प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२२ डिसेंबर

कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका.


    Download mp3

आकाशाला भिऊन पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच; त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. 'प्रयत्‍न केला असता तर बरे झाले असते' असे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत प्रयत्‍न हा अवश्य करावा. यश किंवा अपयश देणारा परमात्माच, असे समजून प्रयत्‍न करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावे. तुझी सेवा किती दिवस करू असे परमेश्वराला विचारणे म्हणजे सेवेत कमीपणा आलाच. तसेच, त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल ? विषय किती दिवस भोगू, असे नाही आपण म्हणत ! मग नामाबद्दलच का असे विचारावे ? आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका.

मनाला रिकामे ठेवले की ते विषयाच्या मागे धावलेच समजा. म्हणून आपले मन नेहमी गुंतवून ठेवावे. उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पागोष्टी करणे, चेष्टा-विनोद करणे, वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवावा; हेच अनुसंधान होय. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय; त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या. आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाम होय. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. नामाचे अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी. नाम नुसते घेतल्याने काम होईल; पण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. नाम मुखी आले की सत्कर्मे आपोआप होऊ लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही.

आपण उगाचच सबबी सांगत असतो. काम असेल त्या काळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता, उगाचच गप्पा, नाही तर निंदा-स्तुती, किंवा इतर खेळ खेळण्यात वेळ घालवतो. तसे करू नये. आपले मन उनाड आहे. त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावले पाहिजे. नामामध्ये भगवंताची शक्ती असल्याने नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमाने कमी होते आणि नाम स्थिरावते. नित्य नामस्मरण केल्यावाचून अंती ते येणार नाही. जागेपणी अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल, झोपेच्या वेळी स्मरण झाले तर रात्री स्वप्नात तेच होईल, आणि असा सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील.


३५७. नाम घेता घेता नामाशी इतके तादात्म्य व्हावे की, मी नाम घेत आहे हेसुद्धा विसरून जावे.