प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२९ जून

पुण्यतिथी कशी साजरी करावी ?


    Download mp3

सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल ? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा. नामांत राहण्याचा प्रयत्‍न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल. इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते, पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार ? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही, तर तो काय करणार ? तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातत चालला आहे; त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही.

समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे, नाम हेच रूप असे समजून घेत चला, म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे, नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे, इत्यादि गोष्टी तात्पुरत्या असतात. एखादा अशक्त, हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी 'अंगाला सूज येऊ दे' असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल; याच्या उलट, त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल. तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे; आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या, वगैरे असतात. खरोखर, प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत ! पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त, वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे ! त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. म्हणून नामात सत्संगतीही आहे. मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा.


१८१. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे.