प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१७ जानेवारी

नाम व इतर साधने.


    Download mp3

नवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण इत्यादि क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे. मनुष्यप्राणी जन्माला आला की शिकायला सुरूवात करतो ती श्रवणापासूनच. मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्याकारणानेच त्यांना बोलता येत नाही. मनुष्यप्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो. म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे; आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो. नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात. त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याचे कारण नाही. एका इसमाला दुसर्‍या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला. पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला. अशा वेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही, त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरणभक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तींचे फळ मिळते.

भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी खूणगाठ बांधून ठेवा. भगवंताचे स्मरण कसे आहे ? बाकी सगळया गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे. बाकीची सर्व इंद्रिये जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही. तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा. कर्तव्याला चुकू नका, कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा; मुखामध्ये राम असू द्या. भक्ताने उपाधी बेताची, म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी. भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी. तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे. ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही. नामात प्रेम येणे जरूर आहे, याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे, म्हणजे त्यात प्रेम येईल. नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे. ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही. म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तर्‍हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.


१७. नामस्मरणाची बुध्दी झाली की आपले काम झाले.