प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

११ ऑगस्ट

समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही.


    Download mp3

खरोखर, जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते, ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही; मग त्याच्या आड कोणीही येत असेल तरी त्याची पर्वा आपण करू नये. पण सत्य अनुभवाला यायला आपली बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगात बुद्धीभेद फार झाला आहे; अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहाणे फार कठीण झाले आहे. अगदी अत्यंत सदाचाराने वागणार्‍या माणसाचीसुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही. केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला, असे मी म्हणत नाही; मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा, असेही मी म्हणत नाही; तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की, जीवनात तुम्हाला समाधान पाहीजे ना ? ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कोठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही, निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू ! एका गावात एक पन्नास-साठीच्या वयाचा बुद्धीमान पण कुत्सित वृत्तिचा माणूस राहात होता. वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळकी करण्यात त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधुचे प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला, "अहो बुवा, ती तुमची भक्तीबिक्ती ती बाजूला ठेवा, देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा !" त्यावर साधु शांतपणे बोलला, ते मी सांगतो; पण आता तुमचे उतार वय झाले. काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही, तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी, आणि मृत्यूची मगरमिठी, यांतून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार, प्रयत्‍न, तुम्ही केला आहे का ?" हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला, पण त्याचे विचारचक्र सुरू झाले. दुसर्‍या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, "आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही. पण आता मी काय करू ते मला सांगा." साधु बोलला, "दोन वर्षे मौन धरून नामस्मरण करावे" त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन धरले आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधुची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळाले ! मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे !


२२४. नामी ठेवावे चित्त । तेच मानावे सत्य ।
हा निश्चय ठेवा मनात । मन होईल निभ्रांत ॥