प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

६ नोव्हेंबर

भगवंताची कृपा.


    Download mp3

खरोखर, भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली; तिथे सासू, सासरा, दीर नणंद, जावा वगैरे सर्व लोकांशी तिचे चांगले आहे पण नवर्याशी मात्र पटत नाही, तर तिला खरे सुख समाधान मिळणार नाही. परंतु, समजा, नवर्याशी चांगले आहे पण इतरांशी तितकेसे ठीक नाही, तर तिचे अडणार नाही. तसेच एकाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याच्या उलट, भगवंताची कृपा आहे, पण इतर गोष्टींचा अभाव आहे, तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे; आणि ती मिळविण्याकरिता, त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे. समजा, एखादी कुरूप मुलगी आहे. पुष्कळ ठिकाणी तिला दाखविली पण ती नापसंत झाली; नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले. ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात, त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले; मग त्याने किती पाप आणि पुण्य केले आहे हे कोण पाहतो !

भगवंताची कृपा सर्वांवर, अर्थात् आपल्यावरही आहेच. आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. ' मी पिईन तर आईचेच दूध पिईन ' असे म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते; त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून, असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. 'भगवंता ! तू माझ्यावर कृपा कर,' असे सांगणे म्हणजे 'मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर' असे म्हणण्यासारखेच आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल ? ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनिरूपाने येतो, त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे. ती काम करीत असतेच, आपणच आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. पुष्कळ केलेले देखील शंकेने व्यर्थ जाते. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरले की आपली वृत्ती निःशंक होते. जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात.


३११. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल
त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नामच तेवढे आहे.