प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

११ फेब्रुवारी

मायेच्या तावडीतून सुटण्यास नाम हेच साधन.


    Download mp3

परमेश्वराची भक्ती करावी, त्याचे नामस्मरण करावे, असे पुष्कळ लोकांना मनातून फार वाटते, पण काही ना काही कारणाने ते घडत नाही. असे का व्हावे ? तर माया आड येते. मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसे पोहोचायचे ? माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे; "तिला सोडून तू ये" असे त्याला म्हणणे म्हणजे " तू येऊ नकोस" असे म्हणण्यासारखेच आहे; कारण एखाद्या इसमाला " तू ये, पण तुझी सावली आणू नको " म्हटले तर कसे शक्य आहे ? म्हणून माया ही राहणारच. आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचे कसे हाच प्रश्न आहे; आणि या प्रश्नाचे उत्तर एकच : भगवंताचे नाम घेणे. नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येते. जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही, तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही. एखादा इसम पूर्व दिशेला चालला आहे, तर त्याची सावली त्याच्यामागून त्याच दिशेने जाईल; त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले तर तिला ते शक्य नाही. तो मनुष्यच जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेकडे जाणे शक्य आहे. याचाच अर्थ, माया भगवंताच्या अधीन आहे. सर्व विश्व हे मायारूप आहे; म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे; याचा अर्थ, या विश्वाला आधार परमेश्वरच आहे.

आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे ? समजा, एखाद्या इसमाला एका मोठया व्यक्तीला भेटायचे आहे. पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही, कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार, कुत्रे वगैरे आहेत. त्यांच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार. पण समजा, "मला अमक्या दिवशी येऊन भेटावे" अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल, तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिनतक्रार आत सोडील आणि मालकाची भेट होईल. तसे भगवंताचे नाम, म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची भेट होईल.

म्हणून माया तरून जायला भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे. नामस्मरणात खूप तल्लीन व्हावे, देहाचा विसर पडावा. देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे. म्हणून त्याला आळवावे आणि 'तुझ्या नामाचे प्रेम दे' हेच मागावे. बाकी सगळे देईल, पण हे नामप्रेम तो फार क्वचित्‌ देतो. म्हणून आपण तेच मागावे. रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे आणि आनंदात राहावे.


४२. विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय; नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय.