प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२५ जून

सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे.


    Download mp3

राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत, त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे. परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना, केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार; तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्‍न करावा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचले आणि कृती केली नाही, तर काय उपयोग ? चार मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल ? एक मैल रस्ता चालावा, म्हणजे पुढचे दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल. परमार्थाचेही असेच आहे. बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल ? त्याचप्रमाणे, आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल ? सद्‍गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावे, म्हणजे सर्व काही होते. जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का ?

खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे; प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे. पण याच्या उलट, आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे. कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे. शेताला कुंपणाची जरूरी आहे; नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढले, तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे.

ज्याने व्यवहार तपासून केला, त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोड लागते, तसे प्रपंचातसुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे; आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले, तर मात्र केल्याशिवाय राहू नये.

पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड, त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे; परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे, हे देखील तितकेच खरे. आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा; आणि दुसर्‍याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ, आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला.


१७७. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ.