॥ श्रीराम समर्थ ॥

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर महाराजकृत

अमृतघुटका

परिच्छेद २१ ते २५

२१. प्रयत्‍नपूर्वक अभ्यासाने आत्मचिंतन साधते

आपण एक स्मरण एक | ऐसा संशय घेसी देख |
चित्त देऊनि थोडे ऐक | कागद शाई भिन्न देख |
लेखक होतां दोनी एक |
सुवर्ण होते घरी | करणी न करिता न होय सरी |
करणी जाहलिया देख | सोने आणि सरी एक |
तैसे अभ्यासावे साधन | मग प्रकृति पुरूष एक जाण ॥२१॥


(आपले आपण स्मरण करावे, असे मी सांगितले यावर) तू अशी शंका घेशील की, 'मी तत्वतः परमात्मा आहे हे मान्य; पण प्रत्यक्षात मी नेहमी विषयस्मरण करीत असतो, मग स्वस्वरूपस्मरण असाध्य दिसते. ते कसे साध्य व्हावे ?' (तुझ्या या संभाव्य शंकेचे मी निरसन करतो.) तर तू थोडे लक्ष देऊन ऐक.

असे पहा की कागद व शाई मुळात भिन्न वस्तू असतात. पण लेखकाने लिहिण्याचे काम केले म्हणजे शाई कागदावर उमटून दोन्ही एक होतात, अर्थ व्यक्त होतो. कागदावर आपणहून काही लेख उमटत नाही. (आता दुसरे उदाहरण सांगतो.) घरात सोने आहे पण त्यावर सोनाराने कारागिरी केली नाही, तर सोन्याची आपोआप सरी होत नाही. पण सोनाराने काम केले म्हणजे हे सोने आणि ही सरी अशा दोन भिन्न वस्तू रहात नाहीत, सोने आणि सरी एकच होतात.

या दोन उदाहरणांवरून तुला असे समजून येईल की जे आधी असाध्य दिसते ते प्रयत्‍न केल्याने साध्य होते. म्हणून तू नामस्मरणाच्या साधनाचा अभ्यास करावास म्हणजे प्रकृति व पुरूष, जगत् व परमात्मा, विषय व आत्मा हे द्वैत नाहीसे होईल, अद्वैताचा अनुभव येईल. (म्हणजेच आपले आपण स्मरण करणे, स्वस्वरूपात लीन होणे, तुला साधेल.) २१


२२."मुख्य साधनाचे सार"

निष्काम करोनि मन | परेपासूनि वैखरीपर्यंत |
करावे रामचिन्तन | हे मुख्य साधनाचें सार |
वैखरीशी रामनामाविणें न पडावें खण्डन |
कोठें न चळावें मन | हेंचि परेचें अधिष्ठान ॥२२॥


मनात वासना न बाळगता, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारी वाणींनी रामचिंतन करावे. नामस्मरण या मुख्य साधनाचे सार म्हणजे चारी वाणींनी नामस्मरण करणे. वैखरी वाणीला रामनामाव्यतिरिक्त अन्य बोलण्याने खंड पाडू नये. नामस्मरणातून मन विचलित होऊ देऊ नये. अशाच अभ्यासाने परावाणीने नामस्मरण करण्याचा पाया तयार होतो. ॥२२॥
परेपासून वैखरीपर्यंत करावे रामचिंतन - मागे बिंदू १६ वरील टीपांमध्ये चार वाणींबद्दल माहिती दिलेली आहे. आता चार वाणींनी रामस्मरण कसे करावे याचा खुलासा असा -


गुरूने दिलेल्या मंत्राचा वैखरीने उच्चार, नामघोष प्रथम दररोज काही वेळ, शक्यतो ठराविक वेळेस व ठराविक स्थळी आणि अभ्यासाने, अखंड नामोच्चार करण्याने, परावाणीने नामस्मरण करण्याचा पाया तयार होतो. उंचावरून पाणी दगडावर एकसारखे ठिबकत राहिले तर पाण्याच्या थेंबांनी दगडाला खळगा पडतो, त्याप्रमाणे वैखरीच्या नामघोषाने नामस्मरण मनात खोलवर जाते व परावाणीने स्मरण करण्याची तयारी होते.

