प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

श्रीदासनवमी

दासनवमीचे प्रवचन


हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूंमधून अत्तरे काढतात; कोणी जाईतून, कोणी जुईतून, कोणी गुलाबातून, असे अत्तर काढतात. ही गोष्ट सोपी आहे; पण मातीतून अत्तर काढणारे जे लोक असतात त्यांची मात्र कमाल आहे. हे जसे खरे, त्याचप्रमाणे सर्व संत सारख्याच योग्यतेचे खरे, पण मातीतून अत्तर काढणारा, म्हणजे प्रपंचामध्ये परमार्थ करायला शिकविणारा, कोणी असेल तर ते समर्थच होत. समर्थांनी विषयाला खरे ओळखले. नुसता 'सावधान' हा शब्द ऐकून समर्थ खरे सावध झाले आणि पळून गेले. शिवाजीसारख्या शिष्याला समर्थांनी सांगितले की, "अरे, माझा दाता राम आहे !' हे उपासनेचे तेज होय. आपल्या ठिकाणी उपासनेचे तेज पाहिजे. समर्थांनी प्रपंची लोकांना तुच्छ केले नाही; परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्या शिवाय ते राहिले नाहीत. उपासना चालवीत असताना, जगण्यासाठी म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही; पण दुसर्‍या कशासाठी भीक मागणे पाप आहे. नुसती भिक्षा मागणे हे काही समर्थांचे ध्येय खास नव्हते. 'राम दाता आहे' या भावनेने भिक्षा मागणे हे मोठेपणाचे आणि तेजस्वीपणाचे लक्षण आहे. शिवाजीसारखा शिष्य झाला तरी समर्थांनी आपली लंगोटी टाकली नाही. हे खरे वैराग्य होय. म्हणूनच ते 'समर्थ' पदवीला पोहोचले. स्वतःचा जीव धोक्यात घालून मिळविलेले राज्य गुरूच्या झोळीत टाकणारा शिष्य धन्य होय, आणि अनायासे चालून आलेले एवढे राज्य निरासक्तिने परत करणारा गुरू त्याहून धन्य होय !

समाजातल्या ज्या वर्गाला परमार्थाच्या शिकवणीची जरूरी आहे, तिथे जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे, हेच प्रत्येक संतांचे काम असते. काही संत एकांतिक वृत्तीचे असतात, तर काही संत समतोल वृत्तीचे असतात. समर्थांसारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात, समर्थांच्या काली लोकांची भगवंताबद्दलची बुद्धी कायम होती, फक्त परिस्थितीमुळे त्यांना बाहेर तसे वागता येत नव्हते. पण आज ती बुद्धीच नाहीशी होत चालली आहे. हा काळ जास्त कठीण आहे. इथे सूक्ष्मामध्ये बिघाड झाला आहे. म्हणून नाम हे सध्या फार परिणामकारक ठरणारे आहे, कारण ते सूक्ष्म आहे. समर्थांनी दासबोध लिहिला, त्यात आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका घेऊन त्यांनी त्यांची उत्तरे दिली आहेत. खरोखर, दासबोधसारखा ग्रंथ मिळणे कठीण. जो दास होतो त्यालाच त्याचा बोध होतो. जो भगवंताचा दास झाला, त्याचे जन्माचे कल्याण दासबोध करील. प्रत्येकाने तो जरूर वाचावा आणि त्याप्रमाणे मनाला बोध द्यावा. समर्थांना आपले हित कशात आहे ते कळले, आणि त्यांनी ते जगाला सांगितले. ज्याला जे झेपण्यासारखे आहे तेच त्यांनी सांगितले. प्रपंच मोडका ठेवा असे नाही त्यांनी सांगितले, तर तू ज्या मार्गाने तो करतोस त्यामार्गाने तो नेटका होणार नाही हे सांगितले.

समर्थांना रामाची मूर्ति म्हणजे प्रत्यक्ष रामच आहे असे वाटे; अशांनाच राम आपण होऊन अनुग्रह देतो. समर्थांसारखे संत स्वतः कधीच उद्धरलेले असतात; केवळ जगाचा उद्धार करण्यासाठी ते जन्माला येतात. अशा संतांनी सांगितलेल्या नामाची कास धरल्यानेच आपण त्यांचे उतराई होऊ शकू.


॥ जानकीजीवनस्मरण जयजयराम ॥