प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

४ ऑक्टोबर

भगवंताच्या संयोग-वियोगातच खरे सुख दुःख आहे.


    Download mp3

हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय् दुसऱ्याचे हित आपण काय साधणार ? ज्याला स्वतःला सुधारता येत नाही, तो दुसऱ्याला काय सुधारणार ? त्यालासुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटते, 'आपण दुसऱ्याचे हित करून देऊ.' या अभिमानाने तो फुगलेला असतो. अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते, आणि ते साधन गुरू सांगत असतात. म्हणून, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते. ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही. ते आपल्या जवळच असते; पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते. हेच काम सद्‌गुरू करीत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म, अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले. परंतु, वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते तोपर्यंत, प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच, नारदांनी जेव्हा सांगितले की, 'श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा म्हणजे तुमचे हित होईल, ' तेव्हा खरी ओळख पटली. तसेच, राम अवतारी असूनही, वसिष्ठांनी जेव्हा सांगितले की, 'तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, ' तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले. आता हे जरी केवळ आपल्याला दाखविण्याकरिता असले, तरी त्याचा अर्थ हा की, गुरूने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरू तरी काय सांगतात ? नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात. ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते; ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये. आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो.

जगात खरे सुख नाही आणि दुःखही नाही. जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे; ते तात्पुरते आहे. खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग-वियोगामध्येच आहे. खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे; आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो. म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा. आपण त्याचे आहोत, आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते, असे समजून वागावे. भूक लागली तर आईजवळ खायला मागावे, पण चोरी करू नये; तसे पोटापुरते भगवंताजवळ मागावे, पण जास्त मागू नये. भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे. तसाच तो सर्वव्यापी आहे. म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो; याचा अर्थ असा की, मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून या वर्षी पुनः त्याचा जन्म करावा लागला ! खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे. भगवंत काल होते, आज आहे, आणि उद्या राहणारच; म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो. भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले, तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल.


२७८. रामनाम जाणा अक्षरे दोन । गुरूमुखे करावी ओळखण ॥