प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१३ ऑक्टोबर

निष्ठा बलवत्तर असावी.


    Download mp3

पोथीची समाप्ती झाली, म्हणजे ऐकण्याचे संपून कृतीत उतरण्याची वेळ आली असे समजावे. पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही; तो असा असावा की दोघांचेही कल्याण होईल. भगवद्‌भक्ति करणे हा खरा मोबदला आहे.

जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचे ज्ञान आपल्याला होत नाही; पण म्हणून काही आपण त्या खोट्या नाही मानीत. आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचाही अभिमान धरतो हे चुकते आपले. भगवंताने ज्ञान दिले, आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो, तर हातात तरवार दिल्यावर शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखे झाले ! ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही, ती विद्या नसून अविद्याच होय. जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे, हे अज्ञान होय. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे, म्हणजे ज्ञान होय.

प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो. म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपले समाधान राहील. हरिश्चंद्र, प्रह्लाद, वगैरे मोठ मोठ्यांचा किती छळ झाला ! पण त्यांची निष्ठा अती बलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. परिस्थिती सारखी बदलत असते; म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही. म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. गीतेत असे सांगितले आहे की, सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावे; पण ते न करता आपण विषयालाच शरण जातो, त्याला काय करावे ? अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले, आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले, ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला; पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो, अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्यावाचून राहणार नाही. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खर्‍या भावनेने एक वर्षभर जो राहील, त्याला समाधान हे काय आहे हे खात्रीने कळेल.


२८७. नाम घेताना देवाला सांगावे, " प्रपंचातले काही मला देऊ नकोस, मला तुझे प्रेम दे."