीठ मोती आणि गार । हे पाणियाचे तीन प्रकार ।
तेवींच जडचंचळ आणि मिश्र । अन्यथा भाव स्वरूपाचे ॥ ३५ ॥
तस्मात् सर्वजगी मी ब्रह्म असें । विकारामाजीही पाणी जैसें ।
मजवेगळे जगीं कांही नसे । तरंगी काय पाण्याविण ॥ ३६ ॥
पाण्याविण तरंग न व्हावे । तरी तें पाणीच कां न म्हणावें ।
जग तेंचि ब्रह्म आघवें । नामकल्पना कासया ॥ ३७ ॥
तरंग जेवीं मागें झालें । त्यां आंत बाहेर पाणी संचले ।
तेवीं जग जें  पूर्वी होऊन गेलें । तें तें मीच ब्रह्मरूप ॥ ३८ ॥
आतां वर्तमानी तरंग जे दिसती । त्या तरंगी पाणियाची वस्ती ।
तेवीं वर्तमानी जया जगा उत्पत्ति । त्यां आंत बाहेरी मी चित्धन ॥ ३९ ॥
पुढे होणार जे तरंग । त्यामाजी पाणीच त्याचे सर्वांग  ।
तेवीं आतां पुढे होणार जग । त्यां त्यां मध्ये असंग मी ॥ २४० ॥
एक स्थिर एक चंचळ । स्थावर जंगमादि सकळ ।
एक उत्पन्न होतांचि नासे केवळ । एक विलंबवरी राहती ॥ ४१ ॥
परी त्या सकळांमाजी मी एकला । दुसरा पदार्थचि नाही मिळाला ।
नामरूपाचा मात्र भ्रम झाला । माझिया न कळण्यानें ॥ ४२ ॥


श्लोकार्द्ध ॥ व्यतिरिक्तं च मत्तोऽस्ति नान्यत्किंचित्सुरेश्वराः ॥


अगा हे सुरेश्वरहो सहजीं । या सर्वही नामरूप जगामाजीं ।
मजविरहित अन्य किंचितही दुजी । वस्तु जात नाहीं ॥ ४३ ॥
सुरेश्वर संबोधन जें  दिधलें । यांत इतकेंचि असे सुचविलें ।
तुम्ही देवादि दिसतां वेगळले । परी मीच की तुम्ही असा ॥ ४४ ॥
देव दानव मानव । पशुपक्षी गो अश्व ।
हे स्थावर जंगम सर्व । मजवीण येथे काय ॥ ४५ ॥
सर्पामाजी जेवी दोरी । की रजतामाजी शिंप सारी ।
तेवीं यया सर्व जगामाझारीं । मजवीण वस्तु नाहीं ॥ ४६ ॥
पुरुषामाजी जेवीं स्थाणु । की अलंकारामाजीं जेवीं सुवर्णु ।
तेवीं जगामाजीं मी सच्चित्घनु । अन्य दुजें कांही नसे ॥ ४७ ॥
घटामाजीं जेवीं मातीं । पटीं तंतूचि आदिअंतीं ।
तेवीं मी या सर्व जगती । मजवीण यांत काय दुजें ॥ ४८ ॥
तरंगामाजीं जेवीं पाणी । की ज्वाळेमाजी अवघा अग्नि  ।
तेवीं मी या सर्वजगीं असें व्यापूनी । रतिमात्र दुजें नाहीं ॥ ४९ ॥
सुवर्णाचे मणी केले । सुवर्णतंतूनेंचि ओविले ।
वरी सुवर्णपत्रिये मढिले । तया व्याप्य व्यापलें म्हणावें ॥ २५० ॥
जग हे अस्ति भाति प्रियात्मक । त्या अंतरीं मी अनंत व्यापक ।
बाहेरीही मी सतचित्तघन एक । व्याप्य व्यापक या नांवें ॥ ५१ ॥
सुवर्णेवीण दुजें आढळेना । मजवीण येथे काही असेना ।
मग व्याप्य व्यापकाची कल्पना । कासया वाउगी ॥ ५२ ॥
सर्व बैसलें साधकाचें अंतरीं । ही सर्व भावना जावी सारी ।
यास्तव श्रुतिमाउली बोध करी । यांत आहे ते ओळखा ॥ ५३ ॥
या सर्वांमाजीं ब्रह्म एक । एक पाहतां नसे अनेक ।
सर्व हे नाहींच निश्चयात्मक । आहे तें ब्रह्म ॥ ५४ ॥
एवं तुम्हांसहित सर्व जग । मीच असें एकला अभंग ।
नट जैसें नानापरी आणी सोंग । परी तो नट एकला ॥ ५५ ॥
तुम्ही कोण तूं होतें पुसिलें । त्यास्तव निजरूप म्यां सांगितलें ।
एक निर्विशेष निश्चळ पहिले । दुजें साविशेषत्वे जगीं ॥ ५६ ॥
सविशेष तरी झालेंचि नाहीं । निर्विशेषचि असे कालीं तिहीं ।
परी सविशेषावीण निर्विशेष कहीं । अनुभवासी न ये ॥ ५७ ॥
आधी सुवर्ण ओळखावें । मग अलंकारामाजी पहावें ।
की अलंकारी आधीं सुवर्ण जाणावें । निखळ सुवर्ण मग ॥ ५८ ॥
तेवीं  सच्चीदानंद ब्रह्म जाणावें । मग जगी आस्ति भातित्वें पहावें ।
की जगांतील आधी ब्रह्म ओळखावें । मग तें निखळ ब्रह्म ॥ ५९ ॥
निखळ ब्रह्म कळल्यावीण । जगीं पहावें ते बाणे खूण ।
जगीं ब्रह्म ओळखिल्यावीण । निखळब्रह्म प्रतीती न ये ॥ २६० ॥
निखळब्रह्म तें निर्विशेष । जगी व्यापलें तें सविशेष ।
हे हेतु हेतुमद्धाव असती विशेष । एकमेकां बोधार्थ ॥ ६१ ॥
तस्मात् देवहो माझें निर्विशेषरूप । त्यावरी जगताचा आरोप ।
त्या सविशेषामाजीही अल्प । निर्विशेषावीण काय ॥ ६२ ॥
असो दोन्ही रूपी हे प्रकार सांगितले । यारीतीं माझें ज्ञान पाहिजे झालें ।
तरी तुम्ही भिन्नपणे अज्ञाने जें केलें । तें नासेल तत्क्षणीं ॥ ६३ ॥
मग तुम्हीही मीच होऊनी । भोगाल जीवन्मुक्तिसुखालागुनी ।
अंती निर्विशेषामाजीं समरसूनी । जातां पुन्हां उद्भवाना ॥ ६४ ॥
तुम्हां ऐसें न कळे जयासी । तया प्रबोधावें सायासी ।
याच कारणे मी कैलासवासी । देह धरून न राहिलों ॥ ६५ ॥
मागे झाले पुढे होणार । सध्यां असती जे नारीनर ।
चतुष्टय येतांचि अधिकार । मीच सद्गुरु बोधीत असे ॥ ६६ ॥
परी हे कृत्रिमरूप धरिलें । नटें जैसें सोंग आणिलें ।
परी तो नट जाणतसें वहिलें । तेवींया मी मिथ्या जाणे ॥ ६७ ॥
परी इतर जे उगेचि पाहती । ते सोंगासीच सत्य म्हणती ।
तेवीं तुम्हां ऐशी पडली जया भ्रांति । ते मज भाविती साकार ॥ ६८ ॥
असो साकार मिथ्या तरी खरा । परी सत्यत्वा मेळवी ज्ञानदारां ।
तस्मात् मुमुक्षूसी आरंभी थारा । सद्गुरूचा ॥ ६९ ॥
सदगरूपासून ब्रह्मज्ञान । त्या ज्ञानेंचि होयिजे आभिन्न ।
अभिन्न होतांचि समाधान । पुसावें न लगे ॥ २७० ॥
असो एक माझें रूप निर्विशेष । दुसरें जगी व्यापक सविशेष ।
त्या सविशेषामाजींच निर्दोष । उपदेष्टा गुरु ॥ ७१ ॥
तुम्ही कोण तूं होतें जें  पुशिलें । तें साकल्य तुम्हांस सांगितलें ।
तरी ऐसेंच जाणून अभिन्न व्हा वहिले । प्रसादें माझिया ॥ ७२ ॥
सविशेष जग हे जितकें । तें सर्व मीच हे सांगितले असिकें ।
आतां वेगळालें सकौतुकें । मीच असें हें बोलिजे ॥ ७३ ॥


श्लोकार्द्ध ॥ नित्योऽनित्योऽहमनघो ब्रह्मणं ब्रह्मणस्पतिः ॥ १२ ॥


नित्यामाजी नित्यत्व । वेदामाजीं मी चिद्‌रूपत्व ।
ब्रह्मादि सुखी आनंदत्व । स्वामित्वे मी निष्पाप ॥ ७४ ॥
घटसत्ता पटसत्ता बोले न्याय । भूतभौतिके आहेत हा जनप्रत्यय ।
त्या सर्वांमाजीं माझें सद्‌रूप होय । तें तें नामरूप त्यागूनी ॥ ७५ ॥
आकाश वायु तेज आहे । आप पृथ्वी त्रैलोक्य आहे ।
चत्वारखाणीं जडत्वे आहे । तो आहेपणा मी सद्‌रूपें ॥ ७६ ॥
आहेपणा वेगळां काढितां । नाहीपणा उरे खालता ।
तो नाहीपणा या जगा समस्तां । आहे तो मी सदा आहे ॥ ७७ ॥
चित्रांमाजी जेवीं भिंती । तेवीं आहेपणे मी सर्वांभूतीं ।
चित्रे तो नाहीपणेच मिरवती । भिंतीचा आहेपणा घेऊनी ॥ ७८ ॥
तेवीं माझा आहेपणा घेऊनी । जग मिरवे नामरूपपणीं ।
नामरूपें जाती जरी आटोनी । तरी मी अस्तित्वें उरें ॥ ७९ ॥
यां सर्वांसी सत्यत्व जे वाटलें । तें माझें सत्यत्व न जाणिल्यामुळे ।
माझें सत्यत्व जाणतां शून्य पडलें । नामरूपासी ॥ २८० ॥
ब्रह्म शब्दें चारी वेद । वेद म्हणिजे जाणीव प्रसिद्ध ।
तया वृत्ति ज्ञानामाजी विशद । ज्ञप्तिरूपें तो मी ॥ ८१ ॥
अथवा शब्दब्रह्मदेव । त्या माजी अर्थ हा विशद ।
त्या अर्थामाजीं मी शुद्ध बुद्ध । प्रत्यगात्मा ब्रह्मविषय ॥ ८२ ॥
अथवा हिरण्यगर्भ ब्रह्मशब्दें । त्या चंचलामाजीं जाणीव अभेदें ।
तोचि चिद्‌रूपत्वे मी विशदें । असें अलिप्तत्वे ॥ ८३ ॥
आतां ब्रह्मयादि सुखभोग निके । एकापरीस शतशतगुणें अधिकें ।
त्यामाजीं माझा निष्कलंकें । निरतिशयानंद ॥ ८४ ॥
एकाहून एक मोठे । एक पाहतां एक विटे ।
ऐसें जें अकरा प्रकारे सुख गोमटें । तया सातिशय म्हणावें ॥ ८५ ॥
ब्रह्मानंदाच्या कणा आंत । इतुकी ही सुखें अंतर्भूत ।
या आनंदापरीस दुजा नसेचि अद्भूत । यास्तव हा निरतिशय ॥ ८६ ॥
एवं जडामाजीं मी सद्‌रूप । चंचळामाजी मी  चिद्‌रूप ।
सुखामाजीं मी आनंदरूप । अलिप्तत्वें अनघ ॥ ८७ ॥
सद्‌रूप जडासी उपादान । चंचळासी चिद्‌रूप कारण ।
सुखासी आनंद प्रयोजन । तिही रूपें तिहींमाजी ॥ ८८ ॥
हे उगेंचि अधिकत्वें देखिलें । यास्तव एकेकाते एक वर्णिलें ।
परी त्रयत्रय असे व्यापलें । तिहींही माजी ॥ ८९ ॥
जडांमध्ये मी जड नव्हें । चंचळीं परी मी न हालवें ।
सुखदुःखीं असें परी म्यां न व्हावें । सुखदुःखा ऐसें ॥ २९० ॥
जड चंचळ उंचनीच योनि । जन्मती पावती सुखदुःखालागूनी ।
हे तरी अभिमाने पापपुण्याची करणी । मी नातळे उभया ॥ ९१ ॥
सर्व जरी जन्मे नासे । परी मद्‌रूप नव्हे त्या त्या ऐसें ।
या रीती मी निष्पाप असें । भूत भावी वर्तमानीं ॥ ९२ ॥
हेही समष्ठिरूपचि सांगितलें । सर्वांमाजी सच्चित्धनानंद व्यापलें ।
आतां भिन्न भिन्न भूत मौतिक झालें । त्यां माजीही मी परब्रह्म ॥ ९३ ॥
सर्व भूतांत श्रेष्ठ आकाश । तें व्यापक असे चौभूतांस ।
परी त्याचाही मी गर्भाविनाश । तेव्हां दशदिशा मी नव्हें कैसा ॥ ९४ ॥


दक्षिणांच उदंचोऽहं प्रांचः प्रत्यंच एव च ॥
अधश्चोर्ध्वं च विदिशो दिशश्चाहं सुरेश्वराः ॥ १३ ॥


 दक्षिणोत्तर पूर्वपश्चिम । ईशान्यादि संधि मध्यम ।
अधोर्ध्व  दशदिशां मी आत्माराम । सुरेश्वर हो व्यापलों ॥ ९५ ॥
आकाशी पंच भूते मिश्रित । तीगाळून काढिली जरी समस्त ।
उरे आकाशाचा गर्भ शाश्वत । तो मी अनंत परमात्मा ॥ ९६ ॥
जड में आकाश भतरूप । तेंही व्यापून ठेलें नामरूप ।
मग मी परमात्मा अरूप । न व्यापी कैसा ॥ ९७ ॥
आकाशामध्ये जे नेणिव । हा पृथ्वीचा जडभाव ।
आकाशी मृदुत्वाचा ठाव । तेंचि आप बोलिजे ॥ ९८ ॥
भासरूप दिसें जें आकाश । तोचि तेजाचा प्रकाश ।
अवकाशी जो निरोधांश । तोचि वायु ॥ ९९ ॥
नेणीव मृदुत्व आणि भासकत्व देख । चौथें निरोधत्व काढितां निश्चळ एक ।
उरे तेंचि निश्चयात्मक । परब्रह्म जाणावें ॥ ३०० ॥
नेणीव नसतां जाणीव उरे । शून्य नसतां आस्तित्व पुरे ।
मृदुत्व नसतां जें का निर्धारें । तें परब्रह्म ॥ १ ॥
वेगळेपणे जे पाहवें । त्यासी आकाश ऐसें म्हणावें ।
तो भास मोडतां अभिन्न व्हावें । तेंचि निजांगें ब्रह्म ॥ २ ॥
स्तब्ध परी हात हालवितां । चंचळवायु उमटे पाहतां ।
तो निरोधचि आकाशी नसतां । तेंचि मायारहित ब्रह्म ॥ ३ ॥
एवं चत्वारभूत आकाशीचें काढिलें । याचि नांवें आकाश गाळिलें ।
नंतर उर्वरीत जें कांहीं उरलें । तें खंब्रह्म श्रुति म्हणे ॥ ४ ॥
ऐसा मी नामरूपावीण । दशदिशा असें व्यापून ।
जडचंचळ पदार्थ निर्माण । होऊन नासती मजमाजीं ॥ ५ ॥
शदब्रह्म जया नांवें बोलिला । तो वेद मज आदिगुरूपासून प्रगटला ।
त्यांत अर्थरूपें मीच संचलों भला । आणि अथर्वणही मीच ॥ ६ ॥


सावित्री चापि गायत्री स्त्री पुमानपुमानपि ॥
त्रिष्ट्रब्जगत्यनुष्टुप् च पंक्तिश्छन्दत्रयीमयः ॥ १४ ॥


त्रिकाण्डरूप जो का वेद । जगतीपंक्ति त्रिष्टुप् अनुष्टुप् छंद ।
गायत्री सावित्री लिंगभेद । स्त्रीपुरुषनपुंसक ॥ ७ ॥
अहं ब्रह्मास्मि जें  स्फुरण । जैशी परावाचेची आठवण ।
तोचि शदब्रह्म मूळ पूर्ण । प्रणवात्मक वेद ॥ ८ ॥
अपौरुष अव्यक्त होता । जेधवां स्वयंभू झाला प्रगता ।
तेव्हां स्पष्ट होय त्या व्यक्ती अतौता । नादरूप ॐकार ॥ ९ ॥
तया प्रणवाचे निरूपण । पुढे असें होईल श्रवण ।
प्रस्तुत शब्दब्रह्म वेदांचे लक्षण । बोलिजेताहे ॥ १० ॥
एकचि नाद विभागला । पंचाशत् प्रकारे झाला ।
चारी वाचेंतून प्रगटला । अक्षर रूपें ॥ ११ ॥
अआदिक हे वर्ण सोळा । कादिमांत पंचवीत स्पर्शमेळा ।
यरादि सात उष्मकळा । ह क्ष हे दोन ॥ १२ ॥
एवं पन्नास मात्रा भिन्नभिन्न । एक स्वर झाला विभागून ।
त्यांत अर्थ प्रगटला येऊन । चंचळी जाणीवरूप ॥ १३ ॥
जीवेश्वराचे जेथें ऐक्य । तयाशी म्हणावें महावाक्य ।
तेचि चोविसाक्षरी अर्थैक्य । गायत्री प्रगटली ॥ १४ ॥
चोविसाक्षरचि ते गायत्री । त्रिप्रणव युक्त ते सावित्री ।
पंचप्रणव तुर्यपाद सहतंत्री । सरस्वती बोलिजे ॥ १५ ॥
असो पन्नास मातृका मागेपुढे । होतां अनंत शब्द उठती गाढे ।
त्यांत लिंगत्रय अपैसें निवडे । स्त्री पुरुष नपुंसक ॥ १६ ॥
अमितपदें या नांव गद्य । परिमित पदांशी बोलिजे पद्य ।
श्लोक प्रबंधरूप होय वेद्य । अर्थशब्द द्वारां ॥ १७ ॥
एकादशाक्षरें चरणासी । त्रिष्टुप्छंद म्हणावे त्यासी ।
द्वादशाक्षरें जगतिच्छंदासी । अनुष्टुप् अष्टाक्षरें ॥ १८ ॥
पांच पांच अक्षरे एकसरा उठती । प्रतिचरणीं तो छंदपंक्ति ।
या विरहित विंशति एकोनविंशति । तो बृहच्छंद ॥ १९ ॥
असो अवघा हा वेदराव । जो सर्वज्ञ दाखवी रूपनांव ।
शेखी विचारद्वारां करी अभाव । निर्विशेषी मेळवी ॥ ३२० ॥
विशब्दें मुख्य जाणीव । तें जाणिवरूप सविशेषशिव ।
मीच असें स्वयमेव । वर्ण अक्षरादि ॥ २१ ॥
कर्म आणि उपासना । कांडी प्रवर्तक शेखीं ज्ञाना ।
यास्तव बोलिजे त्रयीमय वचना । शब्दब्रह्मवेदासी ॥ २२ ॥
मंत्र नाम धेय अर्थवाद । विधिनिषेधरूप संवाद ।
ऐशी हे पांच अंगें विशद । अर्थबोधक असती ॥ २३ ॥
बहुपदें मिळती या नांव मंत्र । नामधेय दाखवी पदार्थमात्र ।
अर्थवाद फलश्रुति अणुमात्र । प्रवृत्यर्थ दाविलीं ॥ २४ ॥
स्वस्वरूपाचे ज्ञान व्हावें । यास्तव विधिनिषेधरूप बोलावें ।
तेंही कळेल प्रसंगें स्वभावें । उभयमुखें पावे कैसा ॥ २५ ॥
यज्ञादि कर्मी प्रवृत्ति तें कर्म । आश्रमवर्णाचे नेम ते धर्म ।
अनुसंघानात्मकवृत्तीसी उपशम । त्या नांव उपासना ॥ २६ ॥
स्वतां आपणासी जाणावें । भेद त्यागून अभिन्न व्हावें ।
ज्ञान बोलिजे याचि नांवें । त्रिविधा प्रतीति ॥ २७ ॥
ज्ञान उपासन तरी मद्‌रूप । परी अध्ययनादि कर्म हे माझें रूप ।
त्यांत मजवीण कोणते अल्प । पदार्थ भिन्न असती ॥ २८ ॥


सत्योऽहं सर्वगः शान्तस्रेताग्निगौर्यहं गुरुः ॥
गौर्यहं गव्हरं चाहं द्यौरहं जगतां विभुः ॥ १५ ॥


सत्य मी सर्वत्रीं सर्वगत । आश्रमत्रयाग्नि अध्यापनगुरुख्यात ।
गिरिगव्हर अंतरिक्षादि स्थितिमंत । या जगताचा प्रभु मी ॥ २९ ॥
 निर्विशेष  जें मी सत्यब्रह्म । तेंचि सविशेषीं सर्वगत परम ।
ब्रह्मचर्यादि तिन्ही आश्रम । त्यांचे पूज्य अग्नि ते मी ॥ ३३० ॥
अध्यापन करविता जो गुरु  । तो मीच असें की शंकरू ।
गौरव म्हणजे शब्द उपचारू । कर्मी प्रवर्तवी ॥ ३१ ॥
पाताळादि स्वर्गापर्यंत । जे जे रहात असती समस्त ।
ते ते गिरिगव्हरादिस्थितिमंत । जगत् हे सारें ॥ ३२ ॥
तें जगतही मीच अंगें । तया प्रवर्तवीं मी प्रसंगें ।
आणि वेदगुरु होऊन लावी मार्गे । कर्मादिकांच्या ॥ ३३ ॥
आणि सर्वांचा मीच विभु । उत्पत्ति स्थिति संहर्ता प्रभु ।
परी मी अलिप्त स्वयं प्रभु । तिन्ही अवस्थेसी ॥ ३४ ॥
मी एकलाचि विस्तारलों । पूज्य पूजक दोन्ही झालों ।
देवताही होऊन बैसलों । मातें म्यां भजावया ॥ ३५ ॥


ज्येष्ठः सर्वसुरश्रेष्ठो वरिष्ठोऽहमपांपतिः ॥
आर्योऽहं भगवानीशस्तेजोऽहं चादिरप्यहम् ॥ १६ ॥


ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वर्षिष्ठ । अपांपति सुरश्रेष्ठ ।
आर्य भगवान ईश स्पष्ट । तेज मी आणि आदिही ॥ ३६ ॥
सर्वांआदि मी प्रगटलों । प्रकृति पुरुषात्मक झालों ।
तोचि आदिनारायण बोलिजेलों । जाणता सर्वज्ञ ॥ ३७ ॥
तोचि मी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ । बहुता काळांचा वर्षिष्ठ ।
तो मी झालों सुरश्रेष्ठ । विष्णवादि देव ॥ ३८ ॥
विष्णवादि देवीं मी प्रवेशलों । तेथें पूज्य भज्य होऊनी बैसलों ।
 मर्त्यादि अधमदेहीं संचरलों । तेव्हां झालों पूजक भजक ॥ ३९ ॥
सर्व जीवनाचे जीवन । तो मी एकचि नारायण ।
नाराउदकचि माझें स्थान । अथवा नरा अधिष्ठान मी ॥ ३४० ॥
एवं सर्वांसी मी आधार । अपांपति मी चित्सागर ।
जग हे मजवरी तरंगाकार । उत्तमाधम मध्यम ॥ ४१ ॥
मजहून दुजा नाहीं वर्य । यास्तव मजचि बोलती आर्य ।
भगवान् षड्गुण ऐश्वर्य । माझ्या ठायीं आकल्प ॥ ४२ ॥
तो मी ईश्वर निजतेजें । ब्रह्मादि नाचवीतसे भोजें ।
आणि सर्वांआदि मी सहजें । आहे तैसा असें ॥ ४३ ॥
एकचि वेदरूप मी असतां । अग्राह्यअल्पमतीयांसमस्तां ।
याचि हेतू झालों चतुर्विधता । त्रिकांडात्मक ॥ ४४ ॥


ऋग्वेदोऽहं यजुर्वेदः सामवेदोऽहमात्मभू: ॥
अथर्वणश्च मन्त्रोऽहं तथा चांगिरसो वरः ॥ १७ ॥


मीच ऋग्वेद यजुर्वेद मी । मीच सामवेद अथर्वण मी ।
स्वतांचि झालों स्वयंभूमी । मीच अथर्वांगिरस ॥ ४५ ॥
वेदत्रय मुख्य असती । प्रणव त्रिमात्रात्मक गति ।
या तिहींतून अथर्वण निश्चितीं । मंत्ररूपें निवडिला ॥ ४६ ॥
 अथर्वांगिरस जो पांचवा । हाचि श्रेष्ठ उपनिषद् भाग जाणावा ।
तोचि वेदांत मोक्षप्रद जीवा । मीच असें स्वयंभू ॥ ४७ ॥
वेद प्रणवात्मक मी स्वतां झालों । यास्तव मी स्वयंभू बोलिजेलों ।
की पुरुषरूपें ब्रह्मा उद्भवलों । तोही मीचि ॥ ४८ ॥
हे असो अंगप्रत्यंगें । शास्त्रपुराणादि वेदाची अंगें ।
तितुकीही मीच असंगें । नामरूपेशीं तें ऐकें ॥ ४९ ॥


इतिहासपुराणानि कल्पोऽहं कल्पवानहम् ॥
नाराशंसी च गाथाहविद्योपनिषदोऽस्म्यहम् ॥ १८ ॥


इतिहास आणि पुराणें । कल्पादि शास्त्रे आणि व्याकरण ।
नाराशंतीरूपें रुद्राध्याय पूर्ण । उपनिषदें आणि गाथा ही मी ॥ ३५० ॥


श्लोकः सूत्राणि चैवाहमनुव्याख्यानमेव च ॥
व्याख्यानानि परा विद्या इष्टं हुतमथाहुतिः ॥ ॥ १९ ॥


श्लोक आणि सूत्रे सारी । यांची अनुव्याख्याने वरीं ।
अन्य व्याख्याने विद्यानुकारी । यज्ञहोम होमद्रव्य मी ॥ ५१ ॥


सार्द्ध द्वौ श्लोकौ ॥ दत्तादत्तमयं लोकः परलोकोऽहमक्षरः ॥
क्षरः सर्वाणि भूतानि दान्तिः शान्तिरहं खगः ॥ २० ॥
गुह्योऽहं सर्ववेदेषु आरण्योहमजोऽ प्यहम् ॥
पुष्करं च पवित्रं च मध्यं चाहमतः परम् ॥ २१ ॥
बहिश्वाहं तथा चांतः पुरस्तादहमव्ययः ॥  


परलोकाची व्हावया प्राप्ति । इहलोकी नाना दानें करिती ।
ते उभयलोक आणि दानेही निश्चिती । मीच असें स्वयमेव ॥ ५२ ॥
आणि मीच की अविनाश अक्षर । अथवा सर्वभूतादि मीच क्षर ।
शांति दांति आदि हे पवित्र । अथवा वनें पुष्करादि ॥ ५३ ॥
मुख्य मी वेदाचे गुह्यगूज । पूर्णपणे तो मी एकचि अज ।
परी या सर्वांमध्येही सहज । आणि तैसाचि बाहेरी ॥ ५४ ॥
मागें दशदिशा मी आहे म्हणोनी । बोलिलें होतें श्लोक व्याख्यानीं ।
मागुती आदरें द्विरुक्तीवाणी । बोलतां दोष नाहीं ॥ ५५ ॥
मागे पुढे आंत बाहेरी । मीच असें व्याप्य व्यापक सारीं ।
कोण कोण बाह्य आणि अंतरीं । भिन्न भिन्न निरोपूं ॥ ५६ ॥


ज्योतिश्चाहं तमश्चाहं तन्मात्राणीन्द्रियाण्यहम् ॥ २२ ॥
बुद्धिश्वाहमहंकारो विषयाण्यहमेव हि ॥


बाहेरीअंधार आणि प्रकाश । सूर्यास्तव होतसे आकाश ।
तेही मीच की अविनाश । विकार सांडूनी ॥ ५७ ॥
दशेंद्रिय बुद्धि अहंकार । हे सूक्ष्म देहाचे प्रकार ।
सर्व देहांतरी असती साचार । शब्दादि तन्मात्रांसहित ॥ ५८ ॥
भोक्त्यासी विषय सलग्न अंतरीं । तेचि भोग्यत्वे उमटले बाहेरी ।
 शब्दस्पर्शादि पदार्थमात्रीं । तेचि पंचविषय ॥ ५९ ॥
हे असो ब्रह्मांडा अंतरीं । देवादिके वसती सारी ।
ते तुम्ही मीच की निर्धारीं । बोलिजेत असे ॥ ३६० ॥


ब्रह्मा विष्णुमहेशोहमुमा स्कन्दो विनायकः ॥ २३ ॥
इन्द्रोऽमिश्च यमश्चाहं निर्जतिर्वरुणोऽनिलः ॥


ब्रह्मा विष्णु महेश मीचि । उमा स्कंद गणपति मीचि ।
इन्द्र अग्नि यम निरृति मीचि । वरुण आणि वायु ॥ ६१ ॥
बाहेरी ब्रह्मा सत्यलोकीं । राहून जगकल्पना करी निकी ।
विष्णु वैकुंठी परी अवतरे अनेकीं । रक्षावया सज्जन ॥ ६२ ॥
हे उभयरूपीहि मीच असें । आणि महेश मी कैलासी बसें ।
उमा स्कंद गणपतिही नसे । मजहून भिन्न ॥ ६३ ॥
हे असो इंद्रादि अष्टदिकपाळ । अष्टदिशांचे करिती प्रतिपाळ ।
तेही देव असें मीच सकळ । अस्ति भाति प्रियरूपें ॥ ६४ ॥
हे इतुकेही देव बाहेरी असतां । देहांतरी झाल्या इंद्रियदेवता ।
त्याचि कोणकोणत्या ऐकें समस्ता । संक्षेपें बोलूं ॥ ६५ ॥
ब्रह्मा बुद्धि होऊन अंतरीं । व्यापारतसे तिहीं व्यापारी ।
जाणीवरूपें विष्णु रक्षण करी । तेंचि अंतःकरण ॥ ६६ ॥
मी रुद्ररूपें अहंकाराचें । दैवत हे असे की साचें ।
आतां दिक्पाल तें बहिरिंद्रियांचे । दैवत असती ॥ ६७ ॥
इंद्र पाणि अग्नि वाचा । यमनिर्जति दैवत गुदाचा ।
वरुण जिव्हा वायु त्वचा । सूर्य तो चक्षु ॥ ६८ ॥


कुबेरोऽहं तथेशानो भूर्भुवः स्वमहर्जनः ॥ २४ ॥
तपः सत्यं च पृथिवी चापस्तेजोऽनिलोऽप्यहम् ॥


कुबेर जाणि ईशान । हेही दैवतें मीच दोन ।
आतां इहपरलोक मीच संपूर्ण । त्यांची नांवें ऐका ॥ ६९ ॥
भूलोक म्हणजे मृत्युलोक । भुवः म्हणजे अंतरिक्षलोक ।
स्वः म्हणजे स्वर्गलोक । हें त्रैलोक्य ऐसें ॥ ३७० ॥
याही वेगळे लोक चार । तेही बोलिजेत नामप्रकार ।
महर्लोक जनोलोक साचार । तप सत्यलोक मीचि ॥ ७१ ॥
इतुकीयांशी आधार आप पृथिवी । तेही वाचेनें बोलतां कळावी ।
त्या वाचेशी तेज वायूची शक्ति  असावी । तेचि क्षुधातृषादि ॥ ७२ ॥
मुख्य अग्नीच मी असतां । तेज वाचा मदंश तत्वतां ।
एक पृथ्वी मीच ऐसे पाहतां । सप्तलोकही मीचि ॥ ७३ ॥


आकाशोऽहं रविः सोमो नक्षत्राणि ग्रहास्तथा ॥ २५ ॥
प्राणः कालस्तथा मृत्युरमृतं भ भूतमप्यहम् ॥


मुख्य आकाशचि  मी असतां । चंद्र नक्षत्रा नसे भिन्नता ।
प्रकाशकारक मीच सविता । आणि सर्व ग्रहही मी ॥ ७४ ॥
मुख्य वायु मी ज्या  ब्रह्माण्ड विहरण । तरी पिंडी मीच पंचप्राण ।
तैसेचि जन्ममृत्युकालपूर्ण । अमृतही मीचि ॥ ७५ ॥


भव्यं भविष्यत्कृत्स्नं च विश्वं सर्वात्मकोऽप्यहम् ॥ २६ ॥
ओमादौ च तथा मध्ये भूर्भवः स्वस्तथैव च ॥


झाले होणार जें जें करणें । तें तें मीच अंगें होणें ।
सर्व विश्वात्मकी जेवीं सुवर्णे । असिजे अलंकारी तेवीं म्यां ॥ ७६ ॥
आदिॐकार मध्य व्याहृती । भूर्भुवस्वः ज्याते म्हणती ।
या रीतीं गायत्रीजप ब्राह्मण करिती । तें मीच की अंगें ॥ ७७ ॥


ततोऽहं विश्वरूपोजस्म शीर्ष च जपतां सदा ॥ २७ ॥
आशितं पायितं चाहं कृतं चाकृतमप्यहम् ॥


तस्मात् विश्वरूपचिही मी । ॐमादिशीर्ष जपती अंतर्यामी ।
भुक्तपीत तेंही सकळ मी । केलें न केलेंही मीच ॥ ७८ ॥


परं चैवापरं चाहमहं सर्वपरायणः ॥ २८ ॥
अहं जगद्वितं दिव्यमक्षरं सूक्ष्ममव्ययम् ॥


मीच पर आणि अपर । परायण असे सर्वत्र ।
मीच जगाचे हित दिव्यअक्षर । सूक्ष्म अव्यय मी ॥ ७९ ॥


प्राजापत्यं पवित्रं च सौम्यमग्राह्यमग्रियम् ॥ २९ ॥
अहमेवोपसंहर्ता महाग्रासौजसां निधिः ॥


पवित्र सौम्य मी प्रजापति । तेजस्वी अग्राह्य मज म्हणती ।
ओजसानधिग्रासक अंतीं । मीच उपसंहर्ता ॥ ३८० ॥


श्लोकार्द्ध ॥ हृदये देवतात्वेन प्राणत्वेन प्रतिष्ठितः ॥ ३० ॥


सर्वांच्या अंतरी जो मी बसें । देवतारू मीच विलसें ।
प्राणरूपें  प्रतिष्ठून असें । देहमात्र जितुका ॥ ८१ ॥


शिरश्चोत्तरतो यस्य पादौ दक्षिणतस्तथा ॥
यश्च सर्वोत्तरः साक्षादोंकारोऽहं त्रिमात्मकः ॥ ३१ ॥


मकार कारणरूप अज्ञान । तोचि भागकल्पिला दक्षिण ।
पादशब्दें उत्पत्तिस्थान । असे सर्वांचें ॥ ८२ ॥
सर्व प्रपंच हेंचि शिर । अकारादि उत्तरोत्तर ।
जडत्वा पावले समग्र । साकारत्वें ॥ ८३ ॥
सर्वांतरत्व चंचल उकार । तोचि उभयसंधींशी भातमात्र ।
ऐसा त्रिमात्रात्मक ॐकार । साक्षात् मीच असें ॥ ८४ ॥
अकाराशी उकार मेळवितां । ओकार उमटे उच्चारितां ।
मकार त्यामध्ये मिश्र होतां । ओमिति प्रगटे ॥ ८५ ॥
एवं अकार उकार मकार । अर्धमात्रा ते ध्वनिउच्चार ।
त्यामध्ये जाणिवेचा प्रकार । एवं प्रणव पंचांगें ॥ ८६ ॥
अकार तोचि सर्वदृश्य । उकार चंचलत्वे सर्वावभास ।
मकार अज्ञान कारण दोहींस । ही प्रकृतीची अंगें तीन ॥ ८७ ॥
ध्वनिमात्र ते मूळप्रकृति । जाणता पुरुष स्वयंज्योति ।
एवं प्रकृति पुरुषात्मक निश्चितीं । सविशेष ॐकार मी ॥ ८८ ॥
मागे झाले पुढे होणार । वर्तमानी जें जें जगमात्र ।
तितुकेंही अवघे एकाक्षर । ब्रह्म जाणावें ॥ ८९ ॥
पन्नास मातृका जेथून होती । वर्णास्तव शब्दाची उत्पत्ति ।
तया अनंत शब्दांनी वेद म्हणती । अनंतावैवेदाः ॥ ३९० ॥
तोचि मी ॐकार सर्वजनासी । उपास्य ध्येयरूप निश्चयेंशीं ।
गति आणि अवगतीसी । ॐकारचि कारण ॥ ९१ ॥


ऊर्ध्वं चौन्नामये यस्मादधश्चापनयाम्यहम् ॥
तस्मादोंकार एवाहमेको नित्यः सनातनः ॥ ३२ ॥


ऊर्ध्वगति नेणार जीवासी । तेवींच दावी अधोगतीसी ।
तस्मात् ॐकार मी आविनाशी । एक नित्य सनातन ॥ ९२ ॥
जितुका असे जंगम प्राणि । त्यामाजी जी हंसाक्षरे दोन्ही ।
उभय अक्षरांशी बोलिजे वाणी । ॐकार त्रिमात्रात्मक ॥ ९३ ॥
ऐसा सर्व प्राणियांच्या देहीं । ॐकार असे सर्वदाही ।
तयासी गुण मिळतां तेणें रीती पाहीं । वर्तणूक होतसे ॥ ९४ ॥
रज तमें होतसे अधःपात । सत्वगुणें ऊर्ध्वगती पावत ।
येणे रीती मी अधोर्ध्व नेत । प्रणवरूपें ॥ ९५ ॥
कामक्रोधादि रजाच्या वृत्ति । येणे रीती पुनरावृत्ति ।
जरी कामयी  स्वर्गप्राप्ति । परी तेही अधअव्हाट ॥ ९६ ॥
आलस्यनिद्रा प्रमाद । हे तमोगुणाचे छंद ।
येणे अंधतमी पावणे प्रसिद्ध । निर्यगादि अधोगमन ॥ ९७ ॥
जये क्षणीं सत्त्वगुण मिळे । उमटती शांति शमदमादि सोहळे ।
विचारारूढ होतां निवळे । ज्ञान तेंचि ऊर्ध्वगमन ॥ ९८ ॥
एवं अधोगती देणार । तो मीचि सनातन ॐकार ।
तरी येथे ध्यानाचा प्रकार । अभ्यासावा साधकें  ॥ ९९ ॥
आत्मा हाचि पूर्वारणी । प्रणव तोचि उत्तरारणी ।
ध्यान हेचि मंथास्थानी । तेव्हां ऐक्यज्ञानाग्नि प्रगटे ॥ ४०० ॥
ज्ञानाग्नि प्रगटलिया वरी । नामरूपें जळती सारीं ।
एकरूप अभेदें मी निर्विकारी । गुरुशिष्यत्व जाऊन उरें ॥ १ ॥
ऐसा मी एकाक्षर ब्रह्म । साधकासी विश्रांतिधाम ।
त्या मज ॐकारा प्रणव नाम । किंनिमित्त तें ऐका ॥ २ ॥


ऋचो यजूंषि सामानि यो ब्रह्मा यज्ञकर्मणि ॥
प्रणामये ब्राह्मणेभ्यस्तेनाहं प्रणवो मतः ॥ ३३ ॥


त्रैविद्य ऋग्यजुः सामासी । जो ब्रह्मा यज्ञादि कर्मासी ।
प्रेरीतसे ब्राह्मणादिकांसी । यास्तव मी प्रणवमान्य ॥ ३ ॥
असो प्रणव नामाची व्याख्या केली । सांगरूपें तो मागें वर्णिली ।
आतां सर्वव्यापकता निरूपिली । पाहिजे कैसी ॥ ४ ॥


स्नेहो यथा मांसपिण्डं व्याप्नोति व्यापयत्यपि ॥
सर्वान् लोकानहं तदत्सर्वव्यापी ततोऽस्यहम् ॥ ३४ ॥


स्नेह जैसें व्यापे मांसपिंडासी । आंत बाहेरी माझी व्याप्ति तैशी ।
व्यापलों म्हणून नाम मजशी । सर्वव्यापक ॥ ५ ॥
स्नेहादिकांत चर्म बुडविलें । अथवा घृतादिकांत शर्करादि घोळिलें ।
तें जैसे आंत बाहेर व्यापलें । तिळप्राय कोरडें नुरे ॥ ६ ॥
तेवीं आंत बाहेरी देह सारा । अथवा ब्रह्माण्ड पदार्थमात्रा ।
व्यापलों असें यास्तव गिरी । सर्वव्यापी बोलिजे ॥ ७ ॥
अथवा जीवन जैसें स्निग्ध असे । कीं मृदत्वें आकाश सर्वां व्यापितसे ।
घटापरी पिण्ड ब्रह्माण्ड व्यापलेसे । सूक्ष्मत्वें म्यां व्याप ॥ ८ ॥


ब्रह्मा हरिश्च भगवानाद्यन्तं नोपलब्धवान् ॥
ततोऽन्ये च सुरा यस्मादनन्तोऽहमितीरितः ॥ ३५ ॥


ब्रह्मा हरि भगवंत । आणि स्वर्गवासी देव समस्त ।
न जाणतीच कदां आदि अंत । यास्तव अनंतमान्य मी ॥ ९ ॥
अनंतत्व माझें निर्विशेषाचें । पुढे बोलेन कैसें तें वाचें ।
परी अनंतत्व सविशेषाचें । कैसें तें ऐका ॥ ४१० ॥
ब्रह्मदेव आणि नारायण । आणि तुम्ही सर्व हे सुरगण ।
माझें सविशेषात्मक रूप संपूर्ण । याचा आद्यंत जाणूं न शका ॥ ११ ॥
पक्षी जेवीं आकाशी फिरती । परी आकाशाची सीमा नेणती ।
तेवीं देहधारक जितुक्या मूर्ती । नेणती आद्यंत माझा ॥ १२ ॥
भगवान् शब्दें मी कैलासवासी । त्या आद्यंत न कळे माझा मजसी ।
मुर्ति तितुक्या एकदेशी । सर्व एकदां केवीं देखे ॥ १३ ॥
अथवा ब्रह्मा बुद्धि विष्णु अंतःकरण । अहंकार रुद्र इंद्रिय देवगण ।
हे मज आत्मयाचें व्यापकपण । जाणती कैसे ॥ १४ ॥
मन जरी चपळ अति । एकदेशीच होय व्याप्ति ।
दशदिशा नव्हे एक समयगति । अनंतत्व जाणावया ॥ १५ ॥
समुद्रावरील जैशा लहरी । मोजवती ना एकसरी ।
ऐसा मी सविशेषही निर्धारीं । विषय नव्हे कवणाचा ॥ १६ ॥
असो कवणासी न लगे अंत । यास्तव नामें मी अनंत ।
आतां मजसी तारक ऐसें वेद म्हणत । तेंचि कैसें अवधारा ॥ १७ ॥


गर्भजन्मजरामृत्युसंसारभवसागरात् ॥
तारयामि यतो भक्तं तस्मात्तारोऽहमीरितः ॥ ३६ ॥


गर्भ जन्म मृत्यु जरा भय । संसार सागरांतून निश्चय ।
तारीतसे भक्त समुदाय । तस्मात् तारक मी बोलिजे ॥ १८ ॥
जन्ममृत्युरूप हे संसृति । सागरापरी नोलंध्य आति ।
अज्ञानरूप पडिलें आवर्ती । सुटिका येथून दुर्गम ॥ १९ ॥
ययापासून सुटावें इच्छुन । मज सद्गुरूसी आले शरण ।
ते मद्भक्त ऐक्यज्ञाने बोधन । सोडवीजे म्यां ॥ ४२० ॥
अथवा प्रणवरूप मी तार । त्या मातें उपासिती जे नर ।
त्यांसी तारिता मी शंकर । ॐकार रूपें ॥ २१ ॥
आतां माझें सूक्ष्मरूप । व्यापून कैसें सर्व व्याप्य ।
तें बोलिजे अरूप । जसें असें तैसें ॥ २२ ॥


चेतविधेष देहेष जीवत्वेन वसाम्यहम् ॥
सूक्ष्मो भुत्वा च हृदेशे यत्तत्सूक्ष्मं प्रकीर्तितः ॥ ३७ ॥


चतुर्विध देह जितुके । त्यांचे हृदयाकाशामाजीं निकें ।
सूक्ष्म जीवत्व होऊन वसे मी कौतुकें । त्या मज सूक्ष्म बोलती ॥ २३ ॥
जरायुजादि चारी खाणी । त्यांतें जीववी जीवत्व धरूनी ।
हृदयाकाशीं सूक्ष्मत्वें व्यापूनी । तिन्ही व्यापार चालवी ॥ २४ ॥
अथवा अन्न प्राण मन विज्ञान । हे चतुर्विध कोश देह संपूर्ण ।
त्यांत मी वसतसे आनंदघन । अतिसूक्ष्मत्वें ॥ २५ ॥
पटाअंतरी जैसा तंतु । तया तंतूमाजी कापूस समस्तु ।
त्या कापुसामाजी अंशु विख्यातु । सूक्ष्म दृष्टीने कळे ॥ २६ ॥
तेवी देहा आंत प्राण असे । त्या प्राणाहून मन सूक्ष्मत्वे वसे ।
त्या मनाहून विज्ञान वसतसे । अतिसूक्ष्मत्वें ॥ २७ ॥
त्या विज्ञानाहून कोटिगुण । अतिसूक्ष्म मी आनंदघन ।
अंतर्दृष्टीने पाहतां अवलोकून । अनुभवा येतों ज्ञानियाचे ॥ २८ ॥
ऐसाचि कीटकापासून ब्रह्मयावरी । सूक्ष्मत्वें वसें मी निर्विकारी ।
यास्तव सूक्ष्म मज बोलती निर्धारीं । आतां मी स्वप्रकाश कैसा ॥ २९ ॥


महातमसि मग्नेभ्यो यत्प्रकाशये ॥ something missing ?
विद्युद्वलतुलं रूपं तस्माद्वैद्युतम स्म्यहम् ॥ ३८ ॥


अज्ञानीमग्न भक्ताकारणें । आत्मज्ञानाचा प्रकाश करणे ।
विद्युत्प्रायवृत्तीमाजी स्फुरद्‌रूप होणें । तस्मात् वैद्युत मीचि ॥ ४३० ॥
अज्ञानतमी वाउंगेचि पडले । नाथिल्याचि अभिमानें गुंतलें ।
ते मदंश जीव व्यर्थचि भ्रमले । जन्ममृत्युरूप संसारी ॥ ३१ ॥
त्यांत अनंत जन्मींचें सुकृत । असेल एखादिया तो तरावें इच्छित ।
नंतर गुरुचरणीं होय रत । तो मद्भक्त मी म्हणोनि ॥ ३२ ॥
त्यासी मीच गुरुरूपें प्रगटून । बोधे प्रकाशवी ऐक्यज्ञान ।
ऐसा बाहेरी मी गुरुपूर्ण । स्वप्रकाशक प्रकाशीं ॥ ॥ ३३ ॥
अंतरी जो मी आनंदघन । कर्णी पडतांचि गुरुवचन ।
होत वृत्तीसी प्रकाशमान । अपरोक्षत्वें ॥ ३४ ॥
विद्युल्लता क्षणांत नासे । मी अक्षयी स्वकीय प्रकाशें ।
वृत्तीमाजी किंचित् स्फुरतसें । यास्तव विद्युत् बोलिलें ॥ ३५ ॥
एवं आंत बाहेरी प्रकाशकता । तो मी एकचि विकारापरता ।
आणि ईश्वरत्व कैंसें तें अतां । बोलिजे सविशेषत्वें ॥ ३६ ॥


एक एव यतो लोकान् विसृजामि सृजामि च ॥
विवासयामि गृण्हमि तस्मादेकोऽहमीश्वरः ॥ ३९ ॥


एकच मी या सर्व लोकांत । उत्पन्न करोनि संरक्षित ।
लयकाळी सर्वांतें ग्रासीत । यास्तव मी एक ईश्वर ॥ ३७ ॥
एक मी निर्विशेष असतां । मायिक स्फुरण झाले न होतां ।
तेचि माया चंचळरूपें जाणतां । मी असें सर्वज्ञ ॥ ३८ ॥
चंचळतेचि जडत्वें प्रकृति । जाणता पुरुष मी स्वयंज्योति ।
परी उभयांसी स्त्रीपुरुष आकृति । किमपि नसे ॥ ३९ ॥
तोचि अर्धनारी नटेश्वर । तोचि षड्गुणात्मक ईश्वर ।
शिवशक्ति आदि नामप्रकार । तया विकारासी ॥ ४४० ॥
प्रकृतीमुळे मज सर्वज्ञपण । सर्वज्ञामुळे प्रकृतीसी चळण ।
ऐसें एकमेकांचे साह्यपण । असे जगत्कारणत्वें ॥ ४१ ॥
मुळी स्फुरण मी ब्रह्म म्हणोनी । तोचि अहंबहुस्यां झाला ध्वनि ।
तेचि इच्छा बोलती तयालागुनी । सत्यसंकल्प ॥ ४२ ॥
अमुक व्हावें हें इच्छिलें । त्या इच्छेसरिसे निर्माण झालें ।
परी झालें तें निःशेष नाथिलें । तेव्हां सत्यसंकल्पही मिथ्या ॥ ४३ ॥
असो चंचळ जो स्वभाव । गुणापर्यंत मायेपासाव ।
वेगळालें ठेविलें नांव । हेतूपरत्वें ॥ ४४ ॥
गुणसाम्य गुणक्षोभिणी । महत्तत्व शुद्ध सत्वगुणी ।
हे इतुकेही नामाची करणी । एका चंचळाची ॥ ४५ ॥
मुळी इच्छा जे गुप्त होती । ते प्रगटती झाली भूताकृति ।
या जडत्वासी कारण अव्याकृती । अविद्या बोलिजे ॥ ४६ ॥
पुढे भूतें गुण मिळती जेधवां । अष्टधाप्रकृति नाम तेधवां ।
तेथून सप्तदशात्मक स्वभावा । उत्पत्ति होती झाली ॥ ४७ ॥
तयाचें करितां पंचीकरण । स्पष्टत्व आलें भूतांलागून ।
आणि चारी खाणीही झाल्या निर्माण । जरायुजादि ॥ ४८ ॥
सत्रा तत्त्वं तेचि इंद्रिय । खाणीत प्रवेशला हा समुदाय ।
मग मी ईश्वरत्वें प्रवेशता होय । तेव्हां जीवत्व आलें ॥ ४९ ॥
एवं ईक्षण आरंभी शेवटी प्रवेश । इतुकें निर्माण करी मी ईश ।
परी हे मायिकरूप सविशेष । बोलिजे माझें ॥ ४५० ॥
आतां जीवाचे व्यापार । अनेक परी पांचचि विकार ।
त्या पांचांसीही जागृति प्रकार । एकचि बोलिजे ॥ ५१ ॥
या जागृतीचा संस्कार । चित्तीं उठे भासमात्र ।
तें स्वप्न दुसरें विश्रांति थार । सुषुप्ति तिसरी ॥ ५२ ॥
जरी अनंत जन्माच्या पुण्यकोटि । नरदेहीं सद्गुरूची होय भेटी ।
मोक्ष लाभे उठाउठी । तस्मात् मोक्ष हे कृति जीवाची ॥ ५३ ॥
एवं जागृदादि मोक्षापर्यंत । जीवाचे हे सर्व असे कृत ।
त्यांत जाणीवपणे असे रक्षित राहणे असें जोवरी । ५४ ॥
आपेआपचि नाश पावे । हेचि संहाराचे रूप जाणावें ।
एवं सृष्टि स्थिति संहार व्हावें । परी आरोपावें मजवरी ॥ ५५ ॥
मुळी इच्छा सृष्टि होण्याची । त्याचें नाम ठेविलें विरिची ।
जाणीवरूपें पालन तोचि । सत्वगुणी विष्णु ॥ ५६ ॥
नेणीव होतांचि विस्मरण । तमोगुणें पावताती मरण ।
तोचि मी रुद्रनामें आरोपण । होणे मजवरीसंहार ॥ ५७ ॥
जेधवां उत्पत्तीचा काळ । तेव्हां मी निर्मीतसे सकळ ।
येणे असावें अमुकवेळ । तोंवरी मी संरक्षीं ॥ ५८ ॥
त्याचा तो काळ सरतांक्षणीं । मी ग्रासी त्या आकारालागुनी ।
एवं सृष्टि स्थिति संहार तिन्ही । याचा कर्ता मी एकला ॥ ५९ ॥
जेवीं ऊर्णनाभी एकला असे । तंतू निर्मून क्रीडत असे ।
शेवटीं ग्रासून उगला बैसे । तेवींच ईश्वर मीही ॥ ४६० ॥
जग जितुकें रूप नांव । हे माझेच सर्व अवयव ।
मीचची रक्षी ग्रासी यास्तव । ईश्वर मी एकला ॥ ६१ ॥
देवहो शंका कराल अंतरीं । की हे सविशेष मिथ्या निर्धारी ।
याचे वर्णन कितीतरी । बहुधा होय ॥ ६२ ॥
तरी अवधारा सविशेषावीण । बोलतां नये निर्विशेष निर्गुण  ।
तस्मात् सविशेषामाजीं ओळखून । निर्विशेष अंगें व्हावें ॥ ६३ ॥
तथापि निर्विशेषाचे वर्णन । पुढे असे यथार्थ पूर्ण ।
परी येणे श्लोकेही निरूपण । अल्पसें कीजे ॥ ६४ ॥


न द्वितीयो यतस्तस्थे तुरीयं ब्रह्म यत्स्वयम् ॥
भूतान्यात्मनि संहृत्य चैको रुद्रो वसाम्यहम् ॥ ४० ॥


जयासी नसेचि किमपि द्वितीय । जे का ब्रह्म ज्या म्हणती तुरीय ।
सर्व भूतांसि ग्रासूनि तें मी स्वयें । रुद्र नामें उरतसें ॥ ६५ ॥
स्फुरणापासून खाणीवरी कांहीं । जया स्वरूपीं झालेंचि नाहीं ।
भ्रमें जैसा रज्जूवरी अही । दिसे तेवीं हे मिथ्या ॥ ६६ ॥
सजातीय विजातीय भेदरहित । तेवींच नसे भेद स्वगत ।
एवं जें द्वितीयारहित अद्वैत । निर्विशेष ब्रह्म मी ॥ ६७ ॥
दुसरें एक ब्रह्म सत्य असावें । तरीच सजातीय भेदें व्हावें ।
जीवेश्वर जरी सचेतन म्हणावें । तरी ते जन्मलेचि नाहीत ॥ ६८ ॥
दुसरें जड एक असावें जरी । विजातीय भेद होईल तरी ।
जग जड म्हणावें भूतादि सारी । तरी ती उद्भवलींच नाहीत ॥ ६९ ॥
अवयय स्वरूपी जरी असते । तरी स्वगत भेदासी बोलूं येतें ।
स्फुरणादि जरी कल्पावे निगुते । तरी तेही झाले नाहीत ॥ ४७० ॥
एवं जेथें नाहीं द्वितीय । तेंचि पूर्णब्रह्म अद्वितीय ।
तयाशीच बोलिजे तुरीय । सविशेष हेतु ॥ ७१ ॥
विश्व तैजस आणि प्राज्ञ । हे सविशेषी अभिमान तीन ।
या तिहींशी जें आधिष्ठान । चौथें ते तुर्यब्रह्म ॥ ७२ ॥
ब्रह्मा विष्णु आणि महेश । हे गुणत्रय सविशेष ।
यांचे अधिष्ठान जें  निर्विशेष । चौथें तें तुर्यब्रह्म ॥ ७३ ॥
क्षराक्षर हे पुरुष दोनी । तिसरा उत्तम पुरुष बोलिजे वाणी ।
यासी अधिष्ठान जें  अनिर्वचनीं । चौथें तें तुर्य ॥ ७४ ॥
द्रष्टा साक्षी आणि ज्ञप्ति । या तिहींपरता त्या तुरीय म्हणती ।
जेथे शब्द अनुसंधान अनुभूति । त्रिपुटीचा अंत ॥ ७५ ॥
ऐसें तुरीयब्रह्म जें  एकलें । जेथें नाथिलेपणे जग होतें झालें ।
तें मूळ मायेसहित लया गेलें । उरलें तें अधिष्ठान ॥ ७६ ॥
मायेस्तव नाथिलेपणीं । उत्पति स्थिति जेवीं होऊनी ।
तेवीं शेवटी काळ संपता क्षणीं । मायेसहित लय पावे ॥ ७७ ॥
शेवटी मीच एकटा उरें । म्हणोन मीच ग्रासी ही उत्तरें ।
जेथे मी म्हणावया दुसरे नुरे । केवळ ब्रह्म ब्रह्मीं ॥ ७८ ॥
देवहो येथे करा शंका । कीं नाश होतां या सर्वा अनेका ।
कवणुही उरेचिना निका । आणि काही नाही ते शून्य ॥ ७९ ॥
रुद्र एकवसामि या वचनीं । एकटाच उरें मी पूर्णपणी ।
जरी नाहीं तरी उत्पत्ति करणे अधिष्ठानी । होईल मागुती ॥ ४८ ॥
 शून्य तरी काही नाहीं । नाहीं तें उरे कैसें पाही ।
म्हणोन उरे ते आहे येथे सहसाही । संदेह न धरावा ॥ ८१ ॥
रुद्रचि मी कैसा उरें । हे निरूपणे ऐका विस्तारें ।
रुद्रनामें जी अक्षरें । तेंचि सतचित ब्रह्म ॥ ८२ ॥
स्वगत सजातीय विजातीय । भेदरहित जें एकाद्वय ।
तोचि रुद्र ऋत सत्य होय । सच्चित् ब्रह्म ॥ ८३ ॥
ऋत सत्य जें  का स्वभावें । तेंचि चिद्रुप ओळखावें ।
ऐसें शुद्ध ज्ञान बरवें । उरे सर्वां लय होतां ॥ ८४ ॥
लय होतां या सर्वांसी । चिद्‌रूपाचा लय माना मानसीं ।
तरी पहा लय होतां पदार्थांसी । डोळा उरे तम देखणा ॥ ८५ ॥
तेवी मायादि सर्व नासती । परी उरे लयसाक्षी ज्ञप्ति ।
सर्वांचा नाश पाहे स्वयंज्योति । यास्तव सर्व नासते हे खरें ॥ ८६ ॥
सर्वांचा लय चिद्‌रूपे पाहिला । परी चिद्‌रूपाचा नाश कवणे देखिला ।
कोणी साक्षी नसतांचि लय मानिला । न वचे कवणे ॥ ८७ ॥
चिद्‌रूप तरी दुसरें नाहीं । की चिद्‌रूपाचें लया होईल ग्वाही ।
साक्षी होईल तेंच सहसाही । चिद्‌रूप उरे ॥ ८८ ॥
चिद्‌रूपाचा लय चिद्‌रूप जाणें । तरी आपणा देखतां आपण गेला मरणें ।
हे देखों ना ऐकों कर्णे  । तस्मात् चिद्‌रूपाचा नाश नाहीं ॥ ८९ ॥
नाश नाहीं तेंचि अविनाशी । अविनाशी तेंचि देखणी दशा ऐशी ।
 चिद्‌रूप तें सद्‌रूप एकरसी । सद्‌रूप तेंचि चिद्‌रूप ॥ ९० ॥
एवं उरें मी ब्रह्म सचित्घन । सर्व भूतांचे होय संहरण ।
भूत म्हणजे झाले निर्माण । ईश्वरादि तृणांत ॥ ९१ ॥
जे कदां उत्पन्न होईना । त्यासी नाशही कदा असेना ।
एवं अविनाशी मी परिपूर्णा । रुद्र नामें वसामि ॥ ९२ ॥
अथवा ऋत म्हणजे सत्य जाणावें । रकार दाता ऐसे ओळखावें ।
म्हणजे चिद्‌रूपज्ञान साधकां द्यावें । म्यां सद्गुरुरूपें ॥ ९३ ॥
सद्‌रूप तरी अंगेंचि असतां । अज्ञानें आली नास्तिकता ।
तया सद्‌रूपाचा होतसें मी दाता । अभिन्नता ज्ञानद्वारें ॥ ९४ ॥
येथे सदगुरुपरता कवण । ब्रह्म सद्‌रूपाचें करील दान ।
तस्मात् मी सद्गुरु रुद्राभिधान । ब्रीद बांधून राहिलों ॥ ९५ ॥
अधिकारिया ज्ञान होतां क्षणीं । नांव रूपाची होय संहारणी ।
तृणापर्यंत ईश्वरापासूनी । कांहीं भेदचि नुरे ॥ ९६ ॥
एवं म्यां भूतांतें निःशेष ग्रासिलें । शेखीं साधकांहीं उरों नाहीं दिधलें ।
मज परब्रह्मीं अभिन्न होऊन गेले । उरलें जें कांहीं तें रुद्रअंगें ॥ ९७ ॥
नामरूप द्वैत ज्याक्षणीं गेलें । ज्ञानें अस्ति भाति प्रिय उरलें ।
समष्टि तादात्म्य एक रुद्ररूप देखिलें । हे वर्म ज्ञानियां पुसा ॥ ९८ ॥
हा आत्यंतिक विवेक प्रलय । येथेही सर्वांचा लय होय ।
देवभक्त गुरुशिष्य एक रुद्र अद्वय । तुर्यब्रह्म स्वयें उरे ॥ ९९ ॥
एवं निर्विशेष जें माझें रूप । देवहो निरूपिलें म्यां अल्प ।
मागुती सविशेषात्मक बोलिजे साक्षेप । मिथ्या जाणून त्यागावया ॥ ५०० ॥
मीच उत्पति स्थिति संहार । सविशेषत्वें करी ईश्वर ।
त्यांत लय सांगितला निर्धार । उभय प्रकारें ॥ १ ॥
आतां स्थिति मी कैसा करीं । कोणती मजपाशी असे सामग्री ।
तेचि ऐका देवहो निर्धारी । वर्तवीं एकट मी कैसा ॥ २ ॥


सालोकान्यदीशेहमीशिनीभिश्च शक्तिभिः ॥
ईशानमस्य जगतः स्वर्दशं चक्षुरीश्वरम् ॥ ४१ ॥


मी आपुल्या ईशनशक्तीकडून । या सर्व जगाचें करीतसें रक्षण ।
वर्तवून जाणतसे मी आपण । चक्षुच्या पाहण्यासी जेवीं चक्षु ॥ ३ ॥
मुळ मायेंत जो जाणता । तो मी ईश्वर निरूपिला आतां ।
त्या मजपाशी सामुग्री पाहतां । चंचळ जाणीव दोनचि ॥ ४ ॥
या दोहोंचेचि गणादि विकार । तेणेंचि सर्वज्ञ सर्व शक्तिमान ईश्वर ।
त्यांत ईशनशक्तिही महाथोर । मजपाशीं असे ॥ ५ ॥
ईशन म्हणजे नियमन । सर्वांशी नेमेचि चालवी मी आपण ।
ज्या रीती जीवाचें कर्माचरण । त्या त्या रीतीं ॥ ६ ॥
अधिक पुण्ये स्वर्गा नेतसें । आधिक पापें नीचयोनि दावीतसे ।
समभागें मानवदेह मी देतसें । या सर्व जीवांलागीं ॥ ७ ॥
तेथें ही जैसे जैसे संचित । त्या त्या रीती जीवा वर्तवीत ।
 ऐसेचि  त्रैलोक्यात्मक जितुकें जगत । वर्तवीं मी स्वशक्तीनें ॥ ८ ॥
देव मानव दानव । पशुपक्षी गो अश्व ।
मी एकलाचि वर्तवीं सर्व । ईशिनी शक्ती कडूनी ॥ ९ ॥
जितुके बोलणे या शिवगीतेचें । श्लोकही वळिले अत्यर्थाचे ।
कित्येक स्थळी श्रुतीच बोलिल्या वाचें । तस्मात वेदउक्त हे गीता ॥ ५१० ॥
असो ईशितापर श्रुतीचे वचन । तेंचि ऐकावें सादर निरूपण ।
सर्व जगतासी ईश्वर मी आपण । वर्तवीं निजसामर्थ्य ॥ ११ ॥


ईशानश्वास्मि जगतां सर्वेषामपि सर्वदा ॥
ईशानः सर्वविद्यानां यदीशानस्ततोऽम्यम् ॥ ४२ ॥


ईशान मी सर्व जगताचा । स्थावर आदि जंगमाचा ।
तेवींच ईशानही सर्व विद्यांचा । याचि हेतू मी ईशान ॥ १२ ॥
चालती तया नांव जगत । स्थावर शब्दें एके स्थळीं स्थित ।
एवं हे इतुकें उत्पन्न होत । यांचा ईशान मीचि ॥ १३ ॥
सहा शास्त्रे चारी वेद । उपांगें चार की चार उपवेद ।
एवं ह्या चौदा विद्या विशद । यांचाही मी ईशान ॥ १४ ॥
मागां बोलिलें षड्गुणसंपन्न । भगवान यश कीर्त्यादि लक्षण ।
तयाहून हे सहा गुण । भिन्न बोलिजेत ईशाशीं ॥ १५ ॥


सर्वभावानिरीक्षेऽहमात्मज्ञानं निरीक्षये ॥
योगं च गमये तस्माद्धगवान्महतो मतः ॥ ४३ ॥


सर्व भावां तें जाणें मी साक्षी । आणि आत्मज्ञानातें निरीक्षी ।
योग आणि उत्तम प्राप्त अपरोक्षीं । येणे योगें मी भगवान ॥ १६ ॥
 भूत भविष्य वर्तमान । सर्व भाव हेचि तीन ।
यासी जाणतचि असें मी ईशान । निजसाक्षित्वें ॥ १७ ॥
साधन चतुष्टय संपन्नासी । आत्मज्ञान देतसे अनायासीं ।
अथवा जाणतचि असें ज्ञानादिकांसी । साक्षित्वरूपें ॥ १८ ॥
योग म्हणजे अभ्यास । करवीतसे मी साधकांस ।
अथवा योग शब्दें मी अप्राप्तास । प्राप्त करवीं ॥ १९ ॥
समयें उत्तमप्रकारें कडून । प्राप्ताचें करी संरक्षण ।
अथवा स्वरूप ज्ञान जें अभिन्न । अपरोक्ष दृढ करीं ॥ ५२० ॥
ऐशी ही सहा ऐश्वर्य भोग । माझ्या ठायी असती सांग ।
यदर्थही मज बोलती अव्यंग । भगवान शब्दें ॥ २१ ॥
आतां महेश्वर मजप्रति बोलती । तेंचि ऐकावें सुनिश्चिती ।
ईश्वर महेश्वराची कृति । एकचि असे ॥ २२ ॥


अजस्त्रं यच्च गृहमि विसृजामि सृजामि च ॥
साल्लोकान्वासयामि तेनाहं वै महेश्वरः ॥ ४४ ॥


अजस्त्र म्हणजे साकल्य जें कांहीं । विसर्जी उत्पन्न करी पाहीं ।
सृजीं संरक्षी आणि भक्षीं साही । चकारें निश्चयात्मक ॥ २३ ॥
आपुलीये मायेकडून । माया म्हणजे निज कपटाने ।
महेश्वर म्हणजे  दुजा नाही मजविण । तैसाचि महादेवही ॥ २४ ॥


सार्द्ध श्लोक ॥ महत्यात्मज्ञानयोगैश्वर्ये यस्तु महीयते ॥
अहमेवा समग्रे च नान्यद्यत्सदसत्परं ॥ ४५ ॥
सर्वान् भावान् परित्यज्य महादेवश्च सोऽस्म्यहम् ॥


ज्ञान योग आणि ऐश्वर्य । महत् ऐसें हे सुरवर्य ।
या सर्वांत मजहून असे काय । तस्मात् मीच हे अवघे ॥ २५ ॥
सदसत्पर जो अद्वय । तोचि मी कर्ता सृष्टि स्थिति लय ।
तस्मात् सर्व ममाधीनच होय । या योगें महादेव मी ॥ २६ ॥
जीवाहून असे विलक्षण । महतयोग ऐश्वर्य ज्ञान ।
आणि आगळा देवांहून । म्हणोन मी महादेव ॥ २७ ॥
अथवा आकारासी जितुके आले । देवादिही जीवचि बोलिले ।
या परतें अव्यक्त कारणत्वें संचलें । तेंचि ईश्वर मी महादेव ॥ २८ ॥
मुख्य सर्व अवस्थांचा जाणता । तोचि थोरला देव तत्त्वतां ।
ज्याची सर्वांठायीं असे व्यापकता । तोचि मी महादेव ॥ २९ ॥
हेही कायसे हो बोलणें । सर्व भावही म्यांचि होणें ।
मीच योनि या जगाकारणें । मीच संभवें तेथें ॥ ५३० ॥


एषोस्मि देवः प्रदिशो नु सर्वाः पूर्वो हि जातोस्म्यहमेव गर्भे ॥
अहं हि जातश्च जणिष्यमाणः प्रत्यग्जनस्तिष्ठति सर्वतोमुखः ॥ ४६ ॥


हाचि मी महादेव पूर्ण । पूर्वादि दशदिशा राहिलों व्यापून ।
जगाची योनि बीज कारण । मीच असें सविशेष ॥ ३१ ॥
मीच जगद्योनिही असतां । ।तेथून जीवरूपें मीच झालों प्रसवता । 
मागे झालों सध्यां वर्तमानी आतां ॥ आणि पुढेही होणार मीच ॥ ३२ ॥
मीच गर्भ माझिये ठायीं । मीच जन्में प्रसवें मीच आई ।
तिहीं अवस्थें तिहीं समयीं । मीचि एक असें ॥ ३३ ॥
येथे कोणी शंका करिती । की तूंचि जन्मशी जन्मविशी स्थिति ।
तरी सुखदुःख पापपुण्य लागती । जन्ममृत्यूही तुज ॥ ३४ ॥
तरी अवधारा निश्चयेशी । पाणियावरी पाणीपणेशीं ।
जन्मास्थिति असे तरंगासी । परी पाणी विकारी नव्हे ॥ ३५ ॥
तेवीं मजपासून हे झाले । मद्रुपचि असे वहिले ।
परी तयाचे विकार जितुके झाले । स्पर्शले नाहीत मजसी ॥ ३६ ॥
मजवीण पदार्थमात्र न होय । याचि हेतु सर्वतोमुख मी निश्चय ।
मजमाजी तिष्ठे जग समुदाय । परी मी आकाशवत् अलेप ॥ ३७ ॥
मी जन्मतों मरतों जरी जीवाऐसा । तरी मज ईश्वर कोण म्हणे सहसा ।
हा माझिये ऐश्वर्याचा तमाशा । मीच जाणे न कळे येरी ॥ ३८ ॥


विश्वतश्चक्षुरुत विश्वतोमुखो विश्वतोबाहुरुत विश्वतस्पात् ॥
संबाहुभ्यां धमति संपतत्रैवाभूमी जनयन्देव एकः ॥ ४७ ॥


विश्वाचा चक्षु आणि मुख मी विश्वाचें । विश्वाचें बाहु आणि पायही विश्वाचें ।
हस्तें पदें प्राप्त गतागतीचे । सर्व पृथ्वी जन्मविता देव एक ॥ ३९ ॥
सर्व दृश्य हे जितुकें झालें । माझिया द्रष्टत्वें वर्ते लागलें ।
मी सर्वांचा डोळा परी स्पर्शले । नाहीत मज विकार जगाचे ॥ ५४० ॥
विश्वाचे भोग विश्व घेतसे । ते मी भोगी परी अभोक्ता असें ।
विश्वाचे मुख मज श्रुति म्हणतसे । परी मी इच्छेरहित ॥ ४१ ॥
मीचि हात या विश्वाचे । मजवीण कार्यजातही नवचे ।
परी कर्मदान प्रतिग्रहाचें । मज स्पर्शलें नाहीं ॥ ४२ ॥
विश्वाची मज निमित्तचि गति । यास्तव विश्वपाद मज म्हजे श्रुति ।
परी जगाची गति आणि अवगति । मजसी स्पर्शली नाहीं ॥ ४३ ॥
माझी माया हाचि माझा हात । येणेंचि वर्तवीं मी जग समस्त ।
मायिक म्हणजे कपटयुक्त । करीं परी न करीं ॥ ४४ ॥
मज वांचून कांहींच नव्हे । यास्तव मी कर्तेपणा पावावें ।
मजसी स्पर्शलेच नाहीत अघवे । याचि नांवें अकर्ता ॥ ४५ ॥
मज सन्मुख ते उद्धरती । विन्मुख तया अधोगति ।
हे मजचिस्तव गति अवगति । परी मज संबंध नाहीं ॥ ४६ ॥
बहु  कासयासी मी बोलावें । द्यावा पृथिव्यादि झाले अघवे ।
हे मज एकदेवापासून बरवे । परी उद्भवलेंचि नाहीत ॥ ॥ ४७ ॥
सूर्यापासून मृगजळ झालें । तयासी काय म्हणावें जन्मलें ।
तैसें वाउगें रूपनाम ठेवलें । उत्पन्न झाले नसतां ॥ ४८ ॥
जें जन्मासीच आले नाहीं । त्याचे बारसें केले कोणें कहीं ।
जग नाहीपणे रज्जुचा अहि । कर्ता त्याचा मी वंध्यासुत ॥ ४९ ॥
जीव अज्ञान बाळकासी । श्रुति दाई कथा सांगे सहजैशीं ।
बालाऽख्यायिका म्हणावें तयेसी । तें त्या बाळा सत्य वाटे ॥ ५५० ॥
एक नसती नामें नगरी । तेथें असत् राजा राज्य करी ।
त्याची प्रिया असती सुंदरी । परम लावण्य ॥ ५१ ॥
राजा नैष्ठिक ब्रह्मचारी । राणी पतिव्रता अव्यभिचारी ।
उभयतांचा संग नव्हे कल्पवरी । परी परस्पर विसंबतीना ॥ ५२ ॥
जे वंध्या असून ठायींची । पुत्रा प्रसवलीसे असाची ।
अवयवहीन तनु पुत्राची । परी अत्यंत लावण्य ॥ ५३ ॥
एकदां तो वंध्येचा सुतु । पारधीसी चालिला त्वरितु ।
कर्दळीगर्भाचा रथ विख्यातु । तयावरी बैसूनी ॥ ५४ ॥
सशाच्या श्रृंगाचे धनुष्य हातीं । केळीच्या गर्भाचे चीर शोभती ।
शुक्ति रजताचे अलंकार ओप देती । चालतां प्रकाशती दशदिशा ॥ ५५ ॥
ऐसा सर्वसज्ज होऊनि चालिला । तों बागुलें मध्येचि  अडविला ।
बुजवण्याचे तस्करी लुटिला । रडू लागला अनिवार ॥ ५६ ॥
इतुक्यांत गंधर्व नगरांतून । अतित्वरित धांवले धांवणे ।
उभयांपासून सोडविलें तेणें । मागुती पुढे चालिला ॥ ५७ ॥
एक मृगजळाचें देखिलें तो । त्यांतील धरावे म्हणे मासोळे ।
यास्तव टाकिलें आंत जाळें । वायुच्या तंतूचें ॥ ५८ ॥
तेणें त्यांतील मीन धरूनी । कांसवीच्या तुपांत तळूनी ।
सर्पाच्या कर्णपुटांत घेतले वाढूनी । भोजन करूनी तृप्त झाला ॥ ५९ ॥
मग शीतळ जीवन घेतलें । तेणें क्षुधे तृषेचे हरण झालें ।
नंतर खपुष्पाचे हार तुरे घातले । तेव्हां अतिशोभा पावे ॥ ५६० ॥
या नंतरी पुढे चालिला । तो अन्तराळी एक वृक्ष देखिला ।
तया वृक्षातळी निजेला । सावकाश शयनी ॥ ६१ ॥
ऐशी कथा धात्री सांगत । तेणे बाळक आनंदभरित ।
म्हणे सांगे आणिक त्वरीत । आख्यायिका मज ॥ ६२ ॥
तैशी श्रुतिमाउली अज्ञान जीवासी । आख्यायिका सांगे सायासी ।
की हे जग झाले कर्ता ययासी । ईश्वरू एक असे ॥ ६३ ॥
ज्याच्या भयें वायु चाले । त्याच्या भयें सूर्ये प्रकाशिले ।
चंद्र अग्नि रात्री प्रकाशू लागले । जयाच्या भयें ॥ ६४ ॥
ज्याच्या भयें मृत्यु संहारी । अकाली कदांकवणानमारी ।
ऐसें सूत्रजयाचियाकरी । तो पुज्य निर्धारीतुम्हासी ॥ ६५ ॥
जीवनियम्य ईश्वरनियंतां । जीव भ्रमें ईश्वर भ्रमविता ।
जीव किंचिज्ञ सुखदुःख भोक्ता । ईश्वर कर्ता सर्वज्ञ ॥ ६६ ॥
इत्यादि हा शास्त्रसंकेत । हेचि बालाख्यायिका विख्यात ।
अज्ञान जीवासीच सत्य वाटत । आत्मज्ञान नाही ज्या ॥ ६७ ॥
तो कालचि सत्य रजत । शिंप ओळखिली नाही यावत् ।
तैसेंचि हे जग समस्त । ब्रह्म नेणें तोवरी ॥ ६८ ॥
बाळपण असे जोवरी । बागुलाचे सत्यत्व तोवरी ।
ब्रह्म जाणिलें नाहीं निर्धारी । तोवरी ईश्वर कर्ता ॥ ६९ ॥
जग हें  कैसे झाले किमात्मक । यथार्थ कळतां निश्चयात्मक ।
तरी मग कर्ता तो होय अवश्यक । वंध्यापुत्रापरी ॥ ५७० ॥
ब्रह्म आत्मा अभेद ज्ञान । होय जेधवां निःसंशयपणें ।
तेव्हांचि ईश्वरापासून तृण । पर्यंत मिथ्या होय ॥ ७१ ॥
हे मिथ्या जयासी नाही कळले । तेणे नाना सायासें साधन केलें ।
तरी कदाही न जात सुटले । कल्पांतरी ॥ ७२ ॥
तस्मात धन्य जयासी कळलें । ब्रह्मात्म अभेद ज्ञान झालें ।
मिथ्या तें मिथ्यापणे गेलें । मागती सत्यत्व नये ॥ ७३ ॥
जयाक्षणी ब्रह्मा भिन्नज्ञान । तयाक्षणी सविशेष मिथ्या भान ।
जयाक्षणी सविशेष मिथ्या होणे । त्या क्षणीं अभिन्न ब्रह्म ॥ ७४ ॥
एवं परस्परें साह्यभूत । हेतु हेतु मद्भाव निश्चित ।
जाणिल्यावींण दुजा उपाय किंचित । अज्ञान लंघावया नसे ॥ ७५ ॥
तस्मात् साधके एक करावें । ब्रह्मात्मत्व अभेदें जाणावें ।
मग हे आपेंआप मिथ्या व्हावें । सर्व सविशेष ॥ ७६ ॥
तरी ब्रह्मात्म अभेदज्ञान कैसें । श्लोकार्थे बोलिजे अल्पसें ।
तत्त्वझाडा करितां अनुभवा येतसें । गुरुमुखें साधकां ॥ ७७ ॥
श्लोक । बालाग्रमात्रं हृदयस्य मध्ये विश्वं देवं जातवेदं वरेण्यम् ।
मामात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरास्तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम् । ४८ ॥
विश्वाचा देव वरेण्य तया मात । आपुलें हृदयकाशी जो धीर पाहत ।
की बालाग्रशत भागवत् सूक्ष्मत्वे निश्चित । त्यासीच शांति नव्हे इतरां ॥ ७८ ॥
विश्व शब्दें ईश्वरापासून । तृणापर्यंत झाले निर्माण ।
इतुक्याही जगताचें उत्पत्तिस्थान । आणि प्रकाशीं तो मी देव ॥ ७९ ॥
सर्प जरी मिथ्यत्वे झाला । परी सत्य अधिष्ठान दोरी तयाला ।
तेवींच या सविशेष भ्रमाला । मी निर्विशेष आधिष्ठान ॥ ५८० ॥
वायू होतां आकाश न चळे । तेंवीं जग होतां निश्चळ न चंचळे ।
ऐसें माझें रूप यथार्थ कळे । जया साधकांसी ॥ ८१ ॥
परी हे आपुलें हृदयीं देखिल्यारीण । माझिया रूपाचे नव्हेचि ज्ञान ।
यास्तव हृदयीं अवलोकावें मजलागून । आत्मरूपी मी कैसा तो ॥ ८२ ॥
स्थूल नव्हे जडांश भूतांचा । सूक्ष्म नव्हे संघ भौतिकांचा ।
अज्ञान नव्हे कोश आनंदाचा । ऐसा तत्त्वझाडा कीजे ॥ ८३ ॥
एक दृश्य दुसरा भास । तिसरें तो शून्यत्वें फोस ।
अन्य सामग्रीवीण जाणें सर्वांस  । तो मी अविनाश आत्मा ॥ ८४ ॥
स्थूलसूक्ष्म दृश्यभास उभयतां । वृत्तियोगें यासी जाणतां ।
वृत्तिरहित सुषुप्तींत टळटळिता । जाणे अज्ञाना ॥ ८५ ॥
 ह्रद म्हणजे डोह भरला । उदकाचा आशय संचला ।
तेवीं देहद्वयामाजी सखोल दाटला । अज्ञान हृद ॥ ८६ ॥
पाणियामाजी गोडी जैसी । अज्ञानी आत्म्याची व्याप्ती तैसी ।
सूक्ष्म म्हणोनि बोलिजे तयासी । बालाग्रशतभागवत ॥ ८७ ॥
बालाग्रभावें अणुत्वें कल्पना । करितां एकदेशी होय गणना ।
मग सर्व व्याप्ती होय परिपूर्णा । कैशी आत्मयाची ॥ ८८ ॥
ऐसें असतां अणुत्वं कल्पिती । ते ब्रह्मैक्य साधितां दांत खाती ।
याचीया निवारणार्थ बोले श्रुति । अणोरणीयान्महतोमहीयान् ॥ ८९ ॥
अणुहून आति सान । आणि मोठियामाजी महान ।
हे पुढे असें बोलणें । तस्मात् आत्मा अणु नव्हे ॥ ५९० ॥
आकाशासी अणुत्व नसतां । अणुहून अति सूक्ष्मता ।
तेवींच आत्म्याची प्रकाशता । गगनवत सूक्ष्म ॥ ९१ ॥
पाणियांत गोडी जेवीं व्यापली । तेवीं अज्ञान व्यापून ज्ञप्ती संचली ।
गोडी ही भिन्नत्वे जाय कळली । तेवींच आत्मस्थिति ॥ ९२ ॥
प्राशनकरितां गोडी समजावी । तेवीं अनुभवें जाणीव निवडावी ।
अज्ञाना जाणे तेचि बरवी । आत्मप्रकाशता ॥ ९३ ॥
जाणीव आत्मयाची प्रभा । आत्मा स्वयंभ तियेशी उभा ।
दीपु आपुलिये शोभा । आपण जैसा ॥ ९४ ॥
ऐसा साधकें आत्मानुभव । घेऊन जाणावा हृदयस्थ मी देव ।
जो का या सृष्टीपूर्वील भाव । तें परब्रह्म हेंचि ॥ ९५ ॥
तया स्वरूपासी वरेण्य श्रुति । बोलिली निरतिशय सुखमूर्ति ।
तोचि हा आनंदास्पद चिन्मूर्ति । आत्माचि ब्रह्म ॥ ९६ ॥
आनंदास्पद आत्मा कैसा । तरी अवधारा निश्चय मानसा ।
सर्व सुखासी इच्छी सहसा । परी आपणासाठीं ॥ ९७ ॥
हे प्रसिद्ध पहा लोकरीती । जे ते आपणासाठी सुख इच्छिती ।
पुत्र जाया स्वजन संपत्ति । त्या त्या भोग्यार्थ प्रिय नव्हे ॥ ९८ ॥
तेवींच देव गुरु वेद सर्व । आपणाप्रीत्यर्थ आवडती अपूर्व ।
तस्मात् आत्मा सर्व सुखासी ठाव । असे अकृत्रिम ॥ ९९ ॥
सर्व सुखे ती सातिशय । आत्मसुख तें निरतिशय ।
तस्मात् वरेण्य ब्रह्म में अद्वय । तोचि निःसंशय आत्मा ॥ ६०० ॥
एकचि आकाश पूर्ण असतां । घटीं मठी व्यापलें तत्त्वतां ।
घट मठ उपाधि झाल्या उभयतां । परी आकाश आभिन्न ॥ १ ॥
तेवीं निर्विशेष ब्रह्म चित्धन । माया उपाधीस्तव नाम ईशान ।
अविद्या उपाधीमुळे किंचिज्ञ । जीव नाम आले ॥ २ ॥
' पिण्ड ब्रह्मांड दोन्ही सांडितां । आत्मया ब्रह्माशी सहज ऐक्यता ।
एवं या रीती पहावी अभिन्नता । साधकें विचारें ॥ ३ ॥
धीर शब्दें साधन संपन्न । शमदमादि विवेकेंकडून ।
देहबुद्धि सांडून भिन्न । मी ब्रह्म आत्मा निर्धारें ॥ ४ ॥
ऐशी अभिन्नता झाली जया । आविशुद्ध शांति पावे तया ।
अन्य काहीही करितां उपाया । येरांसी अप्राप्त ॥ ५ ॥
जेथे मायाअविद्या उपाधी सरे । केवळ शांत स्वरूपचि उरे ।
शांति साधका अविष्करे । अनायासें ॥ ६ ॥
दांत खाऊनिया  सांहणे । ही शांतीची नव्हेत लक्षणे ।
निजांगें शांत ब्रह्मरूप होणें । हेंचि शांति शाश्वती ॥ ७ ॥
तस्मात् मी वरेण्य परिपूर्ण । साधक आत्मवें पाहे मजलागून ।
तोचि शाश्वतीशांती लाहे आपण । येरां दांत खाता नव्हे ॥ ८ ॥
बहुत कासया बोलणें । मीच अंगें तेणे होणें ।
मग जितुकी माझी असती लक्षणें । बाणती त्याप्रति ॥ ९ ॥


अहं योनिमाधितिष्ठामि चैको मयेदं पूर्ण पंचविधं च सर्वम् ॥
मामीशानं पुरुषं देवमीड्यं विदित्वा निचाय्येमा शान्तिमत्यन्तमेति ॥ ४९ ॥


मीच कार्य कारण अधिष्ठून असें । मीच देव पुरुष ईशान एकला वसे ।
ऐसा विचारवान साधका लाहत असे । अत्यंत शांति जे ॥ ६१० ॥
निर्विशेषत्वे ब्रह्म आत्मा अभेद । ऐसा दृढबोध जया विशद ।
मग जितुका सविशेष भेद । अभिन्न वाटे तया ॥ ११ ॥
अहं ब्रह्म जें स्फुरण । समष्टिमय झाले निर्माण ।
तें तया वाटे हे मजपासून । मृगजळवत् झालें ॥ १२ ॥
तेंचि सर्वांची योनि कारण । सर्व भूतादि झाले त्यापासून ।
तो मी कर्ता जया नांव ईशान । साधकां वाटे ॥ १३ ॥
प्रकृतीमाजी जो जाणता । तो पुरुषही अंगें मीच तत्त्वतां ।
आणि सर्वांसी जो प्रकाशिता । तो देवही मीच ॥ १४ ॥
हे असो पंचविध जग सारें । भूत भौतिक नामरूप प्रकारें ।
तयास मीच वाटे निर्धारें  । जेवीं तरंग सागरीं ॥ १५ ॥
चित्सागरचि अंगें जो झाला । मग जगत रंगभेद कोठें उरला ।
ऐसें माझें तादात्म्य पावला । समष्टिरूप मज ऐसें ॥ १६ ॥
तयाशी भिन्न नुरेचि कांहीं । अमुक हे पावावें उरलें नाहीं ।
हेचि अत्यंत शांति निःसंदेही । कृतकार्य तोचि एक ॥ १७ ॥
येथे कोणी कल्पना करिती । कीं षड्गुण ऐश्वर्य नसे त्या प्रति ।
तरी ज्ञान वैराग्य मोक्षसंपत्ति । कीर्ति औदार्य ही असे ॥ १८ ॥
सृष्टयादि व्यापारमात्र न इच्छी मनीं । कारण की अशाश्वत मायागुणीं ।
मृगजळाचिये स्नानपानी । सूर्य कदा प्रवर्तेना ॥ १९ ॥
आपण निर्विशेषत्वही एकला । सविशेषत्वही अंगेंचि झाला ।
सुवर्ण एक असतां अलंकाराला । भिन्नत्व कैचें ॥ ६२० ॥
तथापि ब्रह्मा विष्णु आणि हर । हे मीच की अंगें निर्धार ।
तरी सृष्टयादि व्यापार उरती दूर । कैसे सांगा ॥ २१ ॥
परंतु निर्विशेष तें सत्य एकलें । सविशेष उगेचि भ्रमें भासलें ।
तस्मात् हे नामरूप नाहीच झालें । तेव्हां कर्तृत्वही खरें कैचें ॥ २२ ॥
जोवरी ब्रह्मात्मज्ञान न होतें । तोंकाल हे सत्य भाविलें होतें ।
बालाख्यायिकाहीं शास्त्रे समस्ते । सत्य होती अज्ञानबाळा ॥ २३ ॥
आतां अभेद ज्ञान झालिया । जितुके बोलणे तितुकें वायां ।
कारण कार्यासहित गेलें लया । सविशेष अवघे ॥ २४ ॥
मृगजळचि जेव्हां आटलें । त्यांतील मीनं तरंग मेले ।
अज्ञान ज्ञाने जेव्हां नासलें । तरी कार्य त्याचे उरे केवीं ॥ २५ ॥
आतां इच्छा भीति अवधी गेली । ब्रह्म ऐक्यता एकली संचली ।
बंध मोक्षाची वार्ता बुडाली । जीवशिव गुरुशिष्यासह ॥ २६ ॥
जीवन्मुक्ति नित्यमुक्ति । हे अवस्था कल्पितसे मनोवृत्ति ।
तें मनचि मेलिया जे काही स्थिति । तयासी काय म्हणावें ॥ २७ ॥


प्राणेष्वन्तर्मनसो लिंगमाहुरस्मिन्क्रोधो या च तृष्णा क्षमा च ॥
तृष्णां हित्वा हेतुजालस्य मूलं बुद्धया चित्तं स्थापयित्वा मयीह ॥ ५० ॥


प्राणा अंतरी राहतसे । क्रोध तृष्णा क्षमा ज्याचें चिन्ह असें ।
तयासी मन बोलती अपैसें । तृष्णेसी मूल ॥ २८ ॥
तेंचि चित्त बुद्धीच्या निश्चयें । दृढ स्थापिलें ब्रह्मात्मरूपी माझिये ।
तरी मग कासया उरेल संशयें । निर्भय सहज मग ॥ २९ ॥
प्राणाचें चळण श्वासोच्छवासें । देहे यावत् तोवरी होतसें ।
संकल्परूप मनही त्यासरिसें । उत्पन्न होय विकारी ॥ ६३० ॥
अमुक हे चांगले अमुक वाईट । हे अमुक खरें केव्हां भावी खोटें ।
हे अमुक सान अमुक मोठे ॥ हेचि संकल्प विकल्प ॥ ३१ ॥
केव्हां भावी हे संकल्पें होय । केव्हां विकल्पें भावी न होय ।
एवं एक निश्चय नसतां जो संशय । हेचि रूप मनाचें ॥ ३२ ॥
काम प्रतिबंध तो क्रोध जाणा । अमुक करीन या नांव तृष्णा ।
हे रजतमें उद्भवे  वासना । मुख्य चिन्ह मनाचें ॥ ३३ ॥
जरी होता सत्वगुण उदय । क्षमारूप शांतवृत्ति होय ।
हाही विकारचि मुख्य शांति न होय । जे शिव अद्वैत श्रुति बोले ॥ ३४ ॥
तस्मात् क्रोध आणि तृष्णा क्षमा । हेचि मनाचि व्यावृत्ति परमा ।
अज्ञान तोवरी याची गरिमा । संशय वाढे ॥ ३५ ॥
ब्रह्मात्मज्ञान जेधवां झालें । मुख्य निश्चयें अतिदृढ केलें ।
तयाक्षणी अज्ञान समूळ मेलें । जे मन संकल्पा कारण ॥ ३६ ॥
ब्रह्म खरें की खोटें अज्ञानें करी । जग सत्य मिथ्या एक निश्चय न धरी ।
ब्रह्मात्मा एक की दोन संशय अंतरीं । हा स्वभाव मनाचा ॥ ३७ ॥
आत्मा ब्रह्म निश्चयात्मक । ब्रह्म सत्य जग हे मायिक ।
ऐसा दृढतर कळला विवेक । तेव्हां संशय कैचा ॥ ३८ ॥
होय नव्हेचि करणे सरलें । एक अखण्डरस निश्चया आलें ।
तेव्हांचि जाणावें मन मेलें । अज्ञानासहित ॥ ३९ ॥
अज्ञान हे निपटून जातां । मनाची स्फूर्ति ब्रह्माकार होतां ।
तरी मग उरेल कोठून भिन्नता । मी देह म्हणूनि ॥ ६४० ॥
जेव्हां वृत्तीचे होत स्फुरण । तेव्हां ब्रह्माकार अभेदज्ञान ।
ऐसें बुद्धीच्या निश्चयेंकडून । मन स्थापिलें माझ्या ठायीं ॥ ४१ ॥
आतां मी देह जरी असावें । अथवा जगविषय सत्य वाटावें ।
तरीच क्रोध आणि इच्छादि संभवे । हे तो नव्हे कल्पांती ॥ ४२ ॥
ब्रह्म आत्मा नव्हेचि भिन्न । जग चिन्मात्र नामरूपंवीण ।
आतां संशय उरावा कोठून । तेव्हां मन उद्भवे कैसें ॥ ४३ ॥
सर्व नामरूप रहित । अंगें ब्रह्म चित् घन अनंत ।
आतां कोणतें उरे अप्राप्त । की तृष्णासंभवे ॥ ४४ ॥


श्लोकार्द्ध ॥ एवं ये मां ध्यायमाना भजंते तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम् ॥


एवं जे ऐसे अभिन्नत्वज्ञाने । मज भजती प्रीतीने दैताविने ।
तयासीच मुख्य शांति प्राप्त होणें । अन्यासी नव्हे कल्पान्तीं ॥ ४५ ॥
एवं रजतमात्मक वृत्ती मेली । सत्त्वात्मक शमाही नाही उरली ।
अत्यंत अद्वैत शांति दाटली । शिवआत्मा अखण्ड ॥ ४६ ॥
आतां जग की जगाचा कर्ता । भिन्नचि नुरे संशय वार्ता ।
बंध मोक्ष की तिन्ही अवस्था । निपटून द्वैत हे गेलें ॥ ४७ ॥
मग तया पुरुषाचा जो विहार । तिहीं अवस्थेशी समाधि निर्धार ।
सवृत्तिक तो संप्रज्ञ साचार । निवृत्तिक असंप्रज्ञ ॥ ४८ ॥
एक निश्चयचि दृढ झाला । संप्रज्ञ असंप्रज्ञ कैचे त्याला ।
ठावचि नाही संकल्पाला । तरी निर्विकल्प कैंचे ॥ ४९ ॥
आतां जें जें कांहीं भाषण । तयासी म्हणावें वांचारभण ।
स्थिति गतीवीण अनिर्वचन । समाधान श्रुति बोले ॥ ६५० ॥


यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ॥
आनंदं ब्रह्म मां ज्ञात्वा न विभेति कुतश्चन ॥ ५१ ॥


जें वाणीसी न चावळे । मनासी अप्राप्य ज्याचे सोहळे ।
मी आनंदात्मा ब्रह्म अपरोक्ष निवळे । तरी कवणे वेळे न भीतो ॥ ५१ ॥
ब्रह्मात्मा अभेद निश्चय झाला । तो मागुती वाणीस नाही आला ।
शब्दें निश्चयही बोलू लागला । परी समाधान वेगळे उरे ॥ ५२ ॥
साखर गोड बोलतां आली । परी तृप्ति शब्दापरती राहिली ।
तेवीं अनिर्वाच्यता शब्दी बोलिली । परी ते स्थिति वाचेपरती ॥ ५३ ॥
तेवींच मन हे हिंपुटी होतां । भिन्नत्वें स्वरूप न ये अनुभवितां ।
कारण की जेथें अवसर नव्हे द्वैता । ध्येय ध्यान त्रिपुटीसी ॥ ५४ ॥
जैशी का मिठाची पुतळी । सागराचा ठावं पाहों गेली ।
तो ठाव न लगे परी मुकली । निजै आकारासी ॥ ५५ ॥
तेवीं मन स्वरूपा पाहूं गेलें । अनंतत्व कैसें तें नाहीं अनुभविलें ।
परी स्वता  मनपणाशी मुकलें । भिन्नत्व मोडूनि ॥ ५६ ॥
तस्मात् मनासी जाणणे न घडे । हे सत्य सत्य प्रतीती आलें उघडे ।
तरी मग ऐक्यत्व कैसे जोडे । कल्पील कोणी ॥ ५७ ॥
मीठ मीठपणा जेवीं मुकलें । परी ते निजांगें सागर झालें ।
तेवीं मन मनपणाशी निःशेष विसरलें । परी अंगें झालें परब्रह्म ॥ ५८ ॥
सविशेषीं ब्रह्म अनुभवावें । निर्विशेषीं निजांगेंचि व्हावें ।
ऐसें दृढापरोक्ष होतां स्वभावें । मग भीति कैंची ॥ ५९ ॥
द्वितीयत्व हे असेल जोवरी । भीती हे न चुकेचि तोवरी ।
आभिन्न होतांचि निर्धारी । निर्भयत्व पावला ॥ ६६० ॥
बहुत बोलणे कासया । ध्याता भिन्न उरे जरी ध्येया ।
तरी हे भीति न चुकेचि तया । अभिन्न झालियावीण ॥ ६१ ॥
तरी मग तूं देव मी भक्त आन । कल्पून सहस्रधा करी ध्यान ।
भीती न चुकेचि सत्य वचन । तस्मात् अभिन्न व्हावें ॥ ६२ ॥
परब्रह्मचि जो अंगें झाला । तरी मग कवणाचें भय त्याला ।
या सर्व नामरूप जगत् भ्रमाला । ठेला अधिष्ठान ॥ ६३ ॥
ब्रह्म जरी जन्मेमेरे । तरीच ज्ञात्याशी जन्म ही उत्तरें ।
ब्रह्म सुखदुःखातीत खरें । तरी हाही द्वंद्वातीत ॥ ६४ ॥
तस्मात् ज्ञाता निर्भय परिपूर्ण । जो निजांगें ब्रह्म आपण ।
यास्तव देवहो सावधान । असा निरूपणीं ॥ ६५ ॥
तुम्ही तूं कोण तूं कोण होतें पुशिलें । तेव्हां मी आपुलें निजरूप सांगितलें ।
निर्विशेष सत्यमिथ्यात्व दाविलें । सविशेषाशी ॥ ६६ ॥
निर्विशेष मीच नव्हे केवळ । तद्भिन्न तुम्ही असा सकळ ।
तुम्हां अज्ञानाचे पडिलें पडळ । मी ज्ञानरूप सदा ॥ ६७ ॥
तस्मात् मी ज्ञानघन सदगुरु । तुम्हांती दिघला ज्ञानविचारु ।
तरी स्मरा आम्ही निर्विकारु । कदां भेद भावं नका ॥ ६८ ॥
भेद उपाधीने झाला होता । तो म्यां ज्ञाने सारिला परता ।
आतां अपरोक्षत्वें अनंतता । आपुली दृढ करा ॥ ६९ ॥
तया निर्विशेष रूपावरी । नामरूपें नाहींच जन्मलीं सारीं ।
तस्मात् सविशेषाही माझारी । निर्विशेषचि पहा ॥ ६७० ॥
सुवर्ण जैसें अलंकारी । तेवीं नामरूपी निर्विकारी ।
यथें अवलोकू नका दूजीपरी । एक ब्रह्मात्मा अभेद पहा ॥ ७१ ॥
मी आन आणि तू आन । हा थोर हा असे सान ।
हा जीव हा ईशान । ऐसें भावूचि नका ॥ ७२ ॥
हा देव हा दैत्यदानव । हा गंधर्व हा यक्ष मानव ।
हे स्थावर जंगम गो अश्व । ऐसें भावूचि नका ॥ ७३ ॥
हा दुर्बळ हा संपन्न । हे ज्ञानी आणि हा अज्ञान ।
हा मूर्ख हा पंडित आपण । ऐसें भावूचि नका ॥ ७४ ॥
हे जड हे असें चंचळ । हे पाप हे पुण्य निर्मळ ।
हे सुख हे दुःख केवळ । ऐसें भावूचि नका ॥ ७५ ॥
एवं रामराया म्यां देवांसी । सांगतां निश्चय बाणला त्यांसी ।
अभेदज्ञानें अपरोक्षासी । पावले असती ॥ ७६ ॥


श्रुत्वेति देवा मद्वाक्यं कैवल्यज्ञानमुत्तमम् ॥
जपन्तो मम नामानि मम ध्यानपरायणाः ॥ ५२ ॥


एवं कैवल्यरूप उत्तमज्ञान । देवीं माझिया वचनें ऐकोन ।
विश्वासें माझेंचि नामग्रहण । ममध्यान परायण सदा ॥ ७७ ॥
एकदां अपरोक्षज्ञान झालें । आत्मा ब्रह्म निश्चया आलें ।
तेणें न इच्छितां जरी वर्तू लागलें । तरी अवश्य मोक्ष ॥ ७८ ॥
ऐसें मोक्षरूप अभेदज्ञान । देव पावले मजपासून ।
मग स्व स्व व्यापारही करितां जाण । परी पुन्हा अज्ञान नव्हे ॥ ७९ ॥
मींचि असें सर्वांभूतीं । ऐशी बाणली दृढ़ प्रतीति ।
मग होतां जरी नामरूप व्याप्ती । त्यांत जाण ती मी चित्घन ॥ ६८० ॥
सच्चिदानंद ध्यास लागला । तोचि वाणी मनाशी छंद आथिला ।
मग जो जो शब्द येत वैखरीला । तें तें माझें भजन ॥ ८१ ॥
जें जें मनाशी आठवें । तें तें माझें ध्यानचि बरवें ।
ऐसें होत्सातां कदां न व्हावें । किमपि सुखदुःख ॥ ८२ ॥
ऐसे जीवनमुक्ति सुख पावले । यावत् प्रारब्धे देहाकारे राहिले ।
परी पापपुण्य सुखदुःख विसरले । अंगें झाले परब्रह्म ॥ ८३ ॥


