प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२४ जून

ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे.


    Download mp3

लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय; वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय; आणि सांगितलेले आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय. अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत.त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे. ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे. कोणत्याही ज्ञानाचा बरावाईट उपयोग, तो करणार्‍यावर अवलंबून असतो. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीति आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे. श्रीमंत-गरीब, विद्वान-अशिक्षित, लहान-थोर, स्त्री-पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल, असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे. द्वेष-मत्सर वाढवील, नीतिधर्माला फाटा देईल, असे ज्ञान पुस्तकात नसावे. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवितात, आणि त्यामुळे सर्वनाश होतो. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे. जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय.

देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान. जे असे आहे तसे ओळखणे हे तत्त्वज्ञान. मी देहाला 'माझा' म्हणतो, अर्थात मी देह नव्हे. 'माझे घर' म्हणणारा 'मी', घराहून वेगळा ठरलो ! जडत्व म्हणजे काय ? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व. पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा. व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची; जगाचे गूढ ज्याला कळते तो तत्त्वज्ञानी. सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे, तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्त्वज्ञान आहे. 'ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या' अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या, तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील; पण नामाचे महत्त्व कळणार नाही; ते एक संतकृपेनेच कळते. नामावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे; त्यानेच समाधान लाभेल.

ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते; ज्याच्या योगाने विरक्ति उत्पन्न होते, अनीतिचे वर्तन टाकून नीतिमार्ग, धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, तो सद्‍ग्रंथ; उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथभागवत, हे ग्रंथ वाचून सदोदित त्यांचे मनन करणे, हेच फार जरूरीचे आहे. त्याने ईश्वरप्रेम उत्पन्न होते.


१७६. अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत,
पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे.