प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२९ एप्रिल

पैशाच्या आसक्तित राहू नये.


    Download mp3

कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत; पण मला जर कोणी विचारले की, 'त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा ?' तर मी सांगेन की, 'पैसा हा त्यांतला त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा कमी करतो.' भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे ? यासाठी, भिकार्‍याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण 'स्व' देणार नाही. 'स्व' देऊन मग 'सर्व' ठेवले तरी चालेल, पण 'सर्व' देऊन 'स्व' ठेवला तर ते मात्र चालणार नाही; म्हणजेच, 'मी देतो' ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते.

देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार ? मी 'माझा' देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे, हे आपल्या हातात आहे का ? 'मी माझे रक्षण करीन ' असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते; म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे ! देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहोचणार ? एक भगवदिच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून, रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले; म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले, आणि त्यालाच खरे समाधान मिळाले.

राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात, मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा ? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तित तुम्ही राहू नका. ही आसक्ति नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संतसमागम हाच होय. आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे ! संतांना आपण खोटेपणा देतो. पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संताकडे जातो. पण संताला अर्पण करून घेण्याकरिता कितीजण संताकडे जातात ? देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील ?


१२०. मनाने नेहमी 'मी रामाचा आहे' ही भावना ठेवावी.