श्लोकार्द्ध ॥ सर्वे ते स्वस्वदेहान्ते मत्सायुज्यं गताः परा ॥


सर्व ते स्व स्व देहाचे अंतीं । माझिया सायुज्यपदा पावती ।
जेथून नसे पुनरावृत्ति । सृष्टीच्या आदिकल्पीं ॥ ८४ ॥
देह असतांचि मद्‌रूप झाले । ते अंतीं अन्यथा न होती वहिले ।
विदेह कैवल्याप्रति पावले । प्रारब्ध सरतां ॥ ८५ ॥
मत्सायुज्य याचि नांवें मुक्ति । जेथून कदां नसे पुनरावृत्ति ।
या परी आदि कल्पाचे अंती । देव सर्व पावले ॥ ८६ ॥
घटांत पाणी होतें भरिलें । ते मागुती सरोवरी रिचविलें ।
उदकांत उदक जें मिळून गेलें । तें न निघे काढितां ॥ ८७ ॥
तैसें अज्ञाने होते जीवत्वा आले । तें ज्ञाने जेथील तेथे मेळविले ।
आतां केवीं जाती वेगळे केले । जरी सृष्टिकाळ होतां ॥ ८८ ॥
भरला घट सागरी बुडविला । तो मागुता ज्याक्षणीं काढिला ।
तेव्हां तयाचि पाणिया घेऊन आला । मिळाले नाही म्हणोनि ॥ ८९ ॥
तैसे जे अज्ञानी सांपडले । ज्ञानेविण तैसेचि लया गेले ।
ते उत्पत्तिकाळी पुन्हा आले । कर्मगति देह धरूनी ॥ ६९० ॥
असो ब्रह्मादि देव सर्व मिळून । आदि कल्पी पावले ज्ञान ।
कल्पांती स्वरूपी गेले मिळून । देव ते पुन्हा न जन्मती ॥ ९१ ॥
पुढे मायादेवीने सृष्टीकालीं । दुजी देवसृष्टी निर्मिली ।
ते हे ब्रह्मादि नामें पावली । हे सत्य सत्य रामा ॥ ९२ ॥
तूं जीवाची शंका मनी धरून । पुशिलें होतें मजलागून ।
की सृष्टि केवीं झाली तुजपासून । आणि तुझें रूप कैसें ॥ ९३ ॥
तें म्यां देवांच्या संवादमि । तुज सर्व सांगितले आवेशे ।
ऐशये परी जाणून विशेषे । जीवें मुक्त व्हावें ॥ ९४ ॥
देवचि एक मदंश असती । तेचि अभेदज्ञाने मुक्त होती ।
ऐसें हे न कल्पावें चित्तीं । जीवही सारे मदंश ॥ ९५ ॥
जयासी ज्याक्षणी ज्ञान झालें । ते तत्क्षणींच मत्सायुज्य पावले ।
तस्मात् पदार्थमात्र ते मीच वहिले । अस्ति भाति प्रियरूपें ॥ ९६ ॥


श्लोकार्द्ध ॥ ततोये परिदृश्यन्ते पदार्था मदिभूतयः ॥ ५३ ॥


जे जे पदार्थ उप्तन्न होती । ते ते जाण माझिया विभूति ।
नामरूपी दुजी नसेच व्यक्ति । अस्ति भाति प्रियाविण ॥ ९७ ॥
तस्मात् रामा मीच हे सर्व । जरी दिसती वेगळे जीव ।
हे उगें अज्ञानाचे गौरव । मी असूनियां मी न होती ॥ ९८ ॥
तेंचि अज्ञान फेडावया । रचिलें असे म्यां उपाया ।
गुरुमुखें अभिन्नज्ञान पावोनियां । मदैक्या पावती ॥ ९९ ॥
हाचि देवांचा संवाद गुरुमुखें । ऐकूनि अभेदा पावती सुखें ।
तेचि निःसंशयपणे देखें । मीच होती सत्य हे ॥ ७०० ॥
कारण की मीच हे सर्व असें । आदि अंती मध्येही विलसे ।
तरी मग मी असतां भिन्न कैसे । उरती ज्ञान काळीं ॥ १ ॥


मय्येव सकलं जातं माय सर्व प्रतिष्ठितम् ॥
मयि सर्वं लयं याति तब्रह्मादयमस्म्यहम् ॥ ५४ ॥


माझ्याचि ठायीं हे सकळ झालें । माझिये ठायींच वर्तलें ।
शेवटी माझ्या ठायीं लया गेलें । तें ब्रह्मची अद्वय असें ॥ २ ॥
पृथिवी आप तेज वायु गगन । हेंही पंचक असे भौतिकाकारण ।
उत्पत्ति स्थिति लय पावणें । पृथिवीमाजी सर्वां ॥ ३ ॥
परी पृथ्वी आपापासून झाली । तरी तेही कार्यामाजी आली ।
आतां आपाशी कारणत्व कल्पना केली । तरी हेही कार्य तेजाचें ॥ ४ ॥
तेज जरी सर्वांचे कारण । तरी तें वायूपासून उत्पन्न ।
वायूही पाहतां निर्माण आकाशापासून । ५ ॥
आकाशापासून सर्व झालें । तरी तेंही तमोगुणी उद्भवलें ।
तमोगुणचि कारण म्हणतां दिसले । विरोध आत ॥ ६ ॥
तमोगुण संहाराशी कारण । उत्पत्ति स्थिति नव्हे जेणें ।
उत्पत्ति करी ब्रह्मा रजोगुण । परि स्थिति संहार नव्हे ॥ ७ ॥
सत्वगुण विष्णु पाळीतसे । परी संहार उत्पत्ति तेथें नसे ।
तस्मात् त्रिगुण देवत्रय कारण असे । मुख्यत्वे जगा केवीं ॥ ८ ॥
माया कारण जरी म्हणावी । तरी निमित्तकारण नसे बरवी ।
उपादानकारण मात्र व्हावी । लय असे म्हणोनि ॥ ९ ॥
ईश्वर तरी निमित्तकारण । तेथें नसेच की उपादान ।
ईश्वरी लय न देखों म्हणोन । आभिन्नकारण नव्हे ॥ ७१० ॥
उत्पत्ति स्थिति आणि संहार । या तिहीं कार्याशी जें थार ।
तेंचि अभिन्नकारण थोर । निर्गुण ब्रह्म ॥ ११ ॥
पृथिवीपासून ईश्वरापर्यंत । ही हीं कारणे असती वाटत ।
परी मुख्य कारणीं समस्त । उत्पन्न झालीं ॥ १२ ॥
या सर्वांची उत्पत्ति स्थिति । जेथें लयही पावती अंतीं ।
तेंचि अभिन्नकारण निश्चिती । एक परब्रह्म ॥ १३ ॥
परब्रह्म अभिन्नकारण । तें कवणाचे कार्य नव्हे जाण ।
तस्मात् तेंचि एक मुख्य अधिष्ठान । मायादि तृणांत जगासीं ॥ १४ ॥
अगा रामा माझें तेंचि निजरूप । येर साकार नव्हे जें झालें आपेंआप ।
आणि कर्ता कोण हाही आक्षेप । खपुष्पापरी झाला ॥ १५ ॥
आणि झालें तेंही संपूर्ण खोटें । जेवीं रजचे सर्प गोमटे ।
असे तें परब्रह्म एकटें । निर्विकाररूप ॥ १६ ॥
जग उपजे ब्रह्म उपजेना । जग वर्ते ब्रह्म वर्तेना ।
जग संहारे ब्रह्म पावेना । लय जगासवें ॥ १७ ॥
याचि हेतु अव्यय बोलिलें । तेंचि एक निजरूप संचलें ।
या सर्वांचे आणि माझें कळलें । पाहिजे तेंचि रूप ॥ १८ ॥
तेंचि मागुती रूप कैसें । बोलिजेताहे कांहींसें ।
आणि जगही भिन्न न दिसे । तया स्वरूपाहूनी ॥ १९ ॥


अणोरणीयानहमेव तद्वन्महानहं विश्वमहं विशुद्धः ॥
पुरातनोऽहं पुरुषोऽहमीशो हिरण्मयोऽहं शिवरूपमास्मि ॥ ५५ ॥


अणुहून मी असें सूक्ष्म । मोठियामाजी महान  मी परम ।
आणि विश्वामाजी शुद्ध सम । पुरातन ही मी ॥ ७२० ॥
मी पुरुष मी ईशान । मीचि हिरण्मय चित्धन ।
शिवरूप आहे मी सनातन । सविशेषां निर्विशेष ॥ २१ ॥
अणु म्हणजे सर्वांहून लहान । त्या ऐसा पदार्थ नसे आन ।
त्या अणुहून मी अतितर सान । दृष्टिगोचर नव्हे ॥ २२ ॥
पृथ्वीचा अणु सूक्ष्म असे । त्याहून शतगणे सान आपी वसे ।
पाण्याच्या अणुहुन सूक्ष्मत्वें भासे । अणु तो तेजाचा ॥ २३ ॥
वायु आकाश या दोहींसी । अणु  हा नसे निश्चयेंशीं ।
परी वायू लागतां अंगासीं । अणुत्वेचि स्पर्श होय ॥ २४ ॥
त्या वायूहूनी कोटी गुणित । सूक्ष्मत्वे आकाश निश्चित ।
परी आकाश पोकळपणे भासत । यास्तव भूत नाम तया ॥ २५ ॥
म्हणून ब्रह्मीच्या सूक्ष्मत्वासी । आकाश तुळेना कोटिगुणेशी ।
जे भिन्नत्वे कळेना ज्ञानदृष्टीसी । तरी किती सूक्ष्म म्हणावें ॥ २६ ॥
जें ब्रह्म स्वानुभवें अनुभवितां । त्रिपुटी उद्भवें  द्वैतरूपता ।
तरी ते कैशी असे सूक्ष्मता । त्या उपमा आणू कोठूनी ॥ २७ ॥
ऐसें अणुहून जे अणीयान । म्हणजे त्या ऐसे नव्हेचि आन ।
कोणी तया म्हणतील सान । एकदेशी असे ॥ २८ ॥
यास्तव मोठियामाजी मोठे । आकाश जेथे अणू ऐसें वाटे ।
तया मोठेपणाचे वर्णन करी गोमटें । ऐसा कवण ॥ २९ ॥
आकाशा ऐसा पदार्थ दुसरा । कवण असे जगीं निर्धारा ।
तें जग स्वरूपी अणुत्वें आतां नेम करा । केवढें तें कोणीतरी ॥ ७३० ॥
एवं अणु माजीही अणीयान । आणि महतामाजीही महान ।
या जगदुत्पत्तीपूर्वी परिपूर्ण । पुरातन या नांवें ॥ ३१ ॥
मायादि जगताची उत्पत्ति । त्यांत मीच जेवीं घटी माती ।
यास्तव नामरूपें जी दिसती । तें मी ब्रह्म विश्वरूप ॥ ३२ ॥
जगाचे कर्म नाहीं लिंपलें । यास्तव श्रुति मज शुद्ध बोले ।
पुरी मायेमाजी माझें रूप संचलें । यास्तव मज नाम पुरुष ॥ ३३ ॥
मजवीण पदार्थ न हालती । यास्तव चाळकत्व मज आरोपिती ।
तया नियंत्याशी मज नाम ठेविती । ईशान ऐसें ॥ ३४ ॥
सूर्य रेश्मीने सर्व जग प्रकाशे । तेवीं माझिये जाणीव किरणें सर्व विलसे ।
यास्तव श्रुति मज म्हणतसे । हिण्मयरूप ॥ ३५ ॥
विद्या अविद्येचा न लगे मळ । पापपुण्याचा मज नसे विटाळ ।
बंधमोक्ष नामरूप हे सकळ । मज नाही स्पर्शलें ॥ ३६ ॥
मग अकल्याण असावें कैसें । ते नसतां मी कल्याणरूप शिव असें ।
ऐसें माझें रूप निर्विशेषे । ओळखावें रामा ॥ ३७ ॥
मध्ये सविशेष हें विश्वाकार । परी याचा पहावा आदिअंत विचार ।
आदिअंती जरी निर्विकार । तरी मध्येही तेंचि ॥ ३८ ॥
ऐसें हें गुरुमुखें स्वरूप जाणावें । स्वानुभवें मग निजांगेंचि व्हावें ।
येथे कोणी म्हणेल की स्वभावें । गुरुत्व हा विकार कैसा ॥ ३९ ॥
तरी माझी अचिंत्यशक्ति । वर्णन नव्हेचि वेदाप्रति ।
तेचि ऐकावी श्लोक संमतीं । श्रुत्याधाररूप ॥ ७४० ॥


श्लोकार्द्ध ॥ अपाणिपादोऽहमचिन्त्यशक्तिः पश्याम्यचक्षुः सं शृणोम्यकर्णः ॥


मी अपाणि परी देत घेत । अपाद परी असे चालत ।
अचक्षु देखें अश्रोत्र ऐकत । अचिंत्यशक्ति म्हणोनि ॥ ४१ ॥
स्वतां मी हस्तपाद रहित । परी मजस्तव चालतसे जगत ।
व्यापारग्रहण दानादि समस्त । मजवीण नव्हे ॥ ४२ ॥
मी अचक्षु असोन देखणा । सर्वांगी समर्थ सर्वावलोकना ।
तिन्ही अवस्था जाणतसें  ज्ञाना । स्वप्रकाशत्वें ॥ ४३ ॥
चोरोनि गुप्तरूपें करावें । तें मज साक्षीस पडे ठावें ।
माझिया कळण्यावीण न व्हावें । कोणतेच कार्य ॥ ४४ ॥
श्रोत्र नसतां ऐकतसें । परेचा शब्दही मज ठाउका असें ।
मा वैखरी तो स्पष्टचि असे । तो नायकें कैसा ॥ ४५ ॥
हेचि अघटित्वं माझी शक्ति । चिंतिली नवजाय कवणाप्रति ।
असो ऐसा मी अमूर्ति । असून देहहीं धरीं ॥ ४६ ॥
शिष्यत्व जेव्हां प्रगटलें । तेव्हां म्यां गुरुत्व स्वीकारिलें ।
अधिकारियें मज ज्याक्षणी आठविलें । तत्क्षणीच प्रगटें ॥ ४७ ॥
मी अपांद परी अतिवेगेशीं । चालत जाय भक्तकार्यासी ।
पहातां माझिया गमन गतीसी । मन बापुडे पांगूळ ॥ ४८ ॥
मनास येथून तेथवरी जाणे लागे । मी तेथेचि असे निजांगें ।
अधिकारियें आठवितांचि सवेगें । मूर्तत्वे प्रगटें ॥ ४९ ॥
तो परावाचेनें जरी आठवी । तरी ते म्यां अकर्णे करुणा ऐकावी ।
मा वैखरीने जो अट्टहास्यें स्तवी । तें मी कैसा नायकें ॥ ७५० ॥
मज नसतां मांसमय डोळे । त्याचा अंतर्बाह्य भाव मज कळे ।
प्रबोधमात्र फेडी पडळें । अज्ञानाचीं ॥ ५१ ॥
तया सच्छिष्याचें सकार्य अज्ञान । घेत असें मी पाणीविहीन ।
आणि आपले आभिन्नज्ञान । तया देतसे ॥ ५२ ॥
अंतरीं असें मी आत्मरूपें । बाहेरी मूर्तिमान गुरुस्वरूपें ।
उपदेश करी अतिसाक्षेपें । अमूर्त परी ॥ ५३ ॥
अमूर्ते जरी म्यां देह धरिला । परी मी नातळेच देहकर्माला ।
एवं माझिये अचिंत्य शक्तीला । वेदही नेणें ॥ ५४ ॥
बोधमात्रे सच्छिष्यासी । आतळ नेदी पापपुण्याशीं ।
मग माझिये अलिप्तपणासी  । काय बोलावें लागे ॥ ५५ ॥
जसो ऐशिया मज गुरूपासून । उपदेशे व्हावें ब्रह्माभिन्न ।
हे उत्तम विचाराचे लक्षण । न होतां जाणणें तें वृथा ॥ ५६ ॥
मी होऊन मजमाजी मिळावें । ऐसें न होतां जेणे जाणो जावें ।
तरी ते जाणणे कदां न संभवे । कवणे हिंपुटी होतां ॥ ५७ ॥
रामा सांगितले होतें तुजसी । की मी दुर्ज्ञेय असें सर्वांसी ।
तोचि अर्थ श्रुतिसायासीं । साधकां सांगत ॥ ५८ ॥


