प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१२ मे

कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी.


    Download mp3

अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसर्‍याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसर्‍याला फसविण्याकरिता नसावा. स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचे मन दुखवू नये, आणि देहाने परपीडा करू नये. दुसर्‍याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्माचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. कामक्रोधादि सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यांसारखा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही.

आपली वाचा दुसर्‍याला शिकविण्यासाठी आणि मोठेपणासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते. नेहमी सत्य आणि गोड बोलावे, आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन, संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करावा. अभिमानाचे विष जिथे येते, तिथे नामाची आठवण ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही; पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे, तसे हिरण्यकश्यपूचे झाले. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानाने विसरला. त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले. अभिमान जरूरीपुरताच ठेवावा. 'मी रामाचा आहे' असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. 'नारायणाचे दर्शन व्हावे' असे नाही प्रल्हाद म्हणाला, 'नाम सोडणार नाही' असे म्हणाला.

लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच, आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटायचा नाही; म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत; त्यापासून आपलेच मन गढूळ होते. 'माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस,' असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. मला खात्री आहे, तो तुमच्या साहाय्याला आल्यावाचून राहणार नाही.


१३३. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर
चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच वस्तू स्थिर आहे.