प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२१ ऑगस्ट

सुख स्वतःवरच अवलंबून आहे.


    Download mp3

सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्‍न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की, सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. आपण आहो तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे. जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. समजा, आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ; ते बटण दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटण दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्‍न केला, तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का, की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे ? तसे, जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे, सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची ? ईश्वराने मनुष्याला बरेवाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे. ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून, आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्‍न करावा. वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते, आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या; आणि हे सर्व करताना सर्वकाळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्यानेच सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल, ही कल्पनाच चुकीची आहे. 'तुझे आहे तुजपाशी । परि जागा चुकलासी ॥' आपण स्वतः जगासारखे वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे ?

गीतेमध्ये भगवान सांगतात की, 'मन हे मीच आहे.' भगवंतावाचून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे, आणि मग समाधानात राहावे. भगवंताचे सदासर्वकाळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते.


२३४. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून,
असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.