प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

७ फेब्रुवारी

रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा.


    Download mp3

साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते. परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहूना, अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्य कमी होते. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात्‌ मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी.

आपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही. तुकारामबुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान झालेल्या पुरूषांची गोष्ट निराळी. आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल. खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात, आपण स्वतःदेखील त्याच्या आड येतो, तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले नाम चालू ठेवावे. शिवाय, देवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तके रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावे, आणि ते आपल्या आचरणात कसे येईल याचा सूक्ष्म विचार करावा. अशा मार्गाने जो जाईल त्याची हां हां म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल.


३८. समाधान हीच खर्‍या आनंदाची खूण आहे.