प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

३१ ऑगस्ट

"ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे."


    Download mp3

मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहात नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान, यांवरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता. भगवंतावाचून मनुष्य कसा सुखी होईल ? लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो, तर मला अडाणी आवडतो. असे माझे सगळे जगाच्या उलट आहे. पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला. मी समाधानरूपी आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही, त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले ! आजपर्यंत मी एकच साधन केले: कुणाचे मन दुखवले नाही, आणि एका नामावाचून दुसर्‍या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा ! विद्या नाही, पैसा नाही, किंवा कला नाही. पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो, त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो.

जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे; म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही, मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले. माझे सांगणे ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ऐकायला येता, याची तीन कारणे असू शकतील. एक, मला चांगले सांगता आले नसेल; दुसरे, तुम्हाला ते समजले नसेल; किंवा तिसरे, सांगितलेले तुम्ही विसरला असाल. तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे; आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे. पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो. मी एखाद्याला सांगत असताना, 'याने माझे ऐकले तर याचे कल्याण होईल' असे आपोआपच माझ्या मनात येते. माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही; पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मी मदत करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित होय; आणि जगल्यावर आज ना उद्या तो नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे ? मी एकदा बीज पेरून ठेवतो. आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही.


२४४. आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काही सांगितलेच नाही. जो मला
भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचे माझ्याकडे लागले.