प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

८ ऑगस्ट

समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे.


    Download mp3

प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्ये पाळायला लागतातच. नेहमी 'राम कर्ता' ही भावना मनात जागृत ठेवा. शोक, चिंता, भिती, आशा, तृष्णा, ह्या सर्व 'राम कर्ता' म्हटल्याने नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत, त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे. तरी आजपासून, ह्या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा, आणि 'राम कर्ता' ही भावना दृढ करा. कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते; ते समाधान म्हणता येईल का ? जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही, ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरूरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच. तेव्हा तसा तो सोडता येत नाही; तो एक 'राम' म्हटल्यानेच सुटू शकेल. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा. त्यामुळे समाधान मिळून, मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी; काही न करणारा हा खरा अडाणी होय.

वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय. जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनाला न जुमानता वागणारी, ती स्वैराचारी बुद्धी होय. वासना नष्ट होणे म्हणजे देह्बुद्धी नष्ट होणे होय. प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही. त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे. ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल. खरोखर, थोडा मनापासून निश्चय करा. तो परमात्मा फार दयाळू आहे, तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी उभा राहील. दोष न पाहताही जो दुसर्‍याला जवळ करतो तो दयाळू खरा. भगवंत अत्यंत दयाळू आहे. त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल, आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचे प्रेम कमी होईल, आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते. ती ओढ परमेश्वरप्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल, आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल, तर एका नामानेच. ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले, त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. इतर साधनामध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे, नाम हे स्थिर आहे. हे भगवंताचे नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या, मनापासून घ्या.


२२१. अखंड नामस्मरणात राहा, किती समाधान राहील !