प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

९ जुलै

नाम घेण्याचा निश्चय करावा.


    Download mp3

जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते. भगवंताच्या अधीन असते. म्हणून, जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे, आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे; त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्‍न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते, म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ति ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख होत नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्‍नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून, जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्‍न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे हे न समजता, त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये, आणि अनीति-अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून, मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर, हे सर्व हिंग-जिऱ्याचेच गिऱ्हाईक आहेत; देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही.

जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांनासुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसते 'मी शरण आलो आहे' असे म्हटले तरी पुरे होते. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही; पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत, अलिकडे ते जास्त संकुचित झाले आहेत. पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटला आहे. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की, मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा.


१९१. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल.
दुःखाची जाणीव नसल्यावर, दुःख असले म्हणून बिघडले कुठे ?