प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१५ नोव्हेंबर

काळजीचे मूळ कर्तेपणात आहे


    Download mp3

आनंद पहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का ? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन ' मी दुःखी आहे ' असे मानून घेतले आहे. एक जण आपले तोंड आरशात पहायला गेला, पण त्याला ते दिसले नाही. त्यावर दुसरा एकजण म्हणाला, ' मी दाखवितो.' असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून, त्याने आत पहायला सांगितले, तेव्हां तोंड स्वच्छ दिसले. त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात. ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मस्वरूप आहेस; म्हणजे तू स्वतःसिद्ध आणि आनंदरूप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो. आणि त्यामुळे त्यातले सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ति असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो; पण तिथे आपल्यावर कर्तेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करीत बसतो. वास्तविक आपल्या हाती काय आहे ? परमात्म्याला काय करायचे ते तो करीत असतो, आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे. आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही, आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो.

काळजी ही मोठी विलक्षण असते. एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी ही काळजी होती. पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर, त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली. काही दिवसांनी लग्न झाले; मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झाले; त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली. पण त्या म्हातार्‍यालाच फिट्स येऊ लागल्या. आणि अखेर काळजी करीत करीतच तो मरून गेला. काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरेच काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे, आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात; भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात ! हा तर त्याच्याहिपेक्षा मोठा गुन्हा आहे. 'काळजी लागणे स्वाभाविक आहे ही कल्पनाच आधी मनातून काढून टाकली पाहिजे. आपली काळजी का सुटत नाही ? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. काळजीने आपल्याला धरण्याऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो, तर मग ती सुटणार कशी ? ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही.


३२०. संकट आले तर काळजी करू नये. भगवंत करतो ते आपल्या हिताचे करतो ही दृष्टी ठेवावी.