प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

९ जून

वासनानाश हाच मोक्ष.


    Download mp3

पुष्कळदा भक्ति म्हणजे काय, किंवा परमार्थ कशाला म्हणतात, हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ति नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा, विषयांचा आला पाहिजे. मला सुख हवे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. 'जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिति' अशी मोक्षाची व्याख्या करता येईल.

खरोखर, भगवंताजवळ काय कमी आहे ? एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यासवृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही, त्याला काय करावे ? माझे समाधान माझ्याजवळ असताना, दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते, हेच आपले चुकते. हवेपण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही; हे सर्व रोगांचे मूळ आहे. आणि म्हणूनच; ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. प्रत्येकाला वाटते, मी श्रीमंत व्हावे, पण कितीजण तसे होतात ? म्हणजे ती निराशाच नाही का ? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट, भिकार्‍याचे काम करणार्‍याने जर ते उत्तम केले, तर लोक त्याचे कौतुक करतात. तसे, प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय आणि गरीब असला काय, याला महत्त्व नसून, त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे. आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. विषयावर जोपर्यंत तुमचे सुख अवलंबून आहे, तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही. एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले, म्हणजे तो प्राप्त होतो. 'मी करतो' असे कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहीन असे जो म्हणतो, त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीण असते. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते, त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे, हे प्रथम पाहावे. परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही.


१६१. हवे व नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचे मरण आहे.