प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२३ डिसेंबर

नाम हे रूपापेक्षा व्यापक आहे


    Download mp3

समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की, 'आनंद म्हणजे काय ?' तर एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणाल की, 'हे पहा, इथे आनंद आहे !' इतकेच नव्हे तर याप्रमाणे आनंदाने खेळणारी मांजराची पिले, उड्या मारणारी लहान वासरे, हसणारे स्त्री-पुरुष, फुलांनी बहरलेल्या लता, यांच्याकडे बोट दाखवून, 'इथे आनंद आहे' असे तुम्ही सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर नव्हे. 'आनंदी वस्तू कोणत्या आहेत, असा माझा प्रश्न नसून 'आनंद मला दाखवा असे मी विचारले होते. आनंदी वस्तूमध्ये आनंद राहतो, म्हणून वस्तू हा काही आनंद नव्हे. लहान मूल हेच जर आनंद असेल तर मोठे स्त्री-पुरुष आणि मांजरीची पिले आनंदयुक्त असणार नाहीत. अर्थात् आनंद हा एकच असला पाहिजे; कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो. आपण जो जो माणूस पाहतो, तो तो निराळा असतो, तरी सर्वांना आपण माणसेच म्हणतो, कारण प्रत्येक माणसामध्ये 'मनुष्यपणा' आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनाने ओळखता येतो, आणि त्याचे अस्तित्व 'मनुष्य' या शब्दाने सांगता येते. 'मनुष्यपणा' हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे. प्रत्येक वस्तूचे बाह्यरूप तिच्या नामामुळे टिकते.

आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा 'आनंद' एकच असतो. म्हणजे एकच नव्हे, तर अनेक रूपे आली आणि गेली, तरी नाम आपले शिल्लक राहते. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री-पुरुष जन्माला आले, जगले आणि मृत्यु पावले, तरी 'मनुष्यपणा' आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लावला तर असे दिसेल की, चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या, पण 'चांगलेपणा' कायम आहे. सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या, पण 'सौंदर्य' कायम आहे. आनंदी वस्तु आल्या आणि गेल्या, पण 'आनंद' कायम आहे. लाखो जीव आले आणि गेले, पण 'जीवन' कायम आहे. रूपे अनेक असली तरी नाम एकच असते. म्हणजे नाम हे अनेकांत एकत्वाने राहणारे असते. याचा अर्थ असा की, नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते. नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देश-काल निमित्ताच्या मर्यादा, इत्यादि कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होते, आज आहे, आणि पुढेही तसेच राहील. नाम हे सत्‍स्वरूप आहे. नामातून अनेक रूपे उत्पन्न होतात, आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ असल्यासारखाच आहे.


३५८. माझे बोलणे प्रत्येकाला कळते; ज्याची जेवढी तयारी
असेल तेवढे त्याला कळते, पण वाया कुठेच जात नाही.