प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

५ ऑगस्ट

'देहच मी' हा भ्रम.


    Download mp3

आपण कोण, आपले कर्तव्य काय, हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे. ज्याला मी 'माझे' म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हटल्यावर 'मी' त्याहून निराळाच नव्हे का ? देहाला ताप आला तर 'मला' ताप आला, देह वाळला तर 'मी' वाळलो, असे म्हणतो तीच चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली. म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो. दुःख नको, सुख हवे, असे मला वाटते, याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्यसुख-रूपच असले पाहिजे.

नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी, दोन्ही एकच; पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल, तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते. तसे, सुख-रूप असणार्‍या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती. एका गॄहस्थाची बायको बाळंत झाली, तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही, त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे.

एखादे झाड काढायचे असेल, आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली, तर त्याची पालवी वरवर खुडून काम होत नाही, त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे. तद्वतच संसाररूपी वॄक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे, तो अभिमान नष्ट केला पाहिजे. 'मी कर्म केले' हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा कर्ता ईश्वर असताना जीव विनाकारणच 'मी' कर्ता असे मानतो. कर्तुत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा 'मी कर्ता नसून राम कर्ता' ही भावना वाढवणे, हीच खरी उपासना होय. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते; किंबहुना, हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते.

खरोखर, तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की, सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा, आणि नीतिला धरून राहा; त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतिला, शुद्ध आचरणाला, फार महत्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो, त्याला साहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागू या. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा.


२१८. नामस्मरण 'समजून' करावे; समजून म्हणजे 'राम कर्ता' या भावनेत राहून.