॥ श्रीराम समर्थ ॥

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर महाराजकृत

अमृतघुटका

परिच्छेद ६ ते १०

६. अखंडपणे साधनात रहाण्याची आवश्यकता

सिद्ध म्हणू नये आपण | साधनीं असावे परिपूर्ण |
शंकर करीतसे साधन | वैराग्यशील योगी ऐसा दुजा आहे कोण |
शतकोटींचे काढूनि सार | पार्वतीसहित स्मरण करी शंकर |
इतर किंकराचा पाड कोण |
पाकनिष्पत्ति न होतां | क्षुधा न वारे सर्वथा |
साधनाविणें आत्मज्ञान | नोहे नोहे सत्य जाण ॥६॥


माझे साधन परिपूर्ण होऊन मी सिद्ध, आत्मज्ञानी झालो आहे (आणि यापुढे आपल्याला साधन करण्याची जरूरी नाही) असे साधकाने कधीही म्हणू नये. त्याने सतत सर्वतोपरी साधनात मग्न असावे. याचे उदाहरण - साक्षात् शंकरदेखील सदा साधनात मग्न रहातो. वास्तविक पाहता त्याच्याइतका पूर्णपणे विरक्त आणि योगी (परमात्मचिंतन क्षणमात्रही न सोडणारा) दुसरा कोण आहे? वाल्मिकीने रचिलेल्या शतकोटी रामायणाचे शंकराने जे सार काढले ते म्हणजे रामनाम; त्या रामनामाचे अखंड स्मरण शंकर पार्वतीसह करीत असतो. मग क्षुद्र मानवाचा काय पाड? (त्याने अखंड रामनाम घेतले पाहिजे हे उघडच आहे). अन्न शिजवून तयार करून ते खाल्ल्याशिवाय (नुसत्या बोलण्याने) भुकेचे निवारण होत नसते. याच न्यायाने तू समज की साधन केल्याशिवाय आत्मज्ञान होणे खरोखर सर्वथैव अशक्य होय. ॥६॥
सिद्ध म्हणू नये आपण - योगविद्येच्या बळाने काही असामान्य शक्ती किंवा सिद्धी मिळविलेल्याला 'सिद्ध' असे म्हणण्याचा प्रघात आहे. वास्तविक पाहता, परमात्मा हे परमोच्च साध्य ज्याने मिळविले आहे तोच खरा सिद्ध आणि त्याच अर्थाने श्रीमहाराजांनी हा शब्द वापरला आहे.


आत्मज्ञान झाले म्हणजे कार्यभग संपला असे होत नाही. आणखी साधन करून ते अंगी मुरवावे लागते; इतके की मला आत्मज्ञान झाले आहे ही जाणीवही उरता कामा नये; कारण अशी जाणीव म्हणजेच सूक्ष्म अहंकार आणि त्यातच अविद्येचे बीज आहे. म्हणून 'मी आत्मज्ञानी आहे' असे ज्याला म्हणावेसे वाटते तेथे अपूर्णता शिल्लक आहे असे निश्चितपणे समजावे, असे श्रीमहाराज बजावतात. ते स्वतःलाही 'साधक'च म्हणवतात. (बिंदु २४ - अमृतघुटका सांगितला 'साधके' जाण |)
साधन - साध्य मिळविण्यास उपयोगी पडणारी गोष्ट किंवा उपाय. शंकर करीत असलेले साधन म्हणजेच रामनामस्मरण.
वैराग्य - या जगातील उपभोग्य विषयासंबंधी किंवा इकलोकी पुण्यकर्म करून परलोकी मिळणार्‍या उपभोग्य विषयासंबंधी वासना नसणे; अनासक्ती.
योगी - (युज् - जोडणे) परमेश्वराशी सतत जोडलेला, त्याच्यापासून कधीही विभक्त म्हणजे दूर नसणारा, त्याच्याशी वियोग नसणारा तो योगी. अशा या महान शंकाराने लोककार्यार्थ हलाहल विष प्राशन केले असता झालेला अंगाचा दाह कोणत्याच उपायाने कमी न होता अखेर केवळ रामनाम घेतल्यानेच शमला आणि यानंतरही त्याने रामनाम कधीच सोडले नाही. रामनामाचा हा अद्वितीय प्रभाव पाहून विश्वजननी पार्वतीही रामनामस्मरण करू लागली (बिंदु १६). पतिपत्‍नीची समनिष्ठा व सहकार्य असेल तर त्या जोडप्याचा प्रपंच तसा परमार्थही गोड होऊन तो इतरांना अनुकरणीय होतो.


७. स्वस्वरूपीं लीन होणे हे साधन; नुसत्या बोलण्याने कोणी ब्रह्म होत नाही.

स्वस्वरूपीं व्हावे लीन | हे एक तर्‍हेचे आहे साधन |
कोणी म्हणे 'कां करावें साधन? | आम्ही अहंब्रह्म निर्मळ |
आम्हा नाही पापाचा मळ' | ऐसें बोलती दुर्जन खळ |
आम्हीं ऐसें बोलतां | ब्रह्म न होय सर्वथा ॥७॥


स्वस्वरूपाशी तादात्म्य पावणे हे एक प्रकारचे साधन आहे. यावर कोणी शंका काढील की, 'साधन करण्याची आम्हांला काय जरूरी? आम्ही ब्रह्मस्वरूप आहोत, शुद्ध आहोत, आमच्या ठिकाणी पापाचा मळ नाही.' दुर्जन व वाकड्या बुद्धीचे लोक असे बोलत असतात. आम्ही ब्रह्म आहोत असे नुसते म्हटल्याने काही कोणी ब्रह्म होत नाही. ॥७॥
स्वस्वरूप - स्वस्वरूप म्हणजे आपले खरे स्वरूप. परमात्मा हे आपले खरे स्वरूप आहे. माझा देह म्हणजे मी असे अज्ञानाने वाटते, पण देह हे स्वस्वरूप नव्हे.
स्वस्वरूपी व्हावे लीन - सगुण भक्तीने, विशेषतः नामस्मरणाने, स्वस्वरूपी मिळून जावे हे साधन श्रीमहाराजांनी 'अमृतघुटका' या ग्रंथात जागोजागी सांगितले आहे हे पुढील अवतरणांवरून स्पष्ट होईल -

बिंदु ८ - जाणोनि स्वस्वरूपाची खूण | साधनीं असावे परिपूर्ण |
बिंदु १० - आपले स्वरूपीं मिळोनि जावे |
बिंदु २० - आपले आपण स्मरण करावे |
बिंदु १५ - निर्गुणाची जाणोनि खूण | सगुणाचे करावे ध्यान | (सगुण भक्ती)
बिंदु १८ - राघवाचे भक्तीवीण | म्हणे मज झाले आत्मज्ञान | तोचि दैवहीन पापी जाण |
बिंदु १५ - श्रीरामचिंतन करीत जाई | (नामस्मरण)
बिंदु २२ - परेपासूनि वैखरीपर्यंत करावे रामचिंतन | वैखरीशी रामनामेविणे न पडावे खण्डन |
बिंदु २४ - रामनाम जाणा रे अक्षरे दोन | गुरूमुखे करावी ओळखण |

एकतर्‍हेचे - आत्मज्ञानाची अन्य साधने हठयोग, कर्म, ज्ञानसाधन इ. आहेत.
अहंब्रह्म - 'तत्वमसि - तू तेच आहेस, म्हणजेच तू परमात्मा आहेस. अहं ब्रह्मास्मि - मी ब्रह्म आहे' असे उपनिषदात सांगितले आहे.
दुर्जन खळ - मी ब्रह्म आहे, निष्कलंक आहे अशासारख्या उपनिषद् वाक्यांचा आधार घेऊन काही लोक स्वैरवर्तन करतात, पाखंडीपणे बोलतात, म्हणून अशा लोकांना येथे दुर्जन, खळ असे म्हटले आहे.
ब्रह्म - ब्रह्म म्हणजे सर्व विश्वात भरून राहिलेले अंतिम परमात्मतत्व.


८. देहबुद्धी सोडण्याचा प्रयत्‍न करीत साधन करावे

सोडूनि द्यावा देहाचा संबंधू | मग तोचि ज्ञानाचा सिंधु |
मार्ग चालत असतां |
कांही पहावयाचें नसोनि कारण | सहज नेत्रांपुढे दिसे जाण |
दुजा शब्द बोलतां | अभिमान उठे चित्ता |
ही एक देहाचीच गती | म्हणोनि साधनीं असावी वृत्ति |
ज्ञानदशा प्राप्त जाहली | तरी वृत्ति पाहिजे सांभाळली |
जाणोनि स्वस्वरूपाची खूण | साधनीं असावे परिपूर्ण ॥८॥


देह आणि देहाशी संबंध असणार्‍या व्यक्ती व वस्तू यांच्याबद्दलचे ममत्व व आसक्ती टाकून द्यावी, म्हणजे मनुष्य आत्मज्ञाना सागर बनतो (पूर्ण आत्मज्ञानी होतो). (पण देहबुद्धी सोडणे कठीण असते, कारण ती, म्हणजेच अहंभाव, आपल्या रोमारोमात भिनलेली असते. उदाहरणार्थ) काही विशिष्ट हेतू मनात नसता, रस्त्याने चालत जाणार्‍यालाही सहजगत्या विविध वस्तू (दुजेपणाने) डोळ्यांपुढे दिसतात; किंवा दुसरा काही बोलतो आहे असे अस्पष्टपणे ऐकू आले तरी (हे मजबद्दल असेल असे वाटून माणूस लगेच कान टवकारतो, कारण) अभिमान जागृत होतो. हा देहबुद्धीचाच परिणाम होय. ही खोल मुरलेली वृत्ती नष्ट करणे जरूर आहे, म्हणून तिला साधनात गुंतविली पाहिजे. (ही वृत्ती इतकी जबरदस्त आणि चिवट असते की) आत्मज्ञान प्राप्त झाल्यावरही वृत्ती फार सावधपणे कह्यात ठेवावी लागते. देहबुद्धीपासून सर्वस्वी अलिप्त असणे हेच स्वस्वरूपप्राप्तीचे लक्षण आहे असे ध्यानात ठेवून अखंड साधनात मग्न असावे. ॥८॥


९. मुमुक्षुत्व आणि साधन करण्याची तयारी या दोन
गोष्टींची आत्मज्ञानासाठी अत्यंत जरूरी आहे.


वेदान्ताचे सार | तीर्थांचे माहेर |
या साधनाचे केवळ घर | याहूनि नसे थोर |
पुढें ऐका हा विचार | मुमुक्षूनें पहावी खूण |
साधनाचें लक्षण | मुमुक्षु नसतां घाली कपाळीं आठी |
त्रासूनि आपुने पोटी | वृथा करी चावटीं | त्याचें नोहे हें काम |
गाईची कसाबास न ये दया | जारिणीस बालकाची नसे माया |
तैसा मुमुक्षु साधक नसतां देख | तो कुतर्की होय बाधक |
आतां पारमार्थिक तुम्ही जन | शुद्ध साधनाची ऐका खूण ॥९॥


('साधनी असावे परिपूर्ण' असे मी सांगितले, यावर आपण विचाराल की 'कोणते ते साधन?' याचे उत्तर मी देतो ते असे - ते साधन म्हणजे स्वस्वरूपीं लीन होणे; म्हणजेच 'मी श्रीराम आहे' असे चिंतन, अशी अखंड धारणा करणे. श्रीरामचिंतन 'राम राम राम' म्हणण्याने, नामस्मरणाने होते; म्हणून नामस्मरण हे ते साधन होय.)

नामस्मरण हे साधन वेदांताचे तात्पर्य, पावित्र्याचे माहेरघर, आत्मज्ञान करून देणार्‍या सर्व साधनांचे साक्षात् राहते घर आहे. (नामस्मरणापेक्षा) दुसरे थोर साधन नाही. अशा या साधनाचे सर्वांगीण स्वरूप काय आहे याबद्दलचा विचार मी पुढे सांगणार आहे तो तुम्ही ऐका - आपण मुमुक्षु (मुक्त होण्याची खरी तळमळ असणारे) आहोत की नाही याचा आधी पडताळा घ्याचा. मग साधनाचे स्वरूप समजून घ्यावे.

मनुष्य मुमुक्षु नसल्यास तो (आत्मज्ञानाच्या गोष्टी निघाल्या की त्याबद्दल) तिरस्कार दाखवतो आणि मनात चिडून निष्कारण टवाळी करू लागतो. आत्मज्ञान मिळविणे हे टवाळखोराचे, व्यर्थ बडबड करणार्‍याचे काम नव्हे.

आता ज्याप्रमाणे कसायाला गाईबद्दल, व्यभिचारिणी स्त्रीला आपल्या पोटच्या बाळाबद्दल दयामाया (कळकळ) असत नाही, त्याप्रमाणे ज्या मुमुक्षुला साधनाबद्दल कळकळ नसते आणि जो साधनेचे परिश्रम करण्यास तयार नसतो, तो साधनाबद्दल कुशंका काढीत बसतो आणि (स्वतःच्या आणि दुसर्‍याच्या हिताला) बाधक होतो. पारमार्थिक जनहो, (ही मुमुक्षुत्वाची आवश्यकता धानी ठेवून) आता तुम्ही शुद्ध साधनाचे स्वरूप ऐका. ॥९॥
तीर्थांचे माहेर - अंत:करणाची शुद्धता, दान, सज्जनांची सेवा, भूतदया, इ. सद्गुण ज्यामधून उत्पन्न होतात असे साधन.
या साधनाचे केवळ घर - म्हणजे आत्मज्ञान करून देणारी सर्व साधने ज्याच्यात समाविष्ट होतात असे साधन म्हणजे नामस्मरण (बिंदु २४). इतर साधनांनी जे साधते ते नामस्मरणाने सुलभपणाने साधते.
नामस्मरणात इतर साधनांचा समावेश होतो. ते सर्वश्रेष्ठ साधन आहे. याचा खुलासा बिंदू १५ मध्ये आहे. ते कसे करावे ते बिंदू १६ व २२ मध्ये सांगितले आहे.
पुढे ऐका हा विचार - बिंदू १०, १५, १६, २२, २४.
मुमुक्षु नसतां - दारिद्र्य, ब्यसन, गुलामगिरी अशासारख्या दु:खातून सुटावयाचे झाल्यास आधी तीव्र इच्छा व कष्ट करण्याची तयारी पाहिजे, नाहीतर मनुष्य नुसतीच बडबड करीत बसतो. त्याप्रमाणे मनुष्य मुमुक्षु नसला तर नुसतेच बोलत राहतो. माझा नवरा रोगी, दरिद्री आहे, तो माझी कसलीच हौस भागवत नाही, सुख देत नाही, मी आपला जन्म दु:खात का काढावा ? अशा प्रकारे व्याभिचारिणी स्त्री आपल्या दुर्वर्तनाचे समर्थन करून पातिव्रत्याबद्दल कुतर्कीपणाने बोलते. मुमुक्षु साधक नसल्यास तो सगुण उपासना, नामस्मरण, गुरूची आवश्यकता, इ. गोष्टींबद्दल पाखंडीपणाने बोलतो. अशा त्याच्या कुतर्की विचारसरणीने तो आत्महिताचा घात करतो आणि आपल्या बोलण्याने व वागण्याने दुसर्‍याचाही बुद्धिभेद करून त्याच्याही हिताला बाधा आणतो.
शुद्ध साधन - याबद्दल पुढे विचार आलेला आहेच. ज्याच्या योगाने देहबुद्धी बळावते ते अशुद्ध साधन होय. उदा., शब्दज्ञान, योगसामर्थ्याच्या मागे लागणे. दृश्यासंबंधीचे ज्ञान हेही परमार्थाच्या दृष्टीने अशुद्ध ज्ञान होय. (दासबोध दशक ५ समास ५ व ६ पहा)


१०. आत्मज्ञानाचा मार्ग आणि त्याचे फळ

मी-माझेपणाचा टाकूनि आळ | शुद्ध ज्ञानामाजीं रहावें सर्वकाळ |
निरिच्छ सदा असावे | मन जाळोनि स्वस्थ बसावे |
आपुले स्वरूपी मिळोनि जावे |
वासनेचे बीज जाळोनि आत्मज्ञान पहावे | त्याने पुनर्जन्मासी न यावे ॥१०॥


माझा देह म्हणजेच मी आणि देहाच्या निमित्ताने ज्यांचा संबंध आला त्या व्यक्ती व वस्तू यांबद्दल ममत्व, माझेपणा हे दोन्ही मिथ्या आरोप होत. या खोट्या कल्पना टाकून, आपल्या खर्‍या म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या जाणिवेत, (म्हणजेच नामस्मरणात) सर्वकाळ रहावे. म्हणजेच नेहमी निरिच्छ, वासनारहित होण्याच्या प्रयत्‍नात असावे. चंचलपणा, हवे-नकोपण (हा मनाचा स्वभावधर्म तो) मोडून काढून त्याला स्वस्थ, स्थिर, वासनारहित करावे व आपल्या खर्‍या स्वरूपांत लीन होऊन जावे. वासनेचे मूळ बीजच नष्ट केले म्हणजे आत्मज्ञान होते, ते करून घ्यावे आणि त्यायोगे जन्ममरणाच्या पुनरावृत्तीपासून मुक्त व्हावे. ॥१०॥

* * * * *