श्रीसद्‍गुरुलीलामृत

[ लेखक परिचय ]

पेशव्यांचे सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांचे आश्रयानें जी कुटुंबें तासगांवांत सुस्थिर झाली त्यांपैकी फडके या घराण्यांत श्री. गोपाळराव यांचा जन्म झाला. लहानपणींच मातापिता निवर्तल्यामुळें त्यांचे संगोपन मातुलगृही कुरुंदवाडास झाले. त्यांतच गोपाळरावांना देवी येऊन परिणामी सांधे विकल झाले व कांही काळ परावलंबित्व आलें. पण त्याही अवस्थेत मामीनें मोठ्या ममतेने त्यांचा प्रतिपाळ केला. (याचा उल्लेख मोठ्या कृतज्ञतेने त्यांनी अध्याय १, समास १, ओवी ९० येथे केला आहे.) शिक्षणास सुरुवात उशिरा करावी लागली. पण त्यांची बुद्धी कुशाग्र होती, आणि वागण्या-बोलण्यांत फार गोडवा असे, यामुळे वर्गबंधूंत ते प्रिय होते. ते थोडे ज्योतिषही शिकले. अशा तऱ्हेनें शिक्षण चालूं असतां, सन १९०८ साली लोकमान्य टिळकांवर खटला होऊन त्यांना दीर्घ मुदतीची हद्दपारीची शिक्षा झाली व लोकक्षोभाची लाट जोरानें उसळली, त्यांत गोपाळरावांनी देशभक्तीनें प्रेरित होऊन शाळेला रामराम ठोकला आणि ते शहापूर (बेळगांव) येथें गेले.


शहापुरांत गोपाळरावांनी ज्योतिषाच्या आपल्या ज्ञानावर उपजीविका सुरू केली. वास्तव्य एका धर्मशाळेत असे . कर्मधर्मसंयोगानें त्याच धर्मशाळेंत वैराग्याच्या वेषांतील एक गृहस्थ उतरले होते. हे सन १८५७ च्या स्वातंत्र्याच्या उठावांत भाग घेतलेले होते. त्यांचे आडणाव लेले. त्यांनी आपल्या जवळची वैद्यकी विद्या गोपाळरावांना शिकवून एक दवाखाना काढून दिला. पुढें एक दिवस लेले एकाएकीं कोणास न सांगतां गांव सोडून निघून गेले. (त्यावर सुमारें वीस वर्षांनी गोपाळराव बुधगांवास असताना ते एकदा त्यांना भेटून गेले.) लवकरच गोपाळरावांनीही शहापूर सोडले व कागवाड येथे वैद्यक व्यवसाय सुरू केला. या दरम्यान त्यांचा विवाह झाला होता.


कागवाड येथे गणूबुवा कुलकर्णी नांवाचे गृहस्थाश्रमी रामदासीबुवा राहात असत. हे गणूबुवा श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुगृहीत निष्ठावंत भक्त होते. श्रीमहाराजांनी त्यांना दीक्षानुग्रहाचाही अधिकार दिलेला होता. त्यांची राहणी फार निःस्पृहतेची व वैराग्याची होती. या रामदासीबुवांशी गोपाळरावांचा परिचय होऊन बराच निकट संबंध आला. बुवांनी स्थापन केलेल्या श्रीरामासमोरचा मारुति भंगला तेव्हां त्यांनी अत्याग्रहानें श्रीमहाराजांस बोलावून त्यांच्या हस्तें नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना बुधवार, आषाढ शुद्ध पंचमी शके १८३१ (इ. स. १९०९) या दिवशी केली.


गोपाळरावांची मनोवृत्ति धार्मिक व सात्त्विक असली तरी या काळापर्यंत त्यांचा साधुसंतांवर विश्वास नव्हता. तथापि रामदासीबुवांच्या स्नेहाखातर व त्यांनी दिलेल्या माहितीवरून, श्रीमहाराजांच्या स्वागतार्ह तयार केलेल्या संगीत मेळ्यासाठीं त्यांनी सुरस पदें रचून दिली होती. ते श्रीमहाराजांच्या स्वागतासाठी इतरांबरोबर सामोरे गेले नव्हते, पण मिरवणूक दारावरून जातांना ते दारांत उभे होते. त्या गर्दीतही त्यांची व श्रीमहाराजांची दृष्टादृष्ट झाली, आणि ती होतांच गोपाळरावांचे मन एकदम पालटलें व श्रींचा अनुग्रह घेण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली. त्याप्रमाणे मारुतिस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी त्यांना अनुग्रह मिळाला. नंतर श्रीमहाराज तेथील आत्मारामपंत कुलकर्णी नांवाचे गृहस्थांचे घरीं गेले असतां तेथें मेळ्यांतील मुलें सुस्वर पद्यें म्हणत होतीं, ती ऐकून श्रीमहाराजांनी विचारलें, "ही पदें कोणी केलीं आहेत ?" आणि गोपाळरावांनी ती केल्याचें समजल्यावर "कवित्वाचा हा महाप्रसाद त्यांना द्यावा" असे सांगून त्यांनी एक श्रीफल दिले (ही सर्व हकिकत अकराव्या अध्यायाच्या पहिल्या समासांत आली आहे.) या घटनेनंतर गोपाळरावांचा गणूबुवांशी परिचय आणखीच दृढ झाला व परमार्थाचे बीज त्यांचे मनांत दृढमूल झाले.


कांही दिवसांनी आपले मामेभाऊ श्री. छत्रे यांचे सांगण्यावरून त्यांनी कागवाड सोडून सांगलीजवळ बुधगांव येथे छापखान्यांत नोकरी धरली. नोकरीमुळें फक्त रजा मिळेल तेव्हांच (सामान्यतः श्रीगुरुपौर्णिमेसच) त्यांना गोंदवल्यास जाण्यास मिळे. गोंदवल्यास गेले म्हणजे आपलें नित्यकर्म आटोपून श्रीमहाराजांचे मागे हात जोडून उभे राहण्याचा गोपाळरावांचा शिरस्ता असे. श्रीमहाराज त्यांना "रामदासीबुवा" म्हणून संबोधीत. (ग्रंथात श्री गोपाळरावांनी आपला उल्लेखही असाच केला आहे.) पुढें चारच वर्षांनी श्रीमहाराजांनी देह ठेवल्यामुळे यांना श्रींचा प्रत्यक्ष सहवास फारसा लाभला नाही.


श्रीमहाराजांनी देह ठेवल्यानंतर गोपाळराव श्रीगुरुपौर्णिमेस गोंदवल्यास न जातां बुधगांवी आपल्या घरींच तो उत्सव साजरा करूं लागले. त्यांत मुख्यतः अखंड नामसप्ताह व पौर्णिमेस महाप्रसाद असा कार्यक्रम असे. यासाठी ते कोणाकडेही द्रव्य वा अन्य सामग्रीची याचना करीत नसत, देवापुढें भक्तांच्या स्वयंस्फूर्तीनें काय येईल तेवढेंच. प्रारंभी साह्यकारी अगदींच मोजके होते. त्यांत एक म्हणजे तेथील एक शेतकरी विठू नाना शिंदे पाटील; त्यांनी प्रारंभापासून आपल्या हयातभर उत्सवांत नामाचा पहारा करण्यांत व अन्य प्रकारें साह्य दिलें; त्यांचे चिरंजीव बाबूराव यांनीही आपल्या वडिलांची प्रथा चालविली आहे. तसेच दुसरे, लिंगायत कोष्टी समाजांतले, अण्णाप्पा वसवाडे; त्यांच्यामागें त्यांचे चिरंजीव भरमाप्पा, यांनीही सेवा चालूं ठेवली आहे. एके वर्षी खुद्द श्रीब्रह्मानंद महाराजही एक रात्र भाग घेऊन गेले. हळूहळू या उत्सवाला सर्वमान्यता प्राप्त होऊन अनेकांचे उत्साहपूर्ण सहकार्य मिळूं लागले. नामांकित भक्तमंडळी, भजनी मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, वगैरे येऊं लागले. राजघराणांतील मंडळीही येऊन जात. अशा तऱ्हेने या उत्सवाचे स्वरूप खूपच विस्तारलें.


श्रीमहाराजांनी देह ठेवल्यास तीन वर्षें होऊन गेली तरी त्यांचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्‍न कोठेंच दिसेना, तेव्हां महाराजांनी आपल्याला दिलेला "कवित्वाचा महाप्रसाद" ध्यानी आणून गोपाळरावांनी तो हेतु मनांत धरला, व प्रथम चरित्रसारवजा "नमस्कारत्रयोदशी" हे तेरा श्लोक केले ते पाहून श्रीब्रह्मानंदमहाराजांनी त्यांना चरित्र लिहिण्याची अनुज्ञा दिली. त्याप्रमाणे शके १८४० च्या मार्गशीर्षात (सन १९१८) श्रींच्या पुण्यतिथीचे दिवशीं गोंदवलें येथेंच लेखनास प्रारंभ झाला. ग्रंथरचना प्रासादिक होत आहे असे पाहिल्यावर अनेकांनी आपणांस असलेली श्रींसंबंधींची माहिती दिली, व ग्रंथलेखनसमाप्ति शके १८४३ त बुधगांव येथें झाली. "पूर्वार्ध" व "उत्तरार्ध" असे दोन भागांत विभागलेले व दोन छापखान्यांत हे "श्रीसद्‌गुरुलीलामृत" सन १९२२-२३ साली प्रथम प्रसिद्ध झाले.


पुढे तीस वर्षांनी गोपाळरावांचे वारसांचे संमतीनें गोंदवलें येथील श्रीसंस्थानचे सरपंच कै. गणेश महादेव दामले यांनी याची दुसरी आवृत्ति दोन्ही भाग एकत्रित करून छापली. त्यानंतरच्या आवृत्त्या "श्रीसमर्थ सद्‌गुरु श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर सेवानिधि" यांचेमार्फत प्रसिद्ध होत आल्या आहेत.


गोपाळाराव वैद्यव्यवसाय करीत असत हे वर आलेच आहे. ते वनस्पति औषधें देत असत. त्यांचा हातगुण चांगला होता. गरीबांना ते फुकट औषध देत. ज्योतिषाच्या त्यांच्या ज्ञानाचाही लाभ लोकांना होई. ते निरूपण वगैरेही करीत. या सर्वांमुळे आणि त्यांचा मनमिळाऊ व साह्यतत्पर स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. अध्यात्मांत त्यांनी आपली फार चांगली प्रगति केली. ते प्रतिवर्षी समाधिउत्सवासाठी गोंदवल्यास जात तेव्हां सांगली, मिरज, कुरुंदवाड, कोल्हापूर इत्यादि भागांतील पुष्कळ मंडळी त्यांच्या समवेत येत व त्यांच्याबरोबर "धर्मशाळा" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीशनिमंदिरालगतच्या इमारतीत माडीवर उतरत.


सुमारे १९४८ सालापासून गोपाळरवांची प्रकृति खालावत चालली. आतां आपले आयुष्य फार नाहीं हे त्यांनी जाणले. शेवटी पंधरा दिवस त्यांनी औषध घेण्याचेही सोडले. पण रोज स्नान करून तीर्थ मात्र घेत. अखेर फाल्गुन वद्य १२ शके १८७१ दि. २६ मार्च १९४९, या दिवशी सकाळीं साडेसात वाजतां वयाच्या ६३ व्या वर्षी, बुधगांव मुक्कामी, ते रामरूपीं विलीन झाले.


गोपाळरावांना त्यांच्या प्रपंचांत पत्‍नी यमूताई यांची जोड फारच चांगली मिळाली. संसारांत अनेक बरेवाईट प्रसंग आले त्यांना उभयतांनी जोडीनें तोंड दिलेच, पण पतिनिधनानंतरच्या काळांत तर यमूताईंवर पाठोपाठ अनेक दारूण आघात कोसळले. ते त्यांनी अत्यंत धीरोदात्त वृत्तीनें सोसले आणि आपले कर्तव्य चोखपणें बजावले. आपत्तीनें त्यांच्या वृत्तींत कधीं निराशा किंवा कटुता आली नाही. कधी रागावणे नाही, तोंड टाकून बोलणे नाही; नेहमी विनोदी गोड भाषण आणि सर्वांशी निर्व्याज प्रेमाचे वर्तन. त्यांनी व त्यांच्या पुत्रपौत्रांनी श्रीगुरुपौर्णिमेचा उत्सव पूर्वीइतक्याच श्रद्धेनें व उत्साहानें बुधगांवी आपल्या घरीं चालूं ठेवलेला असून सर्व कुटुंबीय मनापासून उपासना करून समाधानानें जीवन व्यतीत करीत आहेत.


श्रीमहाराजांच्या चरित्रपर कांही ग्रंथ गेल्या कांही वर्षांतच उपलब्ध झाले आहेत. परंतु तत्पूर्वी जिज्ञासूंना व भक्तमंडळींना माहितीपर व मार्गदर्शनपर असा "श्रीसद्‌गुरुलीलामृत" हा एकमेव ग्रंथ उपलब्ध होता, व त्या दृष्टीनें त्याचे महत्त्व आगळे आहे. हा काव्यमय ग्रंथ अतिशय प्रासादिक असून श्रीमहाराजांची भक्तमंडळी नित्यनैमित्तिक पारायणासाठीं या ओवीबद्ध ग्रंथाचाच उपयोग करतात.


श्रीमहाराजांचा कृपाप्रसाद प्राप्त झालेल्या विशेष भक्तमंडळींपैकी गोपाळराव हे एक होते. ग्रंथाचें वाचन करतांना त्यांची उत्कट गुरुभक्ति, परमेश्वरप्राप्तीची ओढ, श्रद्धा व ज्ञान यांचा जागोंजागीं प्रत्यय येतो. श्रीमहाराजांच्या प्रेरणेनेंच रचलेला हा ग्रंथ हें गोपाळरावांच्या जीवनांतील महत्कार्य होय.