प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२० ऑक्टोबर

भगवंताला होता अर्पण । तेथें सुख दुःखाचे नाही कारण ॥


    Download mp3

सर्वस्वी व्हावें रामास अर्पण । हाच उपाय सांगती साधुजन ॥

रामास अर्पण व्हावें कोण्या रीती । त्याचा मार्ग सज्जन सांगती ॥

प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान । तेथें प्रयत्‍नांचा उगम ॥

अखंड राखावे अनुसंधान । येणें कर्म होईल सहज समर्पण ॥

उपास्यदेवतेची करावी आठवण । मनानें जावे त्यास शरण ॥

सद्‌गुरूसी झाला जो अनन्य । त्यास दुजें करणे नाही अन्य ॥

सद्‌वृत्ति, सद्‌गुण, दुर्गुणादि विकार । हें सर्व करावें रामार्पण ।

त्यानेंच रामाचे होऊन राहणे जाण ॥

राजापोटीं पुत्र जन्मा आला । राजपद हातीं चालत आले त्याला ।

तैसे आपण व्हावें रामार्पण । विषयाचा न लागे तेथे लाग जाण ॥

मनानें भगवंतास जावे शरण । व्यवहारांत दक्षता ठेवावी आपण ॥

अनन्य व्हावें रामास शरण । तुझेविण नाहीं मानणें कांही अन्य ॥

ठेवावा सदा मनीं ध्यास । दया येईल रामरायास ॥

जेव्हां मनासकट देह केला अर्पण । मग मरणाच्या भयाचें काय कारण ? ॥


परमार्थाचे मुख्य साधन । शक्यतो न चुकूं द्यावे अनुसंधान ॥

हृदयी भगवंताचे ध्यान । याविण नाहीं दुजा उपाय जाण ॥

सर्व कांही करीत जावे । परि व्यवहारी न गुंतावे ॥

ऐसें राहावे प्रपंचांत । जसा पाहुणा वागे जगांत ॥

बाह्य सृष्टी विषयाकार । तेथें मन न गुंतूं द्यावे जाण ॥

देह लावावा प्रपंची । मन लावावे रामचरणी ॥

लोभ्याचे चित्त पैशावरी । परि व्यवहार जैसा करी ।

तैसें मन ठेवावे रामावरी । प्रपंचांत असावी हुशारी ॥

चित्त एकाग्र न व्हावया कारण । विषय मानला आपला जाण ॥

घार फिरते आकाशांत । तैसें चित्त राहतें विषयांत ॥

म्हणून दृष्टी ठेवावी त्याचेवर । जे स्वाभाविक आहे स्थिर ॥

एकाग्रतेस करणें साधन । त्याला करणें जरूर नामस्मरण ॥

एकाग्रतेस उपाय एकच खरा । नामीं प्रेमा ठेवा पुरा ॥

निश्चितपणा राखावा । साधनांत जोर आणावा ॥

विषयापासून निवृत्ति । जडावी नामाची प्रीति । त्याला दूर नाही रघुपति ॥

व्यवहारांत असावी दक्षता । परि राम चिंतीत जावा सदा ॥

प्रपंचांत असावे लक्ष । तरी त्याचा चित्तीं घेऊं नये पक्ष ॥

परमात्म्याने जें जें दिले । तें तें त्याचें म्हणून सांभाळावे भले ।

मुला-बाळांचे करावें जतन । रामाने दिलेलें हें जाणून ।

त्यांच्या लोभांत न गुंतवावें चित्त । हाच परमार्थ सत्य ॥

सर्व कांही करावे । मीपणाने न राहावे ॥

रामसेवा रामासाठी । न जाणावी विषयासाठी ॥

प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥

सदा राहावें सावधचित्त । मनानें भजावा भगवंत ॥


२९४. जें जें कांही माझे । तें तें जाणावें रामाचें ।
राम त्यास सांभाळिता । काळजीस कारण उरले नाही आतां ॥