प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

३ मे

निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी.


    Download mp3

मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. 'हे परमेश्वरा, आता तुझ्याकरिताच मी जगेन, तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही,' असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे. 'नामस्मरण होत नाही, कारण वयामुळे मन थकले,' हे म्हणणे बरोबर नाही. शरीर थकेल, कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे; परंतु मन थकले, हे मात्र सयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे, असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्युसमयीची. परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना, त्यापूर्वी केव्हाही, मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. पूर्वी सहा-सहा तास बसून जप केलेला असेल, तितका आता होत नसेल, तितके बसवणार नाही. मध्ये मध्ये झोप लागत असेल, हे मान्य आहे; पण स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार. मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे. तेव्हा, सर्व व्यापांतून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे. पैसाअडका, प्रपंचातल्या गोष्टी, यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन.

पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा, माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे, त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.

धर्माचरण, भगवद्‌भक्ति, नामस्मरण, आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत. किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचे लक्षण हे की, आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना होणे. ही भावना वाढण्यासाठी, 'सर्व जग सुखी असावे' अशी प्रार्थना करण्याचा परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत्‌कृपेने साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे, आणि तो केव्हा डोके वर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवू या आणि आनंदाने राहू या.


१२४. नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी.