प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२१ जून

भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही.


    Download mp3

प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच. त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना. त्यावर तिने सांगितले की, हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही. असे म्हणून ती त्याच्या देहाजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही ? त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे. पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग ? तो सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे, असे आपण म्हणतो, पण आपण पापाचरण करायला भितो का ? तो आपल्याला पाहतो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का ? पण आपल्याला तसे वाटतच नाही. आपल्यासारख्या आस्तिकाला देव 'हवा' असे वाटते खरे, पण 'हवाच' असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते. प्रपंच 'असावाच' असे आपल्याला वाटते. आणि भगवंत मात्र 'असला तर बरं' असे वाटते. याच्या उलट 'भगवंत असावाच' आणि 'प्रपंच असला तर बरा' असे वाटायला पाहिजे. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे, आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही, अशीच कृती आपण करावी.

ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात; मग सुख कशात आहे ? पैसा सुख देतो का ? पैसा मिळविणे कठीण, मिळाला तर तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्वसुखी असा प्रपंचात कोण ? प्रत्येकाचे काही ना काही तरी गार्‍हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन. तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचे गार्‍हाणे संपत नाही ! प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत. म्हणूनच प्रपंच असत्य आहे, हा अनुभव प्रपंच देतो. त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी; अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे.


१७३. प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ.