॥ श्रीसद्गुरुलीलामृत ॥ अध्याय  दहावा समास पहिला
 
 
बहू अज्ञ जीवांप्रती उद्धरीलें । तसें नास्तिकां सत्पथा लावियेलें ॥  
समस्तां मुखें नाम हें बोलवीती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १० ॥   
श्रीसद्गुरु चिन्मयदाता । दोन्ही कर जोडोनी आतां ।   
चरणकमलीं ठेवितो माथा । त्रिविधतापें गांजलों ॥ १ ॥   
अज्ञान उद्वेग पीडी भारी । शांति झाली पाठमोरी ।   
म्हणोन हिंडें दारोदारी । श्रमलो देवा अतिशय ॥ २ ॥   
अज्ञानदुःख असे विशद । माजी अनंत पोटभेद ।   
करितां तयाचा अनुवाद । लाजिरवाणें मज वाटे ॥ ३ ॥   
परि गेलिया वैद्याकडे । न ठेवावें मागेंपुढे ।   
तरीच शीघ्र गुण जोडे । भिडेनें व्याधी शमेना ॥ ४ ॥   
भीड सांडोन तुमचे द्वारीं । आलों दीन भिकारी ।   
परिसा जी आपत्ती सारी । दीनानाथ गुरुमूर्ते ॥ ५ ॥   
देहबुद्धि दृढ जाळें । प्रपंच आमिषाचे गोळे ।   
टाकोनि धीवरें दुर्धर काळें । ओढूं आरंभिलें ॥ ६ ॥   
वासना तस्कर महाथोर । द्वैतसहाय्यीं करी बेजार ।   
विवेकीं वृत्ति क्षणभर । नसतां लाग साधिती ॥ ७ ॥   
आशेनें कल्पनातरंग । अनंत उठती, वृत्तिभंग ।   
होतां दुरावे श्रीरंग । आर्त तेंही पुरेना ॥ ८ ॥   
अहंकार पदोपदीं । आडवोन पाडी उपाधी ।   
न कळत कार्य साधी । गुपित पाश टाकितसे ॥ ९ ॥   
ऐशिया पाशसमुदायीं । जीव अत्यंत कष्टी होई ।   
क्षणभरी उसंत नाहीं । जगदृष्टीपुढें ॥ १० ॥   
कनक मिळतां मिळेना । मिळतां ओढ शमेना ।   
ध्यानीं मनीं तेंचि जाणा । चित्तभंग करितसे ॥ ११ ॥   
दारा पुत्र मायपाश । मोहें करिती आपुला दास ।   
जगत्पिता जगन्निवास । पारखा झाला ॥ १२ ॥   
मोठेपणा सकामकर्म । नीतिव्यवहार कुलधर्म ।   
देहव्याधी कष्टी परम । करिती किती आवरावे ॥ १३ ॥   
कामक्रोधाचे तडाखे । अधर्माचीं पेरिती विखें ।   
ऐसे अज्ञानाचे वाखे । दुःख देती अनिवार ॥ १४ ॥   
जीव झाला परम कष्टी । समाधानाची पडली तुटी ।   
कोण निवारील संकटीं । शोधूं लागलों ॥ १५ ॥   
वेदशास्त्रीं वर्णिकी कीर्ति । आत्मारामीं अखंड शांति ।   
परि त्या रामाची वसति । मनबुद्धिसी अगोचर ॥ १६ ॥   
जें कल्पनेसी गवसेना । कैसें जावें तया स्थाना ।   
काय भाकावी करुणा । तयापुढें ॥ १७ ॥   
जो मागे तया न देई । निरिच्छाची पाठ घेई ।   
दातेपणाची नवलाई । ऐसी असे ॥ १८ ॥   
सगुण निर्गुण द्वैतभाव । संदेही गुंतला जीव ।   
तरी कवणापाशीं कींव । भाकावी हें उमगेना ॥ १९ ॥   
मागण्याची सोय नाही । आशा तरी धरणें घेई ।   
परमार्थी हांसती पाहीं । वेडा अज्ञानी म्हणोनि ॥ २० ॥   
भूक कांहीं शमेना । अन्न तेंही मिळेना ।   
मागतां बोलती दैन्यवाणा । काय म्हणोनि होतोसी ॥ २१ ॥   
असो ऐशी जाहली स्थिती । दोन्हीकडे ही फजिती ।   
तंव मार्ग दाविला संतीं । सद्गुरुपदाचा ॥ २२ ॥   
म्हणोनि आलों धांवत । दाता एक सद्गुरुनाथ ।   
दातृत्व असे कल्पनातीत । बहुतीं खुणा सांगितल्या ॥ २३ ॥   
हें शांतीचें निजघर । वेदांताचें माहेर ।   
वासनाक्षय सपरिवार । गुरुपदीं मुळींहून ॥ २४ ॥   
सुख येई वसतीसी । ठाव नसे द्वैतासी ।   
याचकांच्या आर्तिराशी । विरोन जाती ॥ २५ ॥   
प्रपंच परमार्थ दोन्हीकडे । छत्र चालिलें रोकडें ।   
सदा हें महाद्वार उघडें । धन्य देणगी गुरुकृपा ॥ २६ ॥   
चरणीं घातलें । दंडवत । आतां चिंता नको व्यर्थ ।   
पदरीं घेतील समर्थ । बाळचिंता मायेसी ॥ २७ ॥   
ऐसी ही गुरुमाउली । बहुतांलागीं पान्हावली ।   
अष्टमाध्यायीं कथिली । आणिक पुढती अवधारा ॥ २८ ॥   
त्रिविध प्रकृति बोलती । तैसे मानव अनंतजाती ।   
अज्ञ नास्तिक वेदांती । हठनिग्रही कितियेक ॥ २९ ॥   
कोणी व्याधिग्रस्त झाले । कोणा भूतें पछाडिलें ।   
कोणी उन्मादें भरले । निंदा करिती गुरूची ॥ ३० ॥   
नररूपें श्रीमारुती । अवतरली गुरुमूर्ति ।   
त्याहीवरी सिद्धस्थिति । उच्चसाधनें मिळविली ॥ ३१ ॥   
ऐशियांची होतां भेटी । तापत्रयांच्या सुटती गांठी ।   
समाधान पाठीपोटीं । रामभक्ति वाढविती ॥ ३२ ॥   
नित्य घडती चमत्कार । लिहितां ग्रंथ होय विस्तार ।   
विवरण करूं थोडेंफार । कथानुसंधानें ॥ ३३ ॥   
इंदुरीं असतां गुरुमाय । अनंत धरिती चरणसोय ।   
चुकविती बहुत अपाय । गुरुसेवा करूनी ॥ ३४ ॥   
साधु ऐसी पसरली कीर्ति । कोणी एक अधिकारी मंदमति ।   
अधिकारमदें उन्मत्तवृत्ति । आला श्रींसन्निध ॥ ३५ ॥   
उपहासित भाविकांसी । ढोंगी वदत समर्थांसी ।   
सद्गुरु हांसती तयासी । अहंकारी म्हणोनी ॥ ३६ ॥   
तेव्हां तया क्रोध आला । अद्वातद्वा बडबडला ।   
परम शांति देखोन झाला । मानसीं चकित ॥ ३७ ॥   
मग वदे समर्थांसी । ’तुम्ही साधु म्हणविता आपणासी ।   
जरी भविष्य संगाल मजसी । तरीच हें सत्य मानूं’ ॥ ३८ ॥   
महाराज वदती तयालागून । ’आम्ही गोसावी अज्ञान ।   
रामावांचोन आन । भविष्य न ये आम्हांसी ॥ ३९ ॥   
परि तुमची पुरवील आर्त । गोदू ही भगवद्भ्क्त ।   
परिसा स्थिर करोनि चित्त । अहंकार सांडोनी’ ॥ ४० ॥   
 
दहा वर्षांची बालिका । गुरुकृपें वदली देखा ।   
जन समस्त पाहती कौतुका । गुरुमाहात्म्य अगाध ॥ ४१ ॥   
’आजपासोन आठवे दिनीं । तुझीं बालकें मरतील दोन्ही ।   
आणि पंधरा दिवसांनीं । कांता तुझे मरेल ॥ ४२ ॥   
जयाकारणें उन्मत्त झालासी । तो अधिकारही जाईल विलयासी ।   
तदुपरि श्रीचरणासी । धरशील पश्चात्तापें’ ॥ ४३ ॥   
सहज लीलें वदली गोष्ट । राम मनीं खोंचला धीट ।   
वरिवरि हास्य करोनि विकट । निघोन गेला ॥ ४४ ॥   
तंव आठां दिवसांनी । ओहळीं वाहोन दोन्ही ।   
बालकें गेलीं मरोनी । स्त्री बुडाली विहिरींत ॥ ४५ ॥   
लांचेचा आळ आला । अधिकार्यां चा रोष झाला ।   
मग पश्चात्तपें पोळला । श्रीचरणीं मिठी घाली ॥ ४६ ॥   
तारीं तारीं गुरुराया । अहंकारें वाहवलो वायां ।   
आतां मुख हें दडवाया । ठाव देईं तव पदीं ॥ ४७ ॥   
तूं दीनांची माउली । तूंचि शांतेची साउली ।   
उपेक्षा न करीं वहिली । तरणोपाव सांगावा’ ॥ ४८ ॥   
श्रीगुरु वदती तयासी । ’प्रारब्धभोग जीवासी ।   
न चुके जाण निश्चयेंसी । दोष नाही तुम्हांकडे ॥ ४९ ॥   
होणर तें होवोनि गेलें । आतां स्मरा रामपाउलें ।   
सांकडें निवारील सगळे । नोकरी स्थिर होईल’ ॥ ५० ॥   
गुरुवचनीं धरिला विश्वास । नाम घेई रात्रंदिवस ।   
आळ जाऊन निःशेष । योग्यता वाढली ॥ ५१ ॥   
महाराजांची जाहली ख्याती । ही प्रत्यक्ष देवमूर्ती ।   
अघटित करणी करिती । रामभक्त आगळे ॥ ५२ ॥   
तेथेंचि आणिक एक प्रकार । घडला तो करूं विस्तार ।   
चित्त करूनिया स्थिर । श्रवण करावें ॥ ५३ ॥   
गुरुकथा बहु गोड । सेवितां दवडी विषयाची चाड ।   
पूर्वसंचित असतां जाड । श्रवणीं पडे ॥ ५४ ॥   
गुरुकथा वर्णायासी । बुद्धि नसे आम्हांसी ।   
वंदूनि तयांचे चरणांसी । बोलविती तें बोलतसें ॥ ५५ ॥   
गुरुभक्त झाले फार । नित्य करिती नामगजर ।   
हातीं स्मरणी घेऊनि सार । जप करिती नामाचा ॥ ५६ ॥   
त्यांत विप्र होते बहुत । रामनाम जपती नित्य ।   
कर्माभिमानी कांहीं पंडित । तयांसी हें नावडे ॥ ५७ ॥   
’आम्ही वेदाधिकारी ब्राह्मण । सदा करावें वेदाधयन ।   
शूद्रें करावें नामस्मरण । उचित नसे आपणांसी ॥ ५८ ॥   
आम्ही त्रिवर्णांसी पूज्य । आम्ही ज्ञानी उपजत सहज ।   
भूलोकीं देव द्विज । वदती तें पहावें’ ॥ ५९ ॥   
शिष्य वदती तयांलागून । ’ज्ञानी तुम्ही अतिगहन ।   
ज्ञानचिन्हें करा कथन । शब्दज्ञान सांडोनी ॥ ६० ॥   
कामक्रोध अहंकार । हें तो तुमचे माहेरघर ।   
वैराग्य नसे तिळभर । अन्नार्थें वेदविक्रय करितां ॥ ६१ ॥   
वंचकवृत्ती धरोनी । वदतां आम्ही बहु ज्ञानी ।   
ऐसीच वदली वेद वाणी । सांगा कीं आम्हांसी ॥ ६२ ॥   
वेदपुरुष नारायण । तो जयासी प्रसन्न ।   
तो पूज्य सकलांलागुन । हें सांगणें नलगे ॥ ६३ ॥   
वेद वंद्य आम्हांसी । परि पात्रता पाहिजे पठणासी ।   
आहारविहार नियमांसी । अतिशुद्धता ॥ ६४ ॥   
तरीच मंत्र सामर्थ्य चाले । ज्ञान होईल शुद्ध भलें ।   
परि सांप्रत युग आलें । कैसें पहा ॥ ६५ ॥   
शक्य तितुकें करावें । सुलभ नाम जपत जावें’ ।   
ऐसें कथिलें गुरुदेवें । ’नाम प्रिय देवासी ॥ ६६ ॥   
नामें घडे भगवद्भदक्ति । नामें होय ज्ञानप्राप्ती ।   
नामें जोडे सायुज्यमुक्ति । संतसज्जन सांगती ॥ ६७ ॥   
वेदारंभीं हरिनाम । कलींत साधन हेंचि परम ।   
सुगम असोन दुर्गम । भगवत्पदीं नेतसे’ ॥ ६८ ॥   
परि तें नायकतीच कोणी । उपहासिती तयांलागोनी ।   
शास्त्री होते तोफखानीं । ते करिती बहु निंदा ॥ ६९ ॥   
एकदां राममंदिरांत । महाराज आले दर्शनार्थ ।   
शास्त्रियांस कळली मात । धांवोन आले ते ठायीं ॥ ७० ॥   
’तुम्ही भ्रष्टविले ब्राह्मण । उपदेशितां नामस्मरण’ ।   
अहंकारें भरीं भरोन । ऐसीं दुरुत्तरें बोलती ॥ ७१ ॥   
समर्थ वदती ’नामप्रताप । कळेल तुम्हां आपेंआप ।   
उगाच न करावा संताप । मज अज्ञानियावरी’ ॥ ७२ ॥   
’ऐसे पाहिले बहुत’ । म्हणोनि गेले गृहांत ।   
तंव गुरुमहिमेची मात । श्रोतेजनीं परिसावी ॥ ७३ ॥   
एक प्रहर राहतां निशीं । वेड लागलें शास्त्रीयांसी ।   
घेवोन जळके काष्ठासी । गृहांतूनि निघाले ॥ ७४ ॥   
काष्ठाची करुनी टिपरी । मुखीं नाम उच्चारी ।   
हिंडतसे गांवभरी । शुद्धि नाहीं ॥ ७५ ॥   
धरोनि खालीं बैसवितां । हात तोंड नये आवरितां ।   
यासी काय करावें आतां । भूतें कीं झडपिलें ॥ ७६ ॥   
परि हे वदती राम राम । हा साधुनिंदेचा दोष परम ।   
शोधीत आले आराम । ब्रह्मचैतन्य महाराज ॥ ७७ ॥   
चरणी आणोन घातले । करुणा भाकों लागले ।   
कृपासागर श्री द्रवले । मस्तकीं हस्त ठेविला ॥ ७८ ॥   
सहज लागली समाधि । हारपल्या आधिव्याधि ।   
मग येवोनि शुद्धि । वंदन करी क्षणक्षणा ॥ ७९ ॥   
अनुग्रह दीक्षा दिली । निंदकावर कृपा केली ।   
नामसत्ता दाविली । समस्तांसी ॥ ८० ॥  
॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥   
श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥ 
 
  
अध्याय दहावा  समास दुसरा
 
  
जयजय श्रीरघुराया । अज्ञानें जिणें होय वाया ।   
शरणागता दर्शन द्याया । विलंब कासया लाविला ॥ १ ॥   
गोंदवल्यास असतां गुरुवर । भाऊसाहेब जवळगेकर ।   
करोडगिरीचे नाक्यावर । होते श्रीमान् परि रोगग्रस्त ॥ २ ॥   
पोटीं पुत्रसंतान नाहीं । म्हणोनि चिंता करिती पाही ।   
भार्या सती गंगाबाई । समर्थचरणीं विश्वास ॥ ३ ॥   
उभयतां आले गोंदवल्यासी । सद्भावें पूजोनि गुरूंसी ।   
कथन करिती मनोव्यथेसी । उपाय पुसती ते काळी ॥ ४ ॥   
’देहव्याधीने गांजलो । संतान नाहीं म्हणोन भ्रमलों ।   
संपत्ति असोन मुकलों । संसारसुखासी ॥ ५ ॥   
रात्रंदिन वाहे चिंता । तव पदीं ठेविला माथा ।   
आतां तारिता आणि मारिता । तूंचि एक दीनबंधु’ ॥ ६ ॥   
ऐसी करिती विनंती । सद्गुरु शुद्ध भाव पाहती ।   
’कृपा करील रघुपती । चिंता कांही न करावी ॥ ७ ॥   
येथेंचि रहावें उभयतांनीं । रामप्रसाद सेवोनी ।   
सर्वकाळ वागवा स्मरणी । श्रीरामनामाची ॥ ८ ॥   
तोचि निवारील सर्व व्यथा । पुत्र होईल, नको चिंता ।   
रामचरणीं विश्वासतां । उणें नाहीं भक्तासी’ ॥ ९ ॥   
उभयतां मनीं संतोषले । गुरुवचनी विश्वासले ।   
सेवा करित राहिले । महाराजांची सद्भावें ॥ १० ॥   
प्रातःकालीं उठोन । मंदिरीं सडासंमार्जन ।   
कांकड आरती करोन । पूजा करिती आनंदे ॥ ११ ॥   
पंचारती ओवाळिती । चरणतीर्थ आदरें घेती ।   
सदा मुखें नाम वदती । प्रसाद ही महौषधि ॥ १२ ॥   
जो सदा राहे पथ्यावरी । तो मंदिरीं खाता बाजरी ।   
रोग गेला देशांतरीं । गुरुकृपा अगाध ॥ १३ ॥   
पांडुरता मावाळली । शरीरकांती सतेज झाली ।   
कांता गरोदर राहिली । सेवाकरितां भक्तीनें ॥ १४ ॥   
यथाकालें पुत्र झाला । परि उलटे पायाचा जन्मला ।   
सद्गुरु वदती तयाला । ’दुरित शेष अद्यापि ॥ १५ ॥   
आणखी करा नामजप’ । नेमून दिले नित्य माप ।   
’पाय सरळ होतील सरतां पाप । रामप्रसादेंकरोनि’ ॥ १६ ॥   
करितां करितां रामसेवा । मुलगा सरळ झाला तेव्हां ।   
मग आनंद काय सांगावा । स्तुति करिती परोपरी ॥ १७ ॥   
’तूं देवांचाहि देव । आम्हां भेटलासी गुरुराव ।   
निरसिले रोग चिंता सर्व । कृपें सद्गुरु तुमचेनि ॥ १८ ॥   
नाही ज्ञान नाही भक्ति । नाहीं साधनसंपत्ति ।   
अज्ञानियां धरोनि हातीं । सुमार्गासी लाविलें ॥ १९ ॥   
निरोप देती उभयतांसी । ’विसरूं नका श्रीरामासी ।   
इहलोकीं नांदाल सुखेंसी । अंतीं सद्गति पावाल’ ॥ २० ॥   
गुरुआज्ञा घेवोन गेले । ऐसें बहुतांस तारिलें ।   
पुढें श्रीगुरु जगदुद्धारा निघाले । यात्रामिष करोनि ॥ २१ ॥   
आम्ही यात्रेसी जाणार । ऐसें वदतां गुरुवर ।   
शिष्य समुदाय निघाला फार । पुरुष स्त्रिया बालकें ॥ २२ ॥   
समर्थगृही दास कुबेर । तेथें उणें काय पडणार ।   
समुदाय निघाला अपार । रामनाम गर्जत ॥ २३ ॥   
शके अठराशें सत्ताविशीं । सद्गुरु आले प्रयागासी ।   
वर्षाऋतु श्रावणमासीं । समुदायासमवेत ॥ २४ ॥   
तीर्थकृत्यें सकल करोन । करावया वेणीदान ।   
नौकेमाजी आरोहण । करिते झाले ते समयीं ॥ २५ ॥   
मध्यभागीं नौका गेली । तों जलें तुडुंब भरली ।   
आणि भोंवर्यांलत सांपडली । अकस्मात् जीर्णनौका ॥ २६ ॥   
मग गलबलां कोण पुसतां । जीव प्रिय सर्वां भूतां ।   
हाहाःकर उडाला सर्वथा । उभय थडी लोक दाटले ॥ २७ ॥   
पाणी अपरंपार भरलें । मानवी उपाय न चाले ।   
पाहते बुडते घाबरले । काय दशा म्हणती हे ॥ २८ ॥   
श्रीगुरूंची अखंड शांति । सकल लोकां शांतविती ।   
म्हणती तारील रघुपति । भजन करा स्वस्थचित्तें’ ॥ २९ ॥   
पवित्र्यावरी उभे ठेले । आणि भजन आरंभिलें ।   
सकलही करूं लागले । उसनें अवसान धरोनि ॥ ३० ॥   
सुखासनीं गप्पा मारितां । बहुत दाविती समर्थता ।   
प्रसंगें कसोटी लागतां । टिके ऐसा विरळा संत ॥ ३१ ॥  
भजनाचा करितां गजर । तत्क्षणीं नौका झाली स्थिर ।   
लोक पाहती चमत्कार । धन्य साधु म्हणती हे । ३२ ॥   
श्रीगुरु वदती नाविकांसी । दुजी नौका आणा वेगेंसी ।   
चिंता न करावी मानसीं । समर्थ आमुचा पाठिराखा ॥ ३३ ॥   
दुजी नाव येईपर्यंत । ही नाव भोवरी असोन स्थित ।   
लोक पहात तटस्थ । उभय थडी ॥ ३४ ॥   
दुजी नांव येतां तेथ । एक पद ठेविती त्यांत ।   
चला म्हणती समस्त । हळूं हळूं एक एक ॥ ३५ ॥   
समस्त माणसें आलीं । ऐसें त्रिवार पुसोनि गुरुमाउली ।   
चरण उचलितांच गेली । फुटकी नौका वाहत ॥ ३६ ॥   
चरणीं लागतां अनंत तरलीं । मग नौका कशी बुडेल भली ।   
करणी करोनि दाविली । प्रत्यक्ष सद्गुरुरायें ॥ ३७ ॥   
सकळांसी आनंद झाला । नामगजर बहु केला ।   
गौरकायी थवा लोटला । किल्ल्यावरूनि दर्शना ॥ ३८ ॥   
कडेस येतां गुरुमूर्ति । नारीनर आरत्या करिती ।   
कोणी पुष्पमाळा घालिती । किणी करिती दंडवत ॥ ३९ ॥   
निंदकां मनीं पस्ताव झाला । गौरकायी म्हणती साधु भला ।   
देवसुत पुन्हां अवतरला । म्हणोन टाळी देताती ॥ ४० ॥   
तंव इकडे काय झालें । ग्रामाधिकारी क्षोभले ।   
उपाध्यायासी धरोन नेलें । किल्ल्यावरी तयांनीं ॥ ४१ ॥   
’जरी नौका फुटकी होती । तरी त्वां हांकारिली कशा रीतीं ।   
गुन्हा घडला तुझे हातीं । आतां शिक्षा भोगावी ॥४२ ॥  
 
त्या उपाध्यायाचा सुत । महाराजांसी प्रार्थित ।   
’धरोन नेमा मम तात । निरसावे संकट हें ॥ ४३ ॥   
अजाणपणें घडला व्यापार । हें जाणती गुरुवर ।   
कृपा करोनि दीनावर । तारी आम्हां गुरुराया’ ॥ ४४ ॥   
अभय देऊनि तयासी । सोडवलें उपाध्यायासी ।   
मिरवणूक काढिली खाशी । कुरवंड्या करोनि सुवासिनी ॥ ४५ ॥   
दानधर्म केला बहुत । गोप्रदानें सालंकृत ।   
शिष्य झाले अपरिमित । उत्तरदेशीं ॥ ४६ ॥   
पूर्वीं एकदां काशीस गेले । ते समयीं अभिनव घडलें ।   
महामारीनें त्रासले । जन सर्व ॥ ४७ ॥   
किती पडती कितीक मरती । कोणा न मिळे मूठमाती ।   
महाराज चालिल्या मार्गावरती । एक भिकारीण मृत दिसे ॥ ४८ ॥   
तियेचें तान्हे मूल । रडोनि करी गोंधळ ।   
स्तनपाना उतावेळ । परि दूध न येई ॥ ४९ ॥   
पाहोन त्या बालकाची स्थिति । दयार्द्र झाली गुरुमूर्ति ।   
म्हणती ’काय झाले माउलिप्रति । हांका मारोनि पाहावें’ ॥ ५० ॥   
शिष्य सांगती ते काळीं । ’हीं तों असे मृत झाली’ ।   
सद्गुरु वदती ’झीट आली । रामतीर्थ आणावें’ ॥ ५१ ॥   
तीर्थ शिंपडोन अंगावरी । बोलले ’माउली सावध हो सत्वरीं ।   
बालका घेवोन अंकावरी । स्तनपान दे वेगें ॥ ५२ ॥   
ऐसें वदतां गुरुमाउली । निर्जीव तनु सजीव झाली ।   
लोक पाहतां पदर सांवरी । बालका घेत कडेवरी ॥ ५३ ॥   
विस्मय वाटे सकळांसी । धन्य साधु तेजोराशी ।   
मानवी कृति नव्हे ऐसी । म्हणोनि चरणीं लोळती ॥ ५४ ॥   
घटीं मठीं चैतन्य भरलें । हें तों बाणोनिया गेलें ।   
चैतन्यदृष्टी पाहतां आलें । अचेतनासी चतन ॥ ५५ ॥   
असो उपाधि होईल बहुत । म्हणोन निघाले त्वतिर ।   
उद्धरिती अनंत भक्त । रामनाम बोधोनि ॥ ५६ ॥   
साठये उपनामें न्यायाधीश । अधिकारी सात्त्विक विशेष ।   
श्रीमान् परि भोगिती त्रास । पोटशूलव्यथेचा ॥ ५७ ॥   
चैन नसे दिननिशीं । सदा पाळिती पथ्यासी ।   
औषधी देशी विदेशी । घेतां गुण न वाटे ॥ ५८ ॥   
उपाय करोनि थकले । व्यथा अणुभरी न ढळे ।   
तंव भाग्योदयें भेटले । ब्रह्मचैतन्य सद्गुरु ॥ ५९ ॥   
श्रींच्या आशीर्वचनीं । व्याधि हरली मुळींहूनि ।   
जैसा उदय होतां दिनमणि । अंधकार लया जाय ॥ ६० ॥   
येणेंपरी गोंदवल्यासी । असतां करणी केली कैसी ।   
चिंतामणभट्ट द्विजासी । उदरव्यथा अतिशय ॥ ६१ ॥   
कर्नाटकीं वसति ज्याची । उदरव्यथा बहु जाची ।   
वाटे आहुति प्राणांची । घेईल आतां निश्चयें ॥ ६२ ॥   
क्वचित्काळी स्वल्प अन्न । क्वचित्काळी पयःपान ।   
दुःख भोगी रात्रंदिन । म्हणे प्राण जातां बरें ॥ ६३ ॥   
उपाय करितां करितां थकले । दिवसेंदिवस व्याधि प्रबळे ।   
तंव अकस्मात् श्रवणीं पडलें । ब्रह्मचैतन्यचरित्र ॥ ६४ ॥   
महासाधु गोंदवलेकर । केवळ ईश्वरी अवतार ।   
करावया जगदुद्धार । मर्त्यलोकीं अवरतले ॥ ६५ ॥   
व्याधिग्रस्त बहुत येती । गुरुप्रसादें मुक्त होती ।   
तुम्हीं जावें शीघ्रगति । व्याधि हरण करतील ॥ ६६ ॥   
परिसोनिया ऐसी वाणी । वाटे अमृत पडलें श्रवनीं ।   
सत्वर निघाला तेथोनी । गुरुभुवना पावला ॥ ६७ ॥   
कोणी समाराधना होती केली । भोजनपात्रें सिद्ध झालीं ।   
तंव भट्टजींची स्वारी आली । दर्शन घ्यावया श्रीगुरूंचें ॥ ६८ ॥   
समर्थ वदती विप्रांसी । ’बैसा सत्वर भोजनासी’ ।   
विप्र वदे विनयेसी । ’अन्न वैरी आमुचें ॥ ६९ ॥   
अन्नाविणें प्राण जाती । अन्न खातां तीच गति ।   
आठां दिवसांउपरांतीं । स्वल्प आहार सेवितों ॥ ७० ॥   
ते दिनीं अहोरात्र । शूल उदरीं सर्वत्र ।   
ओखटें माझें प्रारब्धसूत्र । दयासिंधो गुरुराया’ ॥ ७१ ॥   
श्रीगुरु वदती ते समयीं । ’रामप्रसादा दोष नाही ।   
भिती सांडोन लवलाहीं । सेवन करा मिष्टान्नें’ ॥ ७२ ॥   
भीत भीत पात्रावरी । बैसला द्विज ते अवसरीं ।   
म्हणे साधुसन्निध मरतां बरी । गति तरी मिळेल’ ॥ ७३ ॥   
बहुतां दिसांचा भुकेला । अत्याग्रहें तृप्त केला ।   
तधींपासोन शूल गेला । धन्य कृपा श्रीगुरूंची ॥ ७४ ॥   
मोरगिरीचे भक्तजन । श्रीसन्निध येवोन ।   
विनविती प्रेमेंकरोन । रामस्थापनें चलावें ॥ ७५ ॥   
बहुत दिवस विनवितां । कृपा उपजली गुरुनाथा ।   
जावोन स्थापिलें रघुनाथा । आनंदोत्सव बहु झाला ॥ ७६ ॥   
भक्त नेती घरोघरीं । गुरुपूजा परोपरी ।   
करोनि मस्तक चरणावरी । अघनाशना ठेविती ॥ ७७ ॥   
गुरुंची कीर्ति परिसोनी । समंधग्रस्त शिंपीण जनी ।   
येतां मुक्त करिती झणीं । सद्गुरु दयाळ ॥ ७८ ॥   
ऐसा अनंत व्याधींस । गुरुकृपामृतरस ।   
मिळतां होय विनाश । भाग्यवंता लाभतसे ॥ ७९ ॥   
साधकांसी बोधामृत । वेळोवेळां सद्गुरु देत ।   
त्यांचीं नामें श्रोते संत । परिसावीं एकचित्तें ॥ ८० ॥   
अमृतघुटका मुख्य जाण । परमार्थ न होण्याचें कारण ।   
निस्पृहसमास शिकवण । अभंगवचनें अनेक ॥ ८१ ॥   
आचारविचार स्त्रीधर्म । साधकां बाधक कलिधर्म ।   
याचेंहि कथिती वर्म । करुणासागर गुरुमूर्ति ॥ ८२ ॥   
मुख्य सार स्वधर्माचरण । जतन करोनि नामस्मरण ।   
करावें अघनाशन । स्वस्वरूपा पावावया ॥ ८३ ॥  
॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥   
श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥ 
 
  
अध्याय दहावा  समास तिसरा
 
  
मागें तुकाई अनुग्रह पावोनि । इंदुरीं आली गुरुजननी ।   
तेव्हां तपस्तेज पाहोनि । तेथें अनेक भक्त जाहले ॥ १ ॥   
जिजाबाई नामें भक्त । कैसी झाली पदांकित ।   
त्याचा इतिहास तुम्ही संत । श्रोतेजनीं परिसावा ॥ २ ॥   
जिजाबाईचा पति । लागला गुरुभजनाप्रति ।   
जिजा म्हणे भोंदू असती । कलियुगीं बहुतेक ॥ ३ ॥   
पाहोनि याची परिक्षा । उतरूं साधुत्वाचा नक्षा ।   
मनीं धरूनि ऐसी आकांक्षा । वरिवरी सेवा करी ॥ ४ ॥   
एकदां भोजनां बैसविलें । पति नाहींसें पाहिलें ।   
सत्त्व पाहूं ये वेळे । साधुत्व कसा लावोनि ॥ ५ ॥   
ऐसा मनीं विकल्प केला । मिरच्या कुटून लाडू वळला ।   
पात्रीं आणोन घातला । दुरून पाहे कौतुक ॥ ६ ॥   
स्वस्थपणें भक्षण केला । म्हणती आणिक लाडू घाला’ ।   
पुनरपिही भक्षिला । हा हा हू हू होईना ॥ ७ ॥   
मनीं म्हणे हा धूर्त । रानींवनीं असे भ्रमत ।   
उपास घडतां असेल खात । भगवती क्वचित्काळी’ ॥ ८ ॥   
निखारे काढिले रखरखीत । पात्री आणोनि घालत ।   
सद्गुरु सहजानंदांत । तेहि खाऊं लागले ॥ ९ ॥   
पाहोन झाली घाबरी । धांवोनिया चरण धरी ।   
’अज्ञानी मी तारी तारीं । कृपाळुवा गुरुराया ॥ १० ॥   
स्त्रीबुद्धि अविचार । घडला जी दयासागर ।   
पतीसी कळतां समाचार । गति बरवी मज नाहीं ॥ ११ ॥   
ढोंगी बहु जगांत । मिरविती म्हणोनि संत ।   
याकारणें अनुचित । कर्म घडलें स्वामिया ॥ १२ ॥   
साधूसी घालोनि निखारे । केलें सुकृताचें मातेरें ।   
यमदूत छळतील सारे । दुष्ट पातकी म्हणोनी ॥ १३ ॥   
इहपर दुःखाच्या राशी । दिसों लागल्या अविनाशी ।   
आतां मज गति कैसी । सांग सांग सर्वज्ञा ॥ १४ ॥   
अज्ञानी मी चांडाळीण । उपजतांच जातें मरोन ।   
तरी साधुद्वेषदोष गहन । टळला असता आजिंचा ॥ १५ ॥   
आतां जी दयासागरा । दोषार्णवीं मज तारा ।   
तुम्हांवांचोनि आसरा । दुजा नसे त्रिभुवनीं’ ॥ १६ ॥   
स्फुंदफुंदोनिया रडे । दंडप्राय चरणीं पडे ।   
दयासागर म्हणती ’वेडे । वृथा शोक न करावा ॥ १७ ॥   
अनुताप उपजला पोटीं । तेव्हां दोष गेले पाठीं ।   
अभय देतो मी शेवटीं । सत्वर शोक आवरीं’ ॥ १८ ॥   
हस्तें धरोनि उठविली । मृदुवचनें शांत केली ।   
तधींपासोन लीन झाली । एकनिष्ठ सेवा करी ॥ १९ ॥   
जिजाबाईचा पती । तैसी जिजा माउली सती ।   
कन्या ताई सुमती । सेवा करिती श्रीगुरूंची ॥ २० ॥   
कांही काळ त्यांचेजवळ । वास्तव्य करिती गुरुदयाळ ।   
सेवोनि बोधामृतकवळ । ज्ञान झालें तिघांसी ॥ २१ ॥   
एकदा कुंभारयोगी कोणी । साधनीं अडले म्हणोनि ।   
आशंका काढिती लिहोनी । प्रश्न पुसती बहुतांसी ॥ २२ ॥   
बहुत साधु शोधिले । परि समाधान नच झालें ।   
तवं कोणी वर्तमान कथिलें । ब्रह्मचैतन्य सद्गुरूंचें ॥ २३ ॥   
तेव्हां आला धांवत । जिजाईचे गृहाप्रत ।   
तंव मंचकीं देखिले समर्थ । चरण चुरित जिजा ताई ॥ २४ ॥   
दुरून पाहतां म्हणे कांही । येथें साधुत्वाचें लक्षण नाहीं ।   
स्त्रिया चरण चुरिती पाही । योगिया मुळीं विघातक ॥ २५ ॥   
ऐसें मनीं आणोनि । निघता झाला तेथोनि ।   
तंव श्रीसमर्थांनी । ताईकडोन बोलाविला ॥ २६ ॥   
’अहो श्रेष्ठ योगिराज । आलां होतां कवण काज ।   
प्रश्न काढा पाहूं’ सहज । हास्यमुखें बोलती ॥ २७ ॥   
मनींचा भाव जाणला । हें पाहोन योगी दचकला ।   
कागद काढोन पुढे केला । चरण वंदी तें समयीं ॥ २८ ॥   
ताईनें वाचला कागद । अठरा प्रश्नांचा अनुवाद ।   
म्हणे ’सद्गुरुप्रसाद । होतां प्रश्न सुटतील ॥ २९ ॥   
आज्ञा होईल मजला जर । उत्तरें देईन सत्वर’ ।   
विनोदें वदती गुरुवर । ’पोरबुद्धी कायसी ॥ ३० ॥   
योगी साधक असती भले । बहुत देश शोधित आले ।   
महान् महान् जेथें थकले । तेथें तूं काय वदशील ॥ ३१ ॥   
परि इच्छा असे तुजसी । तरी तूंच बोल वेगेंसी’ ।   
आज्ञा होतांच ताईसी । उत्तरें बोलूं लागली ॥ ३२ ॥   
एकामागोन एक प्रश्न । सोडवून करी समाधान ।   
योगी आनंदित होवोन । चरण धरित ताईचे ॥ ३३ ॥   
श्रींचे चरणी नमोनि । म्हणे ’धन्य साधुशोरिमणि ।   
मानवाची नव्हे करणी । सत्यस्वरूप दावावें ॥ ३४ ॥   
धनय तुमचा प्रसाद । लहान बालिका बोले विशद ।   
जो थोरथोरांसी अनुवाद । करितां समाधान होईना ॥ ३५ ॥   
साच नोहे मानवकरणी’ । म्हणोनि लागला चरणीं ।   
सत्यस्वरूप दावा झणीं । पायीं घट्ट मारी मिठी ॥ ३६ ॥   
हातीं धरून उठविला । हनुमंतस्वरूप तयाला ।   
दावोन योगी धन्य केला । समर्थ सद्गुरूंनी ॥ ३७ ॥   
योगी म्हणे माझे मनीं । विकल्प आला होता क्षणीं ।   
संगतीं स्त्रिया पाहोनि । क्षमा करणें स्वामिया ॥ ३८ ॥   
अग्निकाष्ठें भक्षण करी । संगतीं राहोन निर्विकारी ।   
ऐसा तूं ब्रह्मचारी । दर्शनें पुनीत जाहलों ॥ ३९ ॥   
 
