प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२३ ऑगस्ट

वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा.


    Download mp3

पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ माझ्याचकरीता सांगितला आहे. तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचन करावे. ग्रंथ लिहीणाराची तीव्र इच्छा असते की, त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे. त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मथितार्थ लक्षात आणावा. भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच; मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले. संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे, तर टीका अणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत, हा फरक जाणून घ्यावा.

कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जाते. उगीच वाचीत बसण्यात फायदा नाही. नुसत्या वाचनाने काही साधत नाही. जितके वाचावे तितका घोटाळा मात्र होतो. वाचावे कुणी ? तर ज्याला पचविण्याची शक्ती आहे त्याने. बाकीच्या लोकांनी फार वाचू नये; त्यातही, वर्तमानपत्र वाचीत वेळ घालविणे, म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलावणे होय. वाचनाचे मनन झाले पाहिजे. मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळते. वाचन आणि साधन बरोबर चालावे. मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो. साधन आणि वाचन असले की साधक कधीही मागे पडायचा नाही. उपनिषदे, गीता, योगवसिष्ठ, यांसारखे ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे, आपल्या उपासनेला आवश्यक असते. गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्मसंन्यास, यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे, हे लक्षात ठेवून ती वाचावी. वेदान्त हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे. समजा, आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जातो आहोत. वाटेत एक माहीतगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखविली. त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो. तसे उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही, आपले मन ताळ्यावर रहात नाही. अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो. आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो.


२३६. पोथी वाचायची ती कशाकरीता ? साध्य काय, साधन काय,
हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी.