प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१५ मार्च

उपाधीरहित 'मी' म्हणजेच भगवंत.


    Download mp3

ब्रह्माचे निरूपण सांगता येण्यासारखे नसते. साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही, काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येते. खोटयावरून खऱ्याची परीक्षा करता येते, तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे. पण मी मायारूपच जर झालो तर ती कशी ओळखावी बरे? सत्यावर छाया पडली तीच माया झाली. वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर, सत्य आणि परमात्मस्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार ? जी जगतेमरते ती माया. म्हणजे माया ही नासणारी आहे, भंगणारी आहे. शाश्वत आनंदापासून जी मला दूर करते ती माया. म्हणूनच, ज्याने शाश्वत सुख मिळते, जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखविते, तेच खरे तत्त्वज्ञान होय. एक भगवंत फक्त सत्यस्वरूप आहे; त्याच्यासाठी जे जे करणे ते सत्य होय. 'मी देवाचा आहे' हे कळणे याचे नाव आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय; म्हणजेच मायेला दूर सारणे. वास्तविक, उपाधिरहित जो 'मी' तोच भगवंत आहे. उपाधिरहित राहणे म्हणजे भगवदरूप होणे. किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते की, तिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होते. म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते, ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था होय. इथे 'मी ब्रह्म आहे' अशी जाणीव राहते.

निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी सांखळी असेल तर तो ॐकार होय. म्हणून, परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निरास करता करता शेवटी ॐकारापर्यंत येऊन थांबावे लागेल; म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल. दहा माणसे उभी केली, त्यांतली नऊ 'ही नव्हेत' म्हणून बाजूला सारली, दहावा राहिला तोच खरा. त्याप्रमाणे 'हे नाही, ते नाही' झाल्यावर जे शेवटी उरले ते ब्रह्मच होय. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, "तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा, पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस; आणि कोणाचे तरी, म्हणजे अर्थात्‌ ज्ञानी माणसाचे, ऐक आणि त्याप्रमाणे वाग." याचा साधा अर्थ असा की, आपण संतांना शरण गेले पाहिजे. सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्‍न कःपदार्थ आहे; म्हणजे खऱ्या अर्थाने आपण निमित्तमात्र आहोत. म्हणून आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे.


७५. वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही.