प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

८ नोव्हेंबर

कर्तव्य करावे, मग व्हायचे ते होऊ द्यावे.


    Download mp3

जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही. पण त्यापैकी पंचवीस टक्के दुःखच बाहेरून येते. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोर्‍यामार्‍या, दारिद्र्य इत्यादिंचे दुःख बाहेरून येते. पण पंचाहत्तर टक्के आपले दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते. आपले शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो. भगवंत आनंदरूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणार नाही. देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे, हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो. तो दुःख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही. उरले आपले मन. कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभावधर्म असल्याने ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अंगिकारते. भक्ताचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊच शकत नाही. ज्याचे मन देहाला चिकटते, त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, सान्त आहे, तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडेतिकडे दोनपण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी समंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस, भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो. भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले. त्यात घडणार्‍या घटनांचा आराखडा त्या संकल्पात असतो. कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो, आणि आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केले. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो, तर त्याचे साहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. भगवंत नामस्वरूप आहे, म्हणून त्याच्या नामात राहाणार्‍याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही.

आपल्या प्रयत्‍नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा. त्या होतच असतात, प्रयत्‍नाने फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखे व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणार्‍या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या, असे म्हणण्यासारखे आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत, आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी. माझे कर्तव्य मी केले आहे ना ? ते करीत असताना मी अनीति, अधर्माने वागलो नाही ना ? आता जे व्हायचे ते होऊ दे; कुठे काळजी करा ! ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना, तोच मनुष्य सुखी होईल.


३१३. देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावे.