प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१० ऑक्टोबर

राम ठेवील त्यात समाधान ।
हे खर्‍या भक्ताचे लक्षण जाण ॥


    Download mp3

नसावे कशाचे ज्ञान । वाटावे सदा घ्यावे रामनाम ।

प्रपंची राखावे समाधान । हेंच भक्ताचे मुख्य लक्षण जाण ॥

डोळे व कान ह्यांनी होते बाह्य जगाचें ज्ञान । त्यांना लावावे नामाचे अनुसंधान ।।

राम आणावा चित्तीं । 'त्याचा प्रपंच करतो' ही राखावी स्मृति ।।

स्वार्थहीन व्हावे आपण । तें होईल करतां परमात्मस्मरण ।।

संधि साधून जो राहिला । तोच जगीं धन्य झाला ।।

नाटकांत नट काम करी जैसें । आपण वर्तत जावें तैसें ।।

राजा रंक होई जरी । तरी मी कोण हें जाणून राहे अंतरीं ।।

जग सज्जन-दुर्जन मिश्रित । त्यांतून शोधून काढावा अवचित ।।

जो लाभेल संगतीला । रामाचें प्रेम दुणावेल त्याला ।।

द्वेष, मत्सर, अहंकारवृत्ति, । यांची न धरावी संगति ।।

मानापमान करावे सहन । साक्ष ठेवून रामचरण ।।

सर्व कांही करावें । पण खरें प्रेम साधनावर असावें ।।

अभिमानरहित राहावें । हेंच शिष्याचे लक्षण जाणावें ।।

राम व्हावा माझा । रात्रंदिवस काळजी ठेवीत जा ।।

लक्ष ठेवावें संताकडे । देह लावावा प्रपंचाकडे ।।


गुणांत उत्तम गुण । आपले कळावे अवगुण ।

अवगुण कळले ज्याला । तो सुधारण्याच्या मार्गाला लागला ।।

प्रथम स्वाधीन करीं आपले मना । सोडावा अहंभाव, विषयवासना । काही पाहिजे हें न वाटावे मना ।।

व्यवहारांत असावे दक्ष । कधीं न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष ।।

दुर्जनाची संगति । तीच रामाला दूर करिती ।।

म्हणून मनासी धरावा सत्संग । रामाविण दुजा नसावा रंग ।

उदास व्हावें एकाच वेळीं । केव्हा भेटेल वनमाळी ।।

तळमळीचे मुख्य लक्षण । दुसरे विषयाची न व्हावी आठवण ।।

पतिव्रतेला पति जाण । तैसें साधकाला साधन जाण ।।

मोहाला बळीं पडणें । याहून नाहीं दुजें लाजिरवाणें ।।

विघ्न रामसेवेंत भारी । तरी आपण सांभाळावें हातीं घेऊन शिरीं ।।

रामाची सेवा हा जाणावा संसार । मग सुखाने करावा व्यवहार ।।

देवास करावा नैवेद्य अर्पण । प्रसाद घ्यावा त्याचा आपण ।।

चित्त ठेवावें रामापाशीं । ध्यास असावा त्याचा अहर्निशीं ।।

गुरूकडून घेतलेले नाम पावन करील जगास । हा ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ।।

देहानें नाहीं करता आले । मन रामापायीं गुंतवले । रामानें त्याचें कल्याण केलें ।।

राम ठेवील त्यांत समाधान । हेंच खरे भक्ताचें लक्षण जाण ।।

भगवंतावांचून मनीं न येऊ द्यावें काही । भगवत्स्वरूप तो सर्व ठिकाणीं पाहीं ।।

आपण व्हावें रामाचें । उदाहरण घालून द्यावें साचें ।।


२८४. नामाहून दुजे काही । सत्य त्रिवाचा नाही ॥
निर्हेतुक घ्यावे नाम । जेणे जोडेल आत्माराम ॥