प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

३० ऑगस्ट

समाधानाचें स्थान । एका रामावांचून नाहीं जाण ॥


    Download mp3

विषयी गुंतले सर्व जन । चित्त मन तेथे केले अर्पण ।

तेथे कोणास न येई समाधान । पावे सुखदुःख समसमान ॥

विषयाचा केला कंटाळा । परि मनावर बसला त्याचाच थारा ॥

पैका हाती खेळवला । त्याने हात काळा झाला ।

हा दोष नाही पैक्याला । आपण त्याला सत्य मानला ॥

एका मानापोटी दुःखाचे मूळ । हे जाणती सर्व सकळ ॥

वैभव-संपत्तीचा सहवास । हाच दुःखास कारण खास ॥

व्यवहाराच्या चालीने चालावे । वेळ प्रसंग पाहून वर्तावे । चित्ती समाधान राखावे ॥

जोवर जरूर व्यवहारात राहणे । तोवर त्याला जतन करणे ॥

ज्याचा घ्यावा वेष । तैसे वागणे आहे देख ॥

व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्याशी । तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसर्‍यापाशी ॥

ज्याचा जो जो संबंध आला । तो तो पाहिजे रक्षण केला ॥

आपलेकडून न कोणाचे दुखवावे अंतःकरण ।

तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण ॥

संगत धरावी पाहून । बाह्य भाषणावर न जावे भुलून ॥

मिष्ट भाषण वरिवरी । विष राहे अंतरी । असल्याची संगत नसावी बरी ॥

ज्याचा त्यास द्यावा मान । लहानाचे राखावे समाधान ।

मोठ्याचे पुढे व्हावे लीन । वागत जावे जगी सर्वास ओळखून ॥

मनाने व्हावे श्रेष्ठ । बाह्यांगी राहावे कनिष्ठ ॥

न करावा कोणाचा उपमर्द । गोड भाषण असावे नित्य ॥

आळसाला न द्यावा थारा । सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला ॥

पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे । पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे ॥

तरी व्यवहारात मिंधेपणे न राहावे । आळशीपण नसावे ॥

देह आळशी न ठेवावा हे जरी खरे । तरी त्याची परिस्थिति ओळखून वागणे बरे ॥

मागे काय झाले हे न पाहावे । उद्या काय होईल हे मनी न आणावे ।

आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे । प्रयत्नाचा कंटाळा न करावा ॥

आज जे मिळाले ते घ्यावे । पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्‍न करावा ॥

बिना केले काम । न मिळत असे दाम ॥

धन संग्रही राखावे । सर्वच खर्चून न टाकावे ॥

थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे । आणखी जास्त न करावे ॥

नोकरी ज्याची करणे जाण । त्याचे मानावे प्रमाण ॥

व्यवहारात असावी दक्षता । अचूक प्रयत्‍न करावा सर्वथा ॥

प्रपंचात असावे दक्ष । सत्याचा धरावा पक्ष ॥

जो जो प्रसंग येईल जैसा । प्रपंचात वागेल तैसा । याचे नाव प्रपंचात दक्षता ॥

व्यवहार करावा ऐसा जपून । कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून ॥

भगवंताचे आहो आपण । ही मनी ठेवावी ओळखण ॥

समाधानाचे स्थान । एका रामावाचून नाही जाण ॥

म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान । राखून नामाचे अनुसंधान ॥


२४३. प्रयत्‍नावाचून व्हावे हित । ऐसे न आणावे चित्तात ॥