श्लोकार्ध ॥ अहं विजानामि विविक्तरूपो न चास्ति वेत्ता मम चित्सदाहम ॥ ५६ ॥


दृश्य भास विविक्त रूपासी । मी जाणतसे निजप्रकाशीं ।
कोणी जाणता नसे मजसी । सदां चिद्‌रूप म्हणोनि ॥ ५९ ॥
जग हे जड आणि चंचळ । उत्पन्न होता हे सकळ ।
मी जाणतचि असें केवळ । स्थिति ही याची ॥ ७६० ॥
आणि याचा जो का लय होणें । तयाशी शून्य ऐसे श्रुति म्हणे ।
तया शून्यासही म्यां सर्वज्ञे । जाणणें निजप्रकाशे ॥ ६१ ॥
मनादि तत्त्वे हे ज्ञानशक्ति । पदार्थ निवडावया सावध असती ।
परी मज जाणावया न होती । सन्मुख कदां ॥ ६२ ॥
चक्षु पाहे घटासी । परी घट न देखेचि नेत्रासी ।
तेवी मीच जाणे सर्वांसी । परी सर्व नेणती मज ॥ ६३ ॥
बहु बोलणें कासया । मीही मज नेणें रामराया ।
जैसा चक्षु चक्षुतें पहावया । समोर न ये ॥ ६४ ॥
चक्षु जरी आपणा न पाहे । तरी तो कदाही अंध नव्हे ।
तेवीं मी चिद्‌रूप मज जाणू न लाहे । तरी नव्हे अदेखणा ॥ ६५ ॥
येथे शंका करील कोणी । कीं जाणणेंचि नव्हे कवणाचेनि ।
तरी जाणिल्यावीण अज्ञानहानि । कैसेनि होय ॥ ६६ ॥
गुरुरूपें हरोनि अज्ञान । मी देतसे निजात्मज्ञान ।
आतां बोलशी की नव्हे कळणें । तरी हा विरोध दिसे ॥ ६७ ॥
येविशींचे उत्तर ऐकावें । येथे साधकें सावध असावें ।
न जाणताही जाणून  रहावें । तें समाधान कैसें ॥ ६८ ॥


श्लोकार्द्ध ॥ वेदैरशेषेरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥


वेदाचा कर्ता आणि वेदवेत्ता । मीच असें गा ज्ञप्तिरूप जाणता ।
परी अनेक वेदेंकडोन ही वेद्यता । माझी असे गुरुमुखें ॥ ६९ ॥
शब्दब्रह्म हा सर्व वेद । मजपासून उमटला विशद ।
तस्मात् वेदाचा कर्ता मी सच्चिदानंद । अन्य पुरुषकृत तो नव्हे ॥ ७७० ॥
आणि सर्व वेदाचा मीच जाणता । देखणा कोण असे मजपरता ।
यास्तव मीच असें वेदवेत्ता । निर्विकारत्वें ॥ ७१ ॥
जेवीं परेपासून शब्द उठती । ते आत्मरूपींच आत्मया कळती  ।
तेवींच मी परमात्मा चिन्मूर्ति । कर्ता वेत्ता वेदाचा ॥ ७२ ॥
ऐसा मी स्वसंवेद्य असोन । वेदास्तवचि माझें होय ज्ञान ।
शब्दब्रह्मेवीण माझें जें लक्षण । ते न कळेचि  कवणा ॥ ७३ ॥
तेचि वेदाची प्रवृत्ति कैशी । होय अनिर्वचनीय वस्तूविशीं ।
तरी अवधारोत निश्चयेंशीं । बोलिजे अल्पत्वें ॥ ७४ ॥
वेदाचीं मुखें असती दोन । विधी आणि निषेध पूर्ण ।
यया उभयें होय ब्रह्मज्ञान । अनिर्वचनीय जरी ॥ ७५ ॥
सच्चिदानंद ब्रह्म सघन  । अखण्डैकरस परिपूर्ण ।
हे विधिमुखें वेदाचें वचन । येणें ब्रह्मलक्षणे कळती ॥ ७६ ॥
ऐसें नव्हे नव्हे तैसें । अशब्द अस्पर्शादि ऐसें ।
हे निषेधमुखें वेद सांगतसे । अन्य निषेधे स्वरूप ॥ ७७ ॥
जेवीं आकाश नव्हे पृथ्वी ऐसें । सांगतां पृथिवी त्यागून कोणी पहात असे ।
तेवीं ब्रह्म नव्हे म्हणतां सर्वां ऐसें । लक्षिले जाय वेगळें ॥ ७८ ॥
पोकळ पैस अवकाश । सांगतां कळे यथार्थ आकाश ।
तेवीं सच्चित्घन अविनाश । श्रुतीने सांगतां ब्रह्म कळे ॥ ७९ ॥
ब्रह्म नव्हे जडचंचळ । हे निषेधमुखें कळे निश्चळ ।
सत्यज्ञानानंत केवळ । हेंचि विधिमुख वेदाचें ॥ ७८० ॥
असो ऐशी उभयमुखानें । वेदाची प्रवृत्ति स्वरूपी होणें ।
तस्मात् गुरुमुखें श्रवणमननें । यथार्थ ब्रह्म जाणावें ॥ ८१ ॥
वेदांताची काय लक्षणे । शब्दासरिसा अर्थ अनुभवणें ।
त्रिविधा प्रतीतीने तयास म्हणणे । श्रवण ऐसें ॥ ८२ ॥
श्रवण झालियावरी मनन । उपरी घडे निदिध्यसन ।
तया निदिध्यासें ब्रह्म अभिन्न । विज्ञान होय साधकां ॥ ८३ ॥
ब्रह्म जाणणे तरी न घडे । परी विज्ञाने ऐक्यता जोडे ।
ऐक्यत्व पावतां सर्व द्वैत उडे । आणि निर्भय होय ॥ ८४ ॥
तस्मात गुरुमुखें श्रवण करावें । ब्रह्मलक्षण सर्व कळावें ।
तेंचि मनन निदिध्यासें पावावें । अभिन्न समाधान ॥ ८५ ॥
साधकें कैसें करावें मनन । निदिध्यासें केवीं अनुसंधान ।
राखणें तेंचि ऐका सावध होऊन । तेणें रीती अभ्यासावें ॥ ८६ ॥


श्लोकार्द्ध ॥ न पुण्यपापे मम नास्ति नाशो न जन्म देहेन्द्रियबुद्धि रस्ति ॥ ५७ ॥


माझिये ठायीं देहचि नसतां । कोण जन्मे कोण मरता ।
बुद्धीवीण पापपुण्या कोण भोक्ता । निरिंद्रिया कर्माभाव ॥ ८७ ॥
मी आत्मा ब्रह्म अखण्डरस । परिपूर्ण सच्चिदानंद अविनाश ।
जेथें नामरूप मायेचा नसे स्पर्श । तिहींही काळीं ॥ ८८ ॥
त्या माझे ठायीं आत्मयाचे । नामरूप हे विकार कैचे ।
सर्व विकारा देह मूळ भूतांचे । ते तरी जन्मलेचि नाहीत ॥ ८९ ॥
देहचि हे जन्मले नसतां । कवणाची असे मातापिता ।
बंधु बहिणी सुता कांता । हे माझें माझें कोठें ॥ ७९० ॥
गृह ग्राम कृष्यादि धन । पशु धान्य वतन वेतन ।
कोणाचे आप्त सुहृद सखे स्वजन ॥ देहाविन कोठे असती ॥ ९१ ॥
देह गर्भी जरी आला असता । तरी षड्विकारें आधी जन्मता ।
अस्थि वाढे तरुण होता । पुढे मरता वृद्धत्वीं ॥ ९२ ॥
देह तरी जन्मलाचि नाहीं । म्हणोन मी देहबुद्धी कवणा पाहीं ।
देहबुद्धीवीण माझें म्हणे सर्वही । कवण कवणा ॥ ९३ ॥
देह संबंधी मी माझें गेलें । तरी पापपुण्य कवणें केलें ।
 कर्त्यावीण कवणे भोगिलें । सुखदुःख कधी ॥ ९४ ॥
देह नसतां इंद्रिये नसतीं । तरी कवण करी कर्माप्रति ।
कर्माभावीं उंचनीच गति । कवणा असे ॥ ९५ ॥
 मुळी बंधनचि सत्य असावें । तरी हा मोक्ष म्हणोनि म्हणावें ।
आतां  द्वैतपणाच्या नांवें । पडिलें शून्य ॥ ९६ ॥
 शून्यत्व आलें या सर्वांसी । मी शून्यातीत अविनाशी ।
तें मी परब्रह्म या भूतादि मायेसी । माझ्या ठायी ठाव नाहीं ॥ ९७ ॥


श्लोकार्द्ध ॥ न भूमिरापो न च वन्हिरास्ति न चानिलो मेऽस्ति न मे नभश्च ॥


मी परब्रह्म परमात्मा असंग । माझ्या ठायीं भूतांचें कोठे सोंग ।
 भूमि आप तेज वायु नामाचे ढोंग । आणि कोठे आकाश ॥ ९८ ॥
स्वर्ग मृत्य पाताळी पाहतां । ह्या दृश्य पंचभूतांपरता ।
सहावा पदार्थ न दिसे तत्त्वतां । तस्मात् भूतात्मक जग ॥ ९९ ॥
भौतिके भूतांमाजी आटलीं । भूतें तरी कधी उद्भवलीं ।
उगीच आस्तित्वा नामें ठेविलीं । अज्ञाने ती गेली ज्ञानें ॥ ८०० ॥
आस्तित्व ब्रह्मीचें काढितां । निस्तत्त्वपण आले पंचभूतां ।
तरी मग भूमी आप तेज नामवार्ता । कोठे वायु आकाश ॥ १ ॥
मुळीच हे झाले नव्हतें । आतां नाशिले म्हणावें केउतें ।
नाम रूप नसतां जें का ऐतें । केवळ ब्रह्म ॥ २ ॥
जेथे झाले नाही अज्ञान । तेथे कोठे सांगा ज्ञान ।
मुळी भिन्नचि नसतां अभिन्न । म्हणावें कवणें ॥ ३ ॥
आतां काय कैसें ऐसे तैसें । बोलतां न ये बोलणेंचि फोसें ।
झालें न झालें झालें ओसें । द्वैता द्वैतासह ॥ ४ ॥


एवं विदित्वा परमात्मरूपं गुहाशयं निष्कलमाद्वितीयम् ॥
समस्तसाक्षिं सदसद्विहीनं प्रयाति शुद्धं परमात्म रूपम् ॥ ५८ ॥


ययापरी परमात्मा आत्मयाचें । यथार्थ रूप जाणोनि साचें ।
संशयमळ जे होते हृदयींचें । धुतले मननें ॥ ५ ॥
सदसतावीण जे अद्वय । समस्त साक्षी हा पूर्वपक्ष होय ।
ऐशीया परमात्मरूपी मिळूनि जाय । साध्य साधक त्यागें ॥ ६ ॥
जे बोला नये नव्हे अनुभव । ऐसें जें परमात्मरूप अपूर्व ।
तेंचि जाणूनि स्वयमेव । मनन जो करी ॥ ७ ॥
सवृत्तिक या नांवें मनन । युक्तीने दृढ करी आपुलें असंगपण ।
तया अखण्डैकरसी एकतान अनुसंधान । हाचि निदिध्यास ॥ ८ ॥
या मनन निदिध्यासेंकडून । बुद्धीचे संशय धुतले संपूर्ण ।
तया संशयाचे अवधारा लक्षण । बोलू काहींसें ॥ ९ ॥
मी देह विकारी सहसा । तेव्हां ब्रह्म होईन कैसा ।
करीतसे सर्व कर्मा अशेषा । तरी मी केवीं न लिंपे  ॥ ८१० ॥
मज जेव्हां करणे सर्व असे । तेव्हां पाप पुण्य भोग सुटती कैसे ।
या सर्व संशयामूळ मी काही ब्रह्म नसें । तेणेंचि बंधन संभवे ॥ ११ ॥
तस्मात् आपण ब्रह्म हे निश्चया आलें । देहबुद्धीचे परी सदृढ केलें ।
त्याक्षणीच हे संशय मेले । मनन निदिध्यासें ॥ १२ ॥
आतां देहासि कांहीं जरी झालें । पाप की पुण्यमार्ग आचरलें ।
हर्ष ग्लानीने मन नाहीं संकोचलें । तेव्हां बुडालें स्वतोत्थान ॥ १३ ॥
नाना शास्त्रे गलबला करिती । की अमुक करितां अमुक फलप्राप्ति ।
परी दृढमति संशयापरती । या नांवें परतोत्थान नाहीं ॥ १४ ॥
कारण की मनननिदिध्यासें । असंगत्व दृढचि केले असे ।
या रीती संशय धुतले लेश नसे । द्वैत विकाराचा ॥ १५ ॥
स्वतां किंवा परतोत्थान । नव्हे नव्हेचि किंचित आन ।
याचि नांवें दृढ समाधान । साक्षात्कार अपरोक्ष ॥ १६ ॥
ऐसा अपरोक्ष साक्षात्कार झालिया । मग सहस्त्रधा का उभवेना माया ।
तरीही जन्म नाहींनाहीं ज्ञानियां । ऐशिया प्रकारें ॥ १७ ॥
जो अंगेचि झाला सदसद्धिहीन । साक्ष्य साक्षी गेले वितळून ।
ऐसें निजरूप झाला परिपूर्ण । देह असतांचि ॥ १८ ॥
मरणा ऐलिकडे जो मेला । पावावयाचें तें अंगें पावला ।
तो प्राणवियोगें अन्य अवस्थेला । न पावे सहसा ॥ १९ ॥
देह आहेतों नांव जीवन्मुक्ति । अथवा निवृत्तिक विदेहमुक्ति ।
प्राणवियोगें म्हणावें तयाप्रति । विदेह कैवल्य पावला ॥ ८२० ॥


एवं मां तत्त्वतो वेत्ति यस्तु राम महामते ॥  
स एव नान्यो लोकेष कैवल्यफलमस्नुते ॥ ५९ ॥
इति श्रीमद्‌ पद्मपुराणे उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
शिवराघवसंवादे विभूतियोगो नाम षष्ठोध्यायः ॥ ६ ॥


अगा रामा हे महामति । जो कोणी पुरुष ऐशियारीती ।
तत्त्वतां जाणेल मज अपरोक्षगति । तोचि एकमुक्त निश्चयें ॥ २१ ॥
यावनि अन्यथा तिहीं लोकीं । देव मानव की दैत्यादिकीं ।
कैवल्यफळ न पाविजे अनेकीं । साधनद्वाराही ॥ २२ ॥
समाधि उत्थानरहित समाधान । जे मागें आतां बोलिलें निरूपण ।
या रीती जाणेल जो अपरोक्ष ज्ञान । तोचि एक मुक्त ॥ २३ ॥
आपण आपणा आपुलेपणे । घेईल तया दृढ अपरोक्ष म्हणणें ।
म्हणजे अंगें स्वयें मीच होणें । माझें ज्ञान तत्त्वतां ऐसें ॥ २४ ॥
ऐसें नसतां परोक्षरीती । ब्रह्मवार्तेतेंही जाणती ।
तया कदाही नव्हेचि मुक्ति । नाना साधने करितां ॥ २५ ॥
तस्मात् रामा हे महामति । म्हणजे तुझी अकुंठित गति ।
त्वां प्रश्न केला जगदोध्दाराप्रति । तो सर्वही फेडिला ॥ २६ ॥
हे जग कैसें झालें आणि कोण कर्ता । कोण अधिष्ठान या समस्तां ।
जीवशिव त्याहून असती भिन्नता । की ऐक्यरूप ॥ २७ ॥
माझें सविशेषरूप कोणतें । आणि निर्विशेष म्हणावें कवणातें ।
कवणे ज्ञानें पाविजे मुक्तीतें । हे सर्वही बोलिलें ॥ २८ ॥
मुख्य अभेदज्ञानावांचून । मोक्ष नसे जीवालागून ।
तरी अधिकारिये गुरुमुखेंकडून । अपरोक्ष ज्ञान पावावें ॥ २९ ॥
अगा अज्ञानेकडून बंधन पडिलें । तें ज्ञानेचि जाय निवर्तलें ।
तस्मात् तेचि ज्ञान तुजशी सांगितलें । कणवें जीवाचे ॥ ८३० ॥
सूत म्हणे शौनकादिकहो । अर्थी बुद्धीचा असे की प्रवाहो ।
हा सहावा अध्याय पहाहो । शीग असे ज्ञानाची ॥ ३१ ॥
या शिवगीतेचा हा गर्भ । की हा शिवहृदयाचे स्वयंभ ।
की वेदांताचा सारांश कोंभ । षोडशोध्यायांचाही ॥ ३२ ॥
पंचाध्याया पावेतों रूपक । बोलणे असे निश्चयात्मक ।
त्याचे रहस्य जे सकळिक । या अध्यायी असे ॥ ३३ ॥
पाशुपतास्त्र विज्ञानाप्रति । जे बोलिली पांचवे अध्यायीं युक्ती ।
तयाचा निश्चय यथामति । या अध्यायीं पहावा ॥ ३४ ॥
तेथूनही अध्याय सातवा । पुढे बोलिजेला असे बरवा ।
तो या अध्यायाचा भाव अघवा । प्रगटला असे ॥ ३५ ॥
बहुत कासया बोलावें । आठविया पासून षोडशांत आघवे ।
अध्याय विस्ताराचे बीज जाणावें । या सहावे अध्यायीं ॥ ३६ ॥
तस्मात् या अध्यायाचें साधकें । अर्थामृत निश्चयात्मकें ।
चाखावें श्रवणमनें निकें । ऐक्यत्व बोधे ॥ ३७ ॥
संस्कृत अथवा प्राकृत । श्रुत्यर्थचि असे समस्त ।
यास्तव जाणिजे वेदउक्त । शिवराघव संवाद हा ॥ ३८ ॥
इति श्रीमद्धदेश्वरी । शिवगीता पद्मपुराणांतरीं ।
विभूतीयोग स्वात्मानुभवाकारी । षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥

॥ श्रीमद्‌वेदेश्वरी षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