॥ श्रीराम समर्थ ॥

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर महाराजकृत

अमृतघुटका

परिच्छेद १६ ते २०

१६. विकार जिंकून मन:पूर्वक अखंड नामस्मरण करावे

वैखरी क्षणभरही न रहावी जाण | कामक्रोधांचा घ्यावा प्राण |
मग वाल्मिकींचे सार | प्रल्हादाचा भाव थोर |
मारुतीची अंतरमाळ | शिवाचा भावशोध फार |
पार्वती विश्वजननी करी नेम | हेंचि जपे 'राम राम राम' |
ऐशा नेमाची होय हातवटीं | मग प्राणी कधी न होय कष्टी ॥१६॥


रामचिंतन कसे करावे ते आता सांगतो. वैखरीने रामनामाचा जप क्षणमात्रही न थांबता करावा. कामक्रोधादि विकारांचा प्राण घेऊन (त्यांना पूर्णपणे जिंकून) 'राम, राम, राम' असा अखंड जप करावा. याचा दररोज काही वेळ अभ्यास करीत जावा. (असा अभ्यास केल्याने काय साधेल ते सांगतो.) रामनाम हे वाल्मिकीच्या जीवनाचे सारसर्वस्व होय. या भगवन्नामाबद्दल बापाने केलेल्या अनंत हालअपेष्टा सोसूनही प्रल्हादाने अत्यंत निष्ठा बाळगलीए. मारूती रामनामाची अखंड माळ आपल्या अंतःकरणात ठेवतो. शंकर अत्यंत शुद्ध भावनेने (अनन्यतेने) नाम जपत असतो. विश्वमाता पार्वतीसुद्धा सतत नामच जपत असते. इतक्या निष्ठेने, शुद्ध भावाने, अखंडपणे जप करण्याची जो सवय लावून घेईल तो प्राणी कधीच कष्टी होणार नाही, आत्मानंदात सदा मग्न होऊन राहील. ॥१६॥
वैखरी - वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा अशा चार प्रकारच्या वाणी आहेत. वाणी किंवा शारदा ही सच्चिदानंदाची ज्ञानमय महाशक्ती होय. ती शुद्ध जाणीवमय असून ओंकाररूपाने नाभिस्थानी वास करते, तिला 'परा' म्हणतात. केवळ जाणीवरूप असणारी परा जेव्हा अनुभवात शिरलेल्या वस्तूचा, घटनेचा अर्थ पाहते तेव्हा तिला 'पश्यंती' असे म्हणतात. हृदय हे तिचे स्थान असून ती केवळ अर्थमय असते. भाषेच्या स्वरूपात व्यक्त नसते. तिसरी, कंठस्थित असणारी ती 'मध्यमा'; ही चिंतनात्मक, शब्दमय असते परंतु व्यक्त उच्चार नसतो. सूक्ष्म अर्थ आणि स्थूल जगत् यांना जोडणारी म्हणून 'मध्यमा'. ह्या 'मौनभाषेला' गळ्यात स्वररूप देऊन शब्दरूपाने ओठ, जीभ, दांत वगैरेच्या साह्याने तोंडावाटे बाहेर पडणारी ती 'वैखरी'. या चारी वाणी एकमेकींशी संलग्न असल्यामुळे आपण बोलतो त्या शब्दामागे तिन्ही वाणींची हालचाल असतेच, ती आपल्या ध्यानात येत नाही इतकेच.


१७. "नित्यनेम करावा दृढ"

नित्यनेमें चुके भवबंधन | सहज होय समाधान |
ऐसें अभ्यासावें मन | मग अंतकाळीं वासना दुजी न उठे जाण |
नित्यनेम करावा दृढ |
नेम दृढ जाहल्यावरी | देहात्मबुद्धी न राहे सकळ |
ऐसें न होय जरी | दु:ख भोगावें जन्मवरी |
यमयातना क्लेश भारी | न चुकेचि निर्धारीं |
क्लेशें फिरावें चारी खाणी |
दु:खशोकासि नाही गणना | यांत संदेह नाही जाणा ॥१७॥


(नामस्मरणाच्या) नित्यनेमाने साधक संसारपाशातून, भवबंधनातून, वासनेच्या बंधनातून मुक्त होतो. नित्यनेमाने सर्व परिस्थितीत समाधान सहज राखता येते, तो स्वभावच होऊन जातो. म्हणून ज्याच्या योगाने नामस्मरण सतत टिकेल असा मनाचा अभ्यास करावा, असे त्याला वळण लावावे. मग अंतकाळी नामस्मरणाच्या वासनेशिवाय दुसरी वासना मनात उठणारच नाही. अंतकाळी देखील नामस्मरण टिकावे म्हणून नित्यनेम अभ्यासाने बळकट करावा. तो बळकट झाल्यावर देहबुद्धी हळूहळू क्षीण होत जाऊन शेवटी पुरी नष्ट होईल. असे जर न झाले (म्हणजे जर देहबुद्धीचा नाश झाला नाही) तर मरेपर्यंत दु:ख भोगावे लागेल, अंतकाळी असह्य क्लेश व यमयातना भोगाव्या लागतील, त्या टळणार नाहीत यात मुळीच संशय नाही. मरणोत्तर पुन्हा जन्म, पुन्हा मरण असे होत चारी खाणीत जन्म घेत क्लेशाने जीवाला फिरावे लागेल. वारंवार व पूर्ववत् अगणित दु:खशोक भोगावे लागतील यात शंका नाही असे समजा. (म्हणून वेळ न गमावता अतिशय तळमळीने व प्रेमाने रामनामस्मरण करावे म्हणजे दु:खमुक्ति होईल.) १७
अभ्यासावे - जसे व्यवहारात त्याप्रमाणे परमार्थातही अभ्यासाचे म्हणजे सतत प्रयत्‍नाचे मोठे महत्त्व आहे. अभ्यासाने असाध्य ते साध्य होते.
क्लेश - ज्यांना आजवर आपण प्रिय मानले अशा व्यक्तिंना सोडून जाताना, तसेच जे धन व लौकिक आपण कष्टाने मिळविला ते धन व लौकिक सोडून जाताना जिवाला फार वेदना होतात.
यमयातना - मरणाच्या वेळी मृत्यूबद्दल जीवाला फार भय वाटते. जिवंत असताना आपल्या हातून्न जी पापे घडली त्याचे शासन यम आपल्याला देईल असे वाटते. त्याचप्रमाणे मेल्यानंतर आपल्याला कसा जन्म मिळणार आहे याबद्दलही जीव अंधारात असतो. म्हणून त्याला पुढील जन्माबद्दलही भय वाटते. या विचारांनी त्याला यातना होतात.
चारी खाणी - सजीव सृष्टीचे चार वर्ग (१) जमिनीतून वर येणारे म्हणजे गवत, वनस्पती, वेली, झाडे (उद्भिज) (२) घामापासून निर्माण होणारे जीवजंतू (स्वेदज) (३) अंड्यामधून बाहेर पडणारे म्हणजे पक्षी (अंडज) आणि मातेच्या योनिद्वारातून बाहेर पडणारे असे प्राणी म्हणजे पशू व मनुष्य (जरायुज अथव योनिज)


१८. आता तरी सावध होऊन शब्दज्ञानाच्या व भ्रमाच्या मागे न लागतां साधन करावे

आतां या जन्मींचे दु:खे होय दीन | हे मागील होतसे उगवण |
आतां राखावें सावधपण | स्वाधीन ठेवावे आपुले मन |
न पडावे भलते भ्रमाचे आटाआटीं | देह जातां होशील कष्टी |
मना पडशील बहु भरीं | तरी दुजें न येई पदरीं |
उन्मत्तपणाचें वारें जाण | ब्रह्मज्ञान आहे फार कठीण |
राघवाचे भक्तिवीण | म्हणे मज झालें आत्मज्ञान |
तोचि दैवहीन पापी जाण |
एकवीस सहस्त्र सहाशें जप | हे शिवाचे घरचे आहे माप |
सर्व देवांमाजीं शिरोमणि | योगी अयोनिसंभव लावण्यखाणी |
पूर्ण ब्रह्म गुणरहित |
सृष्टिकारणास्तव धरिला देह जाण | म्हणोनि करावे लागे साधन ॥१८॥


आता मनुष्य या जन्मातील दु:खाने केविलवाणा होतो याचे कारण म्हणजे (पेरलेले बी ज्याप्रमाणे उगवते त्याप्रमाणे) पूर्वीच्या जन्मांत बाळगलेल्या वासना आणि त्यानुसार केलेली कर्मे परिणामाच्या रूपाने या जन्मात उगवतात.

(हे लक्षात ठेवून पुन्हा अशी चूक घडू नये म्हणून) आता तरी सावध व्हावे (आणि वासनाक्षय करण्याच्या कामी लागावे). आपले मन कह्यात ठेवावे. भलत्या भ्रमाला बळी पडून उपद्व्याप करण्याच्या भानगडीत पडू नये; अन्यथा प्राण जाण्याच्या वेळी पश्चातापाने तुला कष्ट होतील. म्हणून तू मनाला असे समजावून सांगावे की, 'बा मना, तू नाना प्रकारच्या नादाला लागशील तर दु:खाशिवाय दुसरे काही तुझ्या पदरात पडणार नाही.' भक्तीवाचून ब्रह्मज्ञान होणे ही गोष्ट फार दुर्घट होय. (पण रामाच्या भक्तीमुळे ज्ञान सुलभतेने प्राप्त होते.) ताप फार वाढला म्हणजे होणार्‍या उन्मादवायूप्रमाणे, पोकळ शब्दज्ञान हे भयानक आहे असे समज. रामाची भक्ती अंगी नसताना 'मला ब्रह्मज्ञान झाले' असे म्हणणारा दुर्दैवी, पापी आहे असे समजावे. (म्हणून साधकाने पोकळ शब्दज्ञानाच्या नादी न लागता महान रामभक्त जो शंकर त्याचा आदर्श ठेवून रामभक्ती करावी). शंकर दररोज त्रयोदशाक्षरी तारकमंत्राची एकवीस हजार सहाशे जपसंख्या करीत असतो. वस्तुतः तो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ, योगविद्येत पारंगत, स्वयंभू, सौंदर्याची जणू प्रत्यक्ष मूर्तीच, पूर्ण ब्रह्मच, निर्गुण असा आहे. पण त्याने सृष्टिच्या कार्यासाठी देह धारण केला म्हणून त्याला सुद्धा साधन करावे लागले. (मग मनुष्याने साधन केले पाहिजे हे काय सांगायला पाहिजे? तेव्हा साधकाने नेमाने अधिकात अधिक जप करीत जावे.) ॥१८॥
भलता भ्रम - विषयांपासून सुख मिळते, शाब्दिक ज्ञानाने दु:खमुक्ति होते, समाधि लावल्याने देहबुद्धी नष्ट होते, ही भ्रमाची उदाहरणे होत.
बहु भरीं - भविष्यज्ञानासाठी धडपड, भूतपिशाच्च्यांना वश करून घेणे, मंत्राने कार्यसिद्धी किंवा द्रव्यार्जन करण्याचा प्रयत्‍न, हीन धातूचे सोने बनविण्याचा प्रयत्‍न असले नाना प्रकारचे अनिष्ट नाद.
उन्मत्तपणाचे वारे - उन्मादवायु झालेला मनुष्य बरळतो, त्याची हालचाल अनावर होते, तशी पोकळ ब्रह्मज्ञानी माणसाची स्थिती होते; तो अद्वैताच्या गप्पा मारतो, अद्वैताच्या नावावर स्वैर वर्तन करतो.
दैवहीन पापी - बिंदू ११ वरील टिपेत निर्देश केल्याप्रमाणे, इतर साधनमार्गात नानाप्रकारचे धोके असून एक भक्तिमार्गच आत्मज्ञान प्राप्त करून देऊ शकतो. असा सुलभ व खात्रीचा मार्ग सोडून धोक्याचा मार्ग पत्करून, अहंकार व वासना यांना वाव देऊन पुनः जन्ममरणाच्या फेर्‍यात गुरफटून जाणार्‍यांना 'दुर्दैवी' नाहीतर काय म्हणणार? पण हा अपाय एवढ्यावरच संपत नाही; कारण त्यांच्या ढोंगामुळे भाबडे लोक फसून नुकसान पावतात, त्या नुकसानीस जबाबदार म्हणून असले 'ब्रह्मज्ञानी' लोक पापीही ठरतात.


१९. "अंतर्निष्ठाची ही खूण"

कुण्डलिनी ब्रह्मरंध्रांत लाहे | तयानें विषबाधा न जाये |
समाधि लावूनि बसती देख | न तुटती देहाचे कलंक |
देहाचे संबंधी जाहली विषबाधा | तोही 'राम राम' करी सदा |
देहाचे स्मरण न राहे कुडी | तोंवरी रामनाम न सोडी |
म्हणोनि सांगितलें साधन | अन्तर्निष्ठाची ही खूण ॥१९॥


योगसामर्थ्याने कुण्डलिनी जागृत करून तिला ब्रह्मरंध्रापर्यंत नेता येते व तिचा अमृतस्त्राव होतो; परंतु शरीराला झालेली विषबाधा किंवा इतर व्याधी काही त्यायोगे दूर करता येत नाही; तसेच योगबलाने समाधि लावता आली तरी देहदोष (वैगुण्ये, व्याधि, मनोविकार, देहबुद्धी) फार तर समाधि असेतोपर्यंत स्थगित करता येतील, पण त्यांचे कायम निरसन होत नाही. (स्वतः प्रत्यक्ष योगिराज, परंतु) देहाला झालेली विषबाधा 'राम, राम' या जपानेच दूर झाली म्हणून शंकर अविरत रामनाम जपतो; इतके की त्यात देहभानही राहत नाही म्हणून (स्वानुभवावरून) तो ह्याच रामनामाच्या साधनाचा सर्वांना उपदेश करतो; रामनामावरील त्याच्या मनःपूर्वक निष्ठेचीच ही खूण होय. ॥१९॥
कुण्डलिनी - शरीरातील मणिपूर चक्राच्या ठिकाणी सर्पाच्या आकृतिरूपाने राहणारी प्राणरूप शक्ती.
ब्रह्मरंध्र - मृत्यूनंतर ज्यातून प्राण निघून जातो ते टाळूवरील गुप्त छिद्र.


२०. "रामरूप होऊनि करावें चिंतन"

सोडूनि षड्रिपूंचे बंधन | रामरूप होऊनि करावे चिंतन |
देहासाठी वागावें वेगळेपण | अन्तरी पहावें जग कैसे आहे कोण |
देहाचे असती अवयव | नामकरणीं भिन्न भाव |
तैसें दृश्यामाजीं रहावें |
अन्तरी पूर्ण चैतन्य ओळखावें | आपलें आपण स्मरण करावें ॥२०॥


काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या सहा मुख्य शत्रूंच्या दास्यातून मुक्त होऊन, आणि स्वतःसह सर्व विश्वात एक रामच भरून राहिलेला आहे या जाणिवेने त्या परब्रह्म रामाचे चिंतन करावे. आपण देह धारण केला असल्याने व्यवहारापुरते मात्र देहरूपाने दुजेपणाने वागावे. तथापि आपल्या अंतःकरणात या सृष्टीच्या सत्य स्वरूपाची जाणीव ठेवावी, आणि एकाच देहाचे असूनही निरनिराळ्या नावांनी ओळखले जाणारे अवयव ज्याप्रमाणे (वरकरणी) भिन्न, स्वतंत्र असल्यासारखे वर्तत असतात, त्याप्रमाणे दृश्य जगात व्यावहारिक वर्तन ठेवावे. सर्वत्र भरून राहिलेल्या परिपूर्ण अशा मूळ चैतन्याचे ज्ञान अंतर्यामी सतत राखावे, आणि आपणही तेच असल्यामुळे त्याचे म्हणजे स्वस्वरूपाचे सतत स्मरण रहावे. ॥२०॥

* * * * *