॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सार - अध्याय अकरावा ॥

जीव ब्रह्म ऐक्य लक्षण याचेच नांव वेदान्त होय. या अध्यायांत जीवाच्या गतागतीचे लक्षण वर्णिले आहे. गतागती आत्म्यास असे मानतात. पण मेघगतीने चंद्र पळतो असे मूढ बाळे म्हणतात. तसेच अज्ञानीच आत्म्यास गति आहे असे म्हणतात. पण आत्मा सर्वांहून सर्वसाक्षी, भिन्न असून त्रिपुटीची उपेक्षा करतो. तो अभिमान कसा घेईल ? जो सर्व संघांत असून कर्मापासून अलिप्त आहे, जसे घटीं गगन अलिप्त असते. म्हणून आत्मा सर्वत्र व्याप्त असल्याने त्यास येणे जाणे संभवतच नाही. म्हणून ज्याने देहाभिमान घेतला त्यासच येणेजाणे संभवते हे त्रिवार सत्य आहे.

अज्ञानाने जो जीव आत्म्याहून वेगळा पडतो त्यासच देहांतर किंवा परलोकगती प्राप्त होतात. असेच समजून मिथ्या स्वभावानें मिथ्याचे कर्म मिथ्या भोगावे. आपण तिन्ही अभिमानांचा त्याग करून निजांगे आत्मरूप व्हावे.

अन्नभक्षण आणि उदकपान याने स्थूलदेहाचे पोषण होते आणि स्थूळाचे आणि लिंगदेहाचे बंधनही दृढ होते. अन्नरसाने पिंड व त्याच्या दृढत्वे प्राणसत्त्व दृढ होते. त्या प्राणांमध्ये इंद्रियांसहित लिंगदेह वावरत असतो. त्या सूक्ष्मामुळे देह विचरण करतो. देहास्तव सूक्ष्म राहते. प्राण संचाराने अन्नाचे पचन होऊन दोघांचे पोषण होते.

याप्रकारे स्थूल आणि सूक्ष्म एकमेकांस दृढ धरतात. व त्यामुळे जीवत्व धारण होते. त्या बंधनाला अन्नपान प्रयोजन असल्याने त्यानेच वाचतात. ते अन्न न खाल्ले किंवा खाल्लेले पचले नाही तर सूक्ष्म देहममता सोडूं पहातो आणि स्थूलदेहही क्षीण होतो. तरुणपणी रोगामुळे किंवा पुढे वृद्धपणामुळे अन्न खाववत नाही, खाल्लेले पचत नाही. यामुळे स्थूल देह क्षीण होऊं लागतो, शिरा हाडे दिसूं लागतात, शक्ति जाते, मांसाविण त्वचा लवूं लागते. अन्नरसच शरीरात दृढता आणि पटुता देतात व त्यामुळेच शरीरप्राण टवटवीत राहतात. अन्न रसानेच स्थूळ आणि लिंगाचे परस्पर दृढ बंधन होते. त्याचे अन्नरसावाचून हनन झाले की लिंगदेह प्राणांसह स्थूळदेह सोडून गमन करतो. जसे फळ पक्व झाले की अवचित देठापासून गळून पडते तसा लिंगदेह तनु सोडतो. जातांना काय काय घेऊन जातो ?

ज्या ज्या इंद्रियांच्या वासना असतील त्या मरणसमयी हृदयांत एकत्र होतात. इंद्रियांना अध्यात्मिक म्हणावे. त्यांच्या क्रियांना अधिभूत म्हणावे. त्या वासनेसह हृदयकमळी येतात व नंतर हा जीवही त्यांत मिळतो. असे झाल्यावर सर्व प्राणवायूंत मिळतात व तोही इतर नऊ वायूंसह ऊर्ध्वगती धरतो. तेव्हां प्राण्यांस ऊर्ध्वश्वास लागतो आणि नाडीगत प्राण आपापली जागा सोडून कंठापर्यंत येतात आणि त्वरेने नेत्रांदि द्वारा बाहेर पडतात. सर्व वासना, विद्या आणि कर्में त्यांचेबरोबर जातात. चक्षु, कर्ण, मुख आदि द्वारांनी प्राणांचे गमन झाले तर तो नाना पावन योनीत जन्मास जातो. ही मध्यम गति होय. सुषुम्ना नाडीमार्गे मूर्ध्नि भेदून अभ्यासाने प्राणांचे गमन झाले तर तो उपासक सत्यलोकास जाऊन ब्रह्मदेवासह क्रममुक्तिद्वारा सुटतो. अधोद्वारीं गमन झाले तर अधोगति होते. कृमिकीटकादि अथवा वृक्षलतादि अथवा नरकादि वास भोगावा लागतो. पण कर्मासारखे फळ मिळते यांत अणुमात्र संशय नाही. कृतीस कर्म म्हणतात, जाणणे ह्यास विद्या म्हणतात. या उभयतांचेही तीन भाग असतात. उत्तम, मध्यम, अधम. पापक्रियादि अधम असून त्याने नरकादि लोक मिळतात. कर्म आणि विद्या दोन्ही यथाविधि जाणतो व यज्ञादि कर्मे करतो तो स्वर्गभुवनी जातो.

आता उत्तम गति ज्यायोगे मिळते ते कर्म आणि विद्या सांगतो ते ऐका. विद्या म्हणजे एकाग्र उपासना, कर्म ते योगाभ्यसन. या योगे सत्यलोक व क्रममुक्ति मिळते. पूर्वी जे जे कर्म केले असेल ते ते मरणकाळी वासनेत गुप्त असते आणि जन्मतांच पूर्वाभ्यासामुळे प्रगटते. हे सर्व एका स्मरणांत साठवले जाते. पण स्मरणाचे विस्मरण होणे तेच मरण होय. प्रज्ञानात्मा हा ईश्वरस्वभाव व विज्ञानात्मा म्हणजे जीव, तो प्रज्ञानात्म्याचा आश्रय करून गमन करतो; जसे कुंभ देशाहून देशांतरी गेला की त्याच्याबरोबर त्यांतील गगन जाते. जीवाला जे प्रेरणा देते ते ईशचैतन्य होय.

जीवाची स्फूर्तिरूप ऊर्मी उठतांच त्यास तसतशीच प्रेरणा ईश्वर देतो. येथे मात्र अशी शंका येईल कीं सर्व कर्मास ईश्वराची प्रेरणा कारण असेल तर जीवाच्या पुरुष प्रयत्‍नास व्यर्थता आली तर तसे नाही; जीवाने जो जो प्रयत्‍न आरंभला असेल त्या त्या प्रयत्‍नास ईशान अनुकूल होतो म्हणून पुरुष हा प्रयत्‍नसिद्ध आहे. बुद्धि कर्मानुसारिणी असते आणि कर्माप्रमाणे धर्म, अधर्मांस प्रवर्तते. त्यात ईश्वर अलिप्तपणें त्या जीवास अनुदिनी योजतो. विज्ञानात्मा प्रज्ञानात्म्याच्या प्रेरणेंने प्राणोत्क्रमण होतांना लिंगभेदासह त्या देहरूपी घरास सोडतो. गगन सर्वत्र असते पण घटाबरोबर घटाकाश जाते तसे मुख्य आत्मा सर्वत्रच संचलेला असतो. पण लिंगदेहासवें जीव जो लिंगदेहांत प्रतिबिंबित झालेला आहे तो वासनेसह जातो. प्रश्न :- गेला हा भास कसा मानावा ? तर दुसर्‍या देहांत जन्मास येतो. मासा जसा प्रवाहांत पोहत असता कधी खाली कधी वर पोहत राहतो, त्याप्रमाणे जीवाचे जसे कर्म असेल, त्याप्रमाणे उच्च, नीच योनींत जन्मास येतो. जोपर्यंत अपरोक्षज्ञान होऊन अज्ञान निरसन होत नाही तोपर्यंत तो भ्रमण करीत राहतो. पुण्यकर्मे स्वर्ग, पापाने नीच योनी, मध्यम कर्माने मनुष्यादि होतो. पण जीव वासनेसहित भ्रमतच असतो. देहांतीं मुक्ति म्हणतात ते मंदमति जाणावे.

हा देह निमाला आणि दुसरा प्राप्त झाला नाही तोपर्यंत जीव कोठे असतो ? मध्य संधीत मूर्छित असतो, जसा सुषुप्तीत असतां किंवा यमयातना भोगत असतो, स्वप्नाप्रमाणे ! भास किंवा मूर्च्छा असते त्यावेळी सलिंगदेह जीव असतो. भासरूप लिंगदेहाने भासरूप यमयातना भोगतो. पुण्याने पितृलोक, अग्निसेवा केली असेल तर इंद्रलोकादि दाक्षिणायनी, कृष्णपक्षी, रात्री प्राण गेला व अंतरीही अंधःकार दाटला तर पुण्यामुळे प्रथम पितृलोकी जाऊन पुण्यक्षय झाल्यावर जीवत्व पावून प्रथम आकाशरूप, नंतर वायूचा आश्रय करून आपरूप म्हणजे मेघदशा पावतो व वृष्टिरूपत्व पावतो मग पूर्वजन्मानुसार धान्यरूप नंतर भक्ष्यरूप होतो. कधी मनुष्याने अन्न तर कधी अन्य योनींचे भक्ष्य अथवा वृक्षादि स्थावर होऊन राहतो. जसे कर्म तसे सुख पावतात. धान्यरूप झाल्यावर मनुष्याने अन्न बनला तर रक्तरेत होते व मैथुनाने गर्भत्व पावतो. तेथे कर्माप्रमाणे स्त्री, पुरुष अथवा नपुंसक होतो. याप्रमाणे जीवगति वर्णन केली. आता पुढे ज्या मार्गाने गेले असतां (अर्चिरामार्ग) क्रममुक्ति मिळते तो सांगतात.

ही गतागती जी झाली ती अज्ञानी जीवास भ्रांतिमुळे झाली. ती साधकांनी स्वानुभवे मिथ्या म्हणून ओळखावी म्हणजे जीवब्रह्मैक्य होऊन त्याचा ग्रंथिभेद होऊन गतागती मावळते. असा जीवन्मुक्त झाला की त्याचे देहावसान उत्तरायणांत होवो की दक्षिणायनांत होवो, कृष्णपक्ष असो वा शुक्लपक्ष, रात्र असो वा दिवस, स्मरण असतां होवो वा विस्मरणांत, देशी होवो वा विदेशी, कुग्रामांत मरो वा वाराणशीत त्याचे दृष्टीने फरक पडत नाही. निषिद्ध आणि काम्य कर्म त्यागून जो विहित स्वधर्मकर्माचरण शांत अंतःकरणाने फलाशा त्यागून लोकरीतीसाठी करतो तो क्रममुक्तीचा अधिकारी होय. हठयोगादि क्रिया करून कुणी मन शांत करतात पण स्वामी म्हणतात की अभेद ज्ञान झाल्याखेरीज खरी शांति मिळत नाही. विद्यारत जे सगुणोपासक ध्यानभजनादिने दृढ होतात, त्यांची आणि हठयोग्यांची शांति आणि दृढ धारणा मरणसमयीं टिकली तरच क्रममुक्ती मिळते.

जो उपासक योगी निग्रहीत शांतचित्त असेल, प्रथम ध्यानाचा अभ्यास करून निदिध्यासनाने वैराग्योपरमाने संतुष्ट शांत असेल तर उपासनेच्या बळाने अंतःकाळी स्मरण राहून वृत्ति प्रकाशते. उपासकाचा योगाभ्यास नसला तरी अन्यथा गति होत नाही. उपास्य देवता देवयान मार्गी अतिवाहक होतात आणि त्यास ब्रह्मलोकास नेतात. उत्तरायण, संवत्सर शुक्लपक्ष, दिवस यावेळी देहावसान झाल्यास यांच्या देवता, त्यास क्रमाने सूर्यलोक, विद्युलोक, तपोलोक व ब्रह्मलोकास नेतात. तो दिव्यदेह धरून तेथेच राहतो, त्यास पुनरावृत्ति नाही. पंचाग्निसाधक, विद्योपासक किंवा कर्मयोगी शुचि श्रीमंतांच्या घरी वा योग्यांच्या कुळीं जन्म घेतात व अभ्यास करून जीवनमुक्त होतात ते पुनरावृत्तीस येत नाहीत.

जे पुनरावृत्तीस येत नाहीत, त्यांना ब्रह्मदेवाकडून ज्ञान प्राप्त होते व तेथे चिरकाल राहून ते ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात. श्रीहंसराज सांगतात अशा क्रममुक्तीवर साधकांनी विसंबू नये. या देहीच सद्‌गुरूस शरण जाऊन ऐक्यज्ञान संपादावे. वर वर्णिलेल्या क्रममुक्तीच्या साधनांत चूक झाली तर जन्ममरण चुकत नाही. शिवाय कल्पान्तकाळी ब्रह्मी मिळण्यापेक्षा याच देही याच डोळा जीवन्मुक्तीचे सोहळे कां अनुभवूं नयेत ? मुमुक्षूने लोकेषणा त्यागून गुरुमुखे करून अपरोक्ष साधावे. यज्ञादिकांस कर्म म्हणतात आणि उपासनेस विद्या म्हणतात. जे अकर्म आणि विद्याहीन असतात ते यमलोकास जातात.

एक अपरोक्ष ज्ञान झाले की उपरम, शांति आदि आपोआप येतात. दवडितांही जात नाहीत. श्रीहंसराज म्हणतात क्रममुक्तीचा प्रकार सविस्तर त्यागार्थ वर्णिला आहे. मुमुक्षूंनी या मार्गास जाऊं नये. इतर लोक गेले तर जावोत बापडे ! आता ह्यां तिन्हीहून वेगळी गति वर्णन करता शुद्ध ब्रह्मरत जो असेल तो वरीलपैकी कोठेंच जात नाही. सैंधव पाण्यांत विरते. शुद्ध ब्रह्म हेच जीवाचे निजरूप ज्यास अस्ति, भाति, प्रिय म्हणतात. घट फुटला की घटाकाश जसे जेथल्या तेथेच असते. महदाकाशरूपाने त्याप्रमाणे त्याचे प्राण जेथल्या तेथे ब्रह्मरूपी लीन होतात. सहजरीत्या जीव माझ्याहून भिन्न नाही. मी मुख्यरूप जो सच्चिदानंद त्या माझे वृत्तीत पडलेले प्रतिबिंब म्हणजेच जीव नाम हा आभासच आहे. मडक्यांत वासना नसते म्हणून फुटले की संपते. जीवाच्या ठिकाणी वासना असते. म्हणून जन्म घ्यावा लागतो.

यानंतर संशय छेदार्थ प्रश्न - गंधर्वादि लोकांच्या ठायीं भोग कसे असतात ? सर्व भोग एकसमान असतात की एकाहून एक अधिक असतात. इंद्रादि सुख कसे मिळते ? जे कृत्रिम सुखाची इच्छा करतात त्या मंदमतिंना विरक्ती व्हावी म्हणून प्रश्न केला. शत अश्वमेध केले की इंद्रपद मिळते म्हणून मुख्य फळ कर्माचे जाणावे, पण उपासना हवीच. त्याशिवाय यज्ञ सिद्धिस जात नाहीत. सिद्धिस गेले तर स्वर्ग मिळतो पण पुण्य क्षय झाला की पतन होते. शत‍अश्वमेधाहून कमी झाले तर इतर देव त्याहून कमी झाले तर पितर गंधर्वादि होतात.

सामान्य मनुष्याच्या आनंदाहून शतगुणे थोर मानुष चक्रवर्तीचा आनंद असतो. पण तरुण, सुंदर, शूर, निरोगी, बलवान असून सप्तद्वीप वसुंधरेचा एकमेव चक्रवर्ती असेल तरच वरीलप्रमाणे सुख मिळते. यापैकीं एकही कमी असेल तर तितके सुख मिळणार नाही. राजाहून शतगुण मनुष्य गंधर्वाचे सुख, त्याहून शतगुण देवगंधर्वाचे, त्यांहून शतगुण पितृगणाचे, त्यांच्याहून शतगुण आजानदेव (उपदेव) यांचे, त्याहून शतगुण सर्व देव, इंद्र, बृहस्पति यांचे, त्याहून शतगुण कर्दमादि प्रजापति, ब्रह्मदेवादिंचे - अशा आनंदाच्या दहा श्रेणी श्रुति वर्णन करते. पापपुण्य दोन्हीचे नामें पापच असते. याविरहीत जो असेल तोच निष्पाप होय.

निवृत्तीचे सुख प्रवृत्तीशी तोलूं नये. ज्ञानी मनुष्यांस उपाधिरहित सुखाची रासच प्राप्त होते. देह कसाही असो, जग मीच म्हणून तादात्म्य झाले की त्याच्या सुखाची मर्यादा वेदही करूं शकत नाहीत. अभिन्न अपरोक्ष ज्ञानांत अधिक उणे नसते. कर्मी, उपासक, योगी, यांना ते मिळत नाही. अभिन्न सुख एकदां दृढ झाले म्हणजे त्यास क्षय, वृद्धि नसते.

देहाची कर्मे ज्ञात्यास स्पर्शत नाहीत. कर्म करीत असता ज्ञाता ईश्वर असा अंतरी सद्‌भाव दृढ असेल तर कर्मात अंतर पडले तरी त्यास ज्ञानाधिकार प्राप्त होतो. अंतःकरण शुद्धि झाली की एकवेळ उपदेश झाला तरी अपरोक्षता अंतःकरणी ठसावते व तो सहज मोक्षरूप होतो. साधू निंदा करील त्याच्या पापास गणती नाही, त्याचा अधःपात होतो. एखाद्याच्या घरी ज्ञाता त्या माणसाच्या मनांत भाव नसतां जरी भोजन करून गेला तरी कोटी ब्राह्मण संतर्पणाचे पुण्य मिळते, मग जो ईश्वरभाव ठेवून जेऊं घालीत त्याच्याविषयीं काय बोलावे !

ज्ञान सुदृढ व्हावे म्हणून निर्गुण अथवा सगुण उपासना आवश्यक आहे. कारण ध्येय गोचर असून अतूट एकतानी अनुसंधान राहणे तेच ध्यान होय आणि त्याचेच नांव उपासना. उपासनेमुळे म्हणजेच कर्तृतंत्रतेमुळे वस्तुतंत्रता म्हणजेच अपरोक्ष ज्ञान प्राप्त होते. निर्गुण स्वरूपाचा साक्षात्कार म्हणजेच अपरोक्षज्ञान होय. बहिरंगाचा विटाळ होऊं न देता निर्मळ सगुणध्यान करावे असे सांगितले आहे.

GO TOP