प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२८ जून

परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे.


    Download mp3

एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला, आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली. 'आता राजा आपली पूजा करील' असे त्याच्या मनात आले. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की, 'आपण एकटेच यावे.' त्याप्रमाणे, आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे; तसेच सद्‍गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे. 'मी कोण' याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच. अभिमान वाढविण्याकरिता देवाकडे नाही जाऊ. दुसर्‍याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे. पोराबाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे, हे परमार्थाचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी, आणि आनंदात राहावे. अगदी निःस्वार्थबुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही. एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले, तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे, आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचे रक्षण करावे; ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे.

संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने, बंधने पाळावीत. स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झाले पाहिजे. ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो, त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात; त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो.

नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबर्‍याला चव कमी; तसे, जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. फार वाचू नका; जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा; आणि ते कृतीत आणा. जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.


१८०. सर्व काही करावे । पण खरे प्रेम साधनावर असावे ॥