प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१६ जानेवारी

नामाकरताच नाम घ्यावे.


    Download mp3

नाम हे निसरडयासारखे आहे. निसरडयावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही. त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही. रोगी-निरोगी, विद्वान-अडाणी, श्रीमंत-गरीब, लहान-थोर, स्त्री-पुरूष, जात-गोत, यांपैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही, नसली तरीही अडत नाही. नामाशिवाय दुसर्‍या कोणत्याही साधनाला शक्ती, बळ, पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते. असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम येईल. आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच, स्वत:च्या कल्याणाकरिताच घेणे, जगातल्या दुसर्‍या कशाहीकरिता न घेणे. आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही. सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे. असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे, कारण देव, संत यांसारख्या विभूतिही तिच्यापोटी जन्म घेतात; अशा स्त्रियांना पळवून नेऊन अनीतीने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळविण्याचा धंदा काही लोक करतात ही किती निंद्य गोष्ट आहे बरे ! पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक निंद्य आहे. म्हणून नाम हे नामाकरिताच घ्यावे, त्याचा संबंध आपल्या इच्छा-अपेक्षांशी ठेवू नये. नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते. नामाच्या साहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो. आपल्या हृदयातच तो सापडतो.

आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुध्द ठेवावे; दुसरी, नामाला कधीही सोडू नये; आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी -म्हणजे सदगुरू - आहे ही जाणीव जागृत ठेवावी. प्रत्येक माणसाला कशाचीतरी विशेष आवड असते; त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे. आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही. भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर किती थोडे घालावे लागते! तसे भगवंताच्या नामाचे आहे. रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे ते फार काम करील. भगवंत हा सर्वसत्ताधीश खरा पण एका बाबतीत तो लुळापांगळा होतो व सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळांत अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते.


१६. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे.