प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१२ सप्टेंबर

नाम अभिमानाचा नाश करते.


    Download mp3

दुसर्‍याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की, भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले, तेव्हा तो रडू लागला ! ’लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ असे नसावे. जे आपण दुसर्‍यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करू या. नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याचे वेळी दैव आठवते; म्हणून दोन्ही प्रसंगी कर्तेपण नसावे. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे. खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरे रडावे लागते, लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावे. मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. ’यश देणे न देणे तुझ्या हाती आहे’ असे म्हणून रामास शरण जावे. जगात अनेक शोध लागत आहेत, त्यात शरीरसुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत. परंतु खर्‍या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध, एक साधुसंतच करू शकतात, त्यांनी समाधानाची म्हणूण जी काही साधने सांगितली आहेत, त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही, तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना, किंवा केल्यावर, त्याबद्दल अभिमान झाला नाही, तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोके वर काढीत असतो पाहा ! एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली, दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता; परंतु त्या मुलीचे लग्न पाचसहा वर्षे कुठेही जमू शकले नाही. पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला, "माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले." त्यावर त्याला कोणी विचारले, "मग दोनचार वर्षे आधीच का नाही केलेत ?" तेव्हा तो म्हणाला, "त्या वेळी जमले नाही" मग आता जमले म्हण की. ’मी केले’ असे कशाला म्हणतोस ?" असो. अभिमान घालवायला, भगवंताला मनापासून शरण जाणे, हा उपाय साधुसंतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला, की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही. तसेच, एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून, ’रामा, मी तुझा झालो आणि तू माझा झालास,’ असे अनन्येतेने म्हटल्यावर, त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरूरी नाही. म्हणून, होईल ते कर्म त्याचेच मानावे. कोणतेही कर्म अर्पण केले असताना ’अर्पण करणारा’ उरतोच; तर तसे न व्हावे.


२५६. सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन्नामाने आणि सत्संगतीने तो मरतो.