प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१७ डिसेंबर

सर्व दुःखांचे मूळ देहबुद्धी आहे.


    Download mp3

परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे, आणि सर्वांना नडणारा आहे. ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला, मी कोण हे जाणण्यापेक्षा, मी कोण नव्हे हे जाणणे महत्त्वाचे आहे. एखाद्या पाऊलवाटेने जात असताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्या मार्गाला लागलो तर त्यापुढला सर्व व्यवहार चुकत जाणार. एखादे गणित सोडविताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्यापुढले सर्व गणित चुकत जाते किंवा, एखाद्या रोगाचे निदान बरोबर झाले नाही तर मग त्या रोगावर केलेली औषधयोजना फुकट जाते, त्याप्रमाणे, मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्मांचे आकलन जर बरोबर झाले नाही, तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणे फार कठीण गोष्ट होईल. आपण आनंदी असावे, नेहमी आनंदात रहावे, असे सर्वांनाच वाटते; हा झाला पहिला गुणधर्म. या आनंदात चिरंतन असावे, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन रहावे, असेही आपल्याला वाटते. खरे म्हणजे मरण कुणालाच आवडत नाही; जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते. परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्यामुळे आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते. पण आपली मुळात वाट चुकली, आणि म्हणून त्यापुढले सर्व व्यवहारही चुकत गेले. एखाद्याच्या परसातले झाड पडल्यावर तो 'माझे झाड पडले' असे म्हणतो, परंतु त्याचा देह पडल्यावर 'त्याचे शरीर पडले' असे नाही आपण म्हणत, 'तो मेला' असे म्हणतो. म्हणजेच मुळात चूक ही की, आपण स्वतःला देह समजूनच राहतो. देह माझाच समजून त्याच्यावर प्रेम करतो, ही आपली पहिली चूक. नंतर, या देहाचा गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर, त्यांचीच जोपासना करतो, ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर, त्यांची वाढ न थांबविता, ते नेतील तिकडे त्यांच्या पाठीमागे जाणे, आणि त्याकरिता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणे, ही तिसरी चूक. अशा रीतीने चुकांनी चुका वाढत जाऊन आयुष्याचे गणित मग साफ चुकते.

एखादे झाड तोडायचे असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात, आणि नंतर बुंधा तोडतात; तसे, नीतिधर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विचाराच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे, दुसरी योजना म्हणजे सगुणभक्तीची. सगुणभक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो, आणि 'मी तुझा आहे' असे म्हणतो. या भगवंताचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर त्याच्या नामानेच. या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल. पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. तेव्हा आत्तापासून, मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करील.


३५२. मी कोणीच नाही, सर्व राम आहे, आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदात रहा.