प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१३ डिसेंबर

भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते.


    Download mp3

देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत. पण समजा, देहाचे इतर अवयव शाबूत आहेत, आणि हृदय तेवढे बंद पडले, तर सर्व इंद्रिये शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही. या‍उलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले, तरी उपचार करून पुनः पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो. फार काय,पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी, हृदय शाबूत असेल तर काम भागते. पण जर का हृदयच बंद पडले, तर मात्र सर्व कांही संपलेच. नाम हे हृदयासारखे आहे. इतर साधने ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत. म्हणून नाम नसेल तर इतर साधने फलदायी होऊ शकणार नाहीत. 'आता या जन्मात एवढे पुरे' हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता, पण पैसे मिळविण्यासाठी किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करीत नाही ! याचे कारण, भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालते असे वाटते. प्रपंचात जिला प्रीती असे म्हणतात ती भगवंताकडे लागली की भक्ति बनते; प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते. अशा रीतीने आपले विकार भगवंताकडे लावता येतात.

एक प्रवासी होता. गाडीमध्ये त्याला चांगली जागा मिळाली म्हणून आपल्या स्टेशनावर न उतरता, गाडी शेवटी थांबते तिथपर्यंत तो गेला; आणि त्याच गाडीने तो पुनः परत आपल्या गावी आला ! त्याचप्रमाणे आपला जन्म-मरणाचा प्रवास चालला आहे. तुम्ही त्या प्रवाश्याप्रमाणे परत येऊ नका. प्रवासामध्ये केळी, संत्री वगैरे घ्या, म्हणजे इथे घरेबिरे बांधा, पण आपले स्टेशन विसरू नका. भगवंत हे आपले स्टेशन आहे. अलिकडे शास्त्री पंडित सुद्धा सर्वजण भगवंताच्या उलट बोलू लागले आहेत. म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा, आणि नंतर पोथी पुराणे ऐकावीत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी, किंवा करमत नाही म्हणून, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात; असे करणे योग्य नाही. पोथ्या-पुराणांच्यामध्ये दोष नाही; पण सांगणारा आपले काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरते. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान, हेच सर्व पोथ्यांचे सार आहे.

आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी, आपण आपले बोलणे कमी केले पाहिजे. बोलणे कमी करायला मन गुंतवून ठेवणे जरूर आहे. भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते. ह्या भावनेचे मूळ प्रत्येकाच्या हृदयात असते. हीच शुद्ध भावना आपल्याला तारते, मंदिर आणि समाधी तारीत नाही. देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरूपता झाली, त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता त्याचे स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरूपता का होणार नाही ?


३४८. परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो.