प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२ फेब्रुवारी

नामाने सद्‍बुद्धी उत्पन्न होते.


    Download mp3

कौरवांनी पांडवांना निदान पाच गावे तरी द्यावीत, म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल, म्हणून भगवान् श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरिता गेले. त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की, 'देवा, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे. न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरूर आहे. पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही, त्याला मी काय करू? तू सर्वसत्ताधीश आहेस, तर मग माझी बुद्धीच पालट म्हणजे सर्वच प्रश्न एकदम मिटेल!' परंतु तसे काही न होता पुढे युद्ध झाले हे प्रसिद्धच आहे. तीच स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते. म्हणून, सगुणरूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही असे दिसते. सदबुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. म्हणूनच त्रिकालबाधित असणाऱ्या नामावताराची आता जरूरी आहे. नाम म्हणजे भगवंतच आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊ या.

एका माणसाची प्रकृती बरी होती पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाला की, 'जीव वाचवायचा असेल, तर पाय कापायला हवा.' आता, नुसता प्राण आहे पण हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळयांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, पण प्राण आहे, तर उपयोग नाही. याउलट, बाकी सगळे आहे पण प्राण नाही, तरीही उपयोग नाही. प्राण आहे पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल. समजा, कानाने ऐकू येत नाही; नाही तर नाही ! कुठे बिघडले ? उपासना, अनुसंधान, हे प्राणासारखे समजावे; बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा. यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे; ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे. ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंती निराशा आहे.

आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहोत असे म्हणण्यापेक्षा, ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःखमूळ आहे. अमकी गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे, तीच दुःखमूळ आहे, हे समजून आपण वागले पाहिजे. मांजर उंदराशी खेळते; ते त्याला धरील, परत सोडील, पुनः धरील, पुनः सोडील, पण शेवटी प्राण घेईलच त्याचा. तसे काळ आपल्याशी करतो आहे; आशेत गुंतवून ठेवील, पुढे जाईल. आपण पहिल्यापासूनच हे ओळखून राहावे की असे गुंतून राहण्यात काही फायदा नाही, आणि अनुसंधान ठेवले तरच मनुष्याचे कल्याण होईल. नाही तर फार कठीण आहे. मी-मी म्हणणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे, विद्वान, शास्त्री, पंडित, सर्व खरे भ्रमातच आहेत. म्हणून म्हणतो, एक करा ' अनुसंधान टिकवून जेवढे करता येईल तेवढेच करा. '


३३. आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपाच आहे.