गुरूने शिष्याला दिलेला मंत्र त्याच शिष्याकरिता असतो व तो शिष्याचा गुप्त ठेवा असतो, म्हणून दुसर्‍याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने तो म्हणावयाचा नसतो. तो फक्त स्वतःलाच ऐकू जाईल एवढ्या आवाजात म्हणायचा असतो. तो मोठ्याने उच्चारल्यास अधिकाराने दुसर्‍याला मंत्र सांगितल्याचा अपराध घडतो. गुरूने मंत्रोपदेशाचा अधिकार दिल्यावाचून शिष्याने दुसर्‍यास मंत्र द्यावयाचा नाही असा दंडक आहे. अन्यथा मंत्रदीक्षेचा अधिकार कोणीही आपल्याकडे घेईल व गुरूबाजीची बजबजपुरी माजेल. व्यवहारात्सुद्धा विशिष्ट कागदावर विशिष्ट पात्रतेच्या अधिकार्‍याचीच सही लागते. तोच न्याय येथे लागू आहे.

दीक्षामंत्राखेरीज भजनमंत्र अनेक आहेत; जसे राम कृष्ण हरि, हरे राम सीताराम, जय जय श्रीराम, रघुपति राघव राजाराम पतितपावन सीताराम, जय जय गुरूमहाराज गुरू, जय जय परब्रह्म सद्‌गुरु, इ. हे मंत्र प्रकटपणे म्हणण्यास कोणासही प्रत्यवाय नसतो. त्यांचा व्यक्तिशः किंवा समूहाने रागदारीत किंवा टाळमृदुंगाच्या गजरात घोष केला असता मन तल्लीन होते. प्रपंच चिंता व देहभान यांचा विसर पडतो आणि मनात भगवंताबद्दल प्रेम निर्माण होते.

वैखरीने नामघोष करण्याला अंगात शक्ती लागते, ती सर्व परिस्थितीत टिकतेच असे नाही. तसेच साधकाला व्यवहारही सांभाळावा लागतो आणि त्यासाठी त्याला इतर बोलावे लागते. व्यक्तिशः किंवा समूहाने वैखरीने नामोच्चार करण्याला अशा तर्‍हेच्या मर्यादा असतात. म्हणून अखंड जपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मध्यमा, पश्यंती व परा याही वाणींनी जप करण्याचा अभ्यास लागत असतो.

ओठ व जीभ यांची हालचाल करून, म्हणजे वैखरीने नामस्मरणाला प्रारंभ करणे बहुतेकांना सोपे, सोयीचे व लाभदायक असते. पुढे सवयीने तोंड बंद असून आतल्या आत जीभ थोडी हलून नामस्मरण होऊ लागते. नामाचा अभ्यास आणखी वाढला म्हणजे नाम मध्यमेत येऊ लागते. जड व सूक्ष्म यांच्या मधली म्हणून ही 'मध्यमा' वाणी. या स्थितीत ओठ व जीभ यांची हालचाल नसते, तर वाणींचे मेंदूतले जे केंद्र तेथे नामाचे सूक्ष्म स्पंदन चालू असते. येथून या नामाला शारीरिक शक्ती आवश्यक रहात नाही, व बाह्य परिस्थितीशी संबंध कमी होऊ लागतो. शरीराच्या सामान्य हालचालींनाही बाध कमी होऊ लागतो. वैखरीने वा मध्यमेत नाम चालत असता आपण ते कानांनी ऐकण्याचा प्रयत्‍न करीत रहावे, याने एकाग्रता साधण्यास फार मदत होते.अभ्यास नेटाने चालू राहिला म्हणजे नाम यानंतर पश्यंतीमध्ये हृदयस्थानी, अनुसंधानरूपाने चालते व अखेर ते नाभिस्थानी परावाणीने केवळ स्फूर्तिरूपाने चालू असते. मग बोलणे, देहाची हालचाल, स्थिती, व्याधी किंवा बाह्य परिस्थिती या कशाचाही ब्यत्यय न होता नाम अखंड चालू रहाते. म्हणून श्रीमहाराज याला 'मुख्य साधनाचे सार' असे म्हणतात.


२३. वासनेपायीं जन्ममरणाच्या येरझार्‍या घडतात, म्हणून वासनापाश तोडावा

वासनारूपी अवघें बन्धन |
ती वासना कैसे परी | तें तुज सांगतो निर्धारीं |
बाळक वणवा लावूनि आले घरीं | तेथे वृक्ष व्याघ्र जळती भारी |
बाळक राहूनि घरीं | हजारो जीववनस्पतींचा संहार करी |
ऐसें अज्ञानीं लाविले अग्न | तैसें वृथा वासना अज्ञानपण |
वासनारूपी येणेंजाणें |
आत्म्यासि नाहीं जन्ममरण | हे सत्य आहे जाण ॥२३॥


मनुष्याच्या मनाला जखडणारी सर्व बंधने वासनामूलक असतात. त्या वासनेचे स्वरूप काय आहे हे मी बरोबर सांगतो.

(अज्ञान बालकाला सहज गंमत करण्याची वासना उत्पन्न होऊन ते पेटलेला फटाका किंवा काडी-काटकी दूर भिरकावून देते, ती गवतावर पडून आग लागते, व ती वाढत जाऊन तिला वणव्याचे स्वरूप येते; अशा रितीने सहज म्हणून) वणवा लागून (पण त्या आगीला घाबरून) लहान मूल घरी पळून येते. तिकडे वणवा भडकून त्यात मोठमोठे वृक्ष, व्याघ वगैरे पशू जळून जातात. अशा रितीने ते लहान मूल घरी राहूनही एखाद्या काडीच्या योगाने हजारो जीव व झाडेझुडपे यांच्या संहाराला कारणीभूत होते. (परिणामाच्या) अज्ञानामुळे जसा हा भयानक वणवा, तसा स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे सूक्ष्म व फोल अशा वासनांचा पुढे भडका होऊन, त्या वासनांमुळे जीवात्मा जन्ममृत्यूच्या फेर्‍यात सापडतो (व अनंत यातनांचा भडका भोगतो). वास्तविक आत्म्याला जन्ममरण, येणेजाणे नाही हे सत्य आहे हे जाण. ॥२३॥
वासनारूपी अवघे बंधन - वासना (बिंदू १), जन्मजन्माचा फास, देहाचा संबंधु (बिंदू ८), मी-माझेपणा (बिंदू १०), षड्रिपूंचे बंधन (बिंदू २०) अशा अनेक रितींनी जीवाच्या बंधनांचा उल्लेख अमृतघुटक्यात आहे. नातेगोते, प्रेम, मैत्री, जात, धर्म, राष्ट्रीयत्व ही सर्व बंधने मुळात वासनेतूनच निर्माण होत असली तरी कर्तव्य, नीति, धर्म, इ. बंधने व्यवहारात वावरताना आवश्यक असतात, ती सोडल्यास अनर्थच होतो. पण त्यात आसक्तीने गुंतून पडू नये हे मर्म ध्यानी ठेवावे असा श्रीमहाराजांचा आशय आहे.


२४. "रामनाम जाणा अक्षरें दोन | गुरूमुखें करावी ओळखण |"

देहाचेनि पडिलें दीर्घ स्वप्न | म्हणोनि करावें नामस्मरण |
बहुत करितां विस्तार | तरी ग्रंथ होतो थोर |
म्हणोनि सांगितला सारासार |
रामनाम जाणा अक्षरें दोन | गुरूमुखे करावी ओळखण |
सद्‌गुरुचे कृपेकरून | ब्रह्मचैतन्य बोले दीन |
अमृतघुटका सांगितला साधकें जाण |
आतां याहूनि संशय घेसी देख | तरी न दाखवीं आम्हांसि आपुलें मुख ॥२४॥


हा जन्म म्हणजे देहबुद्धीमुळे (वासनेमुळे) पडलेले दीर्घ स्वप्नच होय. यातून जागे होण्यासाठी नामस्मरण (हे साधन) करावे. असो. आता आणखी विस्ताराने सांगितले तर ग्रंथ फार वाढेल, म्हणून थोडक्यात साराचेंही सार सांगतो. 'राम' हे नाम, ही दोन अक्षरे, हेच ते सार होय. त्यांची सद्‌गुरुमुखाने ओळख करून घ्यावी (सद्गुरूकडून रामनामाची दीक्षा घ्यावी.)

मी एक दीन साधक, माझ्या सद्‌गुरुंच्या कृपेने, मी ब्रह्मचैतन्य याने हा अमृतघुटका सांगितला. आता इतके सांगूनही ह्या श्रोत्याला संशय वाटत असेल त्याने मला व इतर भाविकांना पुनः भेटण्याची तसदी न घ्यावी. (कारण असे संशय घेत बसणारा खरा मुमुक्षु व साधक नसतो.) ॥२४॥
दीर्घ स्वप्न - सच्चिदानंद, अनादि व अनंत अशा परब्रह्माच्या काल-स्वरूपाच्या दृष्टीने पाहिले असता आपले आयुष्य हे एक स्वप्नच होय; शेपन्नास वर्षे अवधीपर्यंत ते टिकते इतकेच. स्वप्नातल्या गोष्टी ज्याप्रमाणे सत्य नसून सत्य भासतात, त्याप्रमाणे जागृतीतही मनुष्यप्राण्याला असत्य व शाश्वत वाटतात, खर्‍या सुखमय नसणार्‍या गोष्टी सुखमय वाटतात.
गुरूमुखे करावी ओळखण - गुरू म्हणजे मोठा, श्रेष्ठ. वयाने, विद्येने, गुणांनी, अनुभवाने ज्या ज्या क्षेत्रात जो जो आपल्याहून श्रेष्ठ असतो, त्याच्यापासून आपण शिकत असतो. फार काय, पण लहान, अडाणी, व्यसनी, अशा माणसांकडूनही काय न करावे याचा आपण धडा घेत असतो. निसर्गापासून, घटनांतून, ग्रंथांतून आपण अनेक तर्‍हेचा बोध घेत असतो. म्हणजे सर्व जग गुरूरूपच असते, मग तो गुरू देहधारी असो वा नसो. थोडक्यात, गुरूपद हे ज्ञानमय असते. तथापि, देहधारी व्यक्ती, प्रतिमा, ग्रंथ, इ. व्यक्त गोष्टीला गुरूस्थानी मानण्यात फायदा हा की त्याचे अस्तित्व चटकन व सदैव प्रतीत होत असते आणि त्यासंबंधी आपला आदरभाव आपल्याला व्यक्त करता येऊन समाधान व आधार यांचा लाभ होतो व आपला अहंभाव, कर्तेपण व वासना यांचा त्याग करता येतो.


२५. वंदनपूर्वक ग्रंथसमाप्ति

श्रीक्षेत्र अवंतीनगरी क्षिप्रातीरीं | साधुसन्त व्यासमुनि |
वाल्मिक नारद तत्वज्ञानी | वंदोनि तयांचे चरणीं |
समाप्त केला असे ॥२५॥


ऋषी, तत्वज्ञानी आणि भक्त असलेल्या नारद, व्यास, वाल्मिकी यांच्या चरणी, त्याचप्रमाणे विद्यमान साधुसंतांच्या चरणी वंदन करून अमृतघुटका हा ग्रंथ श्रीक्षेत्र उज्जयिनी नगरीत क्षिप्रा तीरावर समाप्त केला असे. ॥२५॥

शंख चक्र चाप बाण | वरद हस्त उदार वदन |

* * * * *