ऐशी स्तुति करी बहुत । वरचेवरी चरण धरित ।   
अनुतापें जाहला तप्त । योगभ्रष्ट होता जो ॥ ४० ॥   
विकल्पें योगभ्रष्ट केला । तया बोधें शांतविला ।   
पुनरपि साधनें मुक्त झाला । धन्य धन्य गुरुकृपा ॥ ४१ ॥   
ते काळीं गुरुवर । एकांतप्रिय होते फार ।   
क्वचित् प्रसाद कोणावर । पूर्वभाग्यें होतसे ॥ ४२ ॥   
राजयोग जेव्हां धरिला । तेव्हां लोकीं प्रकट झाला ।   
प्रसाद बहुतां लाधला । त्यांतील कांही अवधारा ॥ ४३ ॥   
सांगली येथें सरकारी । डांक खात्याचे अधिकारी ।   
गृहस्थ होते सदाचारी । परि कट्टे शिवभक्त ॥ ४४ ॥   
विष्णुपंत नगरकर । नामें असती द्विजवर ।   
करोनिया घरदार । गृहस्थाश्रमीं राहती ॥ ४५ ॥   
विष्णुभक्तांची निंदा भारी । करिती नानापरोपरी ।   
वैष्णव तितुके त्यांचे वैरी । कृष्णलीला निंदिती ॥ ४६ ॥   
नित्य करिती पार्थिवपूजन । सदा ध्याती उमारमण ।   
शिवभक्ति करिती गहन । परि हरीसी निंदिती ॥ ४७ ॥   
महाथोर शिवभक्त । परि न्यूनभाव द्वैत ।   
जाणोनिया सद्गुरुनाथ । कृपादृष्टीं पाहती ॥ ४८ ॥   
एकदां तया दृष्टांत झाला । स्वप्नीं पूजेसी बैसला ।   
शिवालयीं शंकराला । पूजितसे प्रेमानें ॥ ४९ ॥   
तंव अकस्मात लिंगामागोनी । प्रगट झाली गुरुजननी ।   
गृहस्थ पाहे दचकोनी । म्हणे कोण सिद्धपुरुष ॥ ५० ॥   
चहूंकडे फांकली प्रभा । दिव्यपुरुष सिद्ध उभा ।   
कीं हा परमानंदाचा गाभा । रामदासी भासतेसे ॥ ५१ ॥   
पायी खडावा रत्नचजडित । कंठी तुळशीमाला शोभत ।   
मुद्रा रामनामांकित । पाहतसे प्रेमानें ॥ ५२ ॥   
कफनी फरगुल घातला । भाळीं त्रिपुंड शोभला ।   
मस्तकीं जरीकांठ जिला । मखमली टोपी शोभतसे ॥ ५३ ॥   
हातीं स्मरणी तुळशीची । झोळी नवविधभक्तीची ।   
कुबडी श्रीसमर्थांची । ’रघुवीर समर्थ’ गर्जती ॥ ५४ ॥   
विप्र उभा कर जोडोनि । समर्थ वदती तयालागोनी ।   
’तुम्ही शिवभक्त तपोज्ञानी । परि हरीसी निंदितां ॥ ५५ ॥   
हरिहरां भेद नाहीं । श्रुतिस्मृति कथिती पाहीं ।   
आजपासोन प्रत्यहीं । शालिग्रामही पूजावा ॥ ५६ ॥   
विष्णूचें करितां पूजन । शिव होईल सुप्रसन्न ।   
येविषयीं संशयी मन । पुनरपि ठेवूं नये’ ॥ ५७ ॥   
’हां जी’ म्हणोनि म्हणितले । अंगी रोमांच थरारले ।   
नेत्रीं आनंदाश्रु भरले । मुखीं शब्द फुटेना ॥ ५८ ॥   
संत पूजावे आरते । देव सारावे परते ।   
अभंगवाक्य तयातें । आठवलें ते काळीं ॥ ५९ ॥   
तेंचि साहित्य घेवोनि । पूजिले साधुशिरोमणि ।   
’पुनः भेट होईल; म्हणोनि । गुप्त झाले दयासिंधु ॥ ६० ॥   
विप्र जागृतीस आला । सकळां दृष्टांत निवेदिला ।   
शालिग्राम पूजूं लागला । तेव्हांपासोनि ॥ ६१ ॥   
परि अंतरीं सिद्धध्यान । लागलें सदा अनुसंधान ।   
पुनरपि देईन दर्शन । हें वाक्य चिंतीतसे ॥ ६२ ॥   
सिद्ध साधु येतां कोणी । दर्शना जाई धांवोनि ।   
नाना क्षेत्रांसी पाहोनि । स्वप्नींचें ध्यान धुंडितसे ॥ ६३ ॥   
कांही केल्या आढळेना । तळमळ लागली मना ।   
सकळां सांगोनि खाणाखुणा । पुसे ऐसा साधु पाहिला कीं ॥ ६४ ॥   
तंव कोणी तया कथिलें । पंढरीसी म्यां पाहिले ।   
गोंदवलेकर महाराज भले । राममंदिरीं वास करिती ॥ ६५ ॥   
शीघ्र गाडींत बैसला । पढरीक्षेत्रीं पावला ।   
विठ्ठलचरणीं लोळला । सद्गुरु भेटवीं म्हणोनि ॥ ६६ ॥   
शोधिलें राममंदिर । देखिलें नयनीं गुरुवर ।   
आनंदाचा भरला पूर । मज दीना वर्णवेना ॥ ६७ ॥   
तेंचि रूप पाहतां नयनीं । चरण न्हाणिले अश्रूंनी ।   
प्रेमें हस्तें कुरवाळोनि । बोलती झाली गुरुमाय ॥ ६८ ॥   
महाथोर शिवभक्त । शिवासी आवडते अत्यंत ।   
कलियुगीं ऐसें संत । भेटती विरळा ॥ ६९ ॥   
’शालीग्राम पूजितां कीं नाहीं । कां विसरलां स्वप्नसमयीं ।   
शिव विष्णु एकचि पाहीं । त्रिकाल सत्य मानावें ॥ ७० ॥   
जे शिवासी निंदिती । ते हरीसी नावडती ।   
तैसे विष्णूसी निंदिती । तेहा नावडती शिवा’ ॥ ७१ ॥   
असो अनुग्रहप्रसाद देवोन । केलें तयाचें समाधान ।   
शिव विष्णु हे अभिन्न । सांगती सकळांसी ॥ ७२ ॥   
जेथें राममंदिरें बांधलीं । तेथें शिवालयें स्थापिलीं ।   
सिद्धारूढांची भेटी झाली । ते समयीं तेंचि कथिती ॥ ७३ ॥   
कर्नाटकीं हुबळीं शहरी । सिद्धारूढ सिद्धस्वारी ।   
एकदा समर्थांची फेरी । जाहली तया स्थानासी ॥ ७४ ॥   
समर्थशिष्य रामनाम । गर्जती उच्चस्वरें परम ।   
सिद्धशिष्य शिवनाम । गर्जती ते समयासी ॥ ७५ ॥   
दोघे उपदेशिती सकळांसी । भेद नसे हरिहरांसी ।   
दोन्ही नेत्रीं एका वस्तूसे । पाहतां भिन्न दिसेना ॥ ७६ ॥   
असो ऐसी गुरुमाउली । बहुतांप्रति लाभली ।   
महद्भाग्यें फळासी आलीं । ते ते पुनीत जाले ॥ ७७ ॥   
॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥   
श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥ 
 
  
अध्याय दहावा  समास चवथा
 
  
शिवविष्णु अभेदस्थिति । सकलां सांगे गुरुमूर्ति ।   
आतां परिसावी जी श्रोतीं । सुरस कथा ॥ १ ॥   
एके समयीं कुच्ची ग्रामासी । समर्थ शिष्यगृहासी ।   
गेले पाहोन भक्तीसीं । महोत्साह चालिला ॥ २ ॥   
यात्रा भरली विशेष । भक्त धांवती दर्शनास ।   
प्रसाद होतसे बहुवस । अनुग्रह देती बहुतांसी ॥ ३ ॥   
आपत्तीनें पीडले जन । काकुळती येती धांवोन ।   
समर्थांसी निवेदन । करिती भावभक्तीनें ॥ ४ ॥   
ऐसा चालिला थाट । महान् साधु म्हणती बोभाट ।   
नास्तिकांचें कर्णकपाट । फोडोनि आंत दुमदुमला ॥ ५ ॥   
तंव तेथे कृष्णाजीपंत । असती उपनामें भागवत ।   
तयांसी कळली मात । भगवद्भक्त हे म्हणोनि ॥ ६ ॥   
मनीं म्हणती या युगांत । एकहि नसे अनन्य भक्त ।   
धूर्त भोंदू हे सत्य । भाविकांसी ठकविती ॥ ७ ॥   
तरी पाहूं यांची स्थिति । कैसें ज्ञान कैसी भक्ति ।   
कैसी साधनसंपत्ति । कैसे जन वेधिती ते ॥ ८ ॥   
कौतुक पाहती दुरून । सकल करिती पूजन ।   
नानापरी नैवेद्य देवोन । चरणतीर्थ आदरें घेती ॥ ९ ॥   
भाविक उच्छिष्ट सेविती । मायबहिणी न्हाऊं घालिती ।   
नीरांजनें आरत्या करिती । साहेबमेळा सभोंवार ॥ १० ॥   
पीकपात्र धरिलें कोणी । छाया करिती छत्र धरूनि ।   
कोणी खडावा घेऊनि । मस्तकीं धरिती भक्तीनें ॥ ११ ॥   
दर्शना येती बहुत जन । प्रपंचगार्हाकणी करिती कथन ।   
जपावांचोन परमार्थलक्षण । एकहि तया दिसेना ॥ १२ ॥   
अंतर जाणती शहाणे । उगाच पाहती दैन्यवाणे ।   
भाविक अंधभक्तीनें । उपासने लागती ॥ १३ ॥   
शाब्दिक पाहती व्युत्पन्न । नास्तिकां साक्षात्कार जाण ।   
दुबळे वैभव देखोन । भुलोनि नादीं मागती ॥ १४ ॥   
परिक्षकांच्या ऐशा जाती । भागवत धूर्ततेनें पाहती ।   
अंतर जाणण्या नसे शक्ति । सिद्धानेंचि सिद्ध उमजावे ॥ १५ ॥   
म्हणती येथें वैराग्यलक्षण । कांहींच न दिसे मज लागून ।   
मंत्र तंत्र वशीकरण । कांहीं तरी असेल ॥ १६ ॥   
म्हणोनि पुढें सरसावले । समर्थांसी बोलूं लागले ।   
’धूर्तपणें जन भुलविले । वैभव इच्छा धरोन ॥ १७ ॥   
गोड खाऊन देह मातला । दोन उंटां भार झाला ।  
उगाच भोंदतां जनाला । साधू साधू म्हणोनी ॥ १८ ॥   
काय आहे तुमचेपाशीं । दाखवावे सत्वर मजसी ।   
नाहीं तरी ह्या ढोंगासी । सोडून द्यावे’ ॥ १९ ॥   
परिक्षावंत जाणोन । सद्गुरूंसी समाधान ।   
म्हणती हा विवेकी ब्राह्मण । यावरी कृपादृष्टी करावी ॥ २० ॥   
समर्थ वदती पंतांसी । ’दावितां काय द्याल मजसी’ ।   
पंत वदती ’चरणांसी । अर्पिन देह आपुल्या’ ॥ २१ ॥   
उभयतांचा संवाद झाला । परि संशयो नाही गेला ।   
दुजे दिनीं पाचारिला । शिष्याकरवीं तयासी ॥ २२ ॥   
परि तयाचें कपाळ । उठलें होतें ते वेळ ।   
सद्गुरु समर्थ दयाळ । वदती ’यावे तैसेचि’ ॥ २३ ॥   
हो ना करीत उठोन आला । सद्गुरूंनी हस्त फिरविला ।   
मस्तकाचा शूळ गेला । तत्क्षणीं लयासी ॥ २४ ॥   
’तुम्ही विवेकी परिक्षाकर्ते । आमुचे बहु आवडते’ ।   
महाराज वदती तयांते । ’राहिलें कीं ना मस्तक’ ।   
पंत म्हणती श्रीगुरूंसी । ’येणें नव्हे समाधानासी ।   
मंत्र असेल तुम्हांपाशीं । साधुसत्ता नव्हे ही’ ॥ २६ ॥   
समर्थ वदती तयांप्रती । ’साधुसत्ता कैसी असती ।   
सांगा तुम्ही आम्हांप्रति । विवेकी ज्ञानी पंत हो’ ॥ २७ ॥   
ऐसा करितां विनोद । बहुत जाहला संवाद ।   
नाहीं झालें चित्त शुद्ध । विकल्प कांही जाईना ॥ २८ ॥   
तंव समर्थें उग्र रूप धरिलें । इतरां सौम्यचि भासलें ।   
परि संत अति भ्याले । पळोन गेले ओहोळीं ॥ २९ ॥   
समर्थ वदती शिष्यांसी । ’काय झाले भागवतांसी ।   
धरोनि आणा मजपाशीं । समजाविशी करोनी’ ॥ ३० ॥   
शिष्य निघाले त्वरित । ’अहो थांबा भागवत ।   
हांक मारिती सद्गुरुनाथ । क्षण एक स्थिर रहावे’ ॥ ३१ ॥   
भागवत म्हणती ’नमस्कार । प्रत्यक्ष मारुतिअवतार ।   
मजला न होय धीर । समर्थांपुढे यावया’ ॥ ३२ ॥   
भीत भीत पुढें आले । तेथें सौम्य रूप पाहिले ।   
शरीर चरणीं लोटिलें । अष्टभाव दाटोनी ॥ ३३ ॥   
’आपण साक्षात् हनुमंत । अज्ञानें मी झालो भ्रांत ।   
तारीं तारीं श्रीगुरुनाथ । देह सेवेसी अर्पिला’ ॥ ३४ ॥   
अनुग्रहप्रसाद देवोनी । वदती ’रहा सुखें सदनीं ।   
अखंड नाम स्मरतां मनीं । आमुची सेवा घडेल ॥ ३५ ॥   
रामनाम ज्यांचे चित्तीं । तेथें नित्य आमुची वसति ।   
वियोग न माना कल्पांतीं । सत्य प्रत्यय येईल’ ॥ ३६ ॥   
असो भागवतां मारुतिदर्शन । देऊनि केलें समाधान ।   
तैसेंचि श्रीरामदर्शन । बाळकोबांसी करविलें ॥ ३७ ॥   
श्रोते वदती ती कथा । कैसी केली सार्थकता ।   
सविस्तर सांगोन चित्ता । तोषया जी आमुच्या ॥ ३८ ॥   
गुरुकथामृतपान । करोनि तोषविलें मन ।   
परि आणिकहि हे श्रवण । भुकेले असती ॥ ३९ ॥   
वक्ता बोले जी उत्तर । कृपा करील गुरुवर ।   
क्षण रहावें स्थिर । गुरुपदचिंतनीं ॥ ४० ॥   
बाळकोबा परिचारक नाम । सदाचारी सात्विकोत्तम ।   
श्रीगुरूंचे भक्त परम । ज्वराव्याधीनें ग्रासिले ॥ ४१ ॥   
 
सप्तदिनपर्यंत । तयांसी नव्हतें बोलवत ।   
अंतसमय झाला प्राप्त । श्रीगुरूंनी जाणिले ॥ ४१ ॥   
जवळी जावोनि कुरवाळिती । सत्वर उठवोनि बैसविती ।   
रामतीर्थ तयांप्रती । दिधले श्रींनी स्वहस्तें ॥ ४३ ॥   
तंव तो शुद्धीस आला । वंदन करी गुरुपदाला ।   
दीनवाणी विनविता झाला । ’कृपा करा मजवरी ॥ ४४ ॥   
अंतसमय महाकठिण । जननदुःख तयाहून ।   
फिरफिरोन भागला प्राण । तरी आतां उद्धरावें’ ॥ ४५ ॥   
श्रीगुरूंनी ते अवसरी । हस्त ठेविला मस्तकावरी ।   
ग्रंथिभेद होवोन उपरीं । रामदर्शन करविलें ॥ ४६ ॥   
रामनाम घेत मुखीं । शीघ्र गेला वैकुंठलोकीं ।   
देह ठेविला गुरुपादुकीं । धन्य भाग्य तयाचें ॥ ४७ ॥   
ऐसी गुरुकृपा गहन । तैसेंचि नाममाहात्म्य पूर्ण ।   
दावोन सकळांलागोन । ध्यास लाविला नामाचा ॥ ४८ ॥   
निळकंठबुवा कर्नाटकी । जेव्हां चालिले स्वर्गलोकीं ।   
ओठ बोटें एकसारखीं । पूर्वाभ्यासें हालत होतीं । ४९ ॥   
देहीं नसतां चेतना । तरी ही चालिली चालना ।   
अभ्यासयोग ऐसा जाणा । त्याहीवरी गुरुकृपा ॥ ५० ॥   
अखंड नाम स्मरावें । ऐसें कथिती सकलां ठावें ।   
कोणीएकें पुसिलें कैसें व्हावें । निद्रेमाजीं खंड पडे ॥ ५१ ॥   
सद्गुरु नेती तयासी । अखंड नामधारीयापाशी ।   
निद्रिस्त असते समयासी । म्हणती नाम ऐकावें ॥ ५२ ॥   
देहासी लावितां कान । सूक्ष्म होय नामस्मरण ।   
वदती दृढ आपण जाण । खंड कधींही पडेना ॥ ५३ ॥   
खंडेराव म्हैसाळकर । देसाई कोणी इनामदार ।   
परि रक्तपितीचा आजार । अतिदुःख देतसे ॥ ५४ ॥   
तंव परिसिलीं कीर्ति । सद्गुरुब्रह्मचैतन्यमूर्ति ।   
गोंदवले ग्रामीं वास करिती । निवारतील व्याधीसी ॥ ५५ ॥   
परिसतां कीर्ति ऐसी । दर्शना आले गोंदवल्यासी ।   
विनंती करिती गुरूपाशीं । व्याधी पीडा अनिवार ॥ ५६ ॥   
तयां करवीं नामजप । करोनि निरसिलें पाप ।   
ऐसे बहुतांचे ताप । हरविले किती सांगूं ॥ ५६ ॥   
आप्पासाहेब पटवर्धन । वीरवंशज शीलवान ।   
कागवाड जगदंबाभुवन । राजे पूर्वील तेथींचे ॥ ५८ ॥   
कागवाडकर रामदासी । नेती तयां दर्शनाप्रती ।   
रामनगरी अयोध्येसी । होते जेव्हां समर्थ ॥ ५९ ॥   
अनुग्रहप्रसाद देवोन । सुखी केले धनवान ।   
कृपादृष्टीं पाहोन । स्वग्रामा पाठविलें ॥ ६० ॥   
पूर्वसंचित कुलशाप । बहुत होता यतिताप ।   
सत्त्व रुजतां तम पाप । प्रगट होऊं लागलें ॥ ६१ ॥   
देहस्मृति उडाली । निद्रा शांति समूळ गेली ।   
माय चरणीं नेवोन घाली । श्रीगुरुदत्तांचे ॥ ६२ ॥   
श्रीनृसिंहवाडी क्षेत्रीं । सेवा करिती दिनरात्रीं ।   
दृष्टांत देती सुत-अत्रि । तुम्हां तारक गुरुमाय ॥ ६३ ॥   
मग गोंदवलेंसी आणविलें । श्रींचे चरणीं घातलें ।   
तुमचें बालक तुम्हीं वहिलें । मारावे वा तारावें ॥ ६४ ॥   
समर्थ वदती ते समयीं । रामभक्तां भय नाहीं ।   
नामजपा लावोन पाहीं । समंधरोष शांतविला ॥ ६५ ॥   
ब्रह्मद्वेष अतिकठिण । त्यावरी यति साधक गहन ।   
शांत होतां होतां जाण । वरचेवरी उद्भवे ॥ ६६ ॥   
पुनरपि सेवितां चरण । वासना जाय विरोन ।   
सत्संगतीं पापक्षालन । होवोनि झाले सत्त्वस्थ ॥ ६७ ॥   
आतां श्रीगुरु त्रिकालज्ञ । येविषयीं दृष्टांत जाण ।   
सांगोनि हा ध्याय पूर्ण । करूं, बहु विस्तारला ॥ ६८ ॥   
मठीं त्रिगुणी लोक येती । कांहीं तस्करबुद्धि असती ।   
दुर्लभ वस्तु छपविती । दुजयाची ठकवोनी ॥ ६९ ॥   
कागाळी जाय समर्थांपुढें । नेमके जाती चोरांकडे ।   
वदती ’हें काय करतां वेडे । राजदंड पावाल ॥ ७० ॥   
वस्तु द्यावी आम्हापाशीं । आम्ही सांगूं न कोणासी ।   
यापुढें ऐसे दुर्गुणासी । सोडून द्यावें’ ॥ ७१ ॥   
नेमकीचि सांगती खूण । आणि बोध करिती गहन ।   
बहुतांचे दवडिती दुर्गुण । पुण्यक्षेत्रीं गुरु पाहीं ॥ ७२ ॥   
कामुकांची तीच गति । सद्गुरुतपस्तेजपुढतीं ।   
बुद्धीस होय उपरति । संतसंगमाहात्म्य ॥ ७३ ॥   
सहस्रावधि स्त्रीपुरुष । नांदती गुरुछायेस ।   
रीघ नसे दुर्बुद्धीस । शिराया तपस्तेजें ॥ ७४ ॥   
नेमकाचि सांगती जप । नेमकें दर्शविती पाप ।   
नेमकेचि कथिती संकल्प । या त्रिविध जगासी ॥ ७५ ॥   
परि कोणाचा अपमान । कधींही न करिती जाण ।   
ज्याची त्यासी सांगोन खूण । सुमार्गासी लाविती ॥ ७६ ॥   
ऐशा असती बहु कथा । नित्य घडती कोण गणिता ।   
परमार्थीं वळवाया चित्ता । फक्त दिशा दाविली ॥ ७७ ॥   
तपस्तेज अति गाढें । न पाहावें मुखाकडे ।   
नास्तिकांचेंही मस्तक पडे । नम्र होवोनि गुरुपदीं ॥ ७८ ॥   
हठयोगी कर्मयोगी । वेदांतवादी विरागी ।   
प्रयत्न प्रारब्धवादी जगीं । नाना पंथ नाना ध्येयें ॥ ७९ ॥   
नित्य येती गुरूंपाशी । निंदा स्तुति करावयासी ।   
कांही आशंका पुसणेंसी । गुरुधामीं धांवत ॥ ८० ॥   
नाना आशंका फेडोन । सकळांचें करिती समाधान ।   
गुरुमाय सदा प्रसन्न । भाविकां नास्तिकांसी ॥ ८१ ॥   
आत्माराम हृदयीं धरावा । आणि विश्वात्मा ओढोनि घ्यावा ।   
ये विषयीं हा दाखला पहावा । सद्गुरुलीलेमाझारीं ॥ ८२ ॥   
॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥   
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ 
 
  
अध्याय दहावा  समास पाचवा
 
  
ॐ नमो जी विश्वंभरा । विश्वचालका विश्वेश्वरा ।   
भक्तालागी अभयकारा । विराट्पुरुषा नमोऽस्तु ते ॥ १ ॥   
एकदां श्रीगुरूंची स्वारी । भैय्यासह पादचारी ।   
फिरत असतां नर्मादातीरीं । गिरिगव्हरीं प्रवेशले ॥ २ ॥   
तृषा लागली म्हणोनी । गुहेमाजीं गेले झणीं ।   
तेथें निर्मल जल पाहोनी । प्राशन करूं लागले ॥ ३ ॥   
तेथें एक सतेज योगी । बैसले होते अंतर्भागीं ।   
ते समाधी उतरोनि वेगीं । बाह्यप्रदेशीं पातले ॥ ४ ॥   
पुसती ’रामवतार झाला कीं नाहीं । दर्शना जाऊं लवलाही ।   
ही इच्छा धरोनि पाहीं । समाधि लावोनि बैसलों’ ॥ ५ ॥   
सद्गुरु वदती योगियासी । ’रामकृष्ण अवतारांसी ।   
होवोनि सांप्रत कलीसी । प्रारंभही झालासे’ ॥ ६ ॥   
ऐसी परसोन वाणी । कष्टी झाला वृद्ध मुनि ।   
जाणोनि हे श्रीगुरूंनीं । मस्तकीं हात ठेविला ।   
ज्ञानोदयें चरण वंदोनी । प्राण सोडिते झाले मुनि ।   
अग्निसंस्कार तयां करोनी । उभयतां झाले मार्गस्थ ॥ ८ ॥   
भय्यासाहेब करिती प्रश्न । ’हें काय आश्चर्य गहन’ ।   
सद्गुरु वदती हास्यवदन । ’योगिया गति मिळाली ॥ ९ ॥   
बहुतां दिसांचा तापसी । लावोन बैसला समाधीसी ।   
वंचना करित काळासी । सद्गतीकारणें ॥ १० ॥   
राम दर्शन करोनि । जावें मुक्त होवोनी ।   
ऐसी इच्छा धरोनी । प्राणापान कोंडिले ॥ ११ ॥   
तो काल निघोन गेला । योगी तैसाचि राहिला ।   
आजिं भाग्य उदयाला । येतां गेला वैकुंठीं’ ॥ १२ ॥   
असो योगिया गति दिली । ऐसें बहुत कार्यें केली ।   
दयाळ सद्गुरुमाउली । भेटली आम्हां सभाग्यां ॥ १३ ॥   
नीलकंठ दामोदर जोशी । जे कुरुंदवाडचे रहिवासी ।   
त्यांचे करविती विवाहासी । तो प्रकार परिसावा ॥ १४ ॥   
विजापूरप्रांतींची कोणी । विप्रस्त्री कन्या घेवोनी ।   
आली गोंदवलें श्रीभुवनीं । समर्थचरण वंदितसे ॥ १५ ॥   
कन्या घालोन पदकमलीं । विनंती करी ते वेळीं ।   
रोगें बहुत ही ग्रासली । नायटे उठती सर्वांगी ॥ १६ ॥   
अमावस्ये मावळती । पौर्णिमे पुन्हा चिघळती ।   
ऐसी बहुत दिवसांचे स्थिति । गति बरवी दिसेना’ ॥ १७ ॥   
म्हणोन घातली चरणावरी । ’कृपा करा दीनावरी ।   
तुम्ही दीनांचे कैवारी । ऐसी कीर्ति जगांत’ ॥ १८ ॥   
समर्थ वदती ’अहो माय । सांकडे निरसील रामराय ।   
परि एक असे उपाय । मानेल तरी करावा ॥ १९ ॥   
कन्या देतां गरिबासी । रोगमुक्त होय खाशी ।   
घेवोन पतिअनुज्ञेसी । करा निश्चय सत्वर’ ॥ २० ॥   
तत्काळचि पत्र लिहिलें । होकारार्थीं उत्तर आलें ।   
रामसाक्षी उदक सोडविलें । कन्या देऊं गरिबासी ॥ २१ ॥   
सती वदे समर्थांसी । ’कोणा देऊं सांगा मजसी ।   
विवाहमुहूर्त समयासी । कन्यादान करूं तया ॥ २२ ॥   
ते समयीं दर्शनाकरितां । नीळकंठ तेथें उभा होता ।   
समर्थ वदती ’उदर भरतां । काय धंदा करोनी’ ॥ २३ ॥   
नीळकंठ वदे ’भिक्षेसी । नित्य फिरवितों झोळीसी’ ।   
समर्थ वदती सतीसी । ’यासी द्या हो कुमारिका’ ॥ २४ ॥   
’आज्ञा प्रमाण’ तिनें म्हटलें । एकमेकीं पत्ते पुसिले ।   
बालिकेचें दुःख हरले । कृपावचनें सद्गुरूंच्या ॥ २५ ॥   
कांही दिवसांउपरी । पिता मनीं विचारी ।   
’कन्या सुस्वरूप गोजिरी । कैसी द्यावी भिक्षुका ॥ २६ ॥   
आम्ही गृहस्थ धनवंत । जांवई आम्हां न शोभत’ ।   
भाक विसरला समस्त । कन्यामोहें करोनी ॥ २७ ॥   
विकल्प येतां मनां । पुनरपि उठले नायटे बहुत ।   
मग शीघ्र कन्यदान करीत । कुरुंदवाडी जावोनी ॥ २८ ॥   
असो समर्थकृपेंकरोन । उभयतांचें झालें कल्याण ।   
तैसेचि अनंत जन । गुरुकृपें आनंदले ॥ २९ ॥   
भवानराव नामेंकरोन । भक्त भावसंपन्न ।   
तयांस संकटीं दर्शन । वाराणसीं जाहलें ॥ ३० ॥   
हर्द्यासी असतां गुरुवर । काशीस निघाले सपरिवार ।   
भवानराव भक्त थोर । संगें येऊं विनविती ॥ ३१ ॥   
समर्थ वदती तयांसी । ’तुम्ही रहावें मठासी ।   
आम्ही आलियावरी काशीसी । स्वतंत्र तुम्ही चलावें’ ॥ ३२ ॥   
समर्थ काशीस जावोन येतां । भवानराव निघाले यात्रेकरितां ।   
दरकूच जातां जातां । काशीक्षेत्री पावले ॥ ३३ ॥   
तेथें वदती भटासी । ’एकांत स्थळ आम्हांसी ।   
जप करीत रहावयासी । द्यावें तुम्ही उत्तम’ ॥ ३४ ॥   
एक ओसाड घर असे भलें । जें समंधपीडें दूषित झालें ।   
तें नामधारकासी दिधलें । काय होतें पाहती ॥ ३५ ॥   
समर्थशिष्या कोठेंही । कळिकाळाचें भय नाहीं ।   
पिशाच काय करील पाहीं । प्रकार घडला तो पहावा ॥ ३६ ॥   
कांहीं काल तया स्थानीं । भवानराव होते जप करोनी ।   
मध्यरात्रीं एके दिनीं । समंध तेथें प्रगटला ॥ ३७ ॥   
शुभ्रवस्त्र परिधान । मिठाईचा पुडा देवोन ।   
बोलतसे हास्यवदन । जपून हा ठेवावा ।   
भावानराव नामधारक । पाठीं समर्थ सहायक ।   
न डगला अणु एक । पुडा ठेवोन घेतला ॥ ३९ ॥   
कांही वेळ गेल्यावरी । पुन्हां आली समंधफेरी ।   
कृष्णवस्त्र परिधान करी । मिठाई मागों लागला ॥ ४० ॥   
भवानराव वदले तयासी । ’शुभ्र प्रावरणें असती ज्यासी ।   
तेणें दिधला मजपाशी । तुजला नाहीं देणार’ ॥ ४१ ॥   
उभयतांचा तंटा झाला । उन्मत्त समंध उरीं बैसला ।   
भवानरावें धांवा केला । सद्गुरुमहाराजांचा ॥ ४२ ॥   
तंव तेथें अभिनव घडलें । लख्ख प्रकाशें अंबर भरलें ।   
गुरुमहाराज प्रगटले । समंध गेला पळोनी ॥ ४३ ॥   
शिष्या अभय देवोनी । गुप्त झाली गुरुजननी ।   
पुन्हां तेथें समंधानें । मुख नाही दाखविलें ॥ ४४ ॥   
सत्ताधारी गुरुमूर्ति । शिष्यसंकटी उभे असती ।   
हर्द्यासी असोनि काशीप्रति । शिष्यसंकटीं प्रगटले ॥ ४५ ॥   
पिशाचमोचन केलें फार । गणती कोण करणार ।   
परि कांहींसा प्रकार । दृष्टांतासी वर्णन करूं ॥ ४६ ॥   
रघुनाथराव फडणवीस । जतसंस्थानी करिती वास ।   
परि समंधव्याधी भार्येस । तेणें दुःख भोगिती ॥ ४७ ॥   
उभयतां आले गोंदवलीं । समर्थसेवा बहु केली ।   
बारा समंधां गति दिली । माणगंगाप्रवाहीं ॥ ४८ ॥   
फडणवीसही उदासीन । झाले होते अति गहन ।   
तयांस लावोन साधन । दुःख हरलें उभयतांचें ॥ ४९ ॥   
 
आतपाडीकर पिलाजीपंत । देशपांडे नामें विख्यात ।   
तयांचेही भार्येप्रत । लागले सात समंध ॥ ५० ॥   
तयांसीही दिधली गति । ऐसे प्रकार नित्य घडती ।   
कांही कथिले तुम्हांप्रति । गुरुसत्ता कळावया ॥ ५१ ॥   
गोविंदराव केळकर । भार्या सरस्वती चतुर ।   
परि समंध पीडा फार । मोरगिरीवासिया ॥ ५२ ॥   
येवोन लागती चरणासी । श्रीगुरु वदविती समंधासी ।   
ब्रह्मचारी उच्चारी वेदासी । परि गायत्री अर्धचि म्हणे ॥ ५३ ॥   
’साग्र गायत्री म्हणेन । तरी भस्मचि होईन’ ।   
ऐसें वदे तें दावोन । समर्थ बोधिती शिष्यांसी ॥ ५४ ॥   
गायत्रीचा महिमा ऐसा । ज्ञानरूप तेजोमय ठसा ।   
परि सांप्रत निरर्थक कसा । द्विजांलागी भासतसे ॥ ५५ ॥   
असो पिशाचयोनींतूनि । शीघ्र तयासी काढोनी ।   
गति दिधली समर्थांनी । संतदर्शन होतसे ॥ ५७ ॥   
गुरुसत्ता आहे किती । तैसी स्वरूपाची व्याप्ती ।   
पहावी कांहीं दृष्टांतीं । कथन करूं गुरुलीला ॥ ५८ ॥   
कृष्णराव तरडे म्हणोनी । कोणी भक्त श्रीसदनीं ।   
एकदां जातां आडरानीं । भुजंग आला आडवा ॥ ५९ ॥   
राव बहु घाबरला । तंव सर्प जवळीच आला ।   
मग श्रींची शपथ तयाला । घालितां राहिला तेथेंचि ॥ ६० ॥   
हलूं नको जागचा येथ । म्हणोनि घातली तया शपथ ।   
येवोनि गुरूंसी सांगत । सर्पा भ्यालों म्हणोनी ॥ ६१ ॥   
समर्थ वदती जा सत्वरी । दुरूनि शपथ मोकळी करीं ।   
जाईल बिचारा आपुले घरी । बंधन कोणा नसावें ॥ ६२ ॥   
जावोन पाहती मंडळी । सर्प स्थिर त्या स्थळीं ।   
तरडे वदतां जा स्वस्थळीं । तेव्हांची दूर पळाला ॥ ६३ ॥   
बाळकृष्णभट्ट नामें जोशी । पुत्रविणें बहुक्लेशी ।   
चार केल्याही स्त्रियांसी । पुत्र नाहीं जाहला ॥ ६४ ॥   
चौथी स्त्री उपवर । होवोनि गेलें संवत्सर- ।   
त्रयोदश, परि आशांकुर । लोभें नाहीं मावळला ॥ ६५ ॥   
करुणा भाकी श्रींचे चरणीं । निपुत्रिक अभागी म्हणोनि ।   
श्रीगुरु वदती कोदंडपाणी । संकटसमयीं स्मरावा ॥ ६६ ॥   
औटकोट जप करितां । पुत्र प्रसवली द्विजकांता ।   
आनंद न समाये चित्ता । वारंवार स्तवन करी ॥ ६७ ॥   
महाराज असतां सोलापुरी । आला एक चितारी ।   
विनवी घ्यावी प्रतिमा बरी । इच्छा पुरवा समर्था ॥ ६८ ॥   
श्रीगुरु वदले तयासी । द्रव्य मेळवूं इच्छिसी ।   
तरी आज या समयासी । न काढितां बरें ॥ ६९ ॥   
परि आग्रह साहेबीं धरिला । बहुतां येईल दर्शनाला ।   
सद्गुरूही विनोदें बोला । तुकविती मान ॥ ७० ॥   
श्रींसी आसनीं बैसविलें । दोहींकडे साहेब भले ।   
हस्त जोडोन उभे ठेले । यंत्री घेतली प्रतिछाया ॥ ७१ ॥   
तंव तेथें अघटित घडले । साहेब मात्र व्यक्त दिसले ।   
महाराज गुप्त झाले । अवघे करिती विस्मय ॥ ७२ ॥   
चितारी ओशाळला बहुत । पाहोन दयाळू समर्थ ।   
दुजे दिनीं काढों देत । सुप्रसन्न वदनानें ॥ ७३ ॥   
बहुतीं प्रतिमा काढिल्या । तितुक्या भिन्न आल्या ।   
बहुरूपी सद्गुरु भला । लीला करोन दाखवी ॥ ७४ ॥   
मार्तंडबुवा नामें एक । औंध ग्रामींचा श्रीसेवक ।   
हरिदास हास्यविनोदादिक । कीर्तन करी रसाळ ॥ ७५ ॥   
श्रीगुरुप्रसादेंकरोन । सुत झाला तयालागोन ।   
तोही करी कीर्तन । अल्पवयीं गुरुकृपें ॥ ७६ ॥   
शंकरशास्त्री म्हासुर्णेकर । गुरुचरणीं भाव थोर ।   
एकदां करिती विचार । स्तवन करावें श्रीगुरूंचें ॥ ७७ ॥   
परि कवित्वाची शक्ति । नाहीं म्हणून काकुलती ।   
गुरुचरणांसी प्रार्थिती । कांही सेवा घडावी ॥ ७८ ॥   
ऐसें मनीं भाविलें । तें श्रींनीं ओळखिलें ।   
शिष्यकोड पुरविलें । तो प्रकार परिसावा ॥ ७९ ॥   
रात्रौ तयांस स्वप्नांत । एकाएकी स्फुर्ति होत ।   
सहा श्लोक रचोनि स्तवित । असतां आले जागृती ॥ ८० ॥   
तंव श्लोक स्मरणीं खासे । लिहोन ठेविती जैसे तैसे ।   
परि अष्टक करावें ऐसें । वाटतां आणिक दोन केले ॥ ८१ ॥   
प्रसंगें दावितां गुरूंसी । खूण दिधली तयांसी ।   
शेवटचें दों श्लोकांसी । फाडोनियां टाकिलें ॥ ८२ ॥   
प्रासादिक आणि पाठक । कवित्वा भेद आत्यंतिक ।   
हाही दाविला विवेक । श्लोकार्थातें विवरितां ॥ ८३ ॥   
मोरगिरीनजिक कोकिसरें गांवीं । वार्ता घडली परिसावी ।   
गर्भिणी अडली ती मुक्त व्हावी । बहुतीं केले उपाय ॥ ८४ ॥   
शूद्रस्त्री संकटीं पडतां । हरि पाटलासी आली ममता ।   
अंगारा लावोन नवस करितां । सुटका करिती श्रीगुरु ॥ ८५ ॥   
आनंदें मोरगिरीस येवोनी । प्रेमें नमिला कोदंडपाणी ।   
मठपतीसी विनवोनी । नवस पूर्ण करितसे ॥ ८६ ॥   
पांडवसंख्या मुद्रिकांस । त्वरित पाठविल्या गोंदवलेंस ।   
आनंदें श्रीचरणांस । वारंवार स्तवितसे ॥ ८७ ॥   
कोणा नवसे पुत्र होती । कोणाच्या व्याधी हरती ।   
अनंत नवसांसी पावती । द्यावे किती दृष्टांत ॥ ८८ ॥   
सांगलीस एक भाविक सती । श्रीगुरुपदांकित होती ।   
अवचित तिचे पुत्रावरती । राजक्षोभ जाहला ॥ ८९ ॥   
धरोनि नेती अधिकारी । माय शोक करी भारी ।   
दृढ विश्वास गुरुवरी । म्हणोन संकट घातलें ॥ ९० ॥   
देव्हारींच्या गुरुपादुका । काढोन ठेवी जळीं देखा ।   
निरपराधी सुताची सुटका । व्हावी ऐसें प्रार्थितसे ॥ ९१ ॥   
इकडे गोंदावलेंसीं श्रीचरण । सुजले न कळे कारण ।   
अनेक उपाय करकरोन । पाहतां गुण येईना ॥ ९२ ॥   
समर्थ वदती शिष्यांसी । न करावे उपाय यासी ।   
कांहीं कालें आपैंसी । सूज लया जाईल ॥ ९३ ॥   
इकडे खटला चालूं झाला । पुत्र निर्दोष ठरला ।   
तेव्हां काढोन पादुकांला । समाराधना करितसे ॥ ९४ ॥   
तंव सूज उतरोन गेली । भक्तजनीं पृच्छा केली ।   
एकाएकी आली गेली । रहस्य यांतील कथावें ॥ ९५ ॥   
सद्गुरु वदते ते काळीं । संकटें घालिती भक्तमंडळी ।   
पादुका ठेविल्या होत्या जळीं । तेणें ऐसें जाहले ॥ ९६ ॥   
तंव सांगलीहून वर्तमान । आलें हरिलें श्रींनी विघ्न ।   
सकळीं आश्चर्य पावोन । गुरुचरणा वंदिती ॥ ९७ ॥   
असो ऐसी गुरुमाउली । बहुतांचे उपयोगा आली ।   
स्वयें तरोनि तारिली । जनसंख्या अनिवार ॥ ९८ ॥  
॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः पंचमः समासः ॥   
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥  
 
  
अध्याय दहावा  समास सहावा
 
  
नमो रावणमदहारी । देहबंधनमुक्तिकारी ।   
बिभीषण साह्यकारी । अघनाशना रघुपते ॥ १ ॥   
नमो सीताशोकविनाशना । अखिलसाधुमनरंजना ।   
भरतप्रिय वियोगहरणा । नृपाधीशा नमो तुज ॥ २ ॥   
रामनाम साधनसार । इतर साधनें निःसार ।   
कलियुगीं भव दुस्तर । तार्क नौका रामनाम ॥ ३ ॥   
गुरु सर्वज्ञांचा राजा । मेळवी नामधारक फौजा ।   
प्रत्यक्ष करोनि दाविती काजा । नामपुण्यप्रतापें ॥ ४ ॥   
ऐसा करीत उपदेश । नामीं लाविती नरांस ।   
विप्रश्रेष्ठ विद्वज्जनांस । हें कांही मानेना ॥ ५ ॥   
म्हणती विप्र वेदाधिकारी । त्यासी पूज्य गायत्री ।   
इतर वर्ण नामाधिकारी । विप्रांसी हे अनुचित ॥ ६ ॥   
गायत्रीमंत्र वेदसार । विप्रासी तारक आधार ।   
श्रुतिस्मृतिपुराणांचा विचार । पूज्य एक गायत्री ॥ ७ ॥   
ऐसा असतां आधार । भुलविती बोधूनिया नर ।   
रामनाम म्हणोनि सार । जपानुष्ठानें करविती ॥ ८ ॥   
ऐसियानें भ्रष्टता घडे । वेदश्रद्धा समूळ उडे ।   
म्हणोनि लाविती वांकडें । सद्गुरूंसी ॥ ९ ॥   
महाराज वदती सर्वांसी । ’जमा सर्व एके दिवशी ।   
नामचि तारख विश्वासी । शंका फेडूं साधार’ ॥ १० ॥   
ऐसे वदतां गुरुवर । सकळां मानला विचार ।   
दिवस नेमून दरबार । भरला सुज्ञ द्विजांचा ॥ ११ ॥   
सद्गुरु वदती द्विजांसी । ’तुम्ही ज्ञानी गुणराशी ।   
मी तो अज्ञ माणदेशी । सलगी करितों गुरुकृपें ॥ १२ ॥   
विप्रांसी गायत्री प्रमाण । किंबहुना केवळ प्राण ।   
याचि सिद्धीनें विप्रगण । वंद्य झालें मानवा ॥ १३ ॥   
अखिल देवता ज्याचे अधीन । तयासी हीन म्हणेल कवण ।   
जें वेदांचें मूळस्थान । शब्दब्रह्म बीजरूप ॥ १४ ॥   
अघनाशक ज्ञानदाता । मंत्रराज नसे यापरता ।   
परि साधकाअंगीं पात्रता । असतां बरें ॥ १५ ॥   
वेचोक्त मंत्र प्रतापवंत । शुद्ध भूमिके सिद्धी देत ।   
तयालागीं सतत । वैराग्य पाहिजे ॥ १६ ॥   
यास्तव ऋषि महाज्ञानी । अलिप्त होते सर्वांपासोनी ।   
नदी तडाग निर्जनवनीं । पर्णकुटिके राहती ॥ १७ ॥   
समस्त राजे शरणागत । देवही थरथरां कांपत ।   
परि वैराग्य कडकडित । एकभुक्त अजिनशय्या ॥ १८ ॥   
आहारविहास सत्त्वस्थ । कार्याकारण देह रक्षित ।   
मंत्रसिद्धी तयांप्रत । हस्त जोडून उभी असे ॥ १९ ॥   
त्यांचेचि वंशज सगोत्र । तेचि परमपावन मंत्र ।   
परि तेज शांति सिद्धि मात्र । कोणापाशीं दिसेना ॥ २० ॥   
तैसें बंधविमोचक ज्ञान । तयासी गेले मुकोन ।   
कोरडा राहिला अभिमान । समाधान नाही ॥ २१ ॥   
भूमिका शुद्ध प्रेरक शुद्ध । आहारविहार असतां शुद्ध ।   
तरीच होय मंत्र साद्य । पहावें धर्मग्रंथी ॥ २२ ॥   
पर्जन्यसूक्तें वाहती धारा । आतां येईना शुष्क वारा ।   
सूक्ष्म स्थिती अवधारा । कैसी आली ॥ २३ ॥   
कृपा शाप सत्ता दोन्ही । दर्भ शर कोण न मानी ।   
यास्तव आहारविहारसरणी । शुद्ध पाहिजे शास्त्रोक्त ॥ २४ ॥   
कलि होवोन सबळ । ब्राह्मण्यासी झाला काळ ।   
तेणें मंत्रसिद्धीचें बळ । विफल होत चालिलें ॥ २५ ॥   
विप्र झाले विषयासक्त । वैभवेच्छा वाढली बहुत ।   
वेदपठण जीवितार्थ । कांही शेष राहिले ॥ २६ ॥   
सत्त्वगुण लया गेला । विप्र रजोगुणी बनला ।   
त्याहीवरी तम आला । चित्तक्षोभ करीतसे ॥ २७ ॥   
देहसुखा लोलुप झाले । तेणें शुद्ध ज्ञानासी मुकले ।   
अशाश्वतें शाश्वत ग्रासिलें । कालानुरोधें ॥ २८ ॥   
आहार विहास संगति । वर्णाश्रमातें बुडविती ।   
ऐसी विपरीत कालगति । कर्म सांग घडेना ॥ २९ ॥   
शक्य तितुकें करावें । परि त्यावरी न विसंबावें ।   
चित्तशुद्धीस्तव घ्यावें । रामनाम निर्बंध ॥ ३० ॥   
पुढील भविष्य जाणोनि । सुलभ नाम कथिलें ज्यांनी ।   
वेद पुराणें संतवाणी । स्वानुभवही तैसाचि ॥ ३१ ॥   
कृतयुगीं ध्यान करणें । त्रेतायुगीं हवन देणें ।   
द्वापारीं देवतार्चनें । कलीं साधन कीर्तन ॥ ३२ ॥   
ऐसें बहुतीं पुराणीं । वदली श्रीव्यासवाणी ।   
यास्तव श्रेष्ठ सर्वांहुनी । नाम साधन कलियुगीं ॥ ३३ ॥   
साडेतीन कोटी जप होतां । चित्ताची जाय मलिनता ।   
तेरा कोटी सांगता । जन्ममृत्युची’ ॥ ३४ ॥   
विप्र वदती सद्गुरूंसी । ’वेदाज्ञा दावा आम्हांसी ।   
आधुनिक संतवाक्यासी । न गणूं प्रमाण’ ॥ ३५ ॥   
सद्गुरु वदती ते समयीं । ’उपनिषदें आणा लवलाही ।   
अथर्वणवेदांतर्गत पाही । कलिसंतरणोपनिषत् ’ ॥ ३६ ॥   
तत्काळ उपनिषदांसी । आणविलें त्या समयासी ।   
शोधूनियां छंदांसी । अर्थ बोला वदती गुरु ॥ ३७ ॥   
 
विद्वज्जनीं विवरण केला । नाममहिमा जो वर्णिला ।   
साडेतीन कोटी जपाला । करितां होय चित्त शुद्धि ॥ ३८ ॥   
कलियुगीं नामचि श्रेष्ठ । इतर साधन वृथा कष्ट ।   
ऐसा आधार श्रीगुरु स्पष्ट । दावोनि देती द्विजांसी ॥ ३९ ॥   
’साधु वेदबाह्य वदती । ऐसी तुम्हां शंका होती ।   
परि वेदगुह्य साधूच जाणती । इतरां गूढ कळेना ॥ ४० ॥   
वेदां जें अगोचर । तेंचि साधु स्वयें सार ।   
यास्तव शंका अणुभर । सिद्धवचनीं न धरावी ॥ ४१ ॥   
वेद तरी ईशस्तुति । नामही नव्हे नरकीर्ति ।   
जेथें वेदांची उत्पत्ति । त्या आधीं हरिः ॐ ॥ ४२ ॥   
स्वधर्मकर्में नित्य करितां । चित्ताची जाय मलिनता ।   
परि तीं सांग न घडतां । महादोष बोलिले ॥ ४३ ॥   
नाम घेतां दोष हरती । अवाक्षर होतांही मुक्ति ।   
लयकारण तयांप्रति । वाल्हा म्हणे ’मरा मरा’ ॥ ४४ ॥   
नाम साधन अनादि । शांति पावले शिवादि ।   
कलियुगीं तराया भवाब्धि । विशेषत्वें वर्णिलें ॥ ४५ ॥   
रामनाम आणि वेद । उभय साधनें जगद्वंद्य ।   
परि आहाराविहारादि बंध । वैदिककर्मा मुख्यत्वें ॥ ४६ ॥   
प्रस्तुत तें बंधन सुटलें । यास्तव सुलभ नाम प्रतिष्ठिलें ।   
वेदां अंतर्बाह्य संचलें । नाही आणिकें पाहुणें ॥ ४७ ॥   
आणिक परिसा अभिप्राय चतुर । नामधारकें वेदीं अनादर ।   
करितां त्यासी सुविचार । केव्हांही म्हणूं नये ॥ ४८ ॥   
वेदपुरुष नारायण । वेदवक्ता भगवान ।   
वेद तोषवी जगज्जीवन । वेद मूळ जगतासी ॥ ४९ ॥   
वेद आणि नाम । भिन्न माणणें हाचि भ्रम ।   
आदिपुरुषापासोन दोहींचा उगम । स्थळ वेळ एकचि’ ॥ ५० ॥   
असो ऐसें समाधान । सकलांचें केलें पूर्ण ।   
मग नामगजर करोन । सकल गुरूंसी वंदिती ॥ ५१ ॥   
समर्थांसी ऐसी रीती । जरी नाम उपदेशिती ।   
तरी वैदिक करविती । अत्यादरेंकरोनी ॥ ५२ ॥   
नित्य शनिवार गुरुवार । अभिषेक सर्व देवांवर ।   
रूद्र पवमानसूक्तें प्रकार । ज्यासी प्रिय ते तयासी ॥ ५३ ॥   
दोनवार पुरश्चरण । गायत्रीचें करविती गहन ।   
रुद्रस्वाहाकार वेदपठण । विप्रांकरवी करविती ॥ ५४ ॥   
नित्य उपासनेभीतरीं । चतुर्वेदसेवा बरी ।   
चाले श्रीगुरूंचे घरीं । श्रोते तुम्ही अवधारा ॥ ५५ ॥   
वाराणसीं पंढरीस । करविती वेदघोषास ।   
दक्षिणा देवोन बहुवर । वेदज्ञ विप्रां पूजिती ॥ ५६ ॥   
गोंदवल्यासी वैदिक किती । सद्गुरु आदरें ठेविती ।   
क्षेत्र देवोन कुलगुरुप्रति । सदा सन्निध ठेविलें ॥ ५७ ॥   
यजुर्वेदी गुरुवर । परि चहूं वेदीं अत्यादर ।   
एकदां एक प्रकार । घडला तो परिसावा ॥ ५८ ॥   
मंदिरीं मंत्रपुष्पसमयीं । यजुःशाखी करिती घाई ।   
आदौ देवे म्हणतां पाहीं । ऋक्शाखी तापले ॥ ५९ ॥   
उभयतांचा चालला तंटा । यजुःशाखी अभिमान मोठा ।   
स्वशाखीं सद्गुरुमठा । मान यजुर्वेदासी ॥ ६० ॥   
ऋग्वेदी वदती ’ऐसे नव्हे । ऋग्वेद श्रेष्ठ स्वभावें ।   
तयासी आधीं मानावें । शास्त्ररूढी ऐसी असे’ ॥ ६१ ॥   
भांडत गेले गुरूंपाशी । श्रीगुरु वदती तयांसी ।   
ऋग्वेद थोर सर्वांसी । तोचि आधी म्हणावा । ॥ ६२ ॥   
ऐसें वदतां गुरुवर । यजुःशाखी झाले चूर ।   
आपुला अभिमान धरितील कीर । ऐसी आशा जयांसी ॥ ६३ ॥   
असो ऐसे गुरुराव । वैदिककर्में करिती सर्व ।   
परि नामसाधनीं दृढभाव । साधन सुलभ या कालीं ॥ ६४ ॥   
योगियां तेंचि कथिती । प्राणापाना कोंडितां निश्चितीं ।   
न होय वासनानिवृत्ति । एकदेशी बंधन ॥ ६५ ॥   
गुरु सर्वज्ञ सकलगुणें । क्वचित्काळीं वेदवचनें ।   
नेमकीं कथोन समाधानें । करिती वैदिकद्विजांचीं । ॥ ६६ ॥   
कधीं वेद नाहीं पढले । परि वेदगुह्य साध्य झालें ।   
तयांसी अज्ञेय नुरलें । अणुभरही त्रिकाळीं ॥ ६७ ॥   
नामें तुटती उपाधि । नामें सहजसमाधि ।   
नामें होय अनादि- । स्वरूपाशीं तन्मयता ॥ ६८ ॥   
आणिकही ये समयीं । एक गुरुबोध ठेवा हृदयीं ।   
शास्त्ररूढी लौकिक पाही । उपासनामदें न सोडावे ॥ ६९ ॥   
न दुखवितां परांतर । अगत्य करा कुलाचार ।   
परि नामीं रंगलें जयाचें अंतर । त्यासी बंधन नसे हें ॥ ७० ॥   
नामें होय ज्ञानोदय । नामें होय वासनाक्षय ।   
नामें होय स्वयेंचि ध्येय । निर्विकार निजवस्तु ॥ ७१ ॥   
येणेंपरी नामसार । सकलां बोधिती गुरुवर ।   
नामीं लावोन असंख्य नर । तारिले आणी तारिती ॥ ७२ ॥   
इति श्रीसद्गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।   
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ७३ ॥   
॥ इति श्रीसद्गुगुलीलामृते दशमाध्यायांतर्गतः षष्ठः समासः ॥  
॥ इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥  
  
GO TOP 
  
 |