प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

श्रीगुरुपौर्णिमा

श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन १


ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की, माझ्यापाशी अनुग्रह घेणार्‍यामध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे, तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का ? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे, हे पूर्ण जाणूनसुद्धा मी त्याला रामरूप पाहिला. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही; नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही. तसेच, मी कुणाचे रक्षण करतो आहे असे मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही, ते भगवंताने केले, तिथे मी जगाचे काय रक्षण करणार ? लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात. कारण ती मोकळी असतात; त्यांना बंधन नाही. विद्वानांच्याबद्दल मला आदर आहे, पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्याबद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. तसेच, मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही. एखाद्या मनुष्याला सांगितले की, 'तुझा डोळा घरी ठेवून तू मजकडे ये,' तर तसे त्याला करता येणार नाही; त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही; परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की, तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी, जे करायचे ते मनापासून करावे, प्रामाणिकपणा सोडू नये, आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खतपाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते. तसे, लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल. मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते; पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही; म्हणून मी ते प्रकट करीत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कुणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझे मन अस्वस्थ होते, आणि नंतर, ही अस्वस्थता कोठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो. माझ्या माणसाने उगाच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की, भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे. 'मी तुमच्याजवळ आहे' असे मी सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून' परमात्मस्वरूप तुमच्याजवळ आहे' असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरिता सर्व काही करतो आहे; तुम्हांला जे काही होईल, ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानीत नाही ? वास्तविक जे जे काही तुम्ही करताहात ते मीच करतो आहे, माझीच तशी इच्छा आहे, असे मनी दृढ धरून वागावे. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धारच होणार.

श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन - २


आशीर्वाद. गेले सात दिवस चाललेला उत्सव पाहताना मला असे खरे वाटते की आता तुम्हांला सांगायचे राहिलेच नाही काही ! ज्याची आपण पूजा‍अर्चा करतो, त्याचा हेतू लक्षात घेऊनच, त्याचे म्हणणे आपल्याला पटले आहे म्हणूनच, आपण त्याची पूजा‍अर्चा करतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या आज जेवढ्या म्हणून अडचणी असतील, ज्या परिस्थितीत तुम्ही गुंतून गेला असाल, ती परिस्थिती कायम ठेवूनसुद्धा, तिच्यात बिघाड न करता, कसे वागावे हेच मी शिकविले - आणि तुम्ही ते आचरणात आणता असा माझा समज आहे, बरे का ! आपल्याला प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी आहे. मनुष्य जन्माला येतो तोच पराधीनतेत येतो, आणि जातो तोही पराधीनतेतच, हे आपण पाहतो. मग, मनुष्य पराधीन असताना, आपण आपली वृत्ती कशी करावी की ज्याने परमात्मा आपलासा करून घेता येईल ?

ज्या गोष्टीची आपल्याला अत्यंत आवड असते तेच आपण भगवंताजवळ मागणार; आणि अत्यंत आवड जर कोणती असेल, तर ज्यात माझा घात आहे तीच आवड मला निर्माण होते आहे, हे आपण पाहतो. म्हणून, मला सांगायचे असेल तर एकच; मी भगवंताजवळ काही मागण्यापेक्षा, "भगवंता, तू दाता आहेस, तू सर्व उचित करणारा आहेस, योग्य तेच करणारा आहेस, तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा, परमात्मा, तुला योग्य वाटेल ते तू दे, " असे म्हणणे जरूर आहे. "ज्यात माझे कल्याण असेल तेच तू करशील यात शंका नाही; मग मी काहीतरी मागून माझ्याच पायावर मी धोंडा पाडून घेण्यापेक्षा, परमात्मा, तू देशील त्यात मी समाधान मानीन," ही हमी आज आपण भगवंताला देऊ या. मागणारा मनुष्य आपली योग्यता बघून मागत असतो. एखाद भिकारी आला तर 'तुमचे घर माझ्या नावे करुन द्या' असे कधी म्हणायचा नाही; तो म्हणेल , 'मला चार पैसे द्या. एकवेळचे अन्न द्या.' हे जसे तो आपली किंमत पाहून मागतो, तसे दाता कितीही मोठा असला तरी आपली किंमत पाहूनच आपण मागणार ! अहो, तो दाता भगवंत म्हणजे कसा, वस्तूशिवाय समाधान देणारा आहे ! म्हणून, "भगवंता तुला आवडेल ते मला दे; मी जसे व्हावे असे तुला वाटत असेल तेच मला दे, " हेच मागणे जरूर आहे.

जगामधे आपण पाहिले तर दोन प्रकारचे भक्त आहेत. एक भक्त तुमच्या-आमच्यासारखा आहे; तो म्हणतो. "भगवंता तू माझा कधी होशील ? तू माझा होऊन रहा, म्हणजे मला कशाची ददात नाही पडायची. " म्हणजे खोटा खटला केला तरी निकाल माझ्यासारखा लागेल म्हणतो ! दुसरा भक्त आहे तो म्हणतो, "भगवंता, आता माझं उरलं नाही काही. आता मी तुझा होऊन राहीन." यातला फरक तुम्हाला कळतो आहे. 'तू माझा हो' म्हणत असताना, 'मी आहे तसाच कायम राहीन, जे जे मला हवं आहे ते ते तू पुरव !' असे म्हणतो; आणि दुसरा म्हणतो, 'रामा, आता तुझ्याशिवाय मला काही नको, आता मी तुझाच होणार !' आपले मन आपल्याला काय सांगते ? आपण कोणत्या भक्तांपैकी आहो ? आपण पहिल्या भक्तांपैकी असाल तर आपल्याला वर जाणे जरूर आहे. "आतापर्यंत परमात्म्या, मी मागितलेले तू पुरवलेस. आता माझे मागणेही थांबत नाही, तुझे देणेही थांबत नाही. मग वासनेच्या पोटीच माझा शेवट होणार असे दिसते ! तर आता, परमात्म्या, एकच गोष्ट कर - आता मागण्याची बुद्धी मला देऊ नकोस. '

परमात्म्यासारखा दयाळू कोण आहे ? लहान पोर आईच्या मांडीवर असताना आईने चमच्यातून काहीही आणले तरी आऽ करून पिते, असे आपण भगवंताजवळ राहिले पाहिजे खास ! त्या मुलाला खात्रीच असते; आपल्याला मारण्यासाठी आई हे आपल्याला काहीतरी देते आहे अशी शंकासुद्धा त्याला कधी येत नाही ना ? तसे, मी म्हणेन, परमात्म्याने ज्या अवस्थेत आपल्याला ठेवले आहे त्या अवस्थेतच समाधान बाळगणे तुमचे-आमचे खरोखर काम आहे.

पण व्यवहाराची संगत तर सुटली नाही, आणि भगवंत तर हवा, या अवस्थेत आपण काही करणे जरूर असेल तर, व्यवहारात प्रयत्‍न करावा, अगदी आटोकाटीने करावा, पण 'फळ मात्र, भगवंता, तुझ्या इच्छेने काय मिळायचे ते मिळू दे,' असे म्हणून त्यात समाधान मानायचा अभ्यास करावा. तरच तुम्हाला साधेल, नाहीतर नाही साधणार काही; आणि हे जो करील त्याच्या मागे परमात्मा उभा राहील.

मनुष्याचे जीवन अती क्षणभंगुर आहे. आपण पाहतो ना ? किती मोठमोठे होऊन गेले, राम-कृष्णादि अवतार झाले, मोठमोठे सत्पुरुष होऊन गेले; कोणत्या ना कोणत्या निमित्ताने का होईना, पण आज ते दिसेनासे झाले, एवढी गोष्ट खरी आहे. पण अशा सत्पुरुषांनी आपल्या बरोबरीचे असे काही मागे ठेवले आहे की ते त्यांच्या बरोबरीने काम करील. देहात असताना ते जे काम करीत तेवढेच काम त्यांची सत्ता करील, एवढी शक्ति त्यामध्ये आहे. ते गेले तरी त्यांची सत्ताच काम करते, त्याचप्रमाणे परमात्मा गेला तरी त्याने आपल्याला वरदान देऊन ठेवले आहे; आणि ते जो जतन करील त्याला मी पावन करीन, त्याचा मी होऊन राहीन, असे वचन देऊन ठेवले आहे. त्याने सांगितले, "तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू एक कर. अती दक्षतेने प्रपंच कर, प्रयत्‍नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे औषध सांगतो ते घे." आणि ते औषध जर कोणते असेल तर ते भगवंताचे नाम आहे. त्या नामात राहण्याचा खरोखर तुम्ही अभ्यास करा.

इतक्या अट्टाहासाने मी सांगतो आहे - आणि तुम्ही लोक नाम घेत नसाल अशी शंकासुद्धा मला कधी येत नाही, कारण तुम्ही नाम घेत नसता तर इथे येण्याची बुद्धी तुम्हाला झाली नसती; पण तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा - नामाशिवाय जगणे नाही खरे. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. एकदा तरी भगवंताचे नाम घ्या. नाम घेत असताना एक दिवस एक नाम असे भयंकर येईल की भगवंत थरारून जाईल, आणि मी सांगतो, तुम्ही असाल तिथे तो उभा राहील खास ! 'कुठे माझा तो आहे' असे त्याला वाटेल. मी सांगतो हे काहीतरी सांगतो आहे असे समजू नका, बरे का ! त्या नामावर विश्वास ठेवून तुम्ही वागा. नामावरची निष्ठा कशी काम करते हे ज्याचे त्यालाच कळेल. तेव्हा, तुम्हाला एकच सांगणे आहे, ही जी पूजा तुम्ही करता, तुम्हाला सांगितलेले आचरणात आणाल तेव्हाच ही पूजा घेतली असे समजा. आणि हे जर कराल ना, तर परमात्मा हात दिल्याशिवाय कधी राहायचा नाही. परमात्म्याला तुम्ही-आम्ही दुःखी रहावे असे कधी वाटत नाही. म्हणून परमात्म्याचे होण्यासाठी एकच त्याच्याजवळ मागू. 'तुझ्या नामात प्रेम दे' एवढेच मागू. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्यामागे परमात्मा उभा राहील हे अगदी सत्य, सत्य त्रिवाचा सांगतो बरे का ! आणि इतके जर केलेत तर पौर्णिमा केल्याचे श्रेय तुम्हाला परमात्मा देईल. आता एकच करा, थोडे तरी नाम घेतल्याशिवाय राहू नका. त्याला मोठी क्रिया आणि विधी असतो असे काही नाही बरे का ! आवडीने, प्रेमाने, भगवंताचे नाव घ्या;


॥ जानकीजीवनस्मरण जयजयराम ॥