प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

श्रीरामनवमी

श्रीरामनवमीचे प्रवचन - १


आज रामनवमी आहे. आपण ती आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो. आज रामजन्म झाला; आता पुढच्या रामजन्मापर्यंत आपला हा आनंद टिकेल असे आपल्याला मनापासून वाटते का ? आपली भिती, काळजी, तळमळ दूर झाली का ? जर झाली नसेल तर हा रामजन्माचा आनंद, उत्साह, त्या दिवसापुरताच आहे असे म्हणायला पाहिजे. मग आपण रामजन्म महिनाभर जरी साजरे करीत राहिलो तरी त्याचा काय उपयोग ? खऱ्या अर्थाने जर आपण रामजन्म साजरा केला नाही तर त्यामुळे मिळणारा आनंद कायम कसा राहील ? वाजंत्री लावून व्यावहारिकदृष्ट्या साजर्‍या केलेल्या इतर उत्सव समारंभाचा आनंद जसा तेवढ्यापुरताच टिकतो, त्याप्रमाणेच जर रामजन्माच्याही उत्सवाचा आनंद राहिला, तर आपल्या पदरात काय पडले ? उत्सवाकरिता केलेली खटपट आणि दगदग, इतकेच ना ? भगवंताला त्याच्या उत्सवाची जरूरी नसते. म्हणून मी म्हणतो, रामजन्माचा उत्सव साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तो व्यावहारिक दृष्ट्या साजरा करू नये. श्रीमंतांप्रमाणे गरिबांना, लहानांना त्याचप्रमाणे मोठ्यांना, तो साजरा करताना आपलेपणा वाटेल, तसेच ज्या योगाने रामनामाचे प्रेम उत्पन्न होईल, भक्तिभाव वाढेल, आणि आपापसांत प्रेमभाव निर्माण होईल, अशा रीतीने उत्सव साजरा करावा. प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असेच रामाचे चरित्र आहे. सुष्टांचे रक्षण करणे हा खरा धर्म होय, आणि त्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतला, हे तत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. आपला 'राम' हा देवघरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून, त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन ठेवले, तरच रामजन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल. परंतु आपले कसे होते बघा, आपल्याला डोळे असून प्रकाश दिसू शकत नाही, कारण त्यावर विकारांचा पडदा येतो. डोळ्यांवर दृष्टी कमी करणारे आच्छादन येते आणि डॉक्टरांनी सांगितलेले औषध, पथ्यपाणी, वगैरे चालू ठेवायला लागते, त्याप्रमाणे नीतिधर्माने तुम्ही आपल्या अंतःकरणात पेरलेल्या नामरूपी बीजाची वाढ कशी होईल इकडे लक्ष द्या. प्रत्येक वर्षाच्या रामजन्माबरोबर रामनामाच्या प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी, हेच रामजन्माच्या उत्सवाचे खरे फळ होय. 'राम कर्ता आहे' ही भावना दृढ होऊन मन रामनामात जास्तीत जास्त रमणे, हीच रामजन्म साजरा केल्याची फलश्रुती होय.

श्रीरामनवमीचे प्रवचन - २


रामचरित्र सर्वांगसुंदर आहे. रामाने पितृ आज्ञा पाळली आणि सारे वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला; या त्याच्या थोर कृत्याचा वारंवार विचार करावा. केवढा हा त्याग ! किती हा संयम ! किती असामान्य पितृभक्ति ! काय निर्लोभता ! काय कर्तव्यनिष्ठा ! या प्रत्येक गुणाचा विचार करावा, आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्‍न करावा. कोणी म्हणतील, रामाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा, पण तसे नव्हे. राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग आजही अनुसरणीय नाही का ? मातृ-पितृभक्ति, एकपत्‍नीव्रत, बंधुप्रेम, सहिष्णुता, निर्लोभत्व, अत्यंत प्रेमळपणा, शौर्य, आदिकरून गोष्टी आजही आदर्शभूत नाहीत का ? सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाही का ? काळ वेगळा असला तरी नीतितत्त्वे सर्वकाळी अबाधित असतात. म्हणून रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय होय.

रामचरित्रात महत्त्वाचा भाग भक्ताच्या चरित्राचा आहे.म्हणून भरतादिक रामभक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. रामायणात भरताची भक्ति अपूर्व आहे. रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या, त्या पादुकांना साक्ष ठेवून भरताने अकर्तेपणाने चौदा वर्षे राज्य केले. तसे आपण जर प्रपंचात वागलो तर किती आनंद होईल ! राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याचा त्याग केला नसता. पण त्याने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रत झाला, हेच त्याचे वैशिष्ट्य. भरताचा प्रपंच म्हणजे त्याचा राज्यशकट. रामपादुकांना वंदन करावे, प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी, आणि रामस्मरण करून मग ती करावी, असा त्याने राज्यशकट हाकला. तसेच आपणही प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा, रामाला साक्षी ठेवून करावा; तो सुखाचा होईल. संसार, जग, माता, पिता, जाया, पुत्र, घरदार हे सर्व माझे नसून रामाचे आहे, असा भाव ठेवावा. पुत्र-कलत्र माझे असे म्हणतो, पण खरोखर माझे असते तर त्यांच्यावर सत्ता गाजविता आली असती; पण तसे करता येत नाही. म्हणून हे सर्व भगवंताचे आहे हे पक्के समजावे. लक्ष्मणापेक्षांही भरताचे चरित्र प्रापंचिकाला जास्त आदर्शरूप आहे. चौदा वर्षेपर्यंत जर भरतासारखी भक्ति घडेल तर राम खास भेटेल.

प्रपंच परमात्म्याचा आहे असे समजून केला तर तो बाधणार नाही. जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थातली पहिली पायरी होय. आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठविले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे. ही भावना इतकी तयार झाली पाहिजे. एक भगवंताचे नाम घट्ट धरावे, त्यामध्ये अती उत्कटता ठेवून एकतानता करावी, आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. 'मी नाम घेतो' हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय. रामाला अगदी विनवणी करून सांगा की, " रामा, आता मी तुझा झालो. ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा मी आटोकाट प्रयत्‍न करीन. तू मला आपला म्हण."

श्रीरामनवमीचे प्रवचन - ३


राम दयाळू आहे, त्याने काहीही केले तरी ती दयाच आहे. आत-बाहेर दयाच दया. दयामूर्तीच तो, त्याचा क्रोधही दयारूपच ! रामाने शत्रूला मारले, पण मरणात उद्धार केला. रामाचा कोपही कल्याणकारक; म्हणूनच रामचरित्र गोड.

रामाचा ध्यास लागला पाहिजे. दशरथाला रामाचा विरह झाला, 'राम, राम' म्हणत म्हणत प्राण गेला, त्याला सद्‍गती मिळाली. जटायूला मोठा आनंद झाला की मरतेवेळी रामाचे दर्शन झाले, आणि त्याला पहात पहात, 'राम राम' म्हणत म्हणत प्राणोत्क्रमण झाले. मारीचाला रावण म्हणाला, "सुवर्णमृग हो आणि कपटाने रामलक्ष्मणांना सीतेपासून दूर ने, मग मी सीतेचे हरण करीन." मारीच प्रथम कबूल होईना. रावण म्हणाला, "तू जर माझे ऐकले नाहीस तर मी तुला ठार करीन." मारीच मनात म्हणाला, "रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्याच हातून मेलेले काय वाईट ?" रामरूप पहात पहात त्याने प्राण सोडला. त्यालाही रामाने आत्मस्वरूपात मिळविले. रावणाला मंदोदरी म्हणत होती, "महाराज, तुम्ही महान अपराध केलात, रामाची सीता त्याला देऊन टाका." मंदोदरीने फार उपदेश केला, त्यामुळी त्याचे मन विचलित झाले; त्याच्या मनात सात्त्विक भाव उगवला, सीता देऊन टाकावी असे त्याला वाटले. इतक्यात नारद आले, ते म्हणाले, "अरे सीतेला सोडू नकोस; तिला सोडलेस तर रामाच्या हातून मरण्याचे भाग्य तुला मिळणार नाही !" म्हणून रावणाने रामाच्या हातून मृत्यु पत्करला, आणि त्याच्या देखत प्राण सोडला.

रामाची सर्वच कृती गोड, आकृती गोड, मग त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे ! पण आपल्या अंतरात थोडा तरी सद्‍भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, अंतरी थोडेफार नामप्रेम असावे, मग नामस्मरणात फार आनंद येईल. आपल्यामध्ये प्रेम नाही असे आपल्याला वाटते. पण प्रेम नाही कसे ? प्रेम आहे, पण ते आपण प्रपंचात लावले आहे. तेच रामनामात लावायचे आहे. त्यासाठीच रामचरित्र ऐकावे. आपल्याला जुळणारे असेच रामचरित्र आहे. प्रापंचिकाला ते आदर्शरूप आहे. म्हणून त्याचेच अखंड स्मरण करावे. आपण रामाला अनन्य शरण जाऊ या, मग तो सर्व अडचणी दूर करील. राम आपल्याला बोलावतो आहे, पण आपणच 'काम पुष्कळ असल्यामुळे' जाऊ इच्छित नाही, खरे ना ? आणखी काय सांगावे बरे ? आशीर्वाद.


॥ जानकीजीवनस्मरण जयजयराम